Shabdanjali......शब्दांजली

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

वर्तुळ

                            


"आई, ए आई, बाहेर ये लवकर. आई, अगं किती वेळ आंघोळ करतीयेस ?"
दारावर जोरजोरात थापा मारत  सीमा ओरडली ," आई "
"अगं , हो हो. काय झालंय काय एवढं ओरडायला? आकाश कोसळल्यासारखी का ओरडतीयेस? येते थांब जरा, कपडे तर घालु देत मला "
" ए आई, आता लवकर बाहेर ये ना, तुला काहीतरी सांगायचंय, खूप आनंद होईल तुला. म्हणून म्हणतीये, पटकन ये. कुडता अडकव आणि  सलवार बाहेर येऊन घाल "
मिनल लगबगीने बाहेर आली. "काय करायचं या मुलीला, जरा म्हणून धीर नाहीये हिला" मनाशी पुटपुटत असतानाच सीमाने तिचे दोन्ही हात धरले       "आई , आज विद्यापिठात एका कंपनीमधे निवड झालीये माझी आणि ती सुद्धा  TCS मधे,बघ, आहे ना चांगली बातमी?"
" काय ? सांगतेस काय? निवड झाली ? दोनच दिवसांपूर्वी झाली होती ना मुलाखत?"
"हो पण  आई, तुझी मुलगी हुशार आहे म्हटलं. आज त्यांनी निवड झाल्याचे कळवलं सुध्दा. पगार पण एकदम भारी आहे. खूप खुश आहे मी आज, सगळं श्रेय फक्त आणि फक्त तुला आहे आई.किती कष्ट घेतलेस माझ्यासाठी. आज घरी काहीही करु नकोस. आज आपण दोघी मस्त जेवायला जाऊ या बाहेर, खरेदी करु. ही बातमी साजरी करु या"
" थांब देवाजवळ साखर ठेवते आधी" भरलेले  डोळे लपवत मीनलने देवाजवळ जाऊन दिवा लावला, साखर ठेवली. डोळे बंद करुन ती उभी राहीली  " पोरीनी चिज केलं कष्टाचं, आता मला काळजी नाही. आता निवृत्त झाले तरी हरकत नाही."

डोळे बंद करुन देवासमोर बसल्या बसल्या काय काय आठवायला लागलं तिला. किती वर्ष झाली बरं त्या गोष्टीला ? सिमा दिडच वर्षाची होती जेमतेम . त्या दिवसानंतर न नितीनने न त्याच्या आईने तिच्याकडे किंवा सिमाकडे वळून पाहीलेही नाही,  ना तिला भेटायचा प्रयत्न केला.आज जवळजवळ अठरा वर्षे उलटून गेली असतील त्याला. देवासमोर उभं राहताना ती वर्ष आत्ताच उलटून गेल्यासारखं वाटलं तिला.

मिनलचं लग्नं विसाव्या वर्षीच झालं . तिचं माहेर फार काही श्रीमंत नव्हतं . खाऊनपिऊन सुखी असं म्हणता येईल. वडील एका छोट्या  कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कामाला होते. आई घरीच असायची. तिला एक लहान भाऊ होता, उमेश. मीनल अभ्यासात खूप हुशार, तिला खरंतर इंजिनीयर व्हायचं होतं पण  आर्थिकदृष्ट्या  परवडणारं नाही आणि मुलीपेक्षा मुलाला इंजिनीयर केलेलं बरं या विचाराने  तिला आईदादांनी  विज्ञान शाखेत तरी  पाठवलं.  म्हणूनच संगणक ह्या तिच्या आवडत्या विषयात तिला विशेष श्रेणी मिळवता आली.मात्र त्याच वर्षी  उमेशला कमी गुण असूनही  दादांनी कंपनीतून कर्ज काढले आणि पैसे भरुन त्याला इंजिनीअरींगला टाकलं तेव्हा मिनलला थोडं वाईट वाटलं. मिनलची पुढे शिकायची, नोकरी करायची खूप इच्छा होती पण दादांनी तिचं लग्नं करुन द्यायचं ठरवलं. नितिनचं स्थळ दादांच्या साहेबांनीच सुचवलं असल्याने बोलायची सोयच नव्हती.. एकुलता एक असलेल्या नितीनला इलेक्ट्राॕनीक्स या विषयात पदविका मिळाली होती  आणि एका मोठ्या प्रतिथयश  कंपनीत तो चांगल्या पदावर होता. घरी फक्त  त्याची आई आणि तो असे दोघेच जण.कोणतीही जबाबदारी नसलेला नितीन मीनलसाठी योग्य वर ठरला आणि तिचे लग्नं त्याच्याशी तिची पसंती विचारात न घेताच  दादांनी  लाऊन  दिले. खरं तर लग्नाआधी मिनलला नितीनशी बोलायचं  होते, त्याचा स्वभाव जाणून घ्यायचा होता पण "काही गरज नाहीये बोलायची बिलायची" असं म्हणून आईने तेही करु दिले नाही.

नितिनच्या घरी ती आली. घर छोटंसं पण तिघांना पुरेल असं होतं. तिला ते खूप आवडून गेलं. 'या छोट्या घरात आपण  स्वर्ग निर्माण करु' तिनं मनाशीच ठरवलं. पुजा आटोपली आणि सासुबाइंनी तिला नितीनच्या खोलीत झोपायला पाठवलं. धडधडत्या हृदयाने, लाजत ती पलंगावर येऊन बसली. पहिल्या रात्रीची कितीतरी स्वप्नं तिने पाहीली होती. नितीनची वाट पहात असतानाच तो आत आला आणि धाडकन दार लाऊन टाकले." आई पण फारच करते. पुजा होईपर्यंत कशाला थांबायचं? पहिल्याच रात्री का नाही पाठवलं तुला?" दिवा मालवून तो तिच्याजवळ आला . त्याचे शब्द ऐकायला ,  हळुवार स्पर्श अनुभवायला ती अधीर झाली होती. पण तिला काही कळायच्या आधीच त्याने एकही शब्द न बोलता  त्याला हवे असलेले सुख शब्दशः ओरबाडून घेतले आणि  मान वळवून  झोपूनही गेला. सुन्न झालेली मिनल   दुखावलेले मन घेऊन रात्रंभर जागीच होती. अशी असते पहिली रात्रं?   दुसर्या दिवशी दिवसभर सुजलेले डोळ्यांनी ती घरात वावरत होती. सासुबाईंच्या नजरेला नजर मिळवणं तिला अवघड झालं होतं. दुसर्या रात्री तिला खोलीत जावंसं वाटेना. त्या रात्रीही परत तोच प्रकार. पुढच्या  दहा दिवसात एकही जास्तीचा शब्द नितीन बोलला नाही की तिची चौकशी केली . तिला आता रात्रच नको असं वाटायला लागलं.पाहता पाहता लग्नाला पंधरा दिवस झाले. त्या दिवशी दादा तिला माहेरपणासाठी न्यायला आले तेव्हा तिला खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर  मनातून सुटल्यासारखंच वाटलं. घरी पोचली तेव्हा आई तिची वाट पहात दारातच उभी होती. तिला पाहीलं तेव्हा पळत जाऊन मिनल तिला बिलगली. तिच्या गळ्यात पडून  हमसाहमशी रडायला लागली. " काय झालं बेटा, इतकी का रडतीयेस?"  काय होतंय ते तिला सांगताही येईना.  आईच्या शेजारी लग्नानंतर पहिल्यांदाच शांतपणे ती  झोपून गेली.  आईला काय आणि कसं सांगावे हे तिला कळेना. दुसर्या दिवशी संध्याकाळी नितीन तिला न्यायला आला. जावयाला कुठे ठेऊ नी कुठे नको असं आईला झालं होतं. मीनल मात्रं  घरी परत जाताना हिरमुसूनच गेली. नितीनबरोबर घरी आली तेव्हा तिला खोलीत जावेसेच वाटेना. त्या असह्य रात्री आठवून आत्ताही मिनलच्या अंगावर काटा आला.

आईकडून आल्यावर रात्री मिनल खोलीत आली तेव्हा नितीन आंतरजालावर काहीतरी पहात बसला होता. तिला पाहताच त्याने पटकन संगणक बंद केला आणि तिच्या अंगावर ओरडला," किती वेळ लावतेस? ये लवकर ." त्याच्या वागण्यात , बोलण्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता.काय आहे आपले हे आयुष्य ? हे कायम असंच असणार आहे ? रात्रभर ती  मुसमुसत होती.  दिवसभर शांत असणारा नितीन  पण रात्रं झाली की त्याला काय व्हायचे माहीत नाही.  रात्रीच्या आठवणीने दिवसा  तिला न जेवण जायचं न कामात लक्ष लागायचं. तिचा आनंदी स्वभाव आता औषधालाही शिल्लक नव्हता. ती सतत तणावाखाली असायची. एवढी बुध्दीमान असणारी मीनल हतबल होऊन गेली. काय करावे, कोणाशी बोलावे तिला समजत नव्हते. इतकी खाजगी गोष्ट कोणाला सांगावी, कोण आपल्याला योग्य सल्ला देईल? विचार करुन ती शिणून गेली होती. त्याचं दुसर्यांसमोर  तिच्याशी असलेलं वागणं पाहून कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नसता. दिवसेंदिवस नितीनबरोबर रात्र  काढणं तिला अशक्य होत चाललं होतं.  पाहता पाहता वर्ष होत आलं. एक दिवस स्वयंपाकघरात काम करत असताना ती चक्कर येऊन खाली कोसळली. सासुबाईं तिला डाॕक्टरकडे घेऊन गेल्या .निसर्गाने आपलं काम चोख केलं होतं. नव्या जीवाची चाहुल लागली होती. पण याचा आनंद व्हायला पाहीजे की आता नितीनपासून सुटका नाही याचे दुःख हेच तिला कळेनासे झाले होते. सासुबाई मात्रं खूप खुश होत्या. त्या फारशा तिच्यामधे, तिच्या संसारात लुडबुड करायच्या नाहीत. त्या आणि त्यांचा पांडुरंग हेच त्यांचं विश्व पण ही बातमी ऐकून त्यांना खूप आनंद झाला. अगदी तिला कुठे ठेऊ नी कुठे नको असं झालं होतं त्यांना.नितीनही खुश होता पण त्यामुळे रात्रींमधे काही फरक पडला नव्हता. "मुलगाच व्हायला पाहीजे हां " आताशा  जाता येता तो तिला धमकावायला लागला तेव्हा मनातून थोडी ती धास्तावली. मुलगी झाली तर काय या विचाराने तिची झोपच उडाली. सातव्या महिन्यात आई न्यायला आली तेव्हा नितीन तिला पाठवायला तयारच नव्हता. पण सासुबाईंनी मात्र नशीबाने त्याचं काही  ऐकलं नाही आणि ती माहेरी आली. लग्नं झाल्यापासून पहिल्यांदाच  ती अशी रहायला आली होती. उमेशही काॕलेजच्या वसतीगृहात रहायला गेला होता. घरी आई आणि दादा दोघेच असायचे. त्यामुळे इथे  तनामनाने ती निवांत झाली. आपलं भविष्य कसं असेल, मुलगी झाली तर काय, आपण आपलं आयुष्य नितीनसोबत घालवू शकू? हे विचार करायला तिला आता  अवकाश मिळाला. तिने या विषयावर आईशी बोलायचं ठरवलं. रात्री अंथरुणावर पडली तेव्हा तिची आई तिच्याजवळ आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता  हसत म्हणाली, "झोप येत नाहीये वाटतं? नितीनराव आठवण काढताहेत बहुतेक "
" बरं झालं आई विषय काढलास, मला बोलायचंय तुझ्याशी"
" बोल ना बाळा, त्रास होतोय का काही? जाऊ यात का उद्या डाॕक्टरकडे ?"
" हो आई, त्रास होतोय गं मला पण बाळामुळे नाही, तुझ्या नितीनरावांमुळे"
"म्हणजे गं काय?"
" कसं सांगु आई तुला, समजत नाहीये. या गोष्टी बोलणं माझ्यासाठी खूप लाज आणणारं आहे पण आता मला बोलायलाच हवं"
" काय म्हणायचंय तुला मिनू, मला घाबरवतीयेस तु"
" आई, मन घट्ट करुन ऐक.  नितीनबरोबर राहणं माझ्यासाठी  अशक्य होत चाललंय"
"काय? काय मुर्खासारखं बरळतीयेस. नितीनराव किती चांगले आहेत, किती लाड करतात तुझे. तु इथे राहीलीस की सारखा फोन करुन तुला बोलवून घेतात आणि तु म्हणतेस तुला रहायचं नाही? माझ्याजवळ बोललीस इथपर्यंत ठीक आहे. दादांजवळ बोलू नकोस नाहीतर तंगडं तोडतील तुझं "
" आई, अगं मी काय म्हणतीये ते ऐकून तर घे आधी. मी असं म्हणतीये ते ही या अवस्थेत म्हणजे तसं काहीतरी झालं असेल ना? मी हे तुझ्याजवळ नाही बोलणार तर कोणाजवळ ? गेलं वर्षभर मी विचार करतीये कसं बोलू याचा. प्लिज माझं ऐकून घे"
" बरं, सांग काय झालंय ते"
" आई, नितीनबरोबर राहणं, रात्रं काढणं यापुढे मला शक्य नाही."
"काय बोलतीयेस? इतक्या खाजगी गोष्टी अशा बोलायच्या नसतात बाळा"
" माहीतीये मला आई पण माझा नाइलाज आहे. या गोष्टी मी दुसरीकडे बोलुच शकत नाही. नितीन खूप विकृत आहे आई. दिवसभर खूप चांगला असतो तो, माझे लाड करतो पण रात्रं झाली की त्याला काय होतं मला माहीत नाही. मी तुला स्पष्ट सांगु शकणार नाही पण तो ना, कसं सांगु मी तुला,तु असं समज की रोज माझ्यावर बलात्कार होत असतो, मला नाही सहन होत आई"
मोठ्या हिंमतीने शब्द गोळा करुन ती आईशी बोलली. आईलाही दोन मिनीटे काय बोलावं ते समजेना." हे बघ मिनु, सुरवातीसुरवातीला होतं असं. होईल नीट सर्व. आता बाबा झाला की नीट वागेल बघ "
" नाही गं आई, तो नाही बदलणार कधी आणि मी आता त्याच्यासोबत राहूच शकणार नाही"
" मग, काय करायचंय तुला?"
" आई, मी वेगळी होणार आहे त्याच्यापासून"
" काय? काय मुर्खासारखं बरळतीयेस. वेगळं होणार म्हणे. वेगळं होऊन राहणार कुठे?खाणार काय? इतकं सोपं नसतं सगळं . लोक काय म्हणतील? इतक्या चांगल्या मुलाला सोडलंस तर शेण घालतील तोंडात सगळेजण."
" चांगला ? आणि राहणार कुठे म्हणजे? इथे, तुम्ही मला  ठेउन घेणार नाही? खाण्याचं म्हणशील तर मी नोकरी करेन, पदवी आहे माझ्याकडे .थोडा प्रयत्न केला तर नक्की मिळेल मला नोकरी. आणि लोकांचं काय घेऊन बसतेस?"
" मिनु, माझ्याजवळ बोललीस इथपर्यंत ठीक आहे, बाबांजवळ बोलू नकोस, त्याच पावली तुला सोडून येतील. मी तुला स्पष्ट सांगते, रागावू नकोस. तुला मी इथे ठेवून घेऊ शकत नाही. तु इथे आलीस तर हजार प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावं लागेल, नातेवाईकांमधे बदनामी होईल शिवाय उमेशचं लग्नं व्हायचं आहे, तु घरी परत आलीस तर त्याला मुलगी कोण देईल? तु आपली बाळंतपण कर आणि घरी परत जा. सुधारेल नितीन हळूहळू . तो काही दारु पित नाही की तुला मारत नाही. "
आईचं बोलणं ऐकून मिनलला धक्का बसला. आईबाबांना उमेशची, त्याच्या लग्नाची काळजी आहे,मग मी कोण आहे ? मी नक्की त्यांचीच मुलगी आहे ना?   इथे आपल्याला कोणी ठेवून घेणार नाही, नितीनकडे परत जावं लागणार की काय? पण आता एक दिवससुध्दा त्याच्याबरोबर रहायची तिची इच्छा नव्हती. तिला नुकताच आठवा महीना लागला होता. अजून कमीतकमी तीन महीने तिच्याकडे होते. या तीन महीन्यात  काय तो निर्णय घ्यायला हवा याची जाणीव तिला झाली. नितीनपासून वेगळे व्हायचे असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक होते. सुदैवाने तिच्याकडे संगणका मधली पदवी होती. पण  येणार्या बाळालाही वेळ द्यायला हवा होता. पुढचे एक वर्ष तरी आपल्याला काहीही करता येणार नाही , आपल्याला नितीनकडे परत जावे लागणार या विचाराने ती निराशच झाली. महिनाभरातच तिने गोजीरवाण्या मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून रागाने  तिला पहायला नितीन आलासुध्दा नाही. अशा बुरसटलेल्या विचारांचा मुलगा इंजिनीयर कसा असु शकतो? मिनलला त्याची किव करावीशी वाटत होती. अकराव्या दिवशी बारसं करुन तिचं नाव सीमा ठेवलं. सीमाला पाहून तिच्या सासुबाई खूप खुश झाल्या. एक महिना झाला आणि दादांनी तिला नितीनच्या घरी आणून सोडलं. नितीनचं थोबाड पाहण्याचीही तिची खरं तर इच्छा नव्हती पण नाइलाज होता.

ती घरी आली तेव्हा नितीन कामावर गेला होता. गोड  सीमाला पाहून त्याचा राग नक्की  पळून जाईल असं मनोमनी तिला वाटायला लागलं. तो संध्याकाळी घरी आला तेव्हा सीमाला घेऊन ती त्याच्याजवळ आली. " नितीन, बघ किती गोड आहे आपली परी. तुझ्याकडे पाहून हसतीये बघ. ओळखलं वाटतं बाबांना शोनुलीने"
पण नितीनने तिच्याकडे ढुंकूनही पाहीले नाही आणि तो खोलीत निघून गेला. मीनलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रात्री जेवायला बसल्यावर खुसफुसत नितीन तिला म्हणाला " लवकर ये झोपायला".  कल्पनेनेच मिनलच्या अंगावर काटा आला. सिमाला घेऊन जड पावलांनी ती खोलीत शिरली . सिमा जागीच होती.   आत गेल्या गेल्या नितीनने खसकन तिला ओढले. " थांब ना जरा नितीन, तिला झोपवते आधी "
"काही नको झोपवायला, टाक तिला पाळण्यात आणि ये इकडे. इतक्या दिवसांचा उपास सोडायचाय मला."
तिचं काहीही न ऐकता नितीनने आज कळस गाठला. ठणकणार्या अंगाने ती सिमाला थोपटत राहीली.  दुसर्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे काम करत असतानाच यातून कसं बाहेर पडायचं , कोणाची मदत घेता येईल हे विचारचक्र तिच्या डोक्यात सुरु झालं. कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी  स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक  होतं. लहानग्या सीमाला  घेऊन  कुठे जायचं, आपण नोकरी केली तर तिला सांभाळणार कोण , कोणाच्या आधाराने रहायचं, कुठे रहायचं या सगळ्या प्रश्नांनी तिचं मन व्यापून टाकलं. दिवस आणि रात्रीही तशाच चालल्या होत्या. सीमाकडे  पहायलाही नितीन तयार नव्हता.  सिमाला त्याने प्रेम दिलं असतं तर.... सिमाही हळूहळू मोठी होत होती. पाळण्यात झोपणारी सीमा आता दोघांच्या मधे झोपायला लागली होती. मिनलला आता सगळं असह्य होत चाललं होतं. दिवस कसाही जायचा पण रात्र नकोशी झाली होती तिला. नितीनला स्वतःच्या इच्छेपुढे पोटच्या लेकीची सुध्दा फिकीर नव्हती.  सीमा वर्षाची झाली.  मीनलने आता नितीन कामावर गेल्यानंतर नोकरी करणार्या  मैत्रीणींना फोन करायला सुरवात केली. कुठे नोकरी मिळु शकेल का याची चाचपणी तिला करायची होती. नितीनला कसलाही सुगावा तिने लागू दिला नाही. ३/४ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला एके ठिकाणहून मुलाखतीचे बोलवणे आले. सीमाला सासुबाईंकडे ठेवून ती मुलाखतीला जाऊन आली.मुलाखत होऊन  चार दिवस झाले तरी काही समजले नव्हते त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. आपल्याला ही नोकरी मिळणार नाही असं मनाला समजावत ती कामाला लागली. इतक्यात  तुमची निवड झाली आहे. तुम्हाही कधीपासून रुजु होऊ शकता? असे विचारणारा त्यांचा फोन आला. लग्नानंतर प्रथमच  आनंदाने अक्षरशः तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण आपण राहणार कुठे, सीमाला कुठे ठेवायचं याचा विचार तिला करायचा होता.

मनोमन काही ठरवून एक दिवस ती सीमाला घेऊन आईकडे आली. दादा आणि आई यांच्या समोर बसून तिने बोलायला सुरवात केली." आई, दादा मला तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचंय. यापुढे मी नितीनसोबत राहू शकत नाही. दादा, आईशी मी याआधी बोललीये. आई तु म्हणली होतीस ना की बाबा झाल्यावर नितीन बदलेल पण तसं काहीही झालेलं नाही."
" राहू शकत नाही म्हणजे? मग कुठे राहणारेस? नितीनसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही." दादा कडाडले.
" दादा, खरंय, त्याच्यासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. इतका विकृत.."
"काय मुर्खासारखं बरळतीयेस. मी ओळखतो नितीनला तुझ्या लग्नाआधीपासून. अत्यंत सभ्य मुलगा आहे तो. म्हणूनच तर आमच्या साहेबांनी तुझ्यासाठी सुचवला ना"
"सभ्य? स्पष्टच बोलते बाबा,  इतका सभ्य की रोज रात्री पत्नीच्या इच्छेचा, मनाचा विचारही न करता  तिच्यावर बलात्कार करतो, विकृत चाळे करतो. स्वतःच्या पोटची मुलगी शेजारी रडत असली तरी..इतका सभ्य आहे तुमचा जावई दादा. पण मला तुमच्या या सभ्य जावयासोबत राहणं शक्य नाही." सगळा धीर एकवटून मिनल म्हणाली." मी इथं आलीये ती तुम्हा दोघांची मदत मागायला. घाबरु नका मी इथे येत नाहीये रहायला. तुमच्या मुलाचं लग्नं व्हायचंय अजून माहीतीये मला, आईने सांगीतलंय आधीच. मला नोकरी मिळालीये. माझं आणि सिमाचं भागेल इतका पगार आहे. मी भाड्याने जागा घेऊन राहणार आहे. फक्त अडचण एकच आहे मी नोकरीला गेले की सीमाला कोण सांभाळेल? अजून लहान आहे ती. ३/४ वर्षांचा प्रश्न आहे. नंतर तिची शाळा सुरु होईल. शक्यतो मी एकटीने  सगळं सांभाळेन पण कधीतरी गरज लागली तर उभे रहाल? "
"सगळं ठरवूनच आलीयेस म्हण की. मिनल पैशाने सगळं करशील पण बापाचं प्रेम कसं देशील पोरीला?" आई म्हणाली.
" बापाचं प्रेम? अगं आई तिला एकदाही हात लावला नाहीये नितीनने, ना तिच्याकडे वळून पाहीलंय आजपर्यंत , तो काय देणार तिला बापाचं प्रेम.त्याला फक्त एकच प्रेम माहीतीये. ते जाऊ दे, मी बाहेर पडणारच आहे. तुम्ही नाही म्हणालात तर दुसरी काहीतरी व्यवस्था मला करावी लागेल. पण तुम्ही असलात तर मला सीमाची काळजी वाटणार नाही."

आई वडीलांशी बोलून मिनल घरी आली. पुढील १५ दिवसांत तिला सगळी व्यवस्था करायची होती.दुसर्या दिवशीपासून नितीन कामावर गेल्यानंतर तिने जागा शोधायला सुरवात केली. सुदैवाने मैत्रीणीच्या ओळखीने छोटीसी जागा तिला मिळाली. सासुबाईही पंढरपुरला वारीसाठी गेल्याने गोष्टी थोड्या सोप्या झाल्या होत्या .  हळूहळू तिने आपलं सामान तिथे नेऊन ठेवायला सुरवात केली. सगळी व्यवस्था झाली तेव्हा एक दिवस  नितीन यायची ती कधी नव्हे वाट पहायला लागली. तो घरी आला तेव्हा तिची भरलेली बॕग पाहून तो म्हणाला " कुठे चाललीस? आईकडे? रहायला बिहायला जायचं नाही हा, आपल्याला रात्रीचा उपास चालत नाही माहीतीये ना? जायचं असेल तर उद्या सकाळी जा आणि रात्री परत, काय कळलं? चल,जेवायला वाढ मला आणि आत ये लवकर"
"मी आत तर येणारच नाही आणि परतही येणार नाही इथे"
" परत येणार नाही? कशी येत नाही बघतो ना, मालकी हक्क आहे आपला तुझ्यावर "
" मालकी हक्क ? आणि असा ? स्वतःच्या मुलीचा बाप आहेस तो हक्क नाहीये वाटतं तुझा? का फक्त माझ्या शरीरावरच हक्क  आहे म्हणे तुझा?"
"ए, जास्तं बोलायचं नाही हा, सोडून चाललीये म्हणे. खाणार काय मग? फुटाणे?"
"नितीन, मी काय करणार हे सांगायला मी बांधील नाही. मी आत्ता चाललीये. माझ्या मागे यायचं नाही आणि मला त्रास द्यायचा विचारही करु नकोस. मी जर पोलीसात तुझ्या या विकृतीची तक्रार केली ना तर आत जाशील शिवाय तुझ्या अब्रुचे धिंडवडे निघतील ते वेगळेच. तेव्हा मला माझ्या मार्गाने जाऊ दे, मला अडवु नकोस. या घरातला एकही पैसा मी घेऊन जात नाहीये, माझं मंगळसूत्र मी काढून ठेवलंय आत. परत तूझं तोंड बघायचीही मला इच्छा नाहीये. मला घटस्फोट नकोय, तेवढ्यासाठीही तुझं तोंड बघायला नको, जातीये मी".

घराबाहेर पडलेली मीनल थरथर कापत होती. नवीन जागेत स्थिरावायला तिला थोडा वेळ लागला. तिचा आत्मविश्वास डळमळला होता. पण नोकरीवर जायला लागली तेव्हा तिला थोडा धीर आला. छोट्या सीमाला सांभाळून नोकरी करणे सोपे नव्हते पण आईदादांनी लाजेकाजेस्तव का होईना सीमाला सांभाळायचं कबूल केलं. घर सांभाळणं, सिमा आणि नोकरी अशी तिहेरी कसरत करता करता ती थकून जायची.  छोट्या सीमाची आजारपणं , नोकरीतील अडचणी, खूप वर्षांच्या अंतरानंतर नोकरी करताना करायला लागणारे कष्ट या सगळ्यात सीमा कधी मोठी झाली ते कळलंच नाही.  एकटीने राहताना अनेक संकटांना तिला तोंड द्यायला लागलं पण नितीनच्या सोबत राहण्यापेक्षा हे निश्चीतच चांगलं  असा विचार करुन ती पुढे जात राहीली. शारिरीक आणि मानसिक दोन्ही त्रास सहन करावे लागले. ज्या उमेशसाठी आईदादांनी तिच्या निर्णयाला विरोध केला होता  त्याच्या बायकोचं दोघांशी जमलं नाही आणि  उमेशने त्या दोघांना  मिनलकडे आणून सोडलं. ती जबाबदारीही तिने आनंदाने पार पाडली.त्या दोघांना जाऊनही आता ५/६ वर्ष  झाली होती. तिचा संघर्ष आज पूर्ण व्हायच्या मार्गावर होता. सीमाला नोकरी मिळाली होती. डोळ्यातलं पाणी पुसत ती तयार व्हायला आत गेली.

काही दिवसातच सीमाचे शिक्षण संपून नोकरी सुरु झाली. तिचं प्रशिक्षण  संपलं  आणि मुख्य कार्यालयामधे काम करायला तिची सुरवात झाली. घरी आली की काय सांगु आणि काय नको असं तिला होऊन जायचं. बघता बघता सहा महीने झाले. अलीकडे तिच्या तोंडात सारखं विश्वासचं नाव असतं याची मिनलने नोंद घेतली. तिला वाटत होतं तसंच झालं. एक दिवस विश्वासला घेऊन ती घरी आली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. विश्वासचे आईवडील बंगलोरला होते. त्याला लगेचच सीमाशी लग्नं करायचे होते. मिनलने सीमाला समजावले   "हे बघ बेटा, विश्वास चांगला मुलगा वाटतोय पण तुमची ओळख होऊन अवघे तीन महीने झालेत आणि लगेच लग्नं ? खूप घाई होतीये बेटा. अजून सहा महीने जाऊ दे, आपण बंगलोरला आधी जाऊन येऊ, त्याच्या आई वडीलांना भेटू, चौकशी करु. मी नाही म्हणत नाहीये पण थोडा वेळ जाऊ दे"

इतकं समजावूनही तिचं न ऐकता दोघांनी नोंदणी पध्दतीने लग्नं करायचा हट्ट धरला.शेवटी मिनल थोड्या नाराजीनेच तयार झाली. लग्नाला विश्वासचे आईवडील बंगलोरहून आले होते. पण इतक्या कमी वेळात मीनलची फारशी ओळख होऊ शकली नाही. लग्नानंतर विश्वास बंगलोरला जायची घाई करायला लागला. त्याने स्वतःची बदली तिकडे करुन तर घेतलीच पण सीमालाही करुन घ्यायला लावली. आईला सोडून बंगलोरला  जाताना सीमा तिच्या गळ्यात पडून खूप रडली. मिनलला तर आपल्या काळजाचा तुकडाच तुटल्यासारखं वाटलं. रोज दोन वेळा फोन करेन असं वचन देऊन सीमा गेली .

बंगलोरला गेल्यावर २/३ महिने सीमाचा व्यवस्थित दोन वेळा फोन यायचा. पण हळूहळू ती एक दिवसाआड फोन करायला लागली तेव्हा मिनलला काहीतरी खटकायला लागलं. सीमा फोनवर बोलताना खूप घाईतच असायची, धड काही बोलायची नाही तेव्हाच काहीतरी गडबड आहे हे तिच्या आईच्या मनाला जाणवलं. गेले चार दिवस सीमाचा फोन नव्हता. मीनलला काही सुचेना. सीमाच्या काळजीने तिचा जीव वरखाली व्हायला लागला. शेवटी तिने बंगलोरला जायचा निर्णय घेतला. सिमाला काहीही न कळवता एक दिवस रात्रीच्या बसने ती बंगलोरला येऊन पोचली. ती मुद्दामच शनीवार साधून आली होती म्हणजे विश्वास , सीमा घरी भेटतील. घरी पोचून तिने दारावरची घंटा वाजवली. दार उघडायला विश्वासची आईच आली. "तुम्ही? अशा अचानक? कळवायला पाहीजे होतंत तुम्ही" त्यांच्या आवाजात गुर्मी होती. तिकडे दुर्लक्ष करुन ती आत पोचतीये तोच आतून "आई, तु?" म्हणत सीमा धावत आली आणि तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडायला लागली. " बेटा, कशी आहेस? फोन नाही केलास पाच दिवसांत? कसं कळणार मला तु कशी आहेस? काळजी वाटली गं मला"
" कशाला काळजी करायची तिची? काळजी आमची करा. काही शिकवलं नाहीत तुम्ही मुलीला" सीमाचे सासरे ओरडले.
"शिकवलं नाही? अशक्य आहे, माझी मुलगी  अत्यंत हुषार आणि गुणी आहे."
" गुणी? चांगलेच गुण दाखवलेत तिने" आतून विश्वास ओरडतच बाहेर आला.
"सीमा, काय प्रकार आहे हा? काय चालु आहे हे? विश्वास, त्याचे आई वडील असं का बोलताहेत? घाबरु नकोस, मी आलीये ना, सांग बरं मला" सीमाच्या डोक्यावर हात फिरवत मीनल म्हणाली. तेवढ्यानेही धीर येऊन सीमा मीनलच्या गळ्यात पडून म्हणाली" आई तु बरोबर म्हणत होतीस, मी खूप घाई केली लग्नाची. विश्वासचं आधी लग्नं झालंय. घटस्फोट झालाय त्याचा तिच्याशी . ती इथे बंगलोरलाच असते इतकंच नाही तर तिच्यापासून एक मुलगाही आहे त्याचा तीन वर्षाचा. माझ्यापासून सगळं लपवलं त्याने, आई बाबांनाही सगळं माहीत होतं. मला फसवलंय त्याने, काय करावं ते कळतच नाहीये मला. काय करु आता मी आई"? झालेल्या फसवणुकीमुळे दुखावलेली सीमा तिच्या गळ्यात पडून रडायला लागली.
ती शांत होईपर्यत मिनल थांबली आणि म्हणाली "उठ बेटा. आत जा आणि कपडे भरुन घेऊन ये. इथे आता एक क्षणही  थांबायचं नाही. तुझी आई अजून जीवंत आहे तुझ्या पाठीमागे उभं रहायला. तु एकटी नाहीयेस. जर का या लोकांनी अडवायचा प्रयत्न केला तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेन मी. जा कपडे  घेऊन ये"
"आई" तिला मिठी मारत सीमा आत जायला  उठली.

सीमाला घेऊन मिनल  घरी यायला निघाली होती. विस वर्षापूर्वी मिनलने नितीनचं घर सोडलं होतं ..एकटीने.. आज सीमाने नवर्याचं घर सोडलं होतं. एक वर्तुळ पूर्ण झालं होतं . आपल्या आईवडीलांनी  साथ दिली नाही पण लेकीच्या पाठीमागे ठामपणे उभं रहात मीनलने त्या पूर्ण होऊ पाहणार्या वर्तुळाला  छेद दिला होता...खंबीरपणे.

@ अंजली  जोगळेकर





सोमवार, ३ मे, २०२१

चुकलेली वाट

 

 चुकलेली वाट

कोमलने डोळे उघडले.तिच्या घशाला कोरड पडल्यासारखी झाली . काही क्षण आपण कुठे आहोत हेच तिला समजेना.  इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न केला तेव्हा डोक्याशी सलाईन ची बाटली लावलेली दिसली. मी इस्पीतळात आहे की काय या शंकेने तिने उठायचा प्रयत्न केला पण कंबर व  पोटातून जीवघेणी कळ आली . " आई गं " कळवळून ती ओरडली . तिचा आवाज ऐकून एक परीचारीका धावत आली,” हालचाल करू नका ताई, आत्ताच औषध टोचलंय . थांबेल दुखणं थोड्या वेळात”  असं बोलून काही विचारायच्या आधीच  ती घाईघाईत निघून गेली . मी इथे कशी आले, मला काय झालंय  ? काही केल्या  तिला आठवेना. विचार करुन  ती  इतकी शिणून गेली की तिला ग्लानीच आली.  परत जाग आली तेव्हा  शोधक नजरेने  तिनेआजूबाजूला पाहीलं.एका लांबुळक्या खोलीत चार पलंग होते. त्यातील दुसऱ्या पलंगावर ती होती.तिच्या  एका बाजूला एक आजी होत्या  आणि दुसऱ्या बाजूला एक मध्यमवयीन स्त्री होती. आजींजवळ बहुतेक त्यांची मुलगी बसली होती. तिच्या मनातले प्रश्न तिला काही स्वस्थ बसू देईनात. तिने आजींना विचारले,

“आजी, तुम्हाला माहीतीये का कोणी आणून सोडले मला इथे?” 

" हो.अगं मी पण काल दुपारीच इथे  दाखल झाले. काल आमच्या बागेत शेजारच्या लिनाशी बोलता बोलता  पुजेसाठी फुलं काढत होते आणि पाय घसरला, मग काय? माझा मुलगा घेऊन आला इथे. हाड मोडलंय पायाचं."

आजी चांगल्याच बडबड्या होत्या पण कोमलला तिला इथे कोणी आणले हे ऐकायचे होते.

 " हो का? म्हणजे मला आणलं तेव्हा तुम्ही असणार".  

" हो, अगं होते मी. एका बाईंनी आणलं तुला इथे. तुझ्या शेजारी राहतात असं सांगत होत्या काल परीचारीकेला. ही माझी मुलगी आहे बरं का, मी पडलीये कळल्यावर लगेच धावत आली बघ."

शेजारच्या मिनाकाकू घेऊन आल्या वाटतं मला इथे .डोळे मिटून आपल्याला काय झालं होतं हे तिने  आठवायचा प्रयत्न केला. हळूहळू तिला एकएक गोष्ट आठवायला लागली.केतन, प्राजक्ता कुठे आहेत? काय करत असतील दोघं ? खाल्लं असेल का काही? रडून रडून गोंधळ घातला असणार, आईंच्या हातनं तर काहीच होत नाही. तिला खूप काळजी वाटायला लागली.काय करावे ते सुचेना . इतक्यात आजींच्या मुलीच्या हातात तिला भ्रमणध्वनी दिसला. तिने तो थोडा वेळासाठी मागून घेतला आणि घाईघाईने  घरी फोन लावला. सीमाने,  तिच्या नणंदेने फोन उचलला.

 "कोण वहिनी? कशी आहेस?"

" सीमा, तू? तू कधी आलीस?  केतन, प्राजक्ता कसे आहेत? पोरं काल धड जेवली पण नव्हती गं, रडून गोंधळ  घातला असेल ना?"

" वहिनी, नको काळजी करु. दोघंही व्यवस्थित आहेत, मी घातलंय त्यांना जेवायला. काल आईचा फोन आला होता,मला सगळं सांगीतलं तिने.रडत होती सांगताना. मला राहवलं नाही , लगेचच निघाले मग. आता तू घरी येईपर्यंत मी आहे इथे. तू स्वतःची काळजी घे. घराची, मुलांची काळजी करु नको. जेवायचा डबा पाठवून देते मी कोणाबरोबर तरी."

 सीमाशी  बोलणं झालं तशी ती निश्चिंत झाली.पडल्या पडल्या नजरेसमोर  कालचा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला.


 प्राजक्ताला कडेवर आणि केतनला हाताशी धरून ती संध्याकाळी जवळच्याच बागेत खेळायला घेऊन गेली . मुलांबरोबरच तिलाही थोडी  विश्रांतीची, शांततेची गरज होती. विश्वास नेहमीप्रमाणेच कार्यालयामधे  होता. शेअर बाजार बंद झाला की दिवसभराचा हिशोब संध्याकाळी करायची पध्दत होती त्याची. मुलांची  जबाबदारी घ्यायचे तो कायम टाळायचा . त्याने कधी त्यांना जवळसुध्दा घेतलं नाही ना त्यांच्यासोबत वेळ घालवला. येताजाता त्यांच्यावर राग काढणं एवढं मात्र त्याला करायला यायचं.मुलं मग सतत तिच्या मागेमागे असत. ती पण चार वाजेपर्यंत कार्यालयामधेच असायची. शेअर्सच्या व्यवसायाचा भार पूर्णपणे तिच्यावरच होता .सकाळी ९ ते ४ या वेळात ती अधूनमधून मुले, स्वयंपाक आणि सासुबाई हे सगळं  घरात  येऊनजाऊन बघायची. सासुबाई खूप चांगल्या होत्या, पण गुडघेदुखीमुळे  त्यांना फार काही करता यायचं नाही .त्यातल्या त्यात एक चांगलं होतं कि  कार्यालय घरातच होतं.पण तरीसुध्दा दिवसभर खूप धावपळ व्हायची तिची.  कालही सकाळपासून  विश्वास चा मुड खूपच खराब होता. आजकाल बऱ्याच वेळा तो  तसाच असायचा.  शेअर बाजार काल  अचानकपणे जोरदार गडगडला.  त्यांच्या  ग्राहकांचे यात खूप नुकसान झाले.  संतापलेले  ग्राहक सकाळी कार्यालय  उघडल्यापासूनच येऊन बसले होते.विश्वास आणि त्यांची वादावादी  चालूच होती, संध्याकाळ झाली तरी आरडाओरडा चालूच होता . कार्यालयामध्ये कोमल गेली तेव्हा हा सगळा राग तिच्यावर सर्वांसमोर  काढायला त्याला निमित्तच मिळालं. 

 " कोमल, तुला कधी अक्कल येणार आहे? इतकी वर्षं या व्यवसायात आहेस तरी तुला समजत नाही पैसे कुठे गुंतवावे ?तुझं घरात पण लक्ष नाही आणि धंद्यात पण. Useless.  किती नुकसान सोसु मी तुझ्यामुळे, वैताग आलाय तुझा मला. तुझ्याशी मी लग्नं का केलं कोण जाणे "

 तो ओरडून त्याच्या ग्राहकांसमोर बोलायला लागला तेव्हा  तिला  खूप अपमानास्पद वाटलं. मी सांगेन ते ऐकतोस का कधी?त्या शेअर्समधे गुंतवणूक  करु नको हे बजावून सांगितलं होतं मी तुला तरीसुद्धा तुला हवं तेच तु केलंस, वर दोष मलाच देतोस असं बोलावसं वाटलं तिला पण विश्वासचा रुद्रावतार पाहून ती गप्प बसली. सगळ्यांसमोर हात उचलायलाही कमी केले नसते त्याने.


 दिवसभर हेच चालू होतं म्हणून ती मुलांच्या निमित्ताने बाहेर निघाली. बागेत आल्यावर मुलांचा किलबिलाट ऐकून तिला थोडं बरं वाटलं. केतन व प्राजक्ता  खुश झाले आणि धावत जाऊन झोपाळा खेळायला लागले. समोरच बाकावर मुलांकडे बघत ती बसली .तिच्याही नकळत डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले, तिला ते थांबवताच येईना. सकाळपासूनची घुसमट अश्रूंवाटे बाहेर पडू लागली. समोरच राहाणारा सुमित नेमका त्याच वेळी त्याच्या आजीला न्यायला आला होता. आजी रोज संध्याकाळी बागेतील मंदिरात तासभर येऊन बसत असत. सुमितने तिला रडताना पाहिले आणि तो तिच्याशेजारी बाकावर येऊन बसला.

 "ताई तू ठीक आहेस ना, काय होतंय तुला," 

पण ती बोलायच्या मनःस्थितीत नव्हती. सुमीतनेही जास्त काही न विचारता तिला पाणी दिले आणि आजीला घेऊन तो निघून गेला. तो जातो ना जातो तोच विश्वास अचानक बागेत आला आणि जोरजोरात ओरडायला लागला, 

"आत्ता कोणाशी बोलत होतीस? हेच धंदे करायला येतेस वाटतं इथे.उठ, ताबडतोब घरी चल, बघतो तुला घरी जाऊन" तिला काय करावे ते सुचेना.बागेत आलेले लोक थांबून ,वळूनवळून त्यांच्याकडे पाहू लागले.कसनुसे होत पटकन तिने मुलांना बरोबर घेतले आणि झपाझप  काही तमाशा होण्यापूर्वी  बाहेर पडली. कधी एकदा घरी जातोय असं तिला झालं होतं. घरी पोचताच विश्वासाने परत आरडाओरडा  आणि  सुमित वरून संशय घेण्यास सुरवात केली. त्याने दारू घेतलेली आहे हे तिच्या लक्षात आलं. आता तर त्याला रोज घ्यायची सवयच लागली होती. तरीही

 ,”अरे विश्वास   सुमित किती लहान आहे माझ्यापेक्षा, मी लहान भाऊ  समजते रे त्याला “

तिने बोलायचा प्रयत्न केला. आताशा  तो कोणावरूनही संशय घ्यायचा. आज मात्र  त्याने सीमा ओलांडली , तिचा संताप संताप झाला . पण विश्वासचा ताबा दारूने घेतला होता. त्याने तिला जोरात थोबाडीत मारली. सकाळपासून तिने धड काही खाल्लेही नव्हते  आणि दिवसभराचा ताण याने ती खालीच कोसळली. तरीही त्याचे मारणे थांबत नव्हते. मुले घाबरून रडायला लागली. तिला शेवटचं आठवत होतं ते विश्वास ने तिच्या पोटात जोरात लाथ मारली . त्यानंतरचे  तिला काही आठवत नव्हतं. आत्ता  हे सगळं आठवून तिच्या डोळ्यातून पाणी वहायला लागलं. काय करुन बसले हे मी? माझ्या हातांनीच माझ्या पायावर धोंडा मारुन घेतलाय मी.


 किती वाटा....चुकल्यामुळे चुकलेल्या. आई वडिलांच्या विरोधात जाऊन आपण लग्न केंलं.  विश्वास भरोसा ठेवण्यासारखा नाही, त्याच्याशी लग्न करून तू खूप मोठी चूक करतीयेस हे तिच्या आई वडिलांचा मत तंतोतंत खरं ठरलं होतं. तिच्या वडिलांचा शेअर चा व्यवसाय होता. तिच्या माहेरच्या घराच्या जवळच त्यांचं  कार्यालय होतं .महाविद्यालयात जातायेता किंवा आईचा काही निरोप द्यायचा असेल तर ती तिथे जायची. हे जग तिला आवडत होतं.  पुढे जाऊन मोठ्ठी शेअर ब्रोकर व्हायचं असं तिने ठरवलं होतं. या क्षेत्रात स्त्रीया फारशा नव्हत्या पण आपण यातच यशस्वी व्हायचं अशी तिची इच्छा होती. तसा अभिनयही तिला आवडायचा. पुरुषोत्तम करंडक मध्ये  एका वर्षी तिने अभिनयाचं उत्तेजनार्थ बक्षिसही मिळवलं होतं. पण ते तेवढ्यापुरतंच राहीलं. तिच्या वडीलांनी पण आपला व्यवसाय कोमलला सुपुर्द करायचा असं ठरवलं होतं,तिला त्यांनी त्या  दृष्टीने शिकवायलाही सुरवात केली होती. आपली कारकीर्द  यातच  करायची हा तिचा विचार पक्का होता. महाविद्यालयामधेही ती प्रसिध्द होती.तिची उंची, शेलाटा बांधा आणि रेखासारख्याच तिच्या लांब केसांच्या दोन वेण्या यामुळे बरीच मुले पण तिच्याशी ओळख  करुन घेण्यासाठी धडपडायची.


  तिच्या वडीलांच्या कार्यालयामध्ये त्याच सुमारास विश्वास अर्धं वेळ कामाला यायला लागला. विश्वासची  ओळख तिच्या वडिलांनीचं करून दिलेली तिला आठवत होतं.  विश्वास दिसायला खूपच देखणा होता.त्याची कपड्यांची निवडही चांगली होती. कोमल आॕफीसमधे यायची तेव्हा तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. तिलाही तो आवडला होता. हळूहळू दोघेजण गप्पा मारायला लागले , बाहेर भेटू लागले . कोमलच्या महाविद्यालयामधल्या दांड्या वाढू लागल्या .तिच्या वडलांना मात्र विश्वास कधीच आवडला नाही.  या दोघांमधल्या  मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर झालं ते दोघांनाही कळलंसुध्दा नाही.  कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी घरी त्यांच्या नात्याची कुणकुण लागलीच. तिचे वडील खूप संतापले, त्यांनी कोमलला समजवायचा खूप प्रयत्न केला.

 " हे बघ कोमल, मला समजतंय तु विश्वासच्या प्रेमात पडलीयेस. पण बेटा, तो मुलगा चांगला नाही. त्याचं शिक्षणही जास्त नाहीये. मी माणसांना ओळखतो. म्हणून मी तुला विरोध करतोय. ऐक माझं, भरोसा ठेवण्यासारखा तो मुलगा नाहीये."

 तरीही तिचं त्याला भेटणं चालुच राहीलं. शेवटी तिचं कार्यालयामधे येणं वडीलांनी बंद करुन टाकलं , विश्वासलाही कामावरुन काढून टाकलं. पण विश्वासच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कोमलला ते काय म्हणताहेत ते समजलेच नाही. जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.  तिचे अभ्यासातही मन रमत नव्हते. आईवडील परवानगी देणार नाहीत हे लक्षात येताच दोघांनी आळंदीला जाऊन लग्न केले.

विश्वासच्या घरी ती आली तेव्हा त्याच्या घरी फक्त त्याची आई होती. त्यांनी कोमलचे खूप मनापासून स्वागत केले.  तिला घरातली सगळी कामे, स्वयंपाक शिकवला. लग्नानंतर  सहा महिन्यातच आपले वडील का विरोध करत होते ते तिच्या लक्षात आले. विश्वास जास्त शिकला नव्हता पण छानछोकीशिवाय फारसं काही त्याला येत नव्हते. कोमलला शेअरची, त्या व्यवसायाची  जाण होती  म्हणून तिच्या भरवशावर त्याने व्यवसाय सुरु केला. पण त्यातही तिलाच लक्ष द्यावे लागायचे. विश्वासला त्यात फारशी  गती नव्हती . कोमलच व्यवसाय सांभाळत होती .या सगळ्या संकटात विश्वासची आई मात्र तिच्यामागे खंबीरपणे उभी होती. प्रसंगी आपल्या मुलाला सुनावायलाही त्या मागेपुढे पहायच्या नाहीत.त्यांचा तिला खूप आधार वाटायचा. 

 नव्या नवलाईचे दिवस संपले. केतनच्या वेळेस तिला दिवस गेले. काही वर्षांनी प्राजक्ताचा जन्म झाला  आणि तिचं व्यवसायातलं लक्ष थोडं कमी व्हायला लागलं. विश्वासला  व्यवसाय सांभाळणं फारसं जमत नव्हतं पण त्याचा पुरुषी अहंकार मात्रं हे मान्य करायला तयार नव्हता.आता डोळे बंद केल्यावर सगळे दिवस तिच्या समोर झरझर येऊन उभे राहीले. विश्वासशी लग्न केले नसते तर कदाचित आज  यशस्वी शेअर ब्रोकर झाले असते किंवा अभिनयक्षेत्रात जम बसवला असता. वाट चुकलीच आपली ,ती ओक्साबोक्शी रडायला लागली .रडण्याचा भर ओसरल्यावर तिच्या डोळ्यासमोर मुलांचे चेहरे उभे राहीले आणि ती भानावर आली.मी चूक केली पण त्याची शिक्षा मुलांना का?  मलाच काहीतरी करायला हवे, मला  हातपाय हलवायला हवे, यापुढे असाच अन्याय मी सहन करायचा?  नाही , मला विरोध करायला हवा हा विचार  मनाशी केला आणि सिस्टरला हाक मारली “ मला कधी सोडणार आहात घरी  ?”


घरी आल्या आल्या मुलं तिला येउन चिकटली. आईंनी तिला जवळ घेतले तेव्हा तिच्या मनाचा बांध तुटला व ती त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. त्या खूप समंजस होत्या . “  कोमल, असं कमकुवत होउन कसं चालेल? तुला खंबीर व्हावं लागेल. तु कुठलाही निर्णय घेतलास तरी मी तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव. अजिबात काळजी करु नकोस. “  त्यांच्या शब्दांनी तिला धीर आला. यापुढे काय करायचं  याचा ती विचार करु लागली. आता आपलं आयुष्य आपल्या मुलांसाठी जगायचं .तिने  पक्का  निश्चय केला. काहीतरी मनाशी ठरवत तिने स्वयंपाकाला सुरवात केली. बाहेर दरवाजा आपटल्याचा आवाज आला. विश्वास आल्याचे तिला समजले. 

“ ए, जेवायला वाढ मला , कुठं जाऊन आली दोन दिवस, मित्राबरोबर मजा मारायला? ", 

दारू प्यायलेल्या विश्वासला ती दोन दिवस इस्पीतळात असल्याचे गावी पण नव्हते. तिला वाढायला उशीर झाला तेव्हा स्वयंपाकघरात येऊन तिला मारण्यासाठी त्याने हात उचलला तेव्हा  त्याचा हात वरच्या वर धरत शांतपणे ती म्हणाली,

”  हे बघ विश्वास ,मी आत्ता इस्पीतळातून आलीये. यापुढे तु मला मारणार असलास तर मुलांना घेऊन मी  निघून जाईन नाहीतर तुला तरी घराबाहेर जावं लागेल. दोन्ही परीस्थितीत नुकसान तुझंच आहे. तु शेअर्सचा व्यवसाय करु शकणार नाहीस हे एक सत्य आहे  जे तुला चांगलं माहीत आहे.कारण त्यातलं तुझं ज्ञान शून्य आहे. जो काही व्यवसाय आत्ता चालतोय तो माझ्यामुळे हे लक्षात ठेव.शिवाय तुझ्या खाण्यापिण्याचे वांदे होतील ते वेगळेच . तेव्हा हात खाली करायचा " 

त्याचा हात जोरात हिसडून ती ठामपणे  म्हणाली.तिचा तो आविर्भाव पाहून एकदम गोंधळून, तोंड पाडून तो बाहेर निघून गेला. खुदकन हसून तिने स्वयंपाकघराच्या दारात पाहीले, तिच्या सासुबाईंच्या चेहर्यावर मंद हास्य होतं. चुकलेल्या वाटेतून  योग्य   वाट  तिने शोधली होती .



@ अंजली जोगळेकर 





गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

नशीब

 



                           


 विकास आश्रमाच्या आवारात सुलेखाने पाऊल टाकलं आणि  इकडेतिकडे भिरभिरल्या सारखी पाहू लागली .

           आश्रमाच्या  मधला भाग मोकळा होता आणि त्याला लागून  बाजूलाच काटकोनामध्ये लहान लहान खोल्या होत्या. खोल्यांच्या बाहेरच्या व्हरांड्यात काही मुली लिहीत बसल्या होत्या तर काहीजणी बैठे खेळ खेळत होत्या. सुलेखाला पाहून  मुली तिच्या जवळ धावत आल्या .कुणी तिला हात लावून पहात होतं, तर कुणी तिचा फ्राॕक ओढत होतं. सगळ्यांनाच या नविन मुलीशी बोलायची उत्सुकता होती. तिला मात्र कोणाशीच बोलावेसे वाटत नव्हते. डोळ्यातले अश्रू कधी बाहेर येतील याचा नेम नव्हता.इतक्यात भंडारी बाई लोखंडी दरवाजा लावून आत आल्या. दाराच्या बाहेर तिची बेबीआत्या उभी होती. आत्याला सोडून आपल्याला  आता इथेच रहायचंय हे लक्षात येताच ती ओक्सबोक्शी रडू लागली.  भंडारी बाईंनी तिला जवळ घेतलं,“ चल तुला तुझी खोली दाखवते “ आणि तिला  घेऊन त्या  खोलीत  आल्या. खोली छोटीशीच होती. रंग उडालेल्या भिंती ,दोन गाद्या,त्यावर जुन्या मळकट चादरी आणि एक ट्रंक  असं सामान तिथे होतं. खोलीतल्या दुसऱ्या गादीवर तिच्याएवढीच एक मुलगी चित्रं काढत बसली होती.   पण या सगळ्याकडे पाहण्याएवढी तिची मनःस्थिती चांगली नव्हती.सुलेखा सुन्नपणे  खाली बसून राहीली. भंडारीबाईनी   " उषा, ही सुलेखा, आजपासून तुझ्या बरोबर राहील, तिला आश्रम दाखव आणि नियमही समजावून सांग " असं सांगून तिला सोडून त्या निघून गेल्या. तिला कोणाशीच बोलावसं वाटत नव्हतं. अवघं चौदा वर्षं वय होतं तिचं  पण या  वर्षांत काय पाहीलं नव्हतं तिनं? 


           उगार सारख्या छोट्याशा गावात तिची आई, वडील आणि  ती असं छोटं  कुटुंब  तिला चांगलं  आठवत होतं . खरं तर आई शिक्षीका आणि वडील  पोस्टात एवढं कारण सुखी कुटुंबाला पुरेसं होतं. पण आत्ता मात्र तिला आठवत होतं ते वडलांचं दारू पिऊन येणं आणि आईला गुरासारखं बडवणं . अवघ्या दहा वर्षाच्या तिला काय करावं ते समजतही नसे .तरी पण ती तिच्या इवल्याश्या हातानी आईला वाचवायला बघायची आणि स्वतःच मार खायची .आई  आणि ती कित्येकदा  वडलांच्या हातून  कशाबशा सुटून स्वयंपाकघरात दार लावून थरथर कापत बसलेल्या असत. आत्ताही त्या रात्री तिच्या डोळ्यासमोर जशाच्या तशा आल्या आणि ती शहारली. या सततच्या मानसिक  त्रासामुळे आई आजारी पडली. तिच्या डोळ्यासमोर  आईचे हॉस्पिटल मधील शेवटचे दिवस,तिचा विदीर्ण चेहरा आला. तो दिवस ती कधीच विसरू शकणार नव्हती.आईचं बोलणं तर तिला जसंच्या तसं आठवत होतं . सततच्या  ताणाने आईला क्षयाचा आजार जडला व झपाट्याने हाताबाहेर गेला. तिला सरकारी इस्पीतळात दाखल केलं. जवळ राहणाऱ्या रमाकाकूने तिला तिच्या घरी नेले होते. जवळजवळ दहा दिवसांनंतर  आईला भेटायला ती आणि  काकू हाॕस्पीटलमधे गेले. तिला आईकडे पाहून धक्काच बसला. आईचा  या दहा दिवसांत अक्षरशः हाडांचा सापळा झाला होता. खोकून खोकून तिची छाती दुखत होती.डोळे आत खोलवर गेले होते.इतकं असतानाही सुलुला पाहून तिच्या चेहर्यावर आनंद पसरला. खोकत खोकतच आई म्हणाली , "सुलु माझं बोलणं ऐकतेस ? माझं आता काही खरं नाही, मी काही जास्त जगत नाही. पण मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन एक. आत्ताच्या आत्ता घरी जा, तुझे  जे कपडे सापडतील तुला ते घे आणि रमाकाकूकडेच रहा. मी गेल्यावर बाबांकडे रहायचे नाही हे लक्षात ठेव. एक वेळ भिक माग पण या माणसाकडे राहू नकोस. रमाकाकू तुझी व्यवस्था करेल. लगेच निघ, वेळ घालवू नकोस. राणी, माझे आशिर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत . सांभाळ स्वतःला." आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं, सुलेखाही ओक्साबोक्शी रडायला लागली. खरं तर तिला आईजवळच बसायचं होतं पण आईने   तिला हॉस्पिटलमधून अक्षरशः हाकलून लावले. घरी जाऊन तिने मिळतील ते कपडे एका पिशवीत कोंबले  आणि  रमाकाकूबरोबर जायला निघाली. त्या इवल्याश्या जीवाला काहीच समजत नव्हतं. फक्त आईने सांगितलेलं ऐकायचं एवढंच तिला माहीत होतं. तो रस्ता तिला  इतका लांब वाटत होता की संपता संपेना.  त्या दिवसानंतर मात्रं तिचं सगळं आयुष्यच जणु बदलून गेलं. आईचा चेहरा तिने त्यानंतर कधीच पाहीला नाही. एकाच गावात काकूचे घर होते. बाबांनी तिथे येऊन तिला घेऊन जायचा प्रयत्न केला, दारुच्या व्यसनापायी सुलेखाला विकायलाही तिचे वडील मागे पुढे पाहणार नाहीत  या भितीने काकूने तिला बंगलोरला अनुआत्याकडे नेऊन पोचवलं. इतक्या लांब ते पोचू शकणार नाहीत असं सर्वाचं मत पडलं.

 बंगलोरला आली आणि तिचं एकदम वेगळं आयुष्य सुरु झालं, कल्पनेच्याही पलीकडचं. इतक्या दूर  आल्याने आईची आठवण येऊन तिला खूप  रडू येत असे. त्यातच आई गेली हे आत्या कोणालातरी सांगत असताना तिने ऐकलं  आणि ती हमसून हमसून रडू लागली. हे सगळं काय होतंय हे तिला कळतच नव्हतं. बंगलोरच्या अनुआत्त्याकडे ती काही वर्षं राहीली.  आत्याचं घर म्हणजे दोन  खोल्या. लागुनच असलेल्या  आवारात  चिंचेचं मोठ्ठं झाड  होतं. त्याला खूप चिंचा लागलेल्या होत्या. आत्याच्या बाजूला दोन तीन बिर्हाडं होती.  सगळी मुलं या झाडाखाली खेळायची. सुलेखाचं अजिबात मन लागायचं नाही , संध्याकाळ झाली की तिला झाडाखाली जायची भिती वाटायची.   आत्याला दोन मुली होत्या. आई असताना ती एकदा अनुआत्याकडे आली होती तेव्हा दोन्ही तायांशी सुलेखाची चांगली गट्टी जमली होती. आत्याने पण  तिचे खूप लाड केले होते. सुरवातीचं वर्ष बरं गेलं पण आई गेल्यावर  आत्याचं सुलेखाशी वागणं बदललं. तिचे दिवसंच बदलले. सख्खया आत्याकडून दुजाभाव होऊ लागला. आत्याने  तिला  सरकारी शाळेत घातलं. तिथे मुलींना शिक्षण मोफत होतं. आत्या सरकारी इस्पीतळात नर्स होती आणि अप्पाकाका , आत्याचे यजमान, खासगी नोकरीत होते. स्वतःच्या मुलींना ताजं खाणं द्यायचं आणि तिला मात्रं उरलेलं शिळं अन्नं असं चालू झालं. घरातील सगळं काम शाळा सुटल्यावर तिला करावं लागे. तिला इतक्या कामाची सवय नव्हती. तिच्यापेक्षा थोड्याच मोठ्या असलेल्या बहिणींचे कपडे धुणे, घडी करण्यापासून सगळी कामं केली  तरच तिला खायला मिळे. तिला अभ्यासालाही वेळ मिळत नव्हता. पाहता पाहता  वर्ष उलटलं.या वर्षात कोणी तिच्याशी धड बोललंही नाही.  तिला एकटं रहायची सवय  लागली होती. ती सतत विचारात गढून गेलेली असायची, आईची आठवण येऊन  खूप रडायला यायचं. त्यातच  अलीकडे तिला खूप भूक लागायला लागली.  शरीरातही काहीतरी बदल होत आहेत हे तिला जाणवत होतं.सारखं आरशात पहावं असं वाटायचं. “उफाड्याच्या अंगाची झालीये आपल्या आईसारखी” असं आत्या फणकारत म्हणायची. तिच्या उमलत्या तारुण्याकडे सर्वांचंच लक्ष जात होतं. ती स्वतःही त्यामुळे खूप भांबावलेली, गोंधळलेली असायची. तिला लाज वाटायची. मासिक पाळीही नुकतीच सुरु झाली. घरात खायलाही नीट मिळायचं नाही. प्रेमाचे दोन शब्द तिच्या वाट्याला येत नव्हते. पण एवढ्यावरच तिचं दुदैव संपायचं नव्हतं. आजही तिला ती भयंकर  रात्र जशीच्या तशी आठवत होती .

                  आत्याची काही वेळा रात्रपाळी असायची. त्या दिवशी पण तिची रात्रपाळी होती. दोन्ही ताई  कॉटवर झोपल्या होत्या . ती जमिनीवर नेहमीप्रमाणे सतरंजीवर चादर पांघरून झोपली होती. थकल्याने पडल्या पडल्या तिला गाढ झोप लागायची. त्या रात्री अचानक  तिच्या पांघरुणात कोणी तरी शिरलं,  तिच्या शरीरावरुन कोणाचातरी हात फिरायला लागला.  हे काय होतंय ते तिला समजेचना. ओरडण्यासाठी तिने तोंड उघडलं  पण त्या व्यक्तीने तिचं तोंड दाबून धरलं होतं. खूप धडपडली तेव्हा ती व्यक्ती बाजूला झाली. तिला धक्का बसला. ते अनुआत्त्याचे यजमान, तिचे अप्पाकाका होते. बसलेल्या धक्यातून ती सावरूच शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पाकाकांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते, जणु काही काल रात्री काही घडलेच नाही. तिला काय करावे, कोणाला सांगावे काहीच सुचेना. रोजच्यासारखेच तिच्याशी ते बोलत होते . तिचं कामात लक्षंच लागेना , कामात चुका होऊ लागल्या . दुसऱ्या रात्री परत तोच प्रकार,  ज्यावेळी आत्याची रात्रपाळी असायची त्या वेळेसच बरोब्बर हा घृणास्पद प्रकार चालु झाला.  तिने आत्याला सांगायचा  प्रयत्न करुन पाहीला, आत्याला ते समजलं नाही ? का तिला सांगणं जमलं नाही  माहीत नाही पण आत्याने पूर्णपणे  दुर्लक्ष केलं . आता तर घरात एकटं थांबायचीही तिला भिती वाटायला लागली. रात्रं झाली की ती घाबरायची. भितीने तिची झोपच उडाली होती. सकाळी शाळा, नंतर घरातली कामं आणि रात्रीचा हा त्रास यामुळे तिचं अभ्यासातलं लक्ष उडालं. शाळेत कोणाशी बोलायची इच्छाच राहीली नाही,   नुसती उदास बसून असायची. वर्गातल्या मुली काही बोलल्या तर रडायलाच लागायची. बाईंकडून वर्गात लक्ष नसल्याने ओरडा खायची तो वेगळाच. ही गोष्ट कोणाजवळ बोलायची सोय नव्हती. सांगीतलं असतं तरी तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नसताच हे तिला कळत होतं. हे अनेक महिने चालु होतं. शेवटी जो परीणाम व्हायचा होता तो झालाच.  ती आठवीत नापास झाली. घरी आल्यावर आत्या खूप संतापली होती. “ पदरचा पैसा खर्च करून तुला शाळेत घातलं आणि काय दिवे लावलेस ? लक्ष कुठे असतं तुझं ? तुझी आई निघून गेली तुला माझ्या डोस्क्यावर बसवून, दादा बसलाय तिकडे दारु पित आणि आम्ही सांभाळतोय याच्या मुलीला.नसती ही पिडा लागलीये माझ्या राशीला. काय काय म्हणून करायचं मी? आता तुला मी माझ्या घरी ठेवत नाही, बास झालं. तुझी एखाद्या आश्रमात  सोय करते थांब.”. त्यातच भर म्हणून  तिच्या वडलांना ती बंगलोरला असल्याचा सुगावा लागला मग काय अनुआत्याला निमीत्तच मिळालं. पुण्यातल्या दुसर्या आत्याकडे म्हणजे बेबी आत्याकडे सुलेखाला  पाठवायची तिची तयारी सुरू झाली.  बेबी आत्याने मात्र तिला ठेवून घ्यायला पूर्ण नकार दिला .  तिची  मैत्रीण पुण्यातील एका बालिकाश्रमात विश्वस्त होती. आत्याने तिच्या ओळखीने  सुलूला तिथे ठेवायची तयारी दाखवली.  अनु आत्यानेही सुलुला अप्पाकाकांबरोबर  ताबडतोब बसने पुण्यात बेबीआत्याकडे पाठवलं. बसमधेही काकांनी स्पर्श करण्याची संधी सोडली नाही. अप्पाकाकांच्या या  वागण्याने सुलुच्या त्या नाजूक वयात  पुरुषांविषयी कायमचा राग , स्पर्शाविषयी किळस आणि तिरस्कार निर्माण झाला.

 पुण्यात काय वाढून ठेवलंय हे तिला माहीत नव्हतं पण  अप्पाकाकांपासून सुटका मिळणार या कल्पनेनेच ती आनंदी होती.  वडीलांपासून सुरक्षित ठेवायचंय या निमीत्ताने आत्याने तिला अनाथाश्रमात काही वर्षांसाठी ठेवायचे ठरवले.ती सुलेखाला घरी ठेवून घेउ शकली असती पण वयात आलेल्या सुलेखाची जबाबदारी कोणालाच नको होती.

 “ ए, नाव काय गं तुजं? मी उषा हाय,लई टिमटिम  नाई चालत इथं. मी म्हनंल तसंच रहायचं या खोलीत, काय?”  खोलीतल्या दुसर्या मुलीचं, उषाचं बोलणं ऐकून ती दचकून भानावर आली. आश्रमाच्या खोलीत ती आत्ता उभी होती. उदास मनाने तिने खोलीत सामान लावले.काही दिवस तर तिथले नियम , जेवणाच्या वेळा, पध्दत समजून घेण्यात गेले. भंडारी बाईंनी तिला बोलवले,   ” सुलेखा, सगळं नीट समजुन घे बाकीच्या मुलींकडून. इथे जेवण, चहा, नाश्ता यांच्या वेळा ठरलेल्या असतात. घंटा वाजली की जेवणघरात रांग लावायची. आपलं ताट, वाटी,  कपडे धुवून टाकायचे. सकाळी सहाला उठावं लागतं इथे. सात वाजता प्रार्थना असते. बाकी तुझ्या खोलीत राहणारी उषा आहे ना तिच्याकडून समजून घे. समजलं का?” 

          आश्रमातील तिचे दिवस सुरु झाले. सुरवातीला खूप गोंधळ्यासारखी झाली खरी पण हळूहळू सुलू सरावली. इतर मुली आपल्यासारख्याच किंवा  आपल्यापेक्षा जास्त त्रास सोसून आल्या आहेत हे तिच्या लक्षात आलं. तिच्या बरोबर खोलीत राहणारी मुलगी उषा तर बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीतून आली होती. आश्रमात पहाटे लवकर उठावे लागत असे. मुली जास्त आणि न्हाणीघर कमी, उठल्यापासूनच भांडणांना सुरवात व्हायची. इथे रहायचं असेल तर आपल्यला आक्रमक व्हावं लागेल हे काही दिवसातच तिच्या लक्षात आलं. पण तिचा स्वभाव पडला शांत आणि साधा .मुलींना खूप भूक लागायची. पण खाण्याच्या ,जेवणाच्या वेळा ठरलेल्या असायच्या. जेवणही मर्यादीत असे. त्यामुळे मुली बिस्कीटं, खाणं वगैरेची चोरी करायच्या. सकाळचं खाणं, जेवण यासाठी घंटा वाजायची. घंटा वाजली की आपली ताटली घेऊन पळत जेवणखोलीत जाऊन रांगेत उभं रहायचं. पुढचा नंबर लागला तर निदान बरं जेवण तरी मिळायचं. शेवटचा नंबर असेल तर पातेल्यात उरलेलं जे असेल ते आणि तेवढंच खायला मिळे. काही दिवसातच सुलेखा आरडाओरडा करुन रांगेत पुढे  उभं रहायला शिकली. यामधे तिच्या खोलीतली उषा तिची गुरु झाली. शांत आणि साधी असलेली सुलेखा इथे काही महिन्यातच आक्रमक, अन्यायाला प्रतिकार करणारी  बनली. आश्रमाने तिला जीवन जगण्याचे बरेवाईट दोन्ही धडे दिले. उषाला इथे येऊन दोन वर्ष झाली होती. तिची आई जिथे रहात होती तिथल्याप्रमाणे तिच्या तोंडात शिव्या असायच्या. सुलेखाही आता शिव्या द्यायला शिकली. बर्याच वेळा आश्रमात पाहुणे खाऊ घेऊन यायचे. सगळा खाऊ एका कपाटात ठेवला जाई. कपाटाला कुलूप असे. पण हा खाऊ चोरण्यात उषा पटाईत होती. सुलेखालाही खूप भुक लागायची. ती पण चोरी करायला लागली. आश्रमातल्या मुलींना जवळच्याच मुलींच्या शाळेत घातलं होतं. उषा आणि ती दोघीजणी नववीच्या वर्गात होत्या. शाळेत जाता येता मुलं खूप छेडखानी करायची. उषाची आई काय करते आणि या मुली आश्रमात राहतात हे त्या मुलांना माहीत झालं होतं.पण  त्यांच्याबद्दल  तक्रार करायची सोय नव्हती नाहीतर त्यांची शाळा बंद झाली असती. त्यांना अभ्यासात फारसा रस नव्हता पण तेवढंच आश्रमाच्या बाहेर पडायला मिळायचं. उषाकडे एक त्यांच्यापेक्षा मोठा मुलगा जायच्या यायच्या रस्त्यावर एकटक पहात उभा असायचा. उषाच्याही ते लक्षात आलं होतं. हळूहळू दोघेजण बोलायला लागले. सुलेखाच्या नादी मात्रं  मुलं लागत नसत. कोणी पहात असलं तर ती त्याला शिव्याच द्यायला सुरवात करे.  तिला मुलांचा फार राग यायचा. अप्पाकाकांच्या अनुभवावरुन तिला कोणावरच विश्वास उरला नव्हता. उषालाही ती खूप थांबवायचा प्रयत्न करायची.” कशाला त्या पोराच्या मागे लागती गं? एक दिवस फसवून निघून जाईल ××” पण काहीच उपयोग झाला नाही. तिचं त्याच्याशी बोलणं, शाळा बुडवून त्याच्याबरोबर जाणं चालूच होतं.  उषा त्याच्या प्रेमात पडली होती .शाळेतनं आल्यावर आश्रमात कामंही खूप करायला लागायची. झाडलोट, स्वच्छता, कपडे, भांडी धुणं, स्वयंपाकाला मदत अशी कामं असली तरी प्रत्येकाची पाळी लाऊन दिलेली असायची. अनुआत्या तर भेटायलाही यायची नाही. अभ्यासात तिची फारशी प्रगती नव्हती. पण ती नापासही होत नव्हती. नववी पास होऊन दहावीचं वर्ष सुरु झालं. उषाही नववीत अगदी काठावर पास झाली होती. ती त्या मुलाच्या बरोबर बर्याच वेळा शाळा बुडवून जात असे.  एक दिवस ती जी त्या मुलाबरोबर गेली ती परत आलीच नाही. आश्रमात गेल्यावर बाईंनी जेव्हा त्यांची खोली तपासली तेव्हा तिचे कपडे गायब होते. एकच हाहाकार माजला. सुलेखाला माहीत असणार म्हणून तिची कसून चौकशी सुरु झाली. पोलीसात तक्रार दाखल केली गेली. पण याची शिक्षा म्हणून सुलेखाची शाळा बंद झाली.  आश्रमात अभ्यास करुन सुलेखाने  बाहेरून दहावीची परीक्षा दिली. पळुन गेलेली उषा सहा महिन्यात परत आली तेव्हा तिची अवस्था पाहवत नव्हती. ती तीन महिन्याची गरोदर होती. कायम हसणारी , भांडणारी  उषा एकदम शांत झाली होती. ती सतत रडत असायची. तिला पाहून सुलेखाला खूप वाईट वाटले. आपण आयुष्यात असा आततायी निर्णय कधीही घ्यायचा नाही हे तिने  मनाशी पक्के केले. दहावीला फार मार्क पडले नाहीत तरी सुलू पहील्या झटक्यात पास झाली. उषाकडे पाहून आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे हे तिच्या लक्षात आलं. आपण आई सारखं शिक्षिका व्हायचं  हे तिने मनाशी  ठरवलं. बारावी झाल्यावर बी एड करता येईल असं  आश्रमातल्या एका शिबिरात तिला समजलं. यात अडचण एकच होती . अठरा वर्ष पूर्ण होईपर्यन्तच ती इथे राहू शकत होती. नंतरची तीन वर्ष आपण आत्याला समजावू या विचाराने तिने पूढे शिकायला सुरवात केली .  ती बारावीत  मात्र चांगल्या मार्कांनी पास झाली.  नाइलाजाने अनुआत्या तिला घ्यायला आली. पुढे काय करायचं यावर  सुलु तिच्याशी बोलणार त्याआधीच बेबीआत्या आणि अनुआत्या यांची फोनवरची चर्चा  तिने ऐकली. बेबीआत्या म्हणत होती,” तु इतके वर्ष सांभाळलंस तिला. पण किती काम करुन घ्यायचीस माहीतीये मला. ती आता अठराची झालीये पूर्ण, सरळ लग्नं लाऊन देऊ आणि मोकळे होऊ. कोण ठेवून घेणार ही ब्याद. मी तिच्यासाठी स्थळ पाहते, याहून जास्त काही माझ्याच्याने होणार नाही सांगून ठेवते. माझी पण मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे.” हे बोलणं ऐकलं आणि सुलु सुन्न झाली. आपण कोणालाच नकोय ही भावना फार वाईट असते. आई नसेल तर जगात कोणीच आपलं नसतं हे एक सत्य आहे याची जाणीव क्षणोक्षणी तिला होत होती. एक दिवस बेबीआत्याने तिला जवळ बोलवले,  “ हे बघ सुलेखा, तु माझ्या भावाची मुलगी आहेस. तुला सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणूनच तुझं लग्नं करुन देणार आहोत आम्ही  पण याहून जास्त अपेक्षा ठेवू नकोस माझ्याकडून. माझ्या मुलांची शिक्षणं व्हायची आहेत."  .   

         आत्याने मुलगा पाहायला सुरवात केली आणि फारशी धडपड न करता कोणीतरी माधवचं स्थळ सुचवलं. माधव बारावी पास झाला होता. एका डाॕक्टरांच्या क्ष किरण तपासणी करणार्या दवाखान्यात सहायक म्हणून काम करत होता. सुलेखाला तो आवडला आहे की नाही हे विचारण्याची तसदी कोणीच घेतली नाही. तिला न विचारता तिचं लग्नं सर्व आत्या व काकांनी मिळून ठरवलं. माधवची आणि तिची भेटही झाली नव्हती. त्याच्या घरची माहिती तिला नव्हती, तिने माधवला धड पाहीलेही नव्हते.  पण सुलेखाजवळ आता हे लग्नं करण्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता.  अगदी थोड्या माणसांमधे आणि थोडक्यात लग्नं  उरकल्यावर दोन्ही आत्या तिला म्हणाल्या,  “सुलेखा, आता आमची जबाबदारी संपलीये. सासरी नीट रहा, सगळ्यांशी जमवून घे आणि जमलं नाही तरी आमच्याकडे परत येऊ नकोस, आम्ही तुला यापुढे मदत करु शकणार नाही. आता तु आणि तुझं नशीब”.  सुलेखाला खूप रडायला येत होतं  ते  त्यांच्या बोलण्यामुळे  की त्यांना सोडून जातोय म्हणून हे तिला समजेना.  


         सुलेखा सासरी आली. माधवचं सोमवार पेठेत दोन खोल्यांचं भाड्याचं घर  होतं.  तिच्या सासुबाई , सासरे गावातल्या घरात रहायचे. ह्या घराला, माणसांना आपलं मानून रहायचं, माधवला सुखात ठेवायचं, सासु सासर्यांची सेवा करायची असं तिने मनोमन ठरवलं.दुसर्या दिवशी सत्यनारायण झाल्यावर सगळे पाहुणे घरी गेले. सासुसासरे आठ दिवसांनी जाणार होते. सासुबाई जरा कडक स्वभावाच्या होत्या.  पाहुणे गेल्यावर माधवची आणि तिची झोपायची व्यवस्था स्वयंपकघरात केली होती. सुलेखा गादीवर धडधडत्या हृदयाने लाजून बसली होती. कधीतरी सिनेमात पाहीलं होतं तसा माधव जवळ येईल,बोलेल, आपल्यावर प्रेम करेल आणि आपण आधीची सगळी दुःख विसरुन जाऊ असं तिला वाटत होतं. तिचं सगळं लक्ष दाराच्या आवाजाकडे लागलं होतं. इतक्यात माधव दार लाउन आत आला आणि तिच्याजवळ बसला.  खाली मान घालून तो काहीतरी बोलेल याची ती वाट पाहू लागली. माधवने मात्र काहीही न बोलता तिच्या पदरालाच हात घातला. त्याच्या त्या स्पर्शाने तिला अप्पाकाकांची तीव्रतेने आठवण झाली आणि नकळतच तिने त्याचा हात बाजूला केला.  तिच्या या कृतीने माधव संतापला, त्याचा अहंकार  दुखावल्यासारखा  झाला.तिला जोरात थप्पड मारुन संतापाच्या भरात नाही नाही ते बोलु लागला  “मला हात लाउन देत नाहीस? मला?नवरा आहे मी तुझा , मालकी हक्क आहे माझा तुझ्यावर. मला नाही म्हणतेस काय?कोण दुसरा यार आहे का काय आधीचा? बघु कशी ऐकत नाही. माझा हात झटकते काय?” ती काही बोलायचा प्रयत्न करत होती पण तिची पर्वाही न करता जबरदस्तीने आपला कार्यभाग त्याने उरकला आणि झोपून गेला. सुलेखाला जबरदस्त मानसिक धक्का बसला.  रात्रभर ती सुन्नपणे नुसती बसून होती.  दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्व कामाची जबाबदारी सासुबाईंनी तिच्यावर सोपवली.  कामात दिवस तर उलटला पण जसजशी रात्रं जवळ यायला लागली तसतशी तिला भिती वाटायला लागली. काम करतानाही  रात्रीची आठवण येऊन ती थरथरत होती. परत एकदा त्याच रस्त्यावरुन मी  चाललीये  का?.  दिवसा काम, रात्रीची भिती, नकोसा स्पर्श,  प्रेमाचा अभाव आणि काळेकुट्ट भविष्य, हेच तिचं नशीब होतं? विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं. आठ दिवस झाले आणि सासुसासरे गावी परत  गेले. सुलेखाचा मात्र परतीचा मार्ग बंद झाला होता. तिला आपल्या आईसारखं होऊ पाहणारे आयुष्य अजिबात मान्य नव्हतं.  माधवकडून होणारा अन्याय ती सहन करणार नव्हती. रात्र झाली. रोजच्यासारखा माधव  तिच्याजवळ आला.   सुलुने विरोध करताच त्याने तिच्यावर हात उचलला. तो हात वरचेवर पकडून ती म्हणाली," मला मारायला हात उचलायचा नाही आणि माझ्या मर्जी विरूद्ध मला हातही लावायचा नाही". तो काही बोलायच्या आधीच ती म्हणाली," मला सगळे कायदे माहीत आहेत".  तिचा रणरागिणीचा अवतार पाहून माधव वरमला आणि कुशीला वळून झोपून गेला. सुलुला विश्वासच बसेना, आश्रमात शिकलेले जीवनाचे धडे प्रत्यक्षात येऊ पहात होते. गालातल्या गालात हसत ती सुध्दा खूप दिवसांनी शांत झोपली.


        दुसऱ्या दिवशी सकाळी माधव उठला तेव्हा स्वयंपाकघरात सुलू गाणं गुणगुणत चहा करत होती. तो जरा घाबरतच आत गेला. सुलुने प्रसन्न हसत गरम गरम चहाचा कप त्याच्या हातात दिला. दिवसाची सुरवात छान झाली होती.  तिचं नशीब ती बदलणार होती , त्याची सुरवात तिने केली होती. तिचं भविष्य तीच घडवणार होती...तिला हवं तसं. स्वयंपाक घरातील  रेडिओवर गाणं चालू होतं.. नसीब होगा मेरा मेहरबा कभी ना कभी

अंजली विश्राम जोगळेकर