रोहीत पक्षी पहायला गेले........
म्हणलं चल जरा त्याच्याशी मैत्री करु
आणि पंख झेपावत आकाशाची सैर करु
पण स्पष्ट म्हणाला मैत्री नको कानाला खडा लावतो
पण तरीही चल तुला ‘ माणसांची ‘ सैर करवतो..........
त्याच्याबरोबर निःशंक होऊन निघाले
आणि बघता बघता ढगांच्या वर जाऊन पोचले
म्हणलं ‘माझं’ घर एकदा पहावं
वरुन कसं दिसतंय ते तरी बघावं
हसून म्हणाला त्यात काय ही बघ इतकी सारी घरं
यातलं नेमकं तुझं कोणतं ते जरा बघ बरं
यातलं ‘ माझं’ घर कोणतं?
वरुन तर सगळं सारखंच दिसतं
रोहीत गुढपणे हसला
आणि माझ्यातला ‘मी’पणा क्षणात गळाला.......
मग म्हणलं शेजारचा देश पहावा
त्यांच्याकडे काय वेगळं आहे अंदाज घ्यावा
पण दोन्हीकडे सारखीच माणसं
नद्या, झाडे,रस्ते सगळंच एकसारखं
मग का बरं त्यांच्याशी उभा दावा
खाली पाहताना हा प्रश्नच पडावा............
असू दे, निदान आपल्या देशात तरी माणसं वेगळी असतील
जात, धर्म यांनी केलेले विभाग दिसतील
पण इथून तर माणसं एकसारखीच दिसताहेत
मग आपले लोक का बरं फुट पाडताहेत
रोहीत म्हणाला जा तु तुझ्या देशात
मैत्री नको तुमची मी परततो माझ्या जगात
स्वार्थ, मतलब, संधीसाधु, द्वेष अशा विवीध भाषा तुमच्या
निरभ्र आकाश निःस्वार्थ प्रेम हा आधार जगण्याचा आमच्या
म्हणूनच म्हणतो नको मैत्री या प्रगत मानवाची
लखलाभ असू दे ही बिना भाषेची दुनिया आम्हांला आमची..........

