Shabdanjali......शब्दांजली

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

लोकशाही

काहीही कर पण लोकशाहीवरचा माझा विश्वास कायम ठेव

तसाही माझ्या रोजच्या संघर्षात तु कुठे असतोस
निवडणुकीच्या वेळी मात्र रोज पाया पडतोस
कोण जनता कोण शेतकरी
तुला फक्त तुझी खुर्ची प्यारी
थोडी तरी चाड ठेव
काहीही कर पण माझा विश्वास लोकशाहीवरचा रे कायम  ठेव.....

जातीधर्मामधे आमची हुशारी   विभागलीस
या तापत्या तव्यावर आपली पोळी भाजून घेतलीस
सलोखा, मैत्री सगळं सगळं विसरलो
आत्ता समजतंय आम्ही किती चुकत गेलो
अरे थोडी तरी चाड ठेव
काहीही कर पण माझा लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेव......

आम्हाला हवंय आमचं रोजचं जगणं सुरक्षीत
बस, रिक्षा , रेल्वे सगळं काही सुरळीत
नको तुमचं सरकार नको तुमचं राज्य
राजकारणाला करुन टाकलंत आमच्यासाठी त्याज्यं
आतातरी थोडी चाड ठेव
काहीही झालं तरी लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेव.......

आता मात्र डोक्यावरुन पाणी चाललंय
मतदान करायचंच नाही असं ठरवलंय
शिशुपाला भरलाय तुझ्या पापांचा घडा
आम्हीच शिकवू तुला चांगलाच धडा
नको ना ठेवूस कोणाचीही चाड
काहीही झालं तरी तुझा लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेव......

© सौ.अंजली जोगळेकर



गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

हुसैनीवाला..अभिमानास्पद क्षण

                                                                 हुसैनीवाला




भारताचे  Food bowl  किंवा Wheat  bowl  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  पंजाब राज्याबद्दल वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या आपण वाचत असतो. सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या हिमालयातून उगम पावलेल्या बारमाही वाहणार्या पाच नद्यांमुळे याचं नाव पंजाब असं पडलं. या पाण्याने संपन्न झालेल्या या सुपीक प्रदेशात कृषी हा मुख्य व्यवसाय आहे.   दुर्दैवाने पाकीस्तानला लागून असलेल्या या राज्याला सध्या अंमली पदार्थाच्या सीमेपलीकडच्या स्मगलींगने, व्यसनाने ग्रासून टाकलंय. इथली तरुण पिढी या व्यसनांच्या आहारी चाललीये हे वाचून या शुर वीरांच्या भुमीची, तरुण  दिलदार लोकांच्या भविष्याची काळजी वाटते. या राज्याच्या तीन सीमा पाकीस्तानला लागून आहेत.

आज मात्र मी पंजाबच्या हुसैनीवालाबद्दल लिहीणार आहे. राष्ट्रीय शहीद स्मारक असलेले हे ठिकाण प्रेरणादायी आहेच पण माझ्या मते प्रत्येक भारतीयाने, मराठी माणसाने नतमस्तक व्हावं असं पवित्र तिर्थक्षेत्र आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अशा स्थळांना भेट द्यायला हवी.
पंजाबमधे वाघा , फाजिल्का आणि हुसैनीवाला या तीन सीमारेषा पाकीस्तानला लागून आहेत. या तीनही ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली. वाघा ही एकमेव सीमारेषा आहे जी ग्रँड ट्रंकरोडवर स्थित आहे. ह्या रस्त्याला सिल्क रोड असं म्हणलं जातं. जुन्या काळातही अफगाणीस्तानला जाण्यासाठी ह्या रस्त्याचा  वापर केला जात असे. इथूनच रस्त्याच्या मार्गे आजही पाकीस्तानला येजा करता येते. खूप प्रसिध्द झालेल्या इथल्या संचलनामधे हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला बसून प्रेक्षक लांबून संचलन बघु शकतात. हुसैनीवालामधे मात्र ती आपण खूप जवळून बघु शकतो.
पीरबाबा गुलाम हुसैनीवाला यांच्यावरुन नाव पडलेले हुसैनीवाला हे गाव फिरोजपुर जिल्ह्यात आहे. फाळणीच्या वेळी हा भाग पाकीस्तानच्या हद्दीत गेला. परंतु भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांची समाधी इथे असल्याने भारत सरकारने १९७१ साली फाजील्का येथील बारा गावांच्या बदल्यात हा भाग मिळवला.   या जागेवर या देशभक्तांचं व नंतर झालेल्या युध्दांमधे शहीद झालेल्या वीरांसाठी राष्ट्रीय शहीद स्मारकाची उभारणी केली.  राजगुरु या मराठी देशभक्ताचे नाव  या स्मारकावर वाचून , ते ही पंजाबमधे, अभिमान वाटला. हे ठिकाण प्रत्येक येणाऱ्या माणसासाठी स्फुर्तीस्थान बनलं आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना लाहोर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिघांना फाशी देण्याची तारीख ब्रिटीश सरकारने जाहीर केली होती. पण लोकांमधला वाढता असंतोष पाहून जाहीर केलेल्या तारखेआधीच त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या पार्थीवांवर याच ठिकाणी अग्नीसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी प्रवेश केला की जणु काही इथल्या हवेतच देशभक्ती भरुन राहील्यासारखं वाटतं. इतक्या लहान वयात या तिघांनी केलेलं बलीदान पाहून उर भरुन येतो.  इथेच त्यावेळचे पहिले रेल्वे स्टेशनही आहे. ही जागा१९७१ च्या युध्दात पाकीस्तानने उध्वस्त केली होती. त्यावेळी मराठा बटालीयनने निकराचा लढा दिला, बरेच मराठी वीर शहीद झाले. नंतर भारत सरकारने अतिशय सुंदर राष्ट्रीय स्मारक येथे बनवले आहे.
दररोज सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही देशांचा झेंडा ध्वजसंचलन करुन समारंभपूर्वक उतरवण्यात येतो. हे पाहणं हा अत्यंत प्रेरणादायक अनुभव आहे. एखादे छोटेसे स्टेडियम असते तशी या जागेची रचना आहे. अर्ध्या भागात भारताचे तर दुसऱ्या भागात पाकीस्तानचे प्रेक्षक बसू शकतात. खूप जवळून दोघेही  जण एकमेकांना पाहू शकतात. पाकीस्तानकडील भागाला गेंडावाला असं नाव आहे. ध्वजसंचलन चालू असताना दोन्ही बाजुंनी जोरजोरात घोषणा देणं चालू असतं, झेंडे फडकत असतात.आपल्या बाजूने वंदे मातरम, बोले सौनिहाल सत श्री अकाल,भारत माता की जय तर पाकीस्तानकडे जी ले जीले पाकीस्तान असे नारे जोरजोरात चालू असतात. या घोषणांमधे आपण कधी सामील होतो ते आपल्यालाही कळत नाही. ते वातावरणच जादुई, जोशपूर्ण असतं.मोबाइलचे कॕमेरे लखलखत असतात.  आपले सैनिक संचलन करतात तेव्हा भारताचे लोक आणि त्यांचे सैनिक संचलन करतात तेव्हा त्यांचे लोक ओरडून प्रोत्साहन देत असतात, तेव्हा त्यांच्यातील ओरडण्याच्या स्पर्धेने वातावरण दुमदुमुन जाते, अक्षरशः शेजारी कोण काय बोलतं ते ऐकायलाही येत नाही.  आपले सैनिक खाकी वर्दीमधे पाय खांद्यापर्यंत  उंच नेउन  संचलन करतात तेव्हा त्यांना सलाम करावासा वाटतो. दोन्हीकडचे लोक सैनिकांचे, एकमेकांचे फोटो काढत असतात. विरोधी घोषणा दिल्या तरी ते कसे दिसतात, त्यांनी काय घातलंय याची उत्सुकता दोन्ही बाजूंना असते. ध्वजसंचलन संपल्यावरही एकमेकांकडे पहात पहात लोक बाहेर पडतात.
बाहेर पडताना बंकरमधे सैनिक सावधानतेत बसलेले दिसतात. त्यांना सतत सावध रहायला लागतं. बेसावध असताना एकदा पाकीस्तानने हल्ला करुन मालमत्तेचं  बरंच नुकसान व मनुष्यहानी  केलेली असल्याने  त्यांना सतत सावध रहायला लागतं, अगदी डोळ्यात तेल घालून. विशीष्ठ प्रकारे शिकवलेले  लॕब्रेडोर जातीचे कुत्रेही दोन्ही बाजूने उभे असतात. हे सगळं पाहून भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी या ध्वजसंचलनाचा अनुभव घ्यायला हवा.  भारतमातेच्या सुपुत्रांचे हे स्मारक आहे...पवित्र तिर्थस्थळ  आहे.



रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

आकाशातील सफर





रोहीत पक्षी पहायला गेले........
म्हणलं चल जरा त्याच्याशी मैत्री करु
आणि पंख झेपावत आकाशाची सैर करु
पण स्पष्ट म्हणाला मैत्री नको कानाला खडा लावतो
पण तरीही चल तुला ‘ माणसांची ‘ सैर करवतो..........

त्याच्याबरोबर निःशंक होऊन निघाले
आणि बघता बघता ढगांच्या वर जाऊन पोचले
म्हणलं ‘माझं’ घर एकदा पहावं
वरुन कसं दिसतंय ते तरी बघावं
हसून म्हणाला त्यात काय ही बघ इतकी सारी घरं
यातलं नेमकं तुझं कोणतं ते जरा बघ बरं
यातलं ‘ माझं’ घर कोणतं?
वरुन तर सगळं सारखंच दिसतं
रोहीत गुढपणे हसला
आणि माझ्यातला ‘मी’पणा क्षणात गळाला.......

मग म्हणलं शेजारचा देश पहावा
त्यांच्याकडे काय वेगळं आहे अंदाज घ्यावा
पण दोन्हीकडे सारखीच माणसं
नद्या, झाडे,रस्ते सगळंच एकसारखं
मग का बरं त्यांच्याशी उभा दावा
खाली पाहताना हा प्रश्नच पडावा............

असू दे, निदान आपल्या देशात तरी माणसं  वेगळी असतील
जात, धर्म यांनी केलेले विभाग दिसतील
पण इथून तर माणसं एकसारखीच दिसताहेत
मग आपले लोक का बरं फुट पाडताहेत
रोहीत म्हणाला जा तु तुझ्या  देशात
मैत्री नको तुमची मी परततो माझ्या  जगात
स्वार्थ, मतलब, संधीसाधु, द्वेष अशा विवीध भाषा तुमच्या
निरभ्र आकाश निःस्वार्थ प्रेम हा आधार जगण्याचा आमच्या
म्हणूनच म्हणतो   नको मैत्री या प्रगत मानवाची
लखलाभ असू दे ही बिना भाषेची  दुनिया आम्हांला आमची..........



गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

माझ्या अर्धशतकाची कथा



माझी पन्नाशी जसजशी जवळ यायला लागली तसा मला थोडा ताण येउ लागला. पण मग  काही गोष्टी मी मनाशी ठरवल्या. अर्धशतक ओलांडून मला काही वर्षं झालीयेत. ठरवल्याप्रमाणे मी माझ्यात अनेक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या बदलांमुळे वयाचा हा टप्पा माझ्यासाठी सुखकर, सकारात्मक आणि नवी दृष्टी  देणारा ठरला आहे.

 सर्वात प्रथम मी माझे पती आणि मुलं यांचं माझ्यावरचं  शारिरीक किंवा भावनिक दृष्ट्या अवलंबून असणं  जाणीवपूर्वक कमी केलं. कोणाचं असं आपल्यावर अवलंबून असणं  मनाला सुखावतं पण त्याने अडकायला होतंय हे मला जाणवलं. मी सुध्दा त्यांच्यावर अवलंबून असणं खूप कमी केलं. यामुळे मी जास्तं स्वावलंबी झाले. मी एक पत्नी आणि आई आहे त्यामुळे त्यांना ज्या वेळी गरज असेल  किंवा मला ज्यावेळी गरज असेल  त्यावेळी सर्वात प्रथम मी अथवा ते  तिघे माझ्यासाठी     उभे असणार आहेत हेही मला माहीत आहे. बर्याच वेळा कोणाचीही वाट न पाहता   मी एकटी फिरते.        माझा   आत्मविश्वास  यामुळे खूप वाढलाय. एकटीने प्रवास करत असताना काही वेळा संकंटांचा सामना पण एकटीनेच करावा लागतो.


एकदा एकटीच विमान  प्रवास करत    होते. रेल्वेने विमानतळावर जायचे होते पण पोचायला उशीर झाला. अगदी विमान निघायच्या आधी अर्धा तास मी विमानतळावर पोचले. विमानकंपनीचे कर्मचारी माझं सामान घ्यायला तयारच नव्हते. त्यांना माझ्या उशीराची कारणं देउन, विनंती करुन सामान घ्यायला लावलं. त्यानंतर घाईघाईने  सुरक्षा प्रणालीकडे निघाले. पाहते तर तिथे भलीमोठी रांग लागली होती. विमानात बसण्यासाठी काहीच कालावधी शिल्लक होता. मग तिथेही सुरक्षा रक्षकांशी बोलून,इतर लोकांना विनंती करुन मी त्या प्रणालीबाहेर पडले आणि अक्षरशः धावतच विमानात जाउन बसले.  पण या सर्व     प्रसंगात खूप कमी बोलणारी मी किंवा घाबरट असणारी मी संभाषणकौशल्याचा, प्रसंगावधानतेचा  धडाच शिकले. असे प्रसंग आपल्याला धीट बनायला शिकवतात असं मला वाटतं.

मुलं मोठी झाल्याने त्यांचे व्याप वाढलेत.  त्यांच्या  कामाचं स्वरुप, कामाचे तास यात नियमीतता राहिलेली नाही.    त्यांच्या   जाण्याच्या तसेच येण्याच्या वेळा निश्चित   नाहीत.    पण त्याबद्दल तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो.    आपल्याला त्या वेळापत्रकाशी जुळवून घेतले पाहीजे हे ओळखून  मी माझा    दिवस त्याप्रमाणे आखून घेतला आहे. मी बर्याच वेळा घरी  एकटी असते पण  तो वेळ         खूप चांगला घालवायचा प्रयत्न करते. चांगलं वाचते, चांगलं ऐकते, सुंदर चित्रपट पाहते आणि थोडंफार लिहायचा प्रयत्न करते.माझ्या लेकीने मला वाढदिवसाला  samsung galaxy tab भेट म्हणून दिलाय. त्यावर   मैत्रिणीच्या मदतीने ( विनीता देशपांडे) मी ब्लाॕगवर लिहायलाही सुरवात केलीये. ब्लाॕगचं नावही ( शब्दांजली ) तिनेच सुचवलंय.मला लिहीण्यासाठी माझी,लेक, मुलगा व नवरा खूप प्रोत्साहन  देतात. मग मी पण काहीबाही लिहीत राहते.

  माझा सकाळचा दिड तास व्यायामासाठी असतो.योगासन, प्राणायाम व चालणं मी कधीच  चुकवत नाही. माझ्या आहाराकडे आजपर्यंत मी कधीच लक्ष दिले नाही. पण आता मात्र कटाक्षाने मी पौष्टिक आहार घेते. हे सर्व करण्यात मला आनंद मिळतो. माझा आनंद आता कोणावर अवलंबून नसतो, तो मी मिळवते. त्यासाठी मला बर्याच वेळा ठाम रहावे लागते. ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या आता मी मनाविरुध्द करत नाही. नाही म्हणायला शिकलीये मी.आता स्वतःला सिध्द करायला मी जात नाही. मी जशी आहे तसाच स्विकार केलाय मी स्वतःचा.माझ्याकडूनही चूका होतात पण स्वतःला अपराधी समजणं सोडून सोडून दिलंय मी. Its ok असं म्हणून  मी  पुढे जाते.    नात्यांचं जोखड खांद्यवरुन उतरवून टाकायचा प्रयत्न करते मी. यामुळे  माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. मुक्तपणे , मनासारखं जगण्याचा प्रयत्न करतीये मी. या प्रयत्नांमुळे   माझ्यातली मी सापडलीये मला......अगदी नव्याने, माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे ती.      इतकी वर्षं जणू काही लपून बसली होती.  मी खूप सकारात्मक, आनंदी रहायचा प्रयत्न करते. माझं ८०% आयुष्य संपलंय असं मानते मी. उरलेल्या     आयुष्यात समाजासाठी काहीतरी करायची माझी खूप इच्छा आहे.

 हे सगळं लिहीण्यामागे एक कारण आहे. मी हे केलं, मी ते केलं असा '  मी ' पणा मला करायचा नाहीये.   पण मी आज जे करु शकलीये  ते आधी का नाही केलं हा विचार सतत  माझ्या  मनात येतोय. आपल्यापैकी प्रत्येकीने कुटुंबाकडे  पाहतो  तसे स्वतःकडे पहायला हवंय, स्वतःच्या मनाचा विचार करायला हवाय, महत्व द्यायला हवंय , वयाच्या कुठल्याही टप्प्यात .....

मला सगळ्यांना सांगावसं वाटतंय  कुटुंबाबरोबरच स्वतःलाही प्राधान्य द्या, स्वतःकडे लक्ष द्या, मनाला जपा, मुक्तपणे जगायला शिका  काय माहीत तुमच्यामधली लपलेली ' ती '  बाहेर यायला धडपडत असेल, तुमची वाट पहात असेल..........






शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

जीवलग सख्यांना पत्र

प्रिय प्रिय अपर्णा, जोशीभाभी आणि गांजापुरे वहिनी ,

आश्चर्य वाटलं ना पत्र पाहून ? कितीतरी वर्षांनंतर संवाद साधतीये तुमच्याशी. मला वाटतं१५/२० वर्षं झाली असतील आपल्याला भेटून.  आपल्यातलं भौगोलीक अंतर वाढलं असलं ना तरी मनातून मात्र मी तुमच्या खूप जवळ आहे. तुम्हा तिघींना मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना ते फक्त जवळची व्यक्तीच करु शकते. आज माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं ठरवलं.
मला आठवतंय माझ्या मुलाचा जन्म झाला  आणि माझ्या पतीची मध्य प्रदेशमधे कोरबा या ठिकाणी बदली झाली. तीन महिन्याच्या सचिनला घेउन थोड्याशा तणावातच मी कोरब्याला गेले. लहान बाळ, पुण्याबाहेर प्रथमच बाहेर पडलेली मी, हिंदी भाषा देखील नीट बोलता न येणे व स्वयंपाकाची  नसलेली सवय ह्या सर्वासोबत मी तिथल्या काॕलनीत घाबरतच प्रवेश केला. माझं कसं होणार याची मला व घरच्यांना काळजी लागली होती. पण तुम्ही तिघींनी मनापासून माझं स्वागत केलंत. तुम्ही दोघी मराठी आणि जोशीभाभी गुजराथी, तिघींनी मला खूप सांभाळून घेतलंत, मला मदत केलीत, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनून गेलात. माझ्यावर कोसळलेल्या कठीण प्रसंगात माझ्या पाठीशी पहाडासारख्या उभ्या राहीलात.
तो दिवस मी आजही विसरु शकत नाही. मी, माझ्या मांडीवर ६ महिन्यांचा सचिन आणि माझे पती आमच्या स्कुटरवरुन एका वाढदिवसाच्या पार्टीहून परत येत होतो. रात्रीची वेळ होती. रस्त्यात अंधार होता. एक गाडी मागून जोरात आली आणि स्कुटरला उडवून निघून गेली.  शेजारुन कॕनाल वाहत होता. नशीबाने त्याच्या बाजूला आम्ही पडलो. आश्चर्य  म्हणजे सचिनच्या अंगावर ओरखडाही उठला नाही. पतीलाही फारसं काही लागलं नाही. पण माझं डोकं रस्त्यावर आपटलं, मी बेशुद्ध पडले. मागून आमच्या कंपनीची गाडी येत होती. सगळ्यांनी मिळून मला हाॕस्पीटलमधे अॕडमिट केलं. माझ्या डोक्याला ८ टाके पडले. मला ५ दिवस तिथे रहावं लागलं. पण जनरल वाॕर्डच तिथे उपलब्ध होता. रात्री सोबतीला जो कोणी येईल त्याला खाली झोपावे लागणार होते. पण पाचही दिवस तुम्ही तिघी आळीपाळीने येउन खाली झोपत होतात. सचिन फक्त सहा महिन्याचा होता. त्याला हाॕस्पीटलमधे दिवसभर कसे ठेवणार म्हणून तुम्ही तिघी त्याला दिवसभर सांभाळायचात आणि रात्री माझ्याकडे घेउन यायचात. सकाळी परत जाताना त्याला घेउन जायचात, खरंच हे सगळं मी कसं विसरु? इतक्या छोट्या मुलाला आई नसताना सांभाळणं किती अवघड गेलं असेल तुम्हांला पण तुम्ही त्याचा कधी उच्चारही केला नाहीत. महाराष्ट्राबाहेर, आपल्या माणसांपासून दूर असतानाही घरच्यांपेक्षाही जास्त जवळची माणसं, मैत्रीणी मला मिळाल्या. माझ्यासारखी भाग्यवान मीच, यासाठी देवाचे कितीही आभार मानले  तरी ते कमीच आहेत. मी घरी आल्यावरही १५ दिवस मला स्वयंपाक करु दिला नाहीत तुम्ही. कुठुन आणलंत एवढं मोठ्ठं मन? ह्या सगळ्यासाठी तुमचे आभार मानणं चुकीचंच ठरेल, म्हणूनच तुमच्या रुणात राहणंच मला आवडेल.
या घटनेला इतकी वर्ष झाली तरी एकएक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आजही जसाच्या तसा उभा राहतो. आज या पत्राच्या निमीत्ताने माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायची संधी मला मिळालीये. तुम्हा तिघींना मी कधीच विसरु शकणार नाही.  बाकी काय लिहू.
तुम्हा तिघींना दीर्घायुष्य मिळो, आनंदाने तुमचं आयुष्य भरुन जावो याच माझ्या मनापासून शुभेच्छा .

तुमची मैत्रीण ,

अंजली.


गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

सुहाना सफर और ये मौसम हंसी

सुहाना सफर और ये मौसम हंसी🌧🦋🌲☘

पावसाळी वातावरण , वळणावळणाचा डोंगरांमधून जाणारा अरुंद रस्ता,  एकीकडे उंच पहाड तर दुसरीकडे खोल दरी, दरीत उतरलेले ढग, ढगांच्याही वरुन चाललेली आमची गाडी,दरीतून वरपर्यंत आलेले देवदार वृक्ष , जागा मिळेल तिथे वाढलेली हिरवाई, बारीक बारीक येणारा पाउस आणि गाडीच्या आवाजाखेरीज पसरलेली निःशब्द    शांतता. एखाद्या चित्रपटातील  प्रसंग   वाटतोय ना ? मग पूर्णपणे चुकलात. डलहौसी , खज्जियार ते धर्मशाला या प्रवासात मला आलेला हा अवर्णनीय अनुभव .इतका सुंदर, शुध्द निसर्ग या आधी मी अनुभवलेला नाही.

 हिमाचल प्रदेशला ' देवभुमी ' असं  संबोधलं  जातं. संपूर्ण पहाडांनी भरलेल्या या प्रदेशात पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे इतक्या उंच पहाडांमधेही रस्ते बनवले गेले आहेत. समुद्रसपाटीपासून २००० मिटर उंचीवरून आम्ही प्रवास केला.  तेव्हा या रस्त्यावर खूप अवघड वळणे होती .एरवी अशा रस्त्तयांवर मला खूप त्रास होतो पण  आजुबाजुचा रमणीय परीसर पाहून  भिती किंवा त्रास मी विसरुनच गेले. निसर्गाची ही मुक्त उधळण पाहण्यासाठी  गाडीच्या काचा आम्ही खाली केल्या. खोल श्वास घेउन ती शुद्ध हवा आम्ही छातीत भरुन घेत होतो. सुरवातीला मला किती फोटो काढु आणि किती नाही असं झालं होतं पण मग मात्र मोबाईल आत ठेवून दिला आणि चित्रात असल्यासारख्या निसर्गाचा आस्वाद घेउ लागले.एकामागून एक असे किती पहाड ओलांडले ते आम्हाला समजलंच नाही. लांबून दरीच्या पलीकडील पहाडावरचा रस्ता, त्यावरची वाहने खूप छोटी दिसायची. थोड्या वेळाने पहावं तर आम्हीच त्या रस्त्यावर पोहचायचो. आमच्या    चालक   दादाच्या कौशल्याची मात्र परीक्षाच पाहीली या रस्त्याने. त्या वळणावळणांमुळे त्याला चक्कर येतीये की काय असं वाटायला लागलं. वाटेत चुवाडी, ज्योत, नुरपुर, मनकोट अशी गावं लागत होती. अधूनमधून तुरळक मनुष्यवस्ती इतक्या उंचीवरही दिसत होती.  एके    ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्या दुकानदाराचा ( सुभाष ) मुलगा रोज ६ किमी  खाली असलेल्या शाळेत जातो ते सुध्दा बसने, शाळेच्या नाही तर गावागावांमधून जाणार्या सरकारी बसने. बससेवा त्या उंचीवरही चालू आहे आणि मुलंही विनातक्रार इतक्या लांब शाळेत जातात यावरुन   काही वेळातच तिथल्या संघर्षमय जीवनाची प्रचिती आली. रस्त्यात अनेक ठिकाणी धबधबेही दिसत होते. आपण असे धबधबे पहायला आवर्जून , मुद्दाम एखाद्या ठिकाणी जातो, पण इकडे या लोकांना हे रोजचंच असल्याने त्याचं काहीच अप्रुप नाहीये. मधेच एका ठिकाणी आम्हाला गरमागरम कणसं, काकडी, सफरचंद चाट अगदी नाममात्र किंमतीत मिळालं. इतक्या उंचीवर येउन  व्यवसाय करणाऱ्या  या लोकांचं खूप कौतुक वाटलं. हे सगळं आल्हाददायक वातावरण पाहून इथेच डोळे बंद करुन स्तब्ध उभं रहावं असं वाटत होतं. या   निसर्गापुढे  आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीवही वारंवार होत होती. या पूर्ण  प्रवासात एक गाणं सारखं गुणगुणावसं वाटत होतं
                           'सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो ना जाये कहीं'


या दरम्यान डलहौसी, खज्जियार, धर्मशाला अशी पर्यटन स्थळं आम्ही पाहीली. खज्जियारला तर भारतातलं स्विजर्लंड म्हणून ओळखलं जातं. लांबच्या लांब पसरलेली गवताची कुरणं, मधे तलाव, आजूबाजूला असलेले देवदारचे वृक्ष , त्यात  चरणार्या  मेंढ्या आणि खालपर्यंत आलेले ढग. केवळ अप्रतिम ,अवर्णनीय  दृश्य  होतं ते. निसर्गाने  मुक्त हस्ताने रंगांची उधळण केलीये जणु.
इथल्या 'थुपका' नावाच्या पाककृतीची चवही पाहीली, खूपच चांगली लागते.

 ही सर्व पर्यटन स्थळं  वर्णनातीत , अतिशय सुंदर  आहेतच   पण तरीही खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे नाहीतर भविष्यात ही सगळी संपत्ती आपण गमावून बसू की काय याची भिती वाटते. सगळीकडे   उपहारगृहांची गर्दी झालीये. अरुंद रस्ते, बेसुमार गाड्या, रहदारीचा खोळंबा, सर्वत्र पसरलेला कचरा, बाजारात असलेली अस्वच्छता, दुकानांची बेशुमार गर्दी, निसर्गाच्या कुशीत असूनही पाण्याची कमतरता यामधे त्या स्थळांचं मुळ सौंदर्य हरवत चाललंय की काय असं वाटतं. यामधे पर्यटक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहीजेच पण त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने आत्ताच  काळजी घ्यायला हवी अन्यथा या निसर्गाने दिलेल्या दानाला मुकण्यास वेळ लागणार नाही.





















बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

पावसाला पत्र

प्रिय वरुण,
माझा सर्वात जवळचा मित्र आहेस तु.  आज ' मैत्रीदिन '. मग तुझी आठवण झाल्याशिवाय, तुझ्याशी बोलल्याशिवाय हा दिवस कसा साजरा होणार?  दहावीपर्यंत मुलींच्या शाळेत जात असल्याने 'मित्र' हा शब्दही उच्चारायची बंदी होती. मग कळायला लागल्यापासून मनातल्या मनात तुझ्याशी मैत्रीचं नातं जोडून टाकलं.

दर वर्षी भेटायला येतोस तु. मला आठवतंय सुरवाती सुरवातीला तर बरोब्बर ७ जून ला तु येणार म्हणजे येणारच. कधीच तारीख चुकवली नाहीस. पण आताशा फारच बेभरवशाचा झाला आहेस. तारीख तर चुकवतोसच पण  खूप वाट पहायला लावतोस, कधी येतच नाहीस तर कधी खूप जास्त येतोस. काय झालंय तुला? का असं वागतो आहेस? खरं सांगू का मी खूप नाराज आहे तुझ्यावर.  मग म्हणलं तुला पत्रं लिहून नाराजी कळवावी. म्हणून हा पत्रप्रपंच.
तुझं आधीचं येणं मला आठवतंय. लहान होते तेव्हा मी. तु यायच्या आधीचं वातावरण खू आवडायचं मला, अजूनही आवडतं.माझ्या घराला ना मोठी गॕलरी होती.त्या गॕलरीत उभं राहून तुझं कोसळणं बघायला मजा यायची. लोकांची धावपळ, त्यांच्या छत्र्या, रेनकोट हे सगळं स्वतः न भिजता पहायला काय धमाल यायची. रस्त्यावरून छोटे छोटे ओहोळ वहायला लागायचे. आम्ही कागदाच्या नावा करुन त्यात सोडायचो  आणि पळत पळत गॕलरीत येउन नाव कुठपर्यंत गेलीये हे पाहत बसायचो. खरंच तुझ्या येण्याने खूप आनंद दिलाहेस तु आम्हाला कायमच. मग आताच काय झालंय तुला? आत्ताआत्तापर्यंत जूनमधे यायचा शिरस्ता कधीच मोडला नाहीस. आता तर जून  उलटून जुलैचा मध्य आला तरी तुझी चातकासारखी वाट पहावी लागते. मला माहीतीये तुझं उत्तर .याला कारण आम्हीच आहोत, हो ना? खरंच आहे रे मित्रा, कबूलच करते मी.तुझं पाणी ज्या नदीत मिसळतं ना  त्याचं पात्रंच कमी करुन टाकलंय आम्ही इमारतींसाठी, समुद्र हटवून बाँधकामं करतोय, जंगलच्या जंगल उध्वस्तं करतोय, पर्यावरणाचा ह्रास होतोय, डोंगर फोडतोय, पाणी अडवत नाहीये, पाण्याचा अपव्यय चाललाय, हे सगळं पाहून खूप मनस्ताप होतो तुला आणि मग संतापून तु एकतर येतच नाहीस किंवा खूप जास्त वेळा येतोस, बरोबर म्हणतीये ना मी? पण आम्हांला आता हे समजायला लागलंय. तुझा राग काढण्याचा खूप प्रयत्न करतोय आम्ही, बघतोयस ना? वृक्षारोपण करतोय, पाणी अडवतोय, जिरवतोय, पर्यावरण वाचवायचा प्रयत्न करतोय. आता तरी राग सोड ना रे. माझा जवळचा मित्र रागावला तर मलाआवडेल का सांग बरं? तुझ्या रागामुळे सर्वांचं किती नुकसान होतंय कळतंय का तुला? तु आला नाहीस तर दुष्काळ . माणसं, गुरंढोरं पटापट मरताहेत, शेतकरी बिचारे आत्महत्या करताहेत, जास्तं वेळा आलास तर जित्राबं वाहून चाललीयेत, माणसं, घरंदारं पुरात बुडताहेत, रोगराई पसरलीये. किती अंत पाहणारेस. आता तरी राग सोड . आम्ही या चुका परत करणार नाही, promise करते तुला. आम्ही सगळे तुझी मनापासून माफी मागतो. करशील ना माफ?

 आज मैत्रीदिनाच्या निमीत्ताने हक्काने तुझ्याकडे मागणं मागते जवळची मैत्रीण म्हणून, नाही म्हणू नकोस. आता नेहमीसारखा राग सोडून नियमीत भेटायला  येत जा...७ जूनला.चालेल?

तुझीच मैत्रीण ,
अंजली.

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

आई होताना

आज मातृ दिन. माझ्या  आईचा त्याग, तिचे आमच्यावरील प्रेम,त्यासाठी तिने घेतलेले अपरिमित कष्ट ,निष्ठा हे कसं विसरता येईल? ज्या काळात स्त्रीयांचं बाहेर पडणंसुध्दा अवघड होतं अशा काळात बाहेर पडून, आयुष्यभर शिक्षीकेची नोकरी करुन एकहाती तिने आम्हा तिघांना वाढवलं. यासाठी तिने जो लढा दिला तो आठवला तरी माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. माझ्या सख्ख्या मावशीने, ताईमावशीने, तिला भक्कम पाठींबा दिला. या दोघींना वंदन केल्याशिवाय मातृदिन पूर्ण होउच शकत नाही.

आई होणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म आहे असं म्हणतात.नउ महिने बाळाचा सांभाळ करुन त्याला जन्म देणं हा एक आनंदाचा सोहळा असतो.प्रत्येक गोष्टीसाठी पोटातला तो जीव आईवर अवलंबून असतो.आई खुश तर तो इवलासा  जीवही खुश. म्हणूनच आईची मनःस्थिती खूप महत्वाची असते. या काळात खूप चांगली पुस्तकं वाचावीत असं म्हणतात. त्याचं तंतोतंत पालन मी केलं. एक मुलगा आणि एक मुलगी यांची आई होण्याचं भाग्य मला लाभलं.सचिनच्या वेळी मी शिवाजी महाराजांवरचे ' श्रीमान योगी ' आणि मितालीच्या वेळी 'झाशीची राणी लक्ष्मीबाई ' ही पुस्तके जाणीवपूर्वक वाचली होती. एक प्रकारे गर्भसंस्कारच नाही का?माझे सासरे म्हणूनच सचिनला 'राजे' आणि मितालीला कायम ' लक्ष्मी' अशी हाक मारायचे. दोघांना वाढवणे हा आई म्हणून अनेक अनुभव, आव्हाने आणि समाधान,आनंद  यांचा सुंदर प्रवास होता.
या दोघांना मोठ्ठं करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. मुलगा व मुलगी यांना वाढवतानाचे अनुभव खूप वेगळे असतात असं मला वाटतं. मुली खूप भावनाशील असताता, त्या व्यक्तही होतात पण त्यांना खूप सांभाळावे लागते. त्यांचे मुड्सही प्रत्येक वेळी वेगळे असतात, दर महिन्याच्या मासिक पाळीच्या वेळी ते बदलत असतात. ते समजून घेउन त्याप्रमाणे त्यांच्याशी वागावे लागते. यामधे आपल्या  चिकाटीचा कस लागतो पण याच मुली मोठ्या झाल्यावर सर्वात जास्त आपल्याला समजून घेतात, प्रेम करतात, काळजी घेतात. मुले भावना व्यक्त करु शकत नाहीत. पण त्या भावना ओळखणे हे आईचेच काम असते. त्यांचे विश्व घराबाहेर मित्रांमधे जास्त असते. याचा अर्थ घरात लक्ष नसते असं नाही. पण ते बोलत नाहीत.  त्यांच्या विश्वाकडे लक्ष ठेवावे लागते . अनेक वेळा ते भरकटतात पण परत रस्यावर येतात. खूप काळजीही घेतात पण मुलींसारखे ते बोलत नाहीत.  त्यांना वाढवताना खूप समंजसपणा, शांतपणा दाखवावा लागतो.

दोघांना वाढवताना माझ्यामधे एक व्यक्ती म्हणून  खूप चांगले बदल झाले. आधीची 'मी' आणि आत्ताची आई झाल्यावरची 'मी ' यात आमुलाग्र बदल झालेला आहे. या दोघांनी मला आई म्हणून आयुष्यातील सर्वात उच्च असा अनुभव दिला आहे. आज या दोघांकडे पाहताना आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो, समाधान वाटतं,आनंद वाटतो. या दोघांनी जे सुख मला दिलंय त्याची उतराई  मी होउ शकत नाही.. एक व्यक्ती म्हणून माझा पुनर्जन्म झालाय..नक्कीच .

मला वाटतं प्रत्येक आईचे असेच अनुभव असतील, हो ना मैत्रीणींनो?

@ अंजली जोगळेकर.

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

देशासाठी मी काय करु शकते?

पुलवामा येथे आपल्या जवानांवर दहशतवादी हल्ला होऊन ६ दिवस उलटून गेले तरीही मनाची तगमग, कासाविशी, संताप कमी होत नाहीये. असा भ्याड हल्ला करुन , ४० च्यावर जीव घेऊन शेजारी देशाने काय साधले माहीत नाही पण माझ्यासारख्या लाखो सामान्य नागरीकांच्या मनात मात्र अनेक प्रश्न उभे राहीले आहेत. यातील कित्येक शहीद जवानांची वर्ष, दोन वर्षापूर्वी लग्न झाली आहेत, काहींवर त्यांच्या आईवडीलांची जबाबदारी आहे, काहींची मुलं लहान आहेत तर काहींची नुकतीच लग्न झाली आहेत.त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश बघवत नाहीये.टेलीविजनवर दिसणारी दृश्यं डोळ्यासमोरुन जात नाहीयेत. अशा वेळी एक सामान्य नागरीक म्हणून मी काय करु शकते हा प्रश्न वारंवार मला सतावतोय. या परीस्थितीत प्रत्यक्ष तिथे जाउन तर मी काहीच करु शकत नाही ही हतबलता मला खूप अस्वस्थ करतीये.मग मी नक्की काय करायला हवं? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला आहे.तो मी मांडतीये. तुमच्याकडेही याचे उत्तर असेल तर जरुर सांगा. आपण सर्व जण मिळून या जवानांसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करु या. या घडीला नुसता संताप, बडबड नकोय तर कृती हवीये.......आपल्यासारख्या सामान्य नागरीकांकडून.
• शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसाठी आर्थिक मदत आपण करु शकतो. अक्षयकुमार या सिनेअभिनेत्याच्या कल्पनेतून भारत सरकारने एक वेबसाईट तयार केली आहे. त्याद्वारे जवानांच्या खात्यात तुम्ही थेट रक्कम पाठवू शकता. या साईटचे नाव # bharatkeveer.gov.in असे आहे. कमीतक१०० रुपयेही पाठवू शकता.यामुळे incometax मधेही 80G खाली सुट मिळते. डेबीट कार्डद्वारे पैसे पाठवण्याची यात सोय आहे. Incometax साठी सर्टीफिकेटही लगेच मिळते. फुल ना फुलाच्या पाकळीची मदत करुन कुटुंबियांच्या दुःखावर छोटीशी फुंकर मारु यात.
• प्रत्यक्ष जरी आपण जाउन काही करु शकत नसलो तरी अनेक संस्था जवानांसाठी काम करत असताता, त्यांचे उपक्रम राबवत असतात. या उपक्रमांमधे आपण सहभागी होउ शकतो.  आपल्या परीसरातील संस्थांची माहिती गुगलवर मिळू शकते.
• जखमी झालेले अनेक सैनिक आर्मी हाॕस्पीटलमधे भरती झालेले असतात. त्यांना भेटायला जाउ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याबरोबर दिवाळी, राखी साजरे करु शकतो, त्यांना काही हवे असल्यास आणून देउ शकतो, गप्पा मारु शकतो, गरज असेल तर काही वाचून दाखवू शकतो.
• याशिवाय आज दहशतवाद आपल्या घराच्या उंबर्यापर्यंत येउन पोचलाय. सर्वांनी सजग राहणे, भाड्याने घर देताना काळजी घेणे, जागरुक राहून काही संशयास्पद आढळल्यास पोलीसांना कळवणे हे करणे गरजेचे आहे. आपले सैनिक युध्दात नाही तर दहशतवादामुळे शहीद झाले आहेत हे पाहीले की त्याचे गांभिर्य लक्षात येईल. एक नागरीक हा एक सैनिक असे झाले तर दहशतवाद्यांना काही करायची संधीच मिळणार नाही.
• सध्या सोशल मिडीयावर अनेक फोटो, बातम्या पहायला मिळतात. त्या बहुतेक करुन चुकीच्या , अतिरंजीत असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, forward करु नका. त्याची शहानिशा करा. या अफवा पसरवण्यामागे बर्याचवेळा समाजकंटकही असू शकतात. आपण विश्वास ठेवून त्यांना मदत करतोय व indirectly आपल्या सैन्यासमोर संकट उभे करतोय कारण सिमेवरचा जवान एकसंध भारतासाठी लढतोय, जातपात, धर्म यासाठी आपसात लढणार्या लोकांसाठी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
• आज अनेक चॕनल्सवर ‘experts’ ना बोलवून चर्चा चाललेली दिसते. पण अशा वेळी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणे व संयम बाळगणे हे सामान्य नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.
• आपल्या आसपास कार्यरत असलेल्या सैनिकांचे कुटुंबिय रहात असेल तर त्यांना मदत करायला पाहीजे . त्याची गरज नसेल तर respect करणे, जाणीव ठेवणे की या घरातला माणूस आपल्यासाठी लढतोय हे तर आपण नक्कीच करु शकतो.
• मला असं वाटतं की सर्वोच्च मान हा जवानांना मिळाला पाहीजे. जसं एखादा सैनिक दिसला की उभे राहून मान देणे, सुट्टीवर आलेल्या सैनिकाँची काही सरकारी कामे असतील तर ती लाईनमधे उभे रहायला न लागता preference देउन ती कामे करणे किंवा परदेशात असतं तसं विमानातून जर प्रवास करत असतील तर ते जाहीर करुन टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करणे यासारख्या गोष्टी आपण करायला हव्यात.
• एक नागरीक म्हणून असलेली आपली कर्तव्य पार पाडून आपण एकप्रकारे देशसेवाच करणार आहोत.

चला तर मग सगळेजण मिळून या संकटाचा सामना करु.एकजुट होऊ या, जबाबदार नागरीक बनून,जातपात धर्म यांच्या भिंती तोडून, सगळे नियम पाळून , एकमेकांवर , देशावर, सैनिकांवर प्रेम दाखवू या ,  आदर करु या. आता वेळ आहे कृतीची ...एका सामान्य नागरीकाकडून

@अंजली जोगळेकर.


रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्री दिन

मैत्री दिन

आज मैत्री दिन. या दिवसाची संधी साधून जरा मैत्रिणींबद्ल लिहू असं ठरवलं.  लहानपणापासून बघायला गेलं तर शाळेत फारशा मैत्रीणी मला नव्हत्या. पुढे काॕलेजमधे प्रवेश घेतल्यावरही ३/४ मैत्रीणींपुढे काही माझी गाडी गेली नाही. लग्न झाल्यावर मात्र ही परीस्थिती बदलली. दोन्ही मुलांच्या शाळेच्या निमीत्ताने पालक असलेल्या आम्ही आया मैत्रीणी झालो. मोठ्या मुलाच्या वेळी झालेली मैत्री स्थिरावेपर्यंत मुलीच्या शाळा प्रवेशाची वेळ झाली. माझ्या मैत्रीणींच्या संख्येत वाढ व्हायला मग अजिबात वेळ लागला नाही. हळूहळू संसारात स्थिरावल्यावर मुलांच्या पलीकडे माझं क्षितीज विस्तारायला  लागलं,नवनवीन ओळखी होउ लागल्या आणि मग वय हा मुद्दा मैत्रीसाठी गौण ठरायला लागला. माझ्यापेक्षा खूप लहान/ मोठ्या अगदी आज्यासुध्दा माझ्या सख्यांच्या यादीत भर घालू लागल्या. बघता बघता माझ्या मैत्रीचा परीघ विस्तारत गेला. या मैत्रीणींनी मला खूप काही दिले. खूप मैत्रीणी असणारी मी म्हणूनच गर्भश्रीमंत आहे.

 त्यांच्याबरोबर थोडासा वेळ जरी घालवला तर एकदम ताजंतवानं वाटायला लागतं.  एकत्र जमून कुठल्याही विषयावर बोलून खळखळून हसलं ना की सगळे ताणतणाव दूर होतात. मनसोक्त गप्पा मारल्या की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मैत्रीणींसोबत थोडं बाहेर फिरून आलं की पुढील काही दिवसांसाठी नवा उत्साह मिळतो. अडीअडचणींचा सामना करायला बळ मिळतं. यातल्या प्रत्येक जणींकडून काहीनाकाही शिकण्यासारखं आहे. सुंदर लिहीणार्या, सदैव मदतीस तयार असणार्या, सुगरण, व्यवस्थित, कलात्मक, दिलदार, दुसर्याचे भरभरुन कौतुक करणार्या, हसतमुख, आनंदी, सकारात्मक, धीट, धाडसी,अष्टपैलू, साध्या असे  विवीध पैलू असणाऱ्या या माझ्या मैत्रीणींसाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे, ध्रुवासारखी अटळ. यांनी माझं आयुष्य खूप आनंददायी, सकारात्मक बनवायला मला मदत केलीये. आज आम्हा सगळ्यांची मैत्री लोणच्यासारखी छान मुरलीये, चवीष्ट झालीये. त्याचा आनंद  आम्ही घेतोय. एक व्यक्ती म्हणून वाटचाल करताना, समृद्ध होताना  त्यांचं स्थान अनमोल आहे. त्यांच्या शिवाय आयुष्य साजरं होउच शकत नाही. या सगळ्या माझ्या खास मैत्रीणींना #मैत्रीदिनाच्या खास शुभेच्छा .

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

आवर्जून वाचावे असे पुस्तक 'द डायरी आॕफ ए यंग गर्ल '

वाचनाची मला खूप आवड आहे.  पण गेल्या वर्ष दोन वर्षात माझे पुस्तक वाचन जरा कमी झालंय. त्यासाठी मला खूप अपराधी वाटत होतं, चुकल्या चुकल्यासारखं होत होतं. मग मनाशी संकल्प केला, या वर्षी जास्तीत जास्त पुस्तकं वाचायची. अगदी नुकतंच एक सुंदर आणि वेगळं पुस्तक Kindle ( माझ्या वाचनाच्या आवडीमुळे नवर्याने दिलेली वाढदिवसाची भेट ) वर वाचलं, #‘ द डायरी आॕफ ए यंग गर्ल ‘. अॕन फ्रँक हिने मुळ डच भाषेत लिहीलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद डाॕ. अनघा केसकर यांनी केला आहे.

एका १३ वर्षाच्या मुलीला वाढदिवसानिमीत्त अनेक भेटी मिळतात. पण त्यात तिचे लक्ष वेधून घेते  तीसुंदर वेष्टनात गुंडाळलेली एकडायरी. या डायरीला आपली जीवश्च कंठश्च सखी समजून मग ती तिचे विचार, भावना, मते प्रामाणिकपणे व्यक्त करते, तिला ‘रोजनिशी’  बनवून त्यात लिहीत जाते. ही  रोजनिशी म्हणजेच हे पुस्तक. अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं हे लेखन ऐतिहासिक दृष्ट्या एक मैलाचा दगड ठरलं. अनेक भाषांमधे याचे अनुवाद झालेले आहेत

 १९४२  ते १९४४ या कालखंडात हे पुस्तक लिहीलं गेलंय. ॲनचे कुटुंब ज्यु. हिटलरच्या ज्युंविषयी असलेल्या तिरस्कारामुळे, छळछावणीत जायला लागू नये या भितीने त्यांना सर्वांपासून लपून एका इमारतीच्या मागच्या भागात रहावे लागले. हा भाग  म्हणजे एका आॕफीसमधील पुस्तकाच्या कपाटामागे असलेली लहान, अंधारी, कोंदट जागा. या जागेत ८ जण कोणालाही सुगावा लागू नये याची काळजी घेत, आवाज व फारशी हालचाल न करता दोन ते अडीच वर्ष  राहीले. या काळात अवघ्या तेरा वर्षाच्या ॲनचा , तिच्या सोबत राहणाऱ्या लोकांचा किती भावनिक, शारीरिक व मानसिक कोंडमारा झाला असेल याची कल्पना हे पुस्तक वाचताना येते आणि अक्षरशः अंगावर काटा येतो.
१२ जून , १९४२ या दिवसापासून ही डायरी लिहायला सुरवात होते.  सुरवातीला शाळा, शाळेतले तिचे सोबती, शिक्षक यांच्या स्वभावाबद्दल ती लिहीते. यात कोण तिच्यावर प्रेम करतं, तिला कुठला मुलगा आवडतो या गोष्टी तिने डायरीला ‘ Kitty ‘ अशा नावाने संबोधून मोकळेपणाने लिहील्या आहेत. यात ज्युंना मिळणार्या वेगळ्या वागणुकीबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. अगदी उदाहरणच द्यायचं तर तिने  लिहील्याप्रमाणे ज्युंना कपड्यांवर पिवळ्या रंगाचे star लावावे लागत,त्यांच्या सायकल्स जमा करुन टाकल्या गेल्या, ट्रामने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली, स्वतःच्या मालकीच्या मोटारी वापरायला बंदी, दुपारी३ ते ५ या वेळातच खरेदी करणे, ज्यु लोकांच्याच पार्लर/ न्हाव्यांकडे जायची परवानगी, रात्री ८ ते सकाळी ६ रस्यांवर जायची बंदी, कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमांना जाण्यास बंदी यासारखी अनेक बंधने त्यांच्यावर लादली गेली.पोलीस पकडतील या भितीने त्यांना घर सोडून जावे लागले . जाताना हातात बॕग दिसू नये म्हणूनएकावर एक असे कपड्यांचे अनेक जोड घालून अज्ञातवासात जावे लागले.ॲन व तिच्या बहीणीसाठी शाळेचे मुक्त जीवन सोडून असं स्वतःला डांबून ठेवणं किती असह्य झालं असेल हे वाचताना डोळ्यात पाणी येतं.

त्यांची राहण्याची जागा एका आॕफीसच्या मागे असल्याने वर्दळ सुरु व्हायच्या आधीच आन्हिकं उरकून घ्यायला लागायची. त्यानंतर कुठलाही आवाज न करता वावरायचं, खोकण्याची सुध्दा बंदी, कोंदट जागा, ८ जण रहात असल्याने होणारी दाटीवाटी, उजेड बाहेर जाउ नये म्हणून झाकलेल्या खिडक्या , या वातावरणामुळे होणारे वाद, आजार, होणारे बाँबहल्ले, रोज ऐकायला येणाऱ्या निराशाजनक बातम्या, अफवा आणि किती काळ असं रहावं लागेल याची अनिश्चितता हे सगळं वाचताना जीव कासावीस होतो. त्यांच्यासोबत पीटर नावाचा ॲनएवढाच मुलगा रहात असल्याने तिला त्याच्याविषयी तारुण्यसुलभ ओढ वाटू लागली. हे नक्की प्रेम आहे ? हे सगळे प्रश्न ती निरागसतेने,सहजपणे  लिहीते. पौगंडावस्थेत आसल्याने तिचे आईवडीलांशी सतत वाद होतात, त्यांचे माझ्यावर प्रेमच नाही असंही तिला वाटत राहतं, नंतर मात्र आपण असा विचार कसा केला याबद्दल प्रांजळपणे माफीही मागते.

यात शेवटची नोंद १ आॕगस्ट १९४४ या दिवशी आहे. यानंतर जर्मन पोलीसांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता लागला. या सर्वांना पकडून नेण्यात आले. त्यांची रवानगी छळछावणीत करण्यात आली. तिथली भयानक अस्वच्छ परीस्थिती व टायफससारख्या तापाची साथ यामुळे ( मार्च १९४५)ॲन व तिच्या कुटुंबियांचा मृत्यू झाला. तिचे वडील जीवंत  राहीले. त्यांना ॲनची डायरी सापडली व त्यांनी पुस्तकरूपात याचे प्रकाशन केले.तिच्या या पुस्तकामुळे ज्युंविषयीचे ऐतिहासिक सत्य जगभरातील लोकांपर्यंत पोचले. आजपर्यंत अनेक भाषांमधे याची भाषांतरे झाली आहेत. अनेक देशात शाळेतील पुस्तकांमधेही ॲनविषयी धडा आहे.

हे पुस्तक लिहीताना हे प्रकाशित होईल, कोणी वाचेल याची तिला पुसटशी सुध्दा कल्पना नव्हती त्यामुळे ते खूप सहज लिहीले आहे. त्यातली प्रामाणिकता, प्रांजळपणा, निरागसता लक्षा,त येते.हिटलरच्या काळातील ज्युंविषयी प्रत्यक्ष आनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहीलेलं हे लेखन त्यावेळचे भयाण वास्तव समोर उभे करते., तिच्या नजरेतून तिला दिसलेलं हे जग खरोखरच अनुभवण्यासारखे आहे.

मंगळवार, १६ जुलै, २०१९

पहिलावहीला अनुभव

                                  *महाविद्यालयातील पहिले दिवस*

मला माझ्या महाविद्यालयातील पहिला दिवस स्पष्ट आठवतोय. स.प.महाविद्यलयाचे भव्य पोर्च, दगडी इमारत आणि आमचा ११ वी चा वर्ग विसरणे शक्यच नाही. पण आज मात्र मी लिहीणार आहे चाळीशीनंतर आम्ही दोघी मैत्रीणींनी ( मी व माझी मैत्रीण  मंजुषा) M.A.मानसशास्त्र  करत असताना आलेल्या अनेक पहिल्या वहिल्या अनुभवांबद्दल. हे सगळे अनुभव आमच्या वयामुळे रोमांचकारी, अद्भुत आणि अविस्मरणीय ठरले. ती दोन वर्ष आमच्या आयुष्यातील ' मैलाचा दगड ' आहेत यात काहीच शंका नाही.

एका सामाजिक संस्थेत काम करत असताना 'मानसशास्त्र ' या विषयात आम्हा दोघींना खूप रुची निर्माण झाली आणि आम्ही M.A. करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी पुढे कायकाय करावे लागणार आहे याची थोडीशी सुध्दा कल्पना आम्हाला त्या वेळी नव्हती😔. प्रथम यशवंतराव चव्हाण विद्यापिठातून बहिंंःस्थ B.A . ची पदवी मिळवली पण M.A मानसशास्त्रसाठी मात्र नियमित महाविद्यालयात जावे लागणार होते. मग उत्साहाने माॕडर्न महाविद्यालयात प्रवेश अर्ज भरला आणि चक्क दोघींनाही प्रवेश मिळाला , वयाचा विचार न करता आणि मग सुरु झाला आमचा धाडसी प्रवास.

महाविद्यालयात जायचे म्हणून भरपूर खरेदी झाली, कपडे, वह्या, पेन, बॕग. खूप उत्साह अंगात भरला होता. अखेर पहिला दिवस उजाडला. छान तयार होउन प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरलो आणि जाणवलं इथे विद्यार्थी म्हणून आपण दोघीच इतक्या मोठ्या आहोत, वयाने आणि शरीरानेही😄. वर्गात शिरायची लाज वाटायला लागली पण एकमेकींचे हात घटृ धरुन 👭धडधडत्या हृदयाने वर्गात शिरलो. बाकांवर सगळी तरुण मुले/मुली हसत खिदळत, गप्पा मारत बसली होती. आम्ही आत शिरल्या शिरल्या Good morning madam असं सर्वांनी मिळून अभिवादन केलं. कसनुशा चेहर्याने आम्ही शिक्षिका नाही तर विद्यार्थी आहोत असं सांगितल्यावर आता त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. या चेहर्यांची पुढे आम्हाला सवय होउन गेली. आता पुढचं दिव्य पार पाडायचं होतं बाकावर बसण्याचं. गेल्या अनेक वर्षांचं खाणंपिणं आमच्या चांगलंच 'अंगी ' लागलं होतं. हे शरीर या बाकात कसं बसवायचं 😜तेही या मुलांसमोर हा यक्षप्रश्न आमच्यासमोर होता. आम्ही निमुटपणे शेवटच्या बाकाकडे निघालो. पाय जड झाले होते😊,सगळेजण आमच्याकडे पाहताहेत हे जाणवत होतं, कशाला शिकण्याचं ठरवलं यासाठी स्वतःला लाखो दुषणं देउन झाली पण आता सुखाचा जीव दुःखात टाकलाय ना मग भोगा आपल्या कर्मची फळं असं मनाशी बोलून त्यातल्या त्यात मोठा बाक पाहीला व त्यासमोर आलो. परमेश्वराचा कधी नव्हे ते मनापासून धावा केला आणि मी आत शिरले. काय आश्चर्य कशीबशी का होईना मी आत शिरु शकले😉 आणि पुढची फजिती वाचली😄.

आम्हाला सगळेजण शिक्षिका समजायचे याचा कधीकधी फायदाही व्हायचा. आम्ही Activa ने महाविद्यालयात जायचो . सर्व विद्यार्थ्यांना पार्कींगसाठी रस्त्यावर उन्हात  गाड्या लावायला लागायच्या पण वाॕचमन आम्हाला शिक्षीका समजायचा त्यामुळे शिक्षकांसाठी असलेल्या आच्छादित पार्कींगमधे आम्हाला गाडी लावता यायची.
विनोदाचा भाग सोडला तर या दोन वर्षात मानसशास्त्राबरोबरच  या मुलांची मानसिकता, त्यांचे प्रश्न , त्यांची विचार करायची पध्दत, दृष्टीकोन  जवळून पहायला मिळाले. याशिवाय इतक्या वर्षांनंतर शिकताना पहिली #PPT, पहिली          # viva, पहिलं project सादरीकरण, हात मोडेपर्यंत लेखन, मोठमोठ्या पुस्तकांचं वाचन, Roll Plays असे अनेक ' पहिले ' अनुभव या काळात घेतले ज्याने आमचे आयुष्य समृध्द होउन गेले. या दोन वर्षांनी आम्हाला आमची ओळख मिळवून दिली, पुढचा मार्ग आखायला मदत केली, अविस्मरणीय असा आनंद दिला. हा पहिलावहिला आनंद आमच्यासाठी कायमच खास राहील यात काही शंकाच नाही.