माझ्या लग्नाची एकच ;) गोष्ट
आज माझ्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण झाली. विचार करताना वाटलं आपण एकमेकांना एवssssढी वर्षं सहन केलं ?? पण खरं सांगु का ही वर्षं कशी सरली समजलं पण नाही. माझ्या लग्नाची एक गोष्ट आहे. तसं तर प्रत्येकाच्याच लग्नाची एक गोष्ट असते असं मला वाटतं.
१९८५ सालची गोष्ट . M. Com ला प्रवेश घेउन काॕलेजला सुरवात झाली होती. स्वप्नांनाही पंख फुटले होते. मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. आपण इतक्यात लग्न करायचं नाही असं मनाशी ठरवुन टाकलं. पण आपण जे ठरवतो त्याच्या नेहमी उलटच होतं, बरोबर ना? माझ्या सासर्यांनी एका लग्नात मला पाहिलं. त्यांना असं वाटलं की ही मुलगी आपल्या मुलासाठी योग्य आहे. . त्यांनी आमच्या कुटुंबाची पूर्ण चौकशी केली आणि एक दिवस अचानक न कळवता त्यांच्या मुलाला घेऊन आमच्या घरीच येउन ठेपले की. झाली का पंचाइत? घरात तर मी खास पुणेरी पोशाखात ( पंजाबी ड्रेसचा कुडता व परकर😁). बहिणीचे लग्न नुकतेच झाल्याने घरी भरपूर पसारा, आई वडील कोणीच घरी नाही. घरात फक्त मी, माझा आत्ये भाउ व भावजय. त्यांना चहा वगैरे करुन दिला. पण मी ज्या अवतरात होते त्यावरुन होकार येणार नाही याची खात्रीच होती. आई आल्यावर तिची पण खूप बोलणी खाल्ली . पण तरीही मी बेफिकीरच होते. नाही तर नाही, इथे कोणाला लग्न करायचंय , कोणाचं अडलंय लग्नावाचून हीच धारणा होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून होकार आला. त्यांचं घर पहायला, घरातील लोकांना भेटायला जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा लक्षात आलं की सगळेजण एकमेकांशी हिंदी व english मधे बोलताहेत.मी तर घाबरुनच गेले कारण सदाशिव पेठेतली असल्याने घरात बाळबोध वातावरण आणि इंग्रजी ची सवय नाही. कसं जमणार या घरात माझं? लग्नं ठरवण्याच्या आधी थोडं एकमेकांशी बोलून घ्या असं जेव्हा माझ्या मोठ्या नणंदेनं सांगितलं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जर मी काही केली असेल तर मला इंग्रजी येत नाही हे सांगुन टाकलं. आज खूप हसू येतं विचार करता.पुढं बोलता बोलता मुलाने त्याच्या नोकरीच्या ठिकाणचे वातावरण, कामाचे स्वरुप, पार्ट्या याचे इतके रसभरीत वर्णन केले की ते ऐकून मी घरी आल्यावर आईला हा मुलगा पसंत नाही असं सांगून टाकलं. मला इंग्रजी येत नाही असं सांगितल्या मुळे ते लोकही नाहीच म्हणतील याची मला पक्की खात्री होती. (किती बालीशपणा ना😁)पण दुसऱ्या च दिवशी सासुबाई, नणंद पेढ्याचा पुडा घेउन हजर. आता आली का पंचाइत. मी नकार दिल्यावर त्या दोघी अचंभीत झाल्या. नणंदेने खोदून खोदून कारण विचारल्यावर मी पार्ट्यांचं कारण सांगितले. कारण पार्टी म्हणजे दारु आणि दारु पिणारा नवरा मला नकोच होता.शेवटी नणंदेने मला खूप समजावले. माझा भाउ दारु वगैरे काही पित नाही, त्याला चेष्टा करण्याची सवय आहे. मी तुला खात्री देते. त्यांचं तळमळीचं बोलणं ऐकून मी परत एकदा मुलाशी बोलायला तयार झाले आणि यथावकाश आमाचा २५ नोवेंबरला शुभमंगल झालं. मी या घरात यायचं पूर्ण श्रेय अर्थातच माझ्या नणंदेला, विणाताईंना आहे. लग्नानंतरची पहिली काही वर्षं खूप महत्वाची असतात.हा काळ एकमेकांना तसेच घरातील माणसांना समजून घ्यायचा असतो. पण माझ्या मुलाचा जन्म लगेचच झाल्याने एकमेकांना समजून घ्यायच्या आधीच आमच्यावर जबाबदारी पडली. त्यामुळे एक दुसर्याचा स्वभाव, विचार जाणून घ्यायला मधे खूप कालावधी जावा लागला. हा सगळा काळ तणाव, गैरसमज, कुटुंबातील वाद, आर्थिक संकटं, अडचणी व मुलांची जबाबदारी यांनी भरुन गेलेला होता, परीक्षा घेणारा होता. एखाद्या रोलर कोस्टरसारखी आमची,अवस्था होती. कधी वर तर कधी झपाट्याने खाली. खूप दमून गेलो होतो आम्ही. आज मागे वळून पाहताना वाटतं ह्याच परीक्षेच्या काळात एकमेकांना समजून घ्यायची प्रक्रिया पण बहुतेक चालू होती. कधी मी दोन पावलं मागे सरत होते तर कधी तो.आमचा तोल कधी ढळुन दिला नाही. कुठलीही गोष्ट तुटेपर्यंत ताणली नाही. आज आमचं नातं खूप छान वळणावर येउन ठेपलंय. एखाद्या मुरलेल्या लोणच्यासारखं.. न बोलताही मनातल्या भावना ओळखाता येतात आम्हाला, एकमेकांची काळजी घेतो, मोकळीक देतो, एकमेकांच्या कामाचा आदर करतो .शेवटी यशस्वी लग्नं यालाच म्हणतात ना. Happy Anniversary Vishram
अंजली जोगळेकर
24/12/2018









