*देवी*
कोरोनामुळे सध्या सगळेजण घरात बंद आहेत. सरकारने घालून दिलेले नियम आपल्यासारखे काही मोजके लोक पाळत आहेत. पण घरी बसून काय करायचं हा यक्षप्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आ वासून उभा आहे . त्यावर आपापल्या परीने उत्तरही अनेकजणांनी मिळवलंय किंवा तसा प्रयत्न तरी करताहेत. आज सोशल मिडीयावर जरा डोकावून पाहीलं तर ही उत्तरं आपल्याला पहायला मिळतात. माझ्या बर्याच मैत्रीणी फेसबुकवर अभिवाचन, कवितेचे वाचन करताहेत तर काही जणी कलात्मकतेने परीपूर्ण अशा चित्रफिती बनवत आहेत. यातून त्यांची सर्जनशीलता दिसून येते. टिवी वर पाहण्यासारखे सध्या काहीच नाहीये. या टाळेबंदीच्या काळात माझ्या लेकीने, मितालीने मला Netflix वरच्या काही इंग्रजी मालिका पहायला सुचवले. इंग्रजी मालिका, चित्रपट पहायला मी फारशी उत्सुक नसते. पण तिच्या आग्रहामुळे ‘Unbelievable ‘ ही मालिका पहायला मी सुरवात केली.
या मालिकेत एक महत्वाचा आणि ज्वलंत विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आलेला आहे. वय वर्ष १२ ते वय वर्ष ६० या वयोगटातील स्त्रियांवर एक कामपिपासू पुरुष एखाद्या serial killer सारखा एका मागून एक, वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करत असतो. पण प्रत्येकीचं या घटनेवर व्यक्त होणं हे दुसरीपेक्षा खूप वेगळं आहे .यातल्या १२ वर्षाच्या मुलीवर या घटनेचा इतका खोलवर परीणाम होतो की ती अचानक गप्प गप्प रहायला लागते, स्वतःला मिटवून घेते. साठ वर्षाची स्त्री हा प्रसंग मनाच्या आत खोलवर दाबून टाकते आणि वरवर काहीच झालेलं नाही असं दाखवत एकदम सामान्य जीवन जगायला लागते, निदान तसा आभास निर्माण करते. एक जण जास्तच देवभोळी होते, सतत चर्चमधे जाऊन ती प्रार्थना करायला लागते पण एक तरुण मुलगी मात्र या घटनेला वाचा फोडते. एखाद्या पोलीसाने हे प्रकरण कसे हाताळायला हवे, पिडीतेशी कसं बोलायला हवं हे ते प्रकरण हाताळणार्या स्त्री डिटेक्टीव दाखवून देतात. प्रत्येक स्त्री बलात्कारासारख्या प्रसंगावर ज्या प्रकारे react होते त्यावरून स्त्रिया किती भावनाप्रधान आणि संवेदनशील मनाच्या असतात हे दिसून येते. अतिशय सुंदर असलेली ही मालिका प्रत्येकीने पहायलाच हवी.
ही मालिका पाहील्यावर मग मात्र माझ्या टॕबवर Netflix, Hotstar वगैरे पहायला सुरवात केली. खूप चांगल्या फिल्मस् , वेब सिरीज गेल्या काही दिवसात मी पाहील्या. याच सुमारास यु ट्युबवर ज्या शाॕर्ट फिल्मबद्दल ऐकलं होतं ती ‘ देवी ‘ ही फिल्म पाहीली आणि मनात विचारांचं काहुर माजलं.
ही फिल्म फक्त १२/१३ मिनीटांची आहे. एका खोलीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत , १३/१४ वर्षाच्या मुकबधीर मुलीपासून ६० वर्षाच्या स्त्रीपर्यंत, सुशिक्षित, अशिक्षित ,आधुनिक, साधी,हुषार थोडक्यात सर्व धर्माच्या, भाषेच्या, वयाच्या, दर्जाच्या स्त्रीया एका लहान खोलीत दाटीवाटीने बसलेल्या आहेत. त्यांच्यातला समान धागा एकच आहे. त्या सगळ्या जणींवर बलात्कार झालेला आहे. या फिल्मचा शेवट तर डोळ्यात पाणी आणतो. ही फिल्म मनाला अस्वस्थ करुन जाते. अगदी याच सुमारास माझा भाचा सिध्दांतने whatsapp वरुन अजून एक अस्वस्थ करणारा संदेश पाठवला. ‘ द लास्ट गर्ल ‘ ह्या अनुवादीत पुस्तकाबद्दल माहिती देणारा हा संदेश होता. आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असलेले अत्याचार आयसीस या दहशतवादी संघटनेकडून नादिया मुराद या यजीदी स्त्रीने सहन केले. ते वाचताना सुध्दा अंगावर काटा येतो. प्रत्यक्ष पुस्तकात अजून काय असेल सांगता येत नाही.
सध्या टाळेबंदीमुळे वर्तमानपत्रे येत नाहीयेत. त्यामुळे रोज पेपरमधे वाचवतही नाहीत अशा बाल लैंगिक, स्त्रीयांवरील अत्याचाराच्या बातम्या डोळ्यासमोर येत नाहीयेत. खरं सांगायचं तर खूप चांगलं वाटतंय. पण वर्तमानपत्रं नाहीयेत( असली तरी कोरोनाविषयक बातम्यांनी भरलीयेत), कोरोनाशिवाय दुसरी कुठलीही चर्चा नाहीये म्हणून हे अत्याचार बंदच झाले असतील, अशा घटना आता होत नाहीयेत असं म्हणता येईल ? असं म्हणणं खूप धाडसाचंच ठरेल. रोज अशा बातम्या वाचताना हे नक्की काय चाललंय, काय झालंय आपल्या समाजाला, का विकृत झाले आहेत लोक अशा प्रश्नांनी डोकं भंडावून जातं.
आता इंटरनेटमुळे नको ते ज्ञान, फिल्मस् लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सहजरीत्या, अगदी हातात मिळतंय म्हणून असं होतंय? अत्याचार करणार्याला ६ महिन्याच्या निष्पाप बाळाकडे आणि ६०/७० वर्षाच्या म्हातार्या आजीकडे पाहून काहीच वाटत नाही? का होतंय हे सर्व? कारण काहीही असो पण हे होतंय हे सत्य आहे आणि हे खूप भयावह आहे. बालकांवर अत्याचार करणार्याला माणुस तरी म्हणता येईल? आजकाल लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवतानाही पालकांना भिती वाटते. माझी एक मैत्रीण तिच्या चार वर्षाच्या नातीला लांडे फ्राॕक घालून देत नाही, कायम खाली लांब लेगइन घालते. अनेकजणी मुलांना एकट्यांना बाहेर खेळायला सोडत नाहीत, सतत बरोबर राहतात. पण यात त्यांना कसा दोष देता येईल. बाहेरचं वातावरण एवढं वाईट आहे की आता कोणावरच विश्वास ठेवता येत नाही. पण असं करुन त्यांचं बालपणच आपण हिरावून घेत नाहीये का? त्यांना उमलण्याची संधीही आपण देत नाहीये. यावर उपाय करणं आवश्यक आहे. हे कुठेतरी थांबायला हवंय.
पण मग पूर्वीच्या काळी अशा गोष्टी होत असतील? जिथे माणसं असतात तिथे अशा विकृत मनोवृत्तीची माणसंही असणारच. मग यावर त्यांनी काय उपाय शोधला असेल? त्या वेळेस बालविवाहाची पध्दत होती. बालविवाह हे सोल्युशन असेल आपल्या पुर्वजांच्या नजरेतून??? कदाचित नंतर ही पध्दत चुकीच्या पध्दतीने अवलंबली गेली असेल???? माहीत नाही पण मन मात्रं अशा घटनांनी अस्वस्थ होऊन जातं. खूप असहाय्य वाटायला लागतं..
©® अंजली जोगळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा