विलग्नवासातून सुटका
'अज्ञातवासातून सुटका 'सारखं शिर्षक वाटतंय ना? 🙂. विलग्नवास म्हणजे क्वारंटाईन. मी गुगलवर मराठीत क्वारंटाईनसाठी शब्द शोधत होते तेव्हा हा शब्द सापडला. याचा खरा अर्थ जहाज व त्यावरील प्रवासी यांना ते सांसर्गिक रोगापासून मुक्त आहेत असे ठरेपर्यंत अलग ठेवतात तो काळ असा आहे. प्रत्यक्ष अज्ञातवास एक वर्षाचा होता पण आमचा ( माझ्या लेकीचा )हा विलग्नवास मात्र चौदा दिवसांचा होता . हे चौदा दिवस माझ्या लेकीच्या , मितुच्या, संयमाची परीक्षा घेणारे ठरले आणि वेगळ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले.
गेली दोन वर्ष मितु( मिताली ) आणि तिचा नवरा कुशल मलेशियात असतात. तिच्या भावाचे,सचिनचे , लग्नं ठरलं आणि १६ एप्रिल ही लग्नाची तारीख ठरली. या लग्नाच्या तयारीसाठी, खरेदीसाठी व माझ्या मदतीसाठी म्हणून ती एक मार्चलाच पुण्यात आली. कुशल नंतर एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात येणार असे ठरले. पण कोरोनाची कृपा झाली आणि सचिनचे लग्नं पुढे ढकललं गेलं. इकडे देशातील, परदेशातील विमानसेवा, रेल्वे, बससेवा बंद झाली. प्रवास ठप्प झाले.त्यामुळे मितु इकडे आणि कुशल तिकडे असे दोघेही बिचारे नाइलाजाने अडकून गेले 😞. ' दो हंसोका जोडा बिछड गयो रे 'अशी अवस्था दोघांची झाली होती. थोड्या दिवसातच ती अस्वस्थ व्हायला लागली, चिडचिड करायला लागली. आम्हालाही तिची घालमेल दिसत होती, पण करणार काय? त्याच वेळेस पन्नास माणसांच्या सोबत सचिनच्या लग्नाची परवानगी मिळाली . मग लग्नाची तयारी, व्यवस्था यात आम्ही सगळेच एकदम व्यस्त होऊन गेलो. ठरल्याप्रमाणे २७जूनला लग्नं झालं. आता मलेशियाला परत जायला हवं असं मितुला वाटायला लागलं.ती सतत वेबसाईट्स, गुगलवर काही विमानसेवा सुरु होतीये का याचा शोध घेत होती. तेव्हाच वंदे भारत मिशन चालू झालं . आता जास्तं वाट न पाहता त्यातूनच तिने जायचा निर्णय घेतला. पण एक मोठी अडचण होती. तिचा व्हिसा संपलेला आणि टाळेबंदीमुळे पुण्याचे व्हिसाचे आॕफीस बंद होतं.मग सचिनने तिला मलेशियन दुतावासात मेल पाठवायला सुचवले. तिनेही मेल पाठवुन तिची अडचण कळवली. त्यांचे लगेच उत्तर आले व त्यांनी मुंबईच्या दुतावासासाठी वेळ दिली आणि मग सुरु झाला तिचा खरा प्रवास.
मुंबईतलं व्हिसाचं काम खूप लवकर झालं. पण आता वेळ होती प्रत्यक्ष प्रवासाची. वंदे भारत प्रवासाचे तिकीट खूप जास्त आहे. आम्ही सगळेजण तिला थोडं महाग असलं तरी थेट विमान बुक कर असं सांगत होतो. पण खूप पैसे वाचतील म्हणून वेळ खूप लागणारं आणि सर्वात स्वस्त असलेलं पुणे हैद्राबाद, हैद्राबाद चेन्नई आणि मग चेन्नई क्वाललंपुर असं तिकीट तिने कोणाचंही न ऐकता बुक केलं. सकाळी सात वाजता चेन्नईला जाणारं विमान पकडण्यासाठी आदल्या दिवशी रात्री तिथे पोचणं आवश्यक होतं. म्हणून रात्री सातला तिथे पोचेल असं पुणे हैद्राबाद व हैद्राबाद चेन्नई अशी विमानसेवा बुक केली. चेन्नईला त्या वेळेस पूर्ण टाळेबंदी जाहीर केली होती त्यामुळे विमानतळाच्या बाहेर पडता येणार नव्हतं. रात्रं तिथेच काढायला लागणार होती कारण कुठलेच हाॕटेल चालु नव्हते. तिला एकटीलाच पाठवण्याखेरीज आमच्याकडेही दुसरा उपाय नव्हता. तिच्या प्रवासाच्या दिवशी पुण्यातून दुपारी बारा वाजता ती निघाली. जाताना हातमोजे, मास्क, कोरोनाची टेस्ट या सर्व आवश्यक बाबी तिने पूर्ण केल्या होत्या.
दोन्ही विमाने वेळेवर असल्याने ती वेळेवर म्हणजे संध्याकाळी सातला चेन्नई ला पोचली. सोबतच्या अजून दोन एकट्याने प्रवास करणार्या दोघींशी तिचा आधीच संपर्क झाला होता ही जमेची बाजू. सोबत भरपूर सामान. ती चेन्नईला पोचली खरी पण तिथे मात्रं अनेक अडचणींचा सामना तिला करावा लागला. तिथे कसलीच सोय नव्हती.विमानतळावर सर्वच प्रवासी थांबल्याने जागेची अडचणच होती. कशीबशी जागा पकडून तिघीजणी बसल्या . भरपूर डास, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि त्यात भर म्हणून सोबतचे असे प्रवासी ज्यांच्यामुळे या तिनही मुलींना वाटणारी असुरक्षीतता. नाही म्हणायला एकमेव काॕफी शाॕप मात्र उघडं होतं.कशी रात्रं काढली असेल या विचारानेही अंगावर काटा उभा राहतो. पहाटे चार वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचं होतं म्हणून मितु व तिच्या दोन नवीन मैत्रीणी पहाटे तीन वाजताच विमानतळाच्या बाहेर पडल्या. आंतर्देशीय विमानतळापासून हा विमानतळ लांब होता म्हणून थोड्या लवकरच तिघीजणी बाहेर पडल्या. बाहेरचं वातावरण खूपच गरम, बरोबरच्या जड बॕग्ज त्यात भरीस भर म्हणून ट्राॕलीसुध्दा तिथे उपलब्ध नव्हत्या. ते जड सामान ओढत जात असताना रस्त्यात पूर्ण अंधार. तिघीजणी एकमेकींच्या साथीने धापा टाकत आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर पोचल्या पण आत सोडायला साडेचारला सुरवात करणार होते. तोवर इतर प्रवाश्यांसोबत अर्धा तास ,इतक्या गर्मीत बाहेर बसायला लागले. डासांचा हल्ला तर चालूच होता. नशीबाने ते विमान मात्र वेळेवर होते. आत शिरुन सगळे सोपस्कार पूर्ण करुन एकदाची विमानात जाऊन बसली . तोवर ती इतकी दमली होती की क्वाललंपुर येईपर्यंत गाढ झोपूनच गेली.
क्वाललंपूरला पोचल्यावर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन कोरोनाची टेस्ट परत एकदा तिला द्यायला लागली आणि त्या देशाच्या नियमाप्रमाणे विलग्नवासासाठी ( चौदा दिवसांसाठी ) एका हाॕटेलमधे सर्वांना हलवण्यात आले. आता इथेचौदा दिवस काढायचे होते. हाॕटेलमधली खोली छोटीशी होती. खोलीच्या बाहेर cctv बसवलेले होते. कोणालाही चौदा दिवस बाहेर पडायची परवानगी नव्हती. दरवाज्याच्या बाहेर नाश्ता व दोन वेळचे जेवण आणून ठेवले जायचे. ते घेण्यापुरताच दरवाजा उघडायची परवानगी दिलेली होती. सुरवातीचे ५/६ दिवस खाण्याचे खूप हाल झाले. मितुने अनेक वेळा तक्रारी केल्यावर आठव्या दिवशीपासून बरं जेवण यायला लागलं. या काळात अजून दोन वेळा कोरोनाच्या टेस्ट घेण्यात आल्या. इकडे आम्हालाही चैन पडत नव्हतं, चौदा दिवस असे बंद खोलीत ही कशी काढणार याची काळजी लागून राहीली होती. मी तर रोज दिवस मोजत होते , तिच्याशी बोलताना तिला माझी काळजी दिसायला नको याची काळजी घेत होते. आम्ही सगळेच सतत तिच्या संपर्कात होतो. सगळेजण मुद्दाम वेगवेगळ्या वेळी तिच्याशी बोलायचो. मी व विश्राम सकाळी व संध्याकाळी , सचिन, शुभांगी रात्री आणि तिच्या मैत्रीणी असं आम्ही आपापसात ठरवून तिच्याशी संपर्काचा ताळमेळ राखत होतो. पण खरी लढाई तिलाच लढायची होती.कुशलला भेटायचं या तीव्र इच्छेमुळे हे दिवस पार पडले असावेत. पण या सगळ्या परिस्थितीला तिने एकटीने ज्या हिंमतीने, धाडसाने तोंड दिलंय त्याला तोड नाही. विश्राम नेहमी मला सांगत असतो, "मुलांना त्यांची लढाई लढु दे एकट्याने. वेळ पडली तर आपण आहोतच". ही लढाई मितुने जिंकलीये असं म्हणायलाच हवं. आई म्हणून मला खरंच तिचा खूप अभिमान वाटतोय. या चौदा दिवसात जीवनातले अनेक धडे ती शिकली असेल याची खात्री आहे. आता मात्र दो हंसो का जोडा एकमेकांना भेटलाय.दोघेही खूप खुश आहेत आणि त्यांची खुशी पाहून आम्हीही खूपच खुश आहोत. अखेर विलग्नवासातून सुटका झालीये......
© अंजली जोगळेकर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा