Shabdanjali......शब्दांजली

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

वर्तुळ

                            


"आई, ए आई, बाहेर ये लवकर. आई, अगं किती वेळ आंघोळ करतीयेस ?"
दारावर जोरजोरात थापा मारत  सीमा ओरडली ," आई "
"अगं , हो हो. काय झालंय काय एवढं ओरडायला? आकाश कोसळल्यासारखी का ओरडतीयेस? येते थांब जरा, कपडे तर घालु देत मला "
" ए आई, आता लवकर बाहेर ये ना, तुला काहीतरी सांगायचंय, खूप आनंद होईल तुला. म्हणून म्हणतीये, पटकन ये. कुडता अडकव आणि  सलवार बाहेर येऊन घाल "
मिनल लगबगीने बाहेर आली. "काय करायचं या मुलीला, जरा म्हणून धीर नाहीये हिला" मनाशी पुटपुटत असतानाच सीमाने तिचे दोन्ही हात धरले       "आई , आज विद्यापिठात एका कंपनीमधे निवड झालीये माझी आणि ती सुद्धा  TCS मधे,बघ, आहे ना चांगली बातमी?"
" काय ? सांगतेस काय? निवड झाली ? दोनच दिवसांपूर्वी झाली होती ना मुलाखत?"
"हो पण  आई, तुझी मुलगी हुशार आहे म्हटलं. आज त्यांनी निवड झाल्याचे कळवलं सुध्दा. पगार पण एकदम भारी आहे. खूप खुश आहे मी आज, सगळं श्रेय फक्त आणि फक्त तुला आहे आई.किती कष्ट घेतलेस माझ्यासाठी. आज घरी काहीही करु नकोस. आज आपण दोघी मस्त जेवायला जाऊ या बाहेर, खरेदी करु. ही बातमी साजरी करु या"
" थांब देवाजवळ साखर ठेवते आधी" भरलेले  डोळे लपवत मीनलने देवाजवळ जाऊन दिवा लावला, साखर ठेवली. डोळे बंद करुन ती उभी राहीली  " पोरीनी चिज केलं कष्टाचं, आता मला काळजी नाही. आता निवृत्त झाले तरी हरकत नाही."

डोळे बंद करुन देवासमोर बसल्या बसल्या काय काय आठवायला लागलं तिला. किती वर्ष झाली बरं त्या गोष्टीला ? सिमा दिडच वर्षाची होती जेमतेम . त्या दिवसानंतर न नितीनने न त्याच्या आईने तिच्याकडे किंवा सिमाकडे वळून पाहीलेही नाही,  ना तिला भेटायचा प्रयत्न केला.आज जवळजवळ अठरा वर्षे उलटून गेली असतील त्याला. देवासमोर उभं राहताना ती वर्ष आत्ताच उलटून गेल्यासारखं वाटलं तिला.

मिनलचं लग्नं विसाव्या वर्षीच झालं . तिचं माहेर फार काही श्रीमंत नव्हतं . खाऊनपिऊन सुखी असं म्हणता येईल. वडील एका छोट्या  कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कामाला होते. आई घरीच असायची. तिला एक लहान भाऊ होता, उमेश. मीनल अभ्यासात खूप हुशार, तिला खरंतर इंजिनीयर व्हायचं होतं पण  आर्थिकदृष्ट्या  परवडणारं नाही आणि मुलीपेक्षा मुलाला इंजिनीयर केलेलं बरं या विचाराने  तिला आईदादांनी  विज्ञान शाखेत तरी  पाठवलं.  म्हणूनच संगणक ह्या तिच्या आवडत्या विषयात तिला विशेष श्रेणी मिळवता आली.मात्र त्याच वर्षी  उमेशला कमी गुण असूनही  दादांनी कंपनीतून कर्ज काढले आणि पैसे भरुन त्याला इंजिनीअरींगला टाकलं तेव्हा मिनलला थोडं वाईट वाटलं. मिनलची पुढे शिकायची, नोकरी करायची खूप इच्छा होती पण दादांनी तिचं लग्नं करुन द्यायचं ठरवलं. नितिनचं स्थळ दादांच्या साहेबांनीच सुचवलं असल्याने बोलायची सोयच नव्हती.. एकुलता एक असलेल्या नितीनला इलेक्ट्राॕनीक्स या विषयात पदविका मिळाली होती  आणि एका मोठ्या प्रतिथयश  कंपनीत तो चांगल्या पदावर होता. घरी फक्त  त्याची आई आणि तो असे दोघेच जण.कोणतीही जबाबदारी नसलेला नितीन मीनलसाठी योग्य वर ठरला आणि तिचे लग्नं त्याच्याशी तिची पसंती विचारात न घेताच  दादांनी  लाऊन  दिले. खरं तर लग्नाआधी मिनलला नितीनशी बोलायचं  होते, त्याचा स्वभाव जाणून घ्यायचा होता पण "काही गरज नाहीये बोलायची बिलायची" असं म्हणून आईने तेही करु दिले नाही.

नितिनच्या घरी ती आली. घर छोटंसं पण तिघांना पुरेल असं होतं. तिला ते खूप आवडून गेलं. 'या छोट्या घरात आपण  स्वर्ग निर्माण करु' तिनं मनाशीच ठरवलं. पुजा आटोपली आणि सासुबाइंनी तिला नितीनच्या खोलीत झोपायला पाठवलं. धडधडत्या हृदयाने, लाजत ती पलंगावर येऊन बसली. पहिल्या रात्रीची कितीतरी स्वप्नं तिने पाहीली होती. नितीनची वाट पहात असतानाच तो आत आला आणि धाडकन दार लाऊन टाकले." आई पण फारच करते. पुजा होईपर्यंत कशाला थांबायचं? पहिल्याच रात्री का नाही पाठवलं तुला?" दिवा मालवून तो तिच्याजवळ आला . त्याचे शब्द ऐकायला ,  हळुवार स्पर्श अनुभवायला ती अधीर झाली होती. पण तिला काही कळायच्या आधीच त्याने एकही शब्द न बोलता  त्याला हवे असलेले सुख शब्दशः ओरबाडून घेतले आणि  मान वळवून  झोपूनही गेला. सुन्न झालेली मिनल   दुखावलेले मन घेऊन रात्रंभर जागीच होती. अशी असते पहिली रात्रं?   दुसर्या दिवशी दिवसभर सुजलेले डोळ्यांनी ती घरात वावरत होती. सासुबाईंच्या नजरेला नजर मिळवणं तिला अवघड झालं होतं. दुसर्या रात्री तिला खोलीत जावंसं वाटेना. त्या रात्रीही परत तोच प्रकार. पुढच्या  दहा दिवसात एकही जास्तीचा शब्द नितीन बोलला नाही की तिची चौकशी केली . तिला आता रात्रच नको असं वाटायला लागलं.पाहता पाहता लग्नाला पंधरा दिवस झाले. त्या दिवशी दादा तिला माहेरपणासाठी न्यायला आले तेव्हा तिला खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर  मनातून सुटल्यासारखंच वाटलं. घरी पोचली तेव्हा आई तिची वाट पहात दारातच उभी होती. तिला पाहीलं तेव्हा पळत जाऊन मिनल तिला बिलगली. तिच्या गळ्यात पडून  हमसाहमशी रडायला लागली. " काय झालं बेटा, इतकी का रडतीयेस?"  काय होतंय ते तिला सांगताही येईना.  आईच्या शेजारी लग्नानंतर पहिल्यांदाच शांतपणे ती  झोपून गेली.  आईला काय आणि कसं सांगावे हे तिला कळेना. दुसर्या दिवशी संध्याकाळी नितीन तिला न्यायला आला. जावयाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं आईला झालं होतं. मीनल मात्रं  घरी परत जाताना हिरमुसूनच गेली. नितीनबरोबर घरी आली तेव्हा तिला खोलीत जावेसेच वाटेना. त्या असह्य रात्री आठवून आत्ताही मिनलच्या अंगावर काटा आला.

आईकडून आल्यावर रात्री मिनल खोलीत आली तेव्हा नितीन आंतरजालावर काहीतरी पहात बसला होता. तिला पाहताच त्याने पटकन संगणक बंद केला आणि तिच्या अंगावर ओरडला," किती वेळ लावतेस? ये लवकर ." त्याच्या वागण्यात , बोलण्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता.काय आहे आपले हे आयुष्य ? हे कायम असंच असणार आहे ? रात्रभर ती  मुसमुसत होती.  दिवसभर शांत असणारा नितीन  पण रात्रं झाली की त्याला काय व्हायचे माहीत नाही.  रात्रीच्या आठवणीने दिवसा  तिला न जेवण जायचं न कामात लक्ष लागायचं. तिचा आनंदी स्वभाव आता औषधालाही शिल्लक नव्हता. ती सतत तणावाखाली असायची. एवढी बुध्दीमान असणारी मीनल हतबल होऊन गेली. काय करावे, कोणाशी बोलावे तिला समजत नव्हते. इतकी खाजगी गोष्ट कोणाला सांगावी, कोण आपल्याला योग्य सल्ला देईल? विचार करुन ती शिणून गेली होती. त्याचं दुसर्यांसमोर  तिच्याशी असलेलं वागणं पाहून कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नसता. दिवसेंदिवस नितीनबरोबर रात्र  काढणं तिला अशक्य होत चाललं होतं.  पाहता पाहता वर्ष होत आलं. एक दिवस स्वयंपाकघरात काम करत असताना ती चक्कर येऊन खाली कोसळली. सासुबाईं तिला डाॕक्टरकडे घेऊन गेल्या .निसर्गाने आपलं काम चोख केलं होतं. नव्या जीवाची चाहुल लागली होती. पण याचा आनंद व्हायला पाहीजे की आता नितीनपासून सुटका नाही याचे दुःख हेच तिला कळेनासे झाले होते. सासुबाई मात्रं खूप खुश होत्या. त्या फारशा तिच्यामधे, तिच्या संसारात लुडबुड करायच्या नाहीत. त्या आणि त्यांचा पांडुरंग हेच त्यांचं विश्व पण ही बातमी ऐकून त्यांना खूप आनंद झाला. अगदी तिला कुठे ठेऊ नी कुठे नको असं झालं होतं त्यांना.नितीनही खुश होता पण त्यामुळे रात्रींमधे काही फरक पडला नव्हता. "मुलगाच व्हायला पाहीजे हां " आताशा  जाता येता तो तिला धमकावायला लागला तेव्हा मनातून थोडी ती धास्तावली. मुलगी झाली तर काय या विचाराने तिची झोपच उडाली. सातव्या महिन्यात आई न्यायला आली तेव्हा नितीन तिला पाठवायला तयारच नव्हता. पण सासुबाईंनी मात्र नशीबाने त्याचं काही  ऐकलं नाही आणि ती माहेरी आली. लग्नं झाल्यापासून पहिल्यांदाच  ती अशी रहायला आली होती. उमेशही काॕलेजच्या वसतीगृहात रहायला गेला होता. घरी आई आणि दादा दोघेच असायचे. त्यामुळे इथे  तनामनाने ती निवांत झाली. आपलं भविष्य कसं असेल, मुलगी झाली तर काय, आपण आपलं आयुष्य नितीनसोबत घालवू शकू? हे विचार करायला तिला आता  अवकाश मिळाला. तिने या विषयावर आईशी बोलायचं ठरवलं. रात्री अंथरुणावर पडली तेव्हा तिची आई तिच्याजवळ आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता  हसत म्हणाली, "झोप येत नाहीये वाटतं? नितीनराव आठवण काढताहेत बहुतेक "
" बरं झालं आई विषय काढलास, मला बोलायचंय तुझ्याशी"
" बोल ना बाळा, त्रास होतोय का काही? जाऊ यात का उद्या डाॕक्टरकडे ?"
" हो आई, त्रास होतोय गं मला पण बाळामुळे नाही, तुझ्या नितीनरावांमुळे"
"म्हणजे गं काय?"
" कसं सांगु आई तुला, समजत नाहीये. या गोष्टी बोलणं माझ्यासाठी खूप लाज आणणारं आहे पण आता मला बोलायलाच हवं"
" काय म्हणायचंय तुला मिनू, मला घाबरवतीयेस तु"
" आई, मन घट्ट करुन ऐक.  नितीनबरोबर राहणं माझ्यासाठी  अशक्य होत चाललंय"
"काय? काय मुर्खासारखं बरळतीयेस. नितीनराव किती चांगले आहेत, किती लाड करतात तुझे. तु इथे राहीलीस की सारखा फोन करुन तुला बोलवून घेतात आणि तु म्हणतेस तुला रहायचं नाही? माझ्याजवळ बोललीस इथपर्यंत ठीक आहे. दादांजवळ बोलू नकोस नाहीतर तंगडं तोडतील तुझं "
" आई, अगं मी काय म्हणतीये ते ऐकून तर घे आधी. मी असं म्हणतीये ते ही या अवस्थेत म्हणजे तसं काहीतरी झालं असेल ना? मी हे तुझ्याजवळ नाही बोलणार तर कोणाजवळ ? गेलं वर्षभर मी विचार करतीये कसं बोलू याचा. प्लिज माझं ऐकून घे"
" बरं, सांग काय झालंय ते"
" आई, नितीनबरोबर राहणं, रात्रं काढणं यापुढे मला शक्य नाही."
"काय बोलतीयेस? इतक्या खाजगी गोष्टी अशा बोलायच्या नसतात बाळा"
" माहीतीये मला आई पण माझा नाइलाज आहे. या गोष्टी मी दुसरीकडे बोलुच शकत नाही. नितीन खूप विकृत आहे आई. दिवसभर खूप चांगला असतो तो, माझे लाड करतो पण रात्रं झाली की त्याला काय होतं मला माहीत नाही. मी तुला स्पष्ट सांगु शकणार नाही पण तो ना, कसं सांगु मी तुला,तु असं समज की रोज माझ्यावर बलात्कार होत असतो, मला नाही सहन होत आई"
मोठ्या हिंमतीने शब्द गोळा करुन ती आईशी बोलली. आईलाही दोन मिनीटे काय बोलावं ते समजेना." हे बघ मिनु, सुरवातीसुरवातीला होतं असं. होईल नीट सर्व. आता बाबा झाला की नीट वागेल बघ "
" नाही गं आई, तो नाही बदलणार कधी आणि मी आता त्याच्यासोबत राहूच शकणार नाही"
" मग, काय करायचंय तुला?"
" आई, मी वेगळी होणार आहे त्याच्यापासून"
" काय? काय मुर्खासारखं बरळतीयेस. वेगळं होणार म्हणे. वेगळं होऊन राहणार कुठे?खाणार काय? इतकं सोपं नसतं सगळं . लोक काय म्हणतील? इतक्या चांगल्या मुलाला सोडलंस तर शेण घालतील तोंडात सगळेजण."
" चांगला ? आणि राहणार कुठे म्हणजे? इथे, तुम्ही मला  ठेउन घेणार नाही? खाण्याचं म्हणशील तर मी नोकरी करेन, पदवी आहे माझ्याकडे .थोडा प्रयत्न केला तर नक्की मिळेल मला नोकरी. आणि लोकांचं काय घेऊन बसतेस?"
" मिनु, माझ्याजवळ बोललीस इथपर्यंत ठीक आहे, बाबांजवळ बोलू नकोस, त्याच पावली तुला सोडून येतील. मी तुला स्पष्ट सांगते, रागावू नकोस. तुला मी इथे ठेवून घेऊ शकत नाही. तु इथे आलीस तर हजार प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावं लागेल, नातेवाईकांमधे बदनामी होईल शिवाय उमेशचं लग्नं व्हायचं आहे, तु घरी परत आलीस तर त्याला मुलगी कोण देईल? तु आपली बाळंतपण कर आणि घरी परत जा. सुधारेल नितीन हळूहळू . तो काही दारु पित नाही की तुला मारत नाही. "
आईचं बोलणं ऐकून मिनलला धक्का बसला. आईबाबांना उमेशची, त्याच्या लग्नाची काळजी आहे,मग मी कोण आहे ? मी नक्की त्यांचीच मुलगी आहे ना?   इथे आपल्याला कोणी ठेवून घेणार नाही, नितीनकडे परत जावं लागणार की काय? पण आता एक दिवससुध्दा त्याच्याबरोबर रहायची तिची इच्छा नव्हती. तिला नुकताच आठवा महीना लागला होता. अजून कमीतकमी तीन महीने तिच्याकडे होते. या तीन महीन्यात  काय तो निर्णय घ्यायला हवा याची जाणीव तिला झाली. नितीनपासून वेगळे व्हायचे असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक होते. सुदैवाने तिच्याकडे संगणका मधली पदवी होती. पण  येणार्या बाळालाही वेळ द्यायला हवा होता. पुढचे एक वर्ष तरी आपल्याला काहीही करता येणार नाही , आपल्याला नितीनकडे परत जावे लागणार या विचाराने ती निराशच झाली. महिनाभरातच तिने गोजीरवाण्या मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून रागाने  तिला पहायला नितीन आलासुध्दा नाही. अशा बुरसटलेल्या विचारांचा मुलगा इंजिनीयर कसा असु शकतो? मिनलला त्याची किव करावीशी वाटत होती. अकराव्या दिवशी बारसं करुन तिचं नाव सीमा ठेवलं. सीमाला पाहून तिच्या सासुबाई खूप खुश झाल्या. एक महिना झाला आणि दादांनी तिला नितीनच्या घरी आणून सोडलं. नितीनचं थोबाड पाहण्याचीही तिची खरं तर इच्छा नव्हती पण नाइलाज होता.

ती घरी आली तेव्हा नितीन कामावर गेला होता. गोड  सीमाला पाहून त्याचा राग नक्की  पळून जाईल असं मनोमनी तिला वाटायला लागलं. तो संध्याकाळी घरी आला तेव्हा सीमाला घेऊन ती त्याच्याजवळ आली. " नितीन, बघ किती गोड आहे आपली परी. तुझ्याकडे पाहून हसतीये बघ. ओळखलं वाटतं बाबांना शोनुलीने"
पण नितीनने तिच्याकडे ढुंकूनही पाहीले नाही आणि तो खोलीत निघून गेला. मीनलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रात्री जेवायला बसल्यावर खुसफुसत नितीन तिला म्हणाला " लवकर ये झोपायला".  कल्पनेनेच मिनलच्या अंगावर काटा आला. सिमाला घेऊन जड पावलांनी ती खोलीत शिरली . सिमा जागीच होती.   आत गेल्या गेल्या नितीनने खसकन तिला ओढले. " थांब ना जरा नितीन, तिला झोपवते आधी "
"काही नको झोपवायला, टाक तिला पाळण्यात आणि ये इकडे. इतक्या दिवसांचा उपास सोडायचाय मला."
तिचं काहीही न ऐकता नितीनने आज कळस गाठला. ठणकणार्या अंगाने ती सिमाला थोपटत राहीली.  दुसर्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे काम करत असतानाच यातून कसं बाहेर पडायचं , कोणाची मदत घेता येईल हे विचारचक्र तिच्या डोक्यात सुरु झालं. कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी  स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक  होतं. लहानग्या सीमाला  घेऊन  कुठे जायचं, आपण नोकरी केली तर तिला सांभाळणार कोण , कोणाच्या आधाराने रहायचं, कुठे रहायचं या सगळ्या प्रश्नांनी तिचं मन व्यापून टाकलं. दिवस आणि रात्रीही तशाच चालल्या होत्या. सीमाकडे  पहायलाही नितीन तयार नव्हता.  सिमाला त्याने प्रेम दिलं असतं तर.... सिमाही हळूहळू मोठी होत होती. पाळण्यात झोपणारी सीमा आता दोघांच्या मधे झोपायला लागली होती. मिनलला आता सगळं असह्य होत चाललं होतं. दिवस कसाही जायचा पण रात्र नकोशी झाली होती तिला. नितीनला स्वतःच्या इच्छेपुढे पोटच्या लेकीची सुध्दा फिकीर नव्हती.  सीमा वर्षाची झाली.  मीनलने आता नितीन कामावर गेल्यानंतर नोकरी करणार्या  मैत्रीणींना फोन करायला सुरवात केली. कुठे नोकरी मिळु शकेल का याची चाचपणी तिला करायची होती. नितीनला कसलाही सुगावा तिने लागू दिला नाही. ३/४ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला एके ठिकाणहून मुलाखतीचे बोलवणे आले. सीमाला सासुबाईंकडे ठेवून ती मुलाखतीला जाऊन आली.मुलाखत होऊन  चार दिवस झाले तरी काही समजले नव्हते त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. आपल्याला ही नोकरी मिळणार नाही असं मनाला समजावत ती कामाला लागली. इतक्यात  तुमची निवड झाली आहे. तुम्हाही कधीपासून रुजु होऊ शकता? असे विचारणारा त्यांचा फोन आला. लग्नानंतर प्रथमच  आनंदाने अक्षरशः तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण आपण राहणार कुठे, सीमाला कुठे ठेवायचं याचा विचार तिला करायचा होता.

मनोमन काही ठरवून एक दिवस ती सीमाला घेऊन आईकडे आली. दादा आणि आई यांच्या समोर बसून तिने बोलायला सुरवात केली." आई, दादा मला तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचंय. यापुढे मी नितीनसोबत राहू शकत नाही. दादा, आईशी मी याआधी बोललीये. आई तु म्हणली होतीस ना की बाबा झाल्यावर नितीन बदलेल पण तसं काहीही झालेलं नाही."
" राहू शकत नाही म्हणजे? मग कुठे राहणारेस? नितीनसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही." दादा कडाडले.
" दादा, खरंय, त्याच्यासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. इतका विकृत.."
"काय मुर्खासारखं बरळतीयेस. मी ओळखतो नितीनला तुझ्या लग्नाआधीपासून. अत्यंत सभ्य मुलगा आहे तो. म्हणूनच तर आमच्या साहेबांनी तुझ्यासाठी सुचवला ना"
"सभ्य? स्पष्टच बोलते बाबा,  इतका सभ्य की रोज रात्री पत्नीच्या इच्छेचा, मनाचा विचारही न करता  तिच्यावर बलात्कार करतो, विकृत चाळे करतो. स्वतःच्या पोटची मुलगी शेजारी रडत असली तरी..इतका सभ्य आहे तुमचा जावई दादा. पण मला तुमच्या या सभ्य जावयासोबत राहणं शक्य नाही." सगळा धीर एकवटून मिनल म्हणाली." मी इथं आलीये ती तुम्हा दोघांची मदत मागायला. घाबरु नका मी इथे येत नाहीये रहायला. तुमच्या मुलाचं लग्नं व्हायचंय अजून माहीतीये मला, आईने सांगीतलंय आधीच. मला नोकरी मिळालीये. माझं आणि सिमाचं भागेल इतका पगार आहे. मी भाड्याने जागा घेऊन राहणार आहे. फक्त अडचण एकच आहे मी नोकरीला गेले की सीमाला कोण सांभाळेल? अजून लहान आहे ती. ३/४ वर्षांचा प्रश्न आहे. नंतर तिची शाळा सुरु होईल. शक्यतो मी एकटीने  सगळं सांभाळेन पण कधीतरी गरज लागली तर उभे रहाल? "
"सगळं ठरवूनच आलीयेस म्हण की. मिनल पैशाने सगळं करशील पण बापाचं प्रेम कसं देशील पोरीला?" आई म्हणाली.
" बापाचं प्रेम? अगं आई तिला एकदाही हात लावला नाहीये नितीनने, ना तिच्याकडे वळून पाहीलंय आजपर्यंत , तो काय देणार तिला बापाचं प्रेम.त्याला फक्त एकच प्रेम माहीतीये. ते जाऊ दे, मी बाहेर पडणारच आहे. तुम्ही नाही म्हणालात तर दुसरी काहीतरी व्यवस्था मला करावी लागेल. पण तुम्ही असलात तर मला सीमाची काळजी वाटणार नाही."

आई वडीलांशी बोलून मिनल घरी आली. पुढील १५ दिवसांत तिला सगळी व्यवस्था करायची होती.दुसर्या दिवशीपासून नितीन कामावर गेल्यानंतर तिने जागा शोधायला सुरवात केली. सुदैवाने मैत्रीणीच्या ओळखीने छोटीसी जागा तिला मिळाली. सासुबाईही पंढरपुरला वारीसाठी गेल्याने गोष्टी थोड्या सोप्या झाल्या होत्या .  हळूहळू तिने आपलं सामान तिथे नेऊन ठेवायला सुरवात केली. सगळी व्यवस्था झाली तेव्हा एक दिवस  नितीन यायची ती कधी नव्हे वाट पहायला लागली. तो घरी आला तेव्हा तिची भरलेली बॕग पाहून तो म्हणाला " कुठे चाललीस? आईकडे? रहायला बिहायला जायचं नाही हा, आपल्याला रात्रीचा उपास चालत नाही माहीतीये ना? जायचं असेल तर उद्या सकाळी जा आणि रात्री परत, काय कळलं? चल,जेवायला वाढ मला आणि आत ये लवकर"
"मी आत तर येणारच नाही आणि परतही येणार नाही इथे"
" परत येणार नाही? कशी येत नाही बघतो ना, मालकी हक्क आहे आपला तुझ्यावर "
" मालकी हक्क ? आणि असा ? स्वतःच्या मुलीचा बाप आहेस तो हक्क नाहीये वाटतं तुझा? का फक्त माझ्या शरीरावरच हक्क  आहे म्हणे तुझा?"
"ए, जास्तं बोलायचं नाही हा, सोडून चाललीये म्हणे. खाणार काय मग? फुटाणे?"
"नितीन, मी काय करणार हे सांगायला मी बांधील नाही. मी आत्ता चाललीये. माझ्या मागे यायचं नाही आणि मला त्रास द्यायचा विचारही करु नकोस. मी जर पोलीसात तुझ्या या विकृतीची तक्रार केली ना तर आत जाशील शिवाय तुझ्या अब्रुचे धिंडवडे निघतील ते वेगळेच. तेव्हा मला माझ्या मार्गाने जाऊ दे, मला अडवु नकोस. या घरातला एकही पैसा मी घेऊन जात नाहीये, माझं मंगळसूत्र मी काढून ठेवलंय आत. परत तूझं तोंड बघायचीही मला इच्छा नाहीये. मला घटस्फोट नकोय, तेवढ्यासाठीही तुझं तोंड बघायला नको, जातीये मी".

घराबाहेर पडलेली मीनल थरथर कापत होती. नवीन जागेत स्थिरावायला तिला थोडा वेळ लागला. तिचा आत्मविश्वास डळमळला होता. पण नोकरीवर जायला लागली तेव्हा तिला थोडा धीर आला. छोट्या सीमाला सांभाळून नोकरी करणे सोपे नव्हते पण आईदादांनी लाजेकाजेस्तव का होईना सीमाला सांभाळायचं कबूल केलं. घर सांभाळणं, सिमा आणि नोकरी अशी तिहेरी कसरत करता करता ती थकून जायची.  छोट्या सीमाची आजारपणं , नोकरीतील अडचणी, खूप वर्षांच्या अंतरानंतर नोकरी करताना करायला लागणारे कष्ट या सगळ्यात सीमा कधी मोठी झाली ते कळलंच नाही.  एकटीने राहताना अनेक संकटांना तिला तोंड द्यायला लागलं पण नितीनच्या सोबत राहण्यापेक्षा हे निश्चीतच चांगलं  असा विचार करुन ती पुढे जात राहीली. शारिरीक आणि मानसिक दोन्ही त्रास सहन करावे लागले. ज्या उमेशसाठी आईदादांनी तिच्या निर्णयाला विरोध केला होता  त्याच्या बायकोचं दोघांशी जमलं नाही आणि  उमेशने त्या दोघांना  मिनलकडे आणून सोडलं. ती जबाबदारीही तिने आनंदाने पार पाडली.त्या दोघांना जाऊनही आता ५/६ वर्ष  झाली होती. तिचा संघर्ष आज पूर्ण व्हायच्या मार्गावर होता. सीमाला नोकरी मिळाली होती. डोळ्यातलं पाणी पुसत ती तयार व्हायला आत गेली.

काही दिवसातच सीमाचे शिक्षण संपून नोकरी सुरु झाली. तिचं प्रशिक्षण  संपलं  आणि मुख्य कार्यालयामधे काम करायला तिची सुरवात झाली. घरी आली की काय सांगु आणि काय नको असं तिला होऊन जायचं. बघता बघता सहा महीने झाले. अलीकडे तिच्या तोंडात सारखं विश्वासचं नाव असतं याची मिनलने नोंद घेतली. तिला वाटत होतं तसंच झालं. एक दिवस विश्वासला घेऊन ती घरी आली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. विश्वासचे आईवडील बंगलोरला होते. त्याला लगेचच सीमाशी लग्नं करायचे होते. मिनलने सीमाला समजावले   "हे बघ बेटा, विश्वास चांगला मुलगा वाटतोय पण तुमची ओळख होऊन अवघे तीन महीने झालेत आणि लगेच लग्नं ? खूप घाई होतीये बेटा. अजून सहा महीने जाऊ दे, आपण बंगलोरला आधी जाऊन येऊ, त्याच्या आई वडीलांना भेटू, चौकशी करु. मी नाही म्हणत नाहीये पण थोडा वेळ जाऊ दे"

इतकं समजावूनही तिचं न ऐकता दोघांनी नोंदणी पध्दतीने लग्नं करायचा हट्ट धरला.शेवटी मिनल थोड्या नाराजीनेच तयार झाली. लग्नाला विश्वासचे आईवडील बंगलोरहून आले होते. पण इतक्या कमी वेळात मीनलची फारशी ओळख होऊ शकली नाही. लग्नानंतर विश्वास बंगलोरला जायची घाई करायला लागला. त्याने स्वतःची बदली तिकडे करुन तर घेतलीच पण सीमालाही करुन घ्यायला लावली. आईला सोडून बंगलोरला  जाताना सीमा तिच्या गळ्यात पडून खूप रडली. मिनलला तर आपल्या काळजाचा तुकडाच तुटल्यासारखं वाटलं. रोज दोन वेळा फोन करेन असं वचन देऊन सीमा गेली .

बंगलोरला गेल्यावर २/३ महिने सीमाचा व्यवस्थित दोन वेळा फोन यायचा. पण हळूहळू ती एक दिवसाआड फोन करायला लागली तेव्हा मिनलला काहीतरी खटकायला लागलं. सीमा फोनवर बोलताना खूप घाईतच असायची, धड काही बोलायची नाही तेव्हाच काहीतरी गडबड आहे हे तिच्या आईच्या मनाला जाणवलं. गेले चार दिवस सीमाचा फोन नव्हता. मीनलला काही सुचेना. सीमाच्या काळजीने तिचा जीव वरखाली व्हायला लागला. शेवटी तिने बंगलोरला जायचा निर्णय घेतला. सिमाला काहीही न कळवता एक दिवस रात्रीच्या बसने ती बंगलोरला येऊन पोचली. ती मुद्दामच शनीवार साधून आली होती म्हणजे विश्वास , सीमा घरी भेटतील. घरी पोचून तिने दारावरची घंटा वाजवली. दार उघडायला विश्वासची आईच आली. "तुम्ही? अशा अचानक? कळवायला पाहीजे होतंत तुम्ही" त्यांच्या आवाजात गुर्मी होती. तिकडे दुर्लक्ष करुन ती आत पोचतीये तोच आतून "आई, तु?" म्हणत सीमा धावत आली आणि तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडायला लागली. " बेटा, कशी आहेस? फोन नाही केलास पाच दिवसांत? कसं कळणार मला तु कशी आहेस? काळजी वाटली गं मला"
" कशाला काळजी करायची तिची? काळजी आमची करा. काही शिकवलं नाहीत तुम्ही मुलीला" सीमाचे सासरे ओरडले.
"शिकवलं नाही? अशक्य आहे, माझी मुलगी  अत्यंत हुषार आणि गुणी आहे."
" गुणी? चांगलेच गुण दाखवलेत तिने" आतून विश्वास ओरडतच बाहेर आला.
"सीमा, काय प्रकार आहे हा? काय चालु आहे हे? विश्वास, त्याचे आई वडील असं का बोलताहेत? घाबरु नकोस, मी आलीये ना, सांग बरं मला" सीमाच्या डोक्यावर हात फिरवत मीनल म्हणाली. तेवढ्यानेही धीर येऊन सीमा मीनलच्या गळ्यात पडून म्हणाली" आई तु बरोबर म्हणत होतीस, मी खूप घाई केली लग्नाची. विश्वासचं आधी लग्नं झालंय. घटस्फोट झालाय त्याचा तिच्याशी . ती इथे बंगलोरलाच असते इतकंच नाही तर तिच्यापासून एक मुलगाही आहे त्याचा तीन वर्षाचा. माझ्यापासून सगळं लपवलं त्याने, आई बाबांनाही सगळं माहीत होतं. मला फसवलंय त्याने, काय करावं ते कळतच नाहीये मला. काय करु आता मी आई"? झालेल्या फसवणुकीमुळे दुखावलेली सीमा तिच्या गळ्यात पडून रडायला लागली.
ती शांत होईपर्यत मिनल थांबली आणि म्हणाली "उठ बेटा. आत जा आणि कपडे भरुन घेऊन ये. इथे आता एक क्षणही  थांबायचं नाही. तुझी आई अजून जीवंत आहे तुझ्या पाठीमागे उभं रहायला. तु एकटी नाहीयेस. जर का या लोकांनी अडवायचा प्रयत्न केला तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेन मी. जा कपडे  घेऊन ये"
"आई" तिला मिठी मारत सीमा आत जायला  उठली.

सीमाला घेऊन मिनल  घरी यायला निघाली होती. विस वर्षापूर्वी मिनलने नितीनचं घर सोडलं होतं ..एकटीने.. आज सीमाने नवर्याचं घर सोडलं होतं. एक वर्तुळ पूर्ण झालं होतं . आपल्या आईवडीलांनी  साथ दिली नाही पण लेकीच्या पाठीमागे ठामपणे उभं रहात मीनलने त्या पूर्ण होऊ पाहणार्या वर्तुळाला  छेद दिला होता...खंबीरपणे.

@ अंजली  जोगळेकर