माझी पन्नाशी जसजशी जवळ यायला लागली तसा मला थोडा ताण येउ लागला. पण मग काही गोष्टी मी मनाशी ठरवल्या. अर्धशतक ओलांडून मला काही वर्षं झालीयेत. ठरवल्याप्रमाणे मी माझ्यात अनेक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या बदलांमुळे वयाचा हा टप्पा माझ्यासाठी सुखकर, सकारात्मक आणि नवी दृष्टी देणारा ठरला आहे.
सर्वात प्रथम मी माझे पती आणि मुलं यांचं माझ्यावरचं शारिरीक किंवा भावनिक दृष्ट्या अवलंबून असणं जाणीवपूर्वक कमी केलं. कोणाचं असं आपल्यावर अवलंबून असणं मनाला सुखावतं पण त्याने अडकायला होतंय हे मला जाणवलं. मी सुध्दा त्यांच्यावर अवलंबून असणं खूप कमी केलं. यामुळे मी जास्तं स्वावलंबी झाले. मी एक पत्नी आणि आई आहे त्यामुळे त्यांना ज्या वेळी गरज असेल किंवा मला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी सर्वात प्रथम मी अथवा ते तिघे माझ्यासाठी उभे असणार आहेत हेही मला माहीत आहे. बर्याच वेळा कोणाचीही वाट न पाहता मी एकटी फिरते. माझा आत्मविश्वास यामुळे खूप वाढलाय. एकटीने प्रवास करत असताना काही वेळा संकंटांचा सामना पण एकटीनेच करावा लागतो.
एकदा एकटीच विमान प्रवास करत होते. रेल्वेने विमानतळावर जायचे होते पण पोचायला उशीर झाला. अगदी विमान निघायच्या आधी अर्धा तास मी विमानतळावर पोचले. विमानकंपनीचे कर्मचारी माझं सामान घ्यायला तयारच नव्हते. त्यांना माझ्या उशीराची कारणं देउन, विनंती करुन सामान घ्यायला लावलं. त्यानंतर घाईघाईने सुरक्षा प्रणालीकडे निघाले. पाहते तर तिथे भलीमोठी रांग लागली होती. विमानात बसण्यासाठी काहीच कालावधी शिल्लक होता. मग तिथेही सुरक्षा रक्षकांशी बोलून,इतर लोकांना विनंती करुन मी त्या प्रणालीबाहेर पडले आणि अक्षरशः धावतच विमानात जाउन बसले. पण या सर्व प्रसंगात खूप कमी बोलणारी मी किंवा घाबरट असणारी मी संभाषणकौशल्याचा, प्रसंगावधानतेचा धडाच शिकले. असे प्रसंग आपल्याला धीट बनायला शिकवतात असं मला वाटतं.
मुलं मोठी झाल्याने त्यांचे व्याप वाढलेत. त्यांच्या कामाचं स्वरुप, कामाचे तास यात नियमीतता राहिलेली नाही. त्यांच्या जाण्याच्या तसेच येण्याच्या वेळा निश्चित नाहीत. पण त्याबद्दल तक्रार करण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्याला त्या वेळापत्रकाशी जुळवून घेतले पाहीजे हे ओळखून मी माझा दिवस त्याप्रमाणे आखून घेतला आहे. मी बर्याच वेळा घरी एकटी असते पण तो वेळ खूप चांगला घालवायचा प्रयत्न करते. चांगलं वाचते, चांगलं ऐकते, सुंदर चित्रपट पाहते आणि थोडंफार लिहायचा प्रयत्न करते.माझ्या लेकीने मला वाढदिवसाला samsung galaxy tab भेट म्हणून दिलाय. त्यावर मैत्रिणीच्या मदतीने ( विनीता देशपांडे) मी ब्लाॕगवर लिहायलाही सुरवात केलीये. ब्लाॕगचं नावही ( शब्दांजली ) तिनेच सुचवलंय.मला लिहीण्यासाठी माझी,लेक, मुलगा व नवरा खूप प्रोत्साहन देतात. मग मी पण काहीबाही लिहीत राहते.
माझा सकाळचा दिड तास व्यायामासाठी असतो.योगासन, प्राणायाम व चालणं मी कधीच चुकवत नाही. माझ्या आहाराकडे आजपर्यंत मी कधीच लक्ष दिले नाही. पण आता मात्र कटाक्षाने मी पौष्टिक आहार घेते. हे सर्व करण्यात मला आनंद मिळतो. माझा आनंद आता कोणावर अवलंबून नसतो, तो मी मिळवते. त्यासाठी मला बर्याच वेळा ठाम रहावे लागते. ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्या आता मी मनाविरुध्द करत नाही. नाही म्हणायला शिकलीये मी.आता स्वतःला सिध्द करायला मी जात नाही. मी जशी आहे तसाच स्विकार केलाय मी स्वतःचा.माझ्याकडूनही चूका होतात पण स्वतःला अपराधी समजणं सोडून सोडून दिलंय मी. Its ok असं म्हणून मी पुढे जाते. नात्यांचं जोखड खांद्यवरुन उतरवून टाकायचा प्रयत्न करते मी. यामुळे माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. मुक्तपणे , मनासारखं जगण्याचा प्रयत्न करतीये मी. या प्रयत्नांमुळे माझ्यातली मी सापडलीये मला......अगदी नव्याने, माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे ती. इतकी वर्षं जणू काही लपून बसली होती. मी खूप सकारात्मक, आनंदी रहायचा प्रयत्न करते. माझं ८०% आयुष्य संपलंय असं मानते मी. उरलेल्या आयुष्यात समाजासाठी काहीतरी करायची माझी खूप इच्छा आहे.
हे सगळं लिहीण्यामागे एक कारण आहे. मी हे केलं, मी ते केलं असा ' मी ' पणा मला करायचा नाहीये. पण मी आज जे करु शकलीये ते आधी का नाही केलं हा विचार सतत माझ्या मनात येतोय. आपल्यापैकी प्रत्येकीने कुटुंबाकडे पाहतो तसे स्वतःकडे पहायला हवंय, स्वतःच्या मनाचा विचार करायला हवाय, महत्व द्यायला हवंय , वयाच्या कुठल्याही टप्प्यात .....
मला सगळ्यांना सांगावसं वाटतंय कुटुंबाबरोबरच स्वतःलाही प्राधान्य द्या, स्वतःकडे लक्ष द्या, मनाला जपा, मुक्तपणे जगायला शिका काय माहीत तुमच्यामधली लपलेली ' ती ' बाहेर यायला धडपडत असेल, तुमची वाट पहात असेल..........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा