विकास आश्रमाच्या आवारात सुलेखाने पाऊल टाकलं आणि इकडेतिकडे भिरभिरल्या सारखी पाहू लागली .
आश्रमाच्या मधला भाग मोकळा होता आणि त्याला लागून बाजूलाच काटकोनामध्ये लहान लहान खोल्या होत्या. खोल्यांच्या बाहेरच्या व्हरांड्यात काही मुली लिहीत बसल्या होत्या तर काहीजणी बैठे खेळ खेळत होत्या. सुलेखाला पाहून मुली तिच्या जवळ धावत आल्या .कुणी तिला हात लावून पहात होतं, तर कुणी तिचा फ्राॕक ओढत होतं. सगळ्यांनाच या नविन मुलीशी बोलायची उत्सुकता होती. तिला मात्र कोणाशीच बोलावेसे वाटत नव्हते. डोळ्यातले अश्रू कधी बाहेर येतील याचा नेम नव्हता.इतक्यात भंडारी बाई लोखंडी दरवाजा लावून आत आल्या. दाराच्या बाहेर तिची बेबीआत्या उभी होती. आत्याला सोडून आपल्याला आता इथेच रहायचंय हे लक्षात येताच ती ओक्सबोक्शी रडू लागली. भंडारी बाईंनी तिला जवळ घेतलं,“ चल तुला तुझी खोली दाखवते “ आणि तिला घेऊन त्या खोलीत आल्या. खोली छोटीशीच होती. रंग उडालेल्या भिंती ,दोन गाद्या,त्यावर जुन्या मळकट चादरी आणि एक ट्रंक असं सामान तिथे होतं. खोलीतल्या दुसऱ्या गादीवर तिच्याएवढीच एक मुलगी चित्रं काढत बसली होती. पण या सगळ्याकडे पाहण्याएवढी तिची मनःस्थिती चांगली नव्हती.सुलेखा सुन्नपणे खाली बसून राहीली. भंडारीबाईनी " उषा, ही सुलेखा, आजपासून तुझ्या बरोबर राहील, तिला आश्रम दाखव आणि नियमही समजावून सांग " असं सांगून तिला सोडून त्या निघून गेल्या. तिला कोणाशीच बोलावसं वाटत नव्हतं. अवघं चौदा वर्षं वय होतं तिचं पण या वर्षांत काय पाहीलं नव्हतं तिनं?
उगार सारख्या छोट्याशा गावात तिची आई, वडील आणि ती असं छोटं कुटुंब तिला चांगलं आठवत होतं . खरं तर आई शिक्षीका आणि वडील पोस्टात एवढं कारण सुखी कुटुंबाला पुरेसं होतं. पण आत्ता मात्र तिला आठवत होतं ते वडलांचं दारू पिऊन येणं आणि आईला गुरासारखं बडवणं . अवघ्या दहा वर्षाच्या तिला काय करावं ते समजतही नसे .तरी पण ती तिच्या इवल्याश्या हातानी आईला वाचवायला बघायची आणि स्वतःच मार खायची .आई आणि ती कित्येकदा वडलांच्या हातून कशाबशा सुटून स्वयंपाकघरात दार लावून थरथर कापत बसलेल्या असत. आत्ताही त्या रात्री तिच्या डोळ्यासमोर जशाच्या तशा आल्या आणि ती शहारली. या सततच्या मानसिक त्रासामुळे आई आजारी पडली. तिच्या डोळ्यासमोर आईचे हॉस्पिटल मधील शेवटचे दिवस,तिचा विदीर्ण चेहरा आला. तो दिवस ती कधीच विसरू शकणार नव्हती.आईचं बोलणं तर तिला जसंच्या तसं आठवत होतं . सततच्या ताणाने आईला क्षयाचा आजार जडला व झपाट्याने हाताबाहेर गेला. तिला सरकारी इस्पीतळात दाखल केलं. जवळ राहणाऱ्या रमाकाकूने तिला तिच्या घरी नेले होते. जवळजवळ दहा दिवसांनंतर आईला भेटायला ती आणि काकू हाॕस्पीटलमधे गेले. तिला आईकडे पाहून धक्काच बसला. आईचा या दहा दिवसांत अक्षरशः हाडांचा सापळा झाला होता. खोकून खोकून तिची छाती दुखत होती.डोळे आत खोलवर गेले होते.इतकं असतानाही सुलुला पाहून तिच्या चेहर्यावर आनंद पसरला. खोकत खोकतच आई म्हणाली , "सुलु माझं बोलणं ऐकतेस ? माझं आता काही खरं नाही, मी काही जास्त जगत नाही. पण मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन एक. आत्ताच्या आत्ता घरी जा, तुझे जे कपडे सापडतील तुला ते घे आणि रमाकाकूकडेच रहा. मी गेल्यावर बाबांकडे रहायचे नाही हे लक्षात ठेव. एक वेळ भिक माग पण या माणसाकडे राहू नकोस. रमाकाकू तुझी व्यवस्था करेल. लगेच निघ, वेळ घालवू नकोस. राणी, माझे आशिर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत . सांभाळ स्वतःला." आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं, सुलेखाही ओक्साबोक्शी रडायला लागली. खरं तर तिला आईजवळच बसायचं होतं पण आईने तिला हॉस्पिटलमधून अक्षरशः हाकलून लावले. घरी जाऊन तिने मिळतील ते कपडे एका पिशवीत कोंबले आणि रमाकाकूबरोबर जायला निघाली. त्या इवल्याश्या जीवाला काहीच समजत नव्हतं. फक्त आईने सांगितलेलं ऐकायचं एवढंच तिला माहीत होतं. तो रस्ता तिला इतका लांब वाटत होता की संपता संपेना. त्या दिवसानंतर मात्रं तिचं सगळं आयुष्यच जणु बदलून गेलं. आईचा चेहरा तिने त्यानंतर कधीच पाहीला नाही. एकाच गावात काकूचे घर होते. बाबांनी तिथे येऊन तिला घेऊन जायचा प्रयत्न केला, दारुच्या व्यसनापायी सुलेखाला विकायलाही तिचे वडील मागे पुढे पाहणार नाहीत या भितीने काकूने तिला बंगलोरला अनुआत्याकडे नेऊन पोचवलं. इतक्या लांब ते पोचू शकणार नाहीत असं सर्वाचं मत पडलं.
बंगलोरला आली आणि तिचं एकदम वेगळं आयुष्य सुरु झालं, कल्पनेच्याही पलीकडचं. इतक्या दूर आल्याने आईची आठवण येऊन तिला खूप रडू येत असे. त्यातच आई गेली हे आत्या कोणालातरी सांगत असताना तिने ऐकलं आणि ती हमसून हमसून रडू लागली. हे सगळं काय होतंय हे तिला कळतच नव्हतं. बंगलोरच्या अनुआत्त्याकडे ती काही वर्षं राहीली. आत्याचं घर म्हणजे दोन खोल्या. लागुनच असलेल्या आवारात चिंचेचं मोठ्ठं झाड होतं. त्याला खूप चिंचा लागलेल्या होत्या. आत्याच्या बाजूला दोन तीन बिर्हाडं होती. सगळी मुलं या झाडाखाली खेळायची. सुलेखाचं अजिबात मन लागायचं नाही , संध्याकाळ झाली की तिला झाडाखाली जायची भिती वाटायची. आत्याला दोन मुली होत्या. आई असताना ती एकदा अनुआत्याकडे आली होती तेव्हा दोन्ही तायांशी सुलेखाची चांगली गट्टी जमली होती. आत्याने पण तिचे खूप लाड केले होते. सुरवातीचं वर्ष बरं गेलं पण आई गेल्यावर आत्याचं सुलेखाशी वागणं बदललं. तिचे दिवसंच बदलले. सख्खया आत्याकडून दुजाभाव होऊ लागला. आत्याने तिला सरकारी शाळेत घातलं. तिथे मुलींना शिक्षण मोफत होतं. आत्या सरकारी इस्पीतळात नर्स होती आणि अप्पाकाका , आत्याचे यजमान, खासगी नोकरीत होते. स्वतःच्या मुलींना ताजं खाणं द्यायचं आणि तिला मात्रं उरलेलं शिळं अन्नं असं चालू झालं. घरातील सगळं काम शाळा सुटल्यावर तिला करावं लागे. तिला इतक्या कामाची सवय नव्हती. तिच्यापेक्षा थोड्याच मोठ्या असलेल्या बहिणींचे कपडे धुणे, घडी करण्यापासून सगळी कामं केली तरच तिला खायला मिळे. तिला अभ्यासालाही वेळ मिळत नव्हता. पाहता पाहता वर्ष उलटलं.या वर्षात कोणी तिच्याशी धड बोललंही नाही. तिला एकटं रहायची सवय लागली होती. ती सतत विचारात गढून गेलेली असायची, आईची आठवण येऊन खूप रडायला यायचं. त्यातच अलीकडे तिला खूप भूक लागायला लागली. शरीरातही काहीतरी बदल होत आहेत हे तिला जाणवत होतं.सारखं आरशात पहावं असं वाटायचं. “उफाड्याच्या अंगाची झालीये आपल्या आईसारखी” असं आत्या फणकारत म्हणायची. तिच्या उमलत्या तारुण्याकडे सर्वांचंच लक्ष जात होतं. ती स्वतःही त्यामुळे खूप भांबावलेली, गोंधळलेली असायची. तिला लाज वाटायची. मासिक पाळीही नुकतीच सुरु झाली. घरात खायलाही नीट मिळायचं नाही. प्रेमाचे दोन शब्द तिच्या वाट्याला येत नव्हते. पण एवढ्यावरच तिचं दुदैव संपायचं नव्हतं. आजही तिला ती भयंकर रात्र जशीच्या तशी आठवत होती .
आत्याची काही वेळा रात्रपाळी असायची. त्या दिवशी पण तिची रात्रपाळी होती. दोन्ही ताई कॉटवर झोपल्या होत्या . ती जमिनीवर नेहमीप्रमाणे सतरंजीवर चादर पांघरून झोपली होती. थकल्याने पडल्या पडल्या तिला गाढ झोप लागायची. त्या रात्री अचानक तिच्या पांघरुणात कोणी तरी शिरलं, तिच्या शरीरावरुन कोणाचातरी हात फिरायला लागला. हे काय होतंय ते तिला समजेचना. ओरडण्यासाठी तिने तोंड उघडलं पण त्या व्यक्तीने तिचं तोंड दाबून धरलं होतं. खूप धडपडली तेव्हा ती व्यक्ती बाजूला झाली. तिला धक्का बसला. ते अनुआत्त्याचे यजमान, तिचे अप्पाकाका होते. बसलेल्या धक्यातून ती सावरूच शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पाकाकांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, जणु काही काल रात्री काही घडलेच नाही. तिला काय करावे, कोणाला सांगावे काहीच सुचेना. रोजच्यासारखेच तिच्याशी ते बोलत होते . तिचं कामात लक्षंच लागेना , कामात चुका होऊ लागल्या . दुसऱ्या रात्री परत तोच प्रकार, ज्यावेळी आत्याची रात्रपाळी असायची त्या वेळेसच बरोब्बर हा घृणास्पद प्रकार चालु झाला. तिने आत्याला सांगायचा प्रयत्न करुन पाहीला, आत्याला ते समजलं नाही ? का तिला सांगणं जमलं नाही माहीत नाही पण आत्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं . आता तर घरात एकटं थांबायचीही तिला भिती वाटायला लागली. रात्रं झाली की ती घाबरायची. भितीने तिची झोपच उडाली होती. सकाळी शाळा, नंतर घरातली कामं आणि रात्रीचा हा त्रास यामुळे तिचं अभ्यासातलं लक्ष उडालं. शाळेत कोणाशी बोलायची इच्छाच राहीली नाही, नुसती उदास बसून असायची. वर्गातल्या मुली काही बोलल्या तर रडायलाच लागायची. बाईंकडून वर्गात लक्ष नसल्याने ओरडा खायची तो वेगळाच. ही गोष्ट कोणाजवळ बोलायची सोय नव्हती. सांगीतलं असतं तरी तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नसताच हे तिला कळत होतं. हे अनेक महिने चालु होतं. शेवटी जो परीणाम व्हायचा होता तो झालाच. ती आठवीत नापास झाली. घरी आल्यावर आत्या खूप संतापली होती. “ पदरचा पैसा खर्च करून तुला शाळेत घातलं आणि काय दिवे लावलेस ? लक्ष कुठे असतं तुझं ? तुझी आई निघून गेली तुला माझ्या डोस्क्यावर बसवून, दादा बसलाय तिकडे दारु पित आणि आम्ही सांभाळतोय याच्या मुलीला.नसती ही पिडा लागलीये माझ्या राशीला. काय काय म्हणून करायचं मी? आता तुला मी माझ्या घरी ठेवत नाही, बास झालं. तुझी एखाद्या आश्रमात सोय करते थांब.”. त्यातच भर म्हणून तिच्या वडलांना ती बंगलोरला असल्याचा सुगावा लागला मग काय अनुआत्याला निमीत्तच मिळालं. पुण्यातल्या दुसर्या आत्याकडे म्हणजे बेबी आत्याकडे सुलेखाला पाठवायची तिची तयारी सुरू झाली. बेबी आत्याने मात्र तिला ठेवून घ्यायला पूर्ण नकार दिला . तिची मैत्रीण पुण्यातील एका बालिकाश्रमात विश्वस्त होती. आत्याने तिच्या ओळखीने सुलूला तिथे ठेवायची तयारी दाखवली. अनु आत्यानेही सुलुला अप्पाकाकांबरोबर ताबडतोब बसने पुण्यात बेबीआत्याकडे पाठवलं. बसमधेही काकांनी स्पर्श करण्याची संधी सोडली नाही. अप्पाकाकांच्या या वागण्याने सुलुच्या त्या नाजूक वयात पुरुषांविषयी कायमचा राग , स्पर्शाविषयी किळस आणि तिरस्कार निर्माण झाला.
पुण्यात काय वाढून ठेवलंय हे तिला माहीत नव्हतं पण अप्पाकाकांपासून सुटका मिळणार या कल्पनेनेच ती आनंदी होती. वडीलांपासून सुरक्षित ठेवायचंय या निमीत्ताने आत्याने तिला अनाथाश्रमात काही वर्षांसाठी ठेवायचे ठरवले.ती सुलेखाला घरी ठेवून घेउ शकली असती पण वयात आलेल्या सुलेखाची जबाबदारी कोणालाच नको होती.
“ ए, नाव काय गं तुजं? मी उषा हाय,लई टिमटिम नाई चालत इथं. मी म्हनंल तसंच रहायचं या खोलीत, काय?” खोलीतल्या दुसर्या मुलीचं, उषाचं बोलणं ऐकून ती दचकून भानावर आली. आश्रमाच्या खोलीत ती आत्ता उभी होती. उदास मनाने तिने खोलीत सामान लावले.काही दिवस तर तिथले नियम , जेवणाच्या वेळा, पध्दत समजून घेण्यात गेले. भंडारी बाईंनी तिला बोलवले, ” सुलेखा, सगळं नीट समजुन घे बाकीच्या मुलींकडून. इथे जेवण, चहा, नाश्ता यांच्या वेळा ठरलेल्या असतात. घंटा वाजली की जेवणघरात रांग लावायची. आपलं ताट, वाटी, कपडे धुवून टाकायचे. सकाळी सहाला उठावं लागतं इथे. सात वाजता प्रार्थना असते. बाकी तुझ्या खोलीत राहणारी उषा आहे ना तिच्याकडून समजून घे. समजलं का?”
आश्रमातील तिचे दिवस सुरु झाले. सुरवातीला खूप गोंधळ्यासारखी झाली खरी पण हळूहळू सुलू सरावली. इतर मुली आपल्यासारख्याच किंवा आपल्यापेक्षा जास्त त्रास सोसून आल्या आहेत हे तिच्या लक्षात आलं. तिच्या बरोबर खोलीत राहणारी मुलगी उषा तर बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीतून आली होती. आश्रमात पहाटे लवकर उठावे लागत असे. मुली जास्त आणि न्हाणीघर कमी, उठल्यापासूनच भांडणांना सुरवात व्हायची. इथे रहायचं असेल तर आपल्यला आक्रमक व्हावं लागेल हे काही दिवसातच तिच्या लक्षात आलं. पण तिचा स्वभाव पडला शांत आणि साधा .मुलींना खूप भूक लागायची. पण खाण्याच्या ,जेवणाच्या वेळा ठरलेल्या असायच्या. जेवणही मर्यादीत असे. त्यामुळे मुली बिस्कीटं, खाणं वगैरेची चोरी करायच्या. सकाळचं खाणं, जेवण यासाठी घंटा वाजायची. घंटा वाजली की आपली ताटली घेऊन पळत जेवणखोलीत जाऊन रांगेत उभं रहायचं. पुढचा नंबर लागला तर निदान बरं जेवण तरी मिळायचं. शेवटचा नंबर असेल तर पातेल्यात उरलेलं जे असेल ते आणि तेवढंच खायला मिळे. काही दिवसातच सुलेखा आरडाओरडा करुन रांगेत पुढे उभं रहायला शिकली. यामधे तिच्या खोलीतली उषा तिची गुरु झाली. शांत आणि साधी असलेली सुलेखा इथे काही महिन्यातच आक्रमक, अन्यायाला प्रतिकार करणारी बनली. आश्रमाने तिला जीवन जगण्याचे बरेवाईट दोन्ही धडे दिले. उषाला इथे येऊन दोन वर्ष झाली होती. तिची आई जिथे रहात होती तिथल्याप्रमाणे तिच्या तोंडात शिव्या असायच्या. सुलेखाही आता शिव्या द्यायला शिकली. बर्याच वेळा आश्रमात पाहुणे खाऊ घेऊन यायचे. सगळा खाऊ एका कपाटात ठेवला जाई. कपाटाला कुलूप असे. पण हा खाऊ चोरण्यात उषा पटाईत होती. सुलेखालाही खूप भुक लागायची. ती पण चोरी करायला लागली. आश्रमातल्या मुलींना जवळच्याच मुलींच्या शाळेत घातलं होतं. उषा आणि ती दोघीजणी नववीच्या वर्गात होत्या. शाळेत जाता येता मुलं खूप छेडखानी करायची. उषाची आई काय करते आणि या मुली आश्रमात राहतात हे त्या मुलांना माहीत झालं होतं.पण त्यांच्याबद्दल तक्रार करायची सोय नव्हती नाहीतर त्यांची शाळा बंद झाली असती. त्यांना अभ्यासात फारसा रस नव्हता पण तेवढंच आश्रमाच्या बाहेर पडायला मिळायचं. उषाकडे एक त्यांच्यापेक्षा मोठा मुलगा जायच्या यायच्या रस्त्यावर एकटक पहात उभा असायचा. उषाच्याही ते लक्षात आलं होतं. हळूहळू दोघेजण बोलायला लागले. सुलेखाच्या नादी मात्रं मुलं लागत नसत. कोणी पहात असलं तर ती त्याला शिव्याच द्यायला सुरवात करे. तिला मुलांचा फार राग यायचा. अप्पाकाकांच्या अनुभवावरुन तिला कोणावरच विश्वास उरला नव्हता. उषालाही ती खूप थांबवायचा प्रयत्न करायची.” कशाला त्या पोराच्या मागे लागती गं? एक दिवस फसवून निघून जाईल ××” पण काहीच उपयोग झाला नाही. तिचं त्याच्याशी बोलणं, शाळा बुडवून त्याच्याबरोबर जाणं चालूच होतं. उषा त्याच्या प्रेमात पडली होती .शाळेतनं आल्यावर आश्रमात कामंही खूप करायला लागायची. झाडलोट, स्वच्छता, कपडे, भांडी धुणं, स्वयंपाकाला मदत अशी कामं असली तरी प्रत्येकाची पाळी लाऊन दिलेली असायची. अनुआत्या तर भेटायलाही यायची नाही. अभ्यासात तिची फारशी प्रगती नव्हती. पण ती नापासही होत नव्हती. नववी पास होऊन दहावीचं वर्ष सुरु झालं. उषाही नववीत अगदी काठावर पास झाली होती. ती त्या मुलाच्या बरोबर बर्याच वेळा शाळा बुडवून जात असे. एक दिवस ती जी त्या मुलाबरोबर गेली ती परत आलीच नाही. आश्रमात गेल्यावर बाईंनी जेव्हा त्यांची खोली तपासली तेव्हा तिचे कपडे गायब होते. एकच हाहाकार माजला. सुलेखाला माहीत असणार म्हणून तिची कसून चौकशी सुरु झाली. पोलीसात तक्रार दाखल केली गेली. पण याची शिक्षा म्हणून सुलेखाची शाळा बंद झाली. आश्रमात अभ्यास करुन सुलेखाने बाहेरून दहावीची परीक्षा दिली. पळुन गेलेली उषा सहा महिन्यात परत आली तेव्हा तिची अवस्था पाहवत नव्हती. ती तीन महिन्याची गरोदर होती. कायम हसणारी , भांडणारी उषा एकदम शांत झाली होती. ती सतत रडत असायची. तिला पाहून सुलेखाला खूप वाईट वाटले. आपण आयुष्यात असा आततायी निर्णय कधीही घ्यायचा नाही हे तिने मनाशी पक्के केले. दहावीला फार मार्क पडले नाहीत तरी सुलू पहील्या झटक्यात पास झाली. उषाकडे पाहून आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे हे तिच्या लक्षात आलं. आपण आई सारखं शिक्षिका व्हायचं हे तिने मनाशी ठरवलं. बारावी झाल्यावर बी एड करता येईल असं आश्रमातल्या एका शिबिरात तिला समजलं. यात अडचण एकच होती . अठरा वर्ष पूर्ण होईपर्यन्तच ती इथे राहू शकत होती. नंतरची तीन वर्ष आपण आत्याला समजावू या विचाराने तिने पूढे शिकायला सुरवात केली . ती बारावीत मात्र चांगल्या मार्कांनी पास झाली. नाइलाजाने अनुआत्या तिला घ्यायला आली. पुढे काय करायचं यावर सुलु तिच्याशी बोलणार त्याआधीच बेबीआत्या आणि अनुआत्या यांची फोनवरची चर्चा तिने ऐकली. बेबीआत्या म्हणत होती,” तु इतके वर्ष सांभाळलंस तिला. पण किती काम करुन घ्यायचीस माहीतीये मला. ती आता अठराची झालीये पूर्ण, सरळ लग्नं लाऊन देऊ आणि मोकळे होऊ. कोण ठेवून घेणार ही ब्याद. मी तिच्यासाठी स्थळ पाहते, याहून जास्त काही माझ्याच्याने होणार नाही सांगून ठेवते. माझी पण मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे.” हे बोलणं ऐकलं आणि सुलु सुन्न झाली. आपण कोणालाच नकोय ही भावना फार वाईट असते. आई नसेल तर जगात कोणीच आपलं नसतं हे एक सत्य आहे याची जाणीव क्षणोक्षणी तिला होत होती. एक दिवस बेबीआत्याने तिला जवळ बोलवले, “ हे बघ सुलेखा, तु माझ्या भावाची मुलगी आहेस. तुला सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणूनच तुझं लग्नं करुन देणार आहोत आम्ही पण याहून जास्त अपेक्षा ठेवू नकोस माझ्याकडून. माझ्या मुलांची शिक्षणं व्हायची आहेत." .
आत्याने मुलगा पाहायला सुरवात केली आणि फारशी धडपड न करता कोणीतरी माधवचं स्थळ सुचवलं. माधव बारावी पास झाला होता. एका डाॕक्टरांच्या क्ष किरण तपासणी करणार्या दवाखान्यात सहायक म्हणून काम करत होता. सुलेखाला तो आवडला आहे की नाही हे विचारण्याची तसदी कोणीच घेतली नाही. तिला न विचारता तिचं लग्नं सर्व आत्या व काकांनी मिळून ठरवलं. माधवची आणि तिची भेटही झाली नव्हती. त्याच्या घरची माहिती तिला नव्हती, तिने माधवला धड पाहीलेही नव्हते. पण सुलेखाजवळ आता हे लग्नं करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. अगदी थोड्या माणसांमधे आणि थोडक्यात लग्नं उरकल्यावर दोन्ही आत्या तिला म्हणाल्या, “सुलेखा, आता आमची जबाबदारी संपलीये. सासरी नीट रहा, सगळ्यांशी जमवून घे आणि जमलं नाही तरी आमच्याकडे परत येऊ नकोस, आम्ही तुला यापुढे मदत करु शकणार नाही. आता तु आणि तुझं नशीब”. सुलेखाला खूप रडायला येत होतं ते त्यांच्या बोलण्यामुळे की त्यांना सोडून जातोय म्हणून हे तिला समजेना.
सुलेखा सासरी आली. माधवचं सोमवार पेठेत दोन खोल्यांचं भाड्याचं घर होतं. तिच्या सासुबाई , सासरे गावातल्या घरात रहायचे. ह्या घराला, माणसांना आपलं मानून रहायचं, माधवला सुखात ठेवायचं, सासु सासर्यांची सेवा करायची असं तिने मनोमन ठरवलं.दुसर्या दिवशी सत्यनारायण झाल्यावर सगळे पाहुणे घरी गेले. सासुसासरे आठ दिवसांनी जाणार होते. सासुबाई जरा कडक स्वभावाच्या होत्या. पाहुणे गेल्यावर माधवची आणि तिची झोपायची व्यवस्था स्वयंपकघरात केली होती. सुलेखा गादीवर धडधडत्या हृदयाने लाजून बसली होती. कधीतरी सिनेमात पाहीलं होतं तसा माधव जवळ येईल,बोलेल, आपल्यावर प्रेम करेल आणि आपण आधीची सगळी दुःख विसरुन जाऊ असं तिला वाटत होतं. तिचं सगळं लक्ष दाराच्या आवाजाकडे लागलं होतं. इतक्यात माधव दार लाउन आत आला आणि तिच्याजवळ बसला. खाली मान घालून तो काहीतरी बोलेल याची ती वाट पाहू लागली. माधवने मात्र काहीही न बोलता तिच्या पदरालाच हात घातला. त्याच्या त्या स्पर्शाने तिला अप्पाकाकांची तीव्रतेने आठवण झाली आणि नकळतच तिने त्याचा हात बाजूला केला. तिच्या या कृतीने माधव संतापला, त्याचा अहंकार दुखावल्यासारखा झाला.तिला जोरात थप्पड मारुन संतापाच्या भरात नाही नाही ते बोलु लागला “मला हात लाउन देत नाहीस? मला?नवरा आहे मी तुझा , मालकी हक्क आहे माझा तुझ्यावर. मला नाही म्हणतेस काय?कोण दुसरा यार आहे का काय आधीचा? बघु कशी ऐकत नाही. माझा हात झटकते काय?” ती काही बोलायचा प्रयत्न करत होती पण तिची पर्वाही न करता जबरदस्तीने आपला कार्यभाग त्याने उरकला आणि झोपून गेला. सुलेखाला जबरदस्त मानसिक धक्का बसला. रात्रभर ती सुन्नपणे नुसती बसून होती. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्व कामाची जबाबदारी सासुबाईंनी तिच्यावर सोपवली. कामात दिवस तर उलटला पण जसजशी रात्रं जवळ यायला लागली तसतशी तिला भिती वाटायला लागली. काम करतानाही रात्रीची आठवण येऊन ती थरथरत होती. परत एकदा त्याच रस्त्यावरुन मी चाललीये का?. दिवसा काम, रात्रीची भिती, नकोसा स्पर्श, प्रेमाचा अभाव आणि काळेकुट्ट भविष्य, हेच तिचं नशीब होतं? विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं. आठ दिवस झाले आणि सासुसासरे गावी परत गेले. सुलेखाचा मात्र परतीचा मार्ग बंद झाला होता. तिला आपल्या आईसारखं होऊ पाहणारे आयुष्य अजिबात मान्य नव्हतं. माधवकडून होणारा अन्याय ती सहन करणार नव्हती. रात्र झाली. रोजच्यासारखा माधव तिच्याजवळ आला. सुलुने विरोध करताच त्याने तिच्यावर हात उचलला. तो हात वरचेवर पकडून ती म्हणाली," मला मारायला हात उचलायचा नाही आणि माझ्या मर्जी विरूद्ध मला हातही लावायचा नाही". तो काही बोलायच्या आधीच ती म्हणाली," मला सगळे कायदे माहीत आहेत". तिचा रणरागिणीचा अवतार पाहून माधव वरमला आणि कुशीला वळून झोपून गेला. सुलुला विश्वासच बसेना, आश्रमात शिकलेले जीवनाचे धडे प्रत्यक्षात येऊ पहात होते. गालातल्या गालात हसत ती सुध्दा खूप दिवसांनी शांत झोपली.
दुसऱ्या दिवशी सकाळी माधव उठला तेव्हा स्वयंपाकघरात सुलू गाणं गुणगुणत चहा करत होती. तो जरा घाबरतच आत गेला. सुलुने प्रसन्न हसत गरम गरम चहाचा कप त्याच्या हातात दिला. दिवसाची सुरवात छान झाली होती. तिचं नशीब ती बदलणार होती , त्याची सुरवात तिने केली होती. तिचं भविष्य तीच घडवणार होती...तिला हवं तसं. स्वयंपाक घरातील रेडिओवर गाणं चालू होतं.. नसीब होगा मेरा मेहरबा कभी ना कभी
अंजली विश्राम जोगळेकर
