प्रिय आईस,
माझं पत्रं आणि ते ही पुण्यातल्या पुण्यात, लाॕकडाऊन चालु असताना, आश्चर्य वाटलं ना? या आधी तुला पत्रं लिहून मला वाटतं अनेक वर्ष झाली असतील, मला तर आठवतही नाहीये. पण असं पत्रं मातृदिनाच्या दिवशी पहिल्यांदाच लिहीतीये.
आज सकाळी तुझ्याशी फोनवर बोलले. ८२ वं वर्ष लागलंय तुला. अजूनही तुला एवढं फिट पाहून तुझी नातवंडं आम्हा बहिणींना आणि भावाला चिडवतात, तुमची आई तुमच्यापेक्षा फिट आहे😊. खरं सांगु आई तुला असं समाधानी, आनंदी पाहीलं ना की परमेश्वराचे लाख लाख आभार मानावेसे वाटतात. आयुष्याच्या या टप्प्यावर तरी तुला निवांतपणा आणि सुख लाभलंय.
मला आठवतंय आमच्या लहानपणी तुला कायम धावतपळत शाळेत जाताना, आल्यावर स्वयंपाक करताना अगदी सतत काम करताना पाहीलंय. पण एवढया कष्टाच्या काळात आमच्यावार चांगले संस्कार कसे होतील यासाठीही धडपडायचीस. आपल्या एवढ्याशा खोलीत इतकी माणसं, नातेवाईक यायचे .शाळेतली नोकरी , आम्ही तीन लहान भावंडं सांभाळून या सर्वांचं हसतमुखाने सगळं करताना तु कधीच वैतागली कशी नाहीस गं? पण हे त्या वेळी कधी कळलंच नाही आम्हाला. आता संसारात पडल्यावर मात्र हे सगळं जाणवायला लागलं. मी आठ महीन्याची असताना मला मांडीवर घेउन तु शिकलीस. मी चाळीशीनंतर MA करत असताना जेव्हा कधी मनात अभिमानाची भावना यायची ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुच यायचीस गं. कसं केलंस तु हे सगळं आणि तेही कोणाचीही मदत नसताना? मावशी तेवढी तुझ्या पाठीशी उभी होती.आत्ता काही दिवसांपूर्वी जयंतीला ( माझी बहीण ) गंभीर आजाराची शंका आलेली असताना तु पटकन म्हणालीस, माझ्याकडे जे पैसे, दागिने आहेत ते सगळं विकून मी तिला बरं करेन, मला काही नकोय यातलं. देवाजवळ त्यावेळी प्रार्थना करत होतीस, जप करत होतीस. सुदैवाने तसं काही निघालं नाही पण तेव्हा तुझं बोलणं ऐकून थक्क झाले होते मी. या वयातही तुझं आईपण संपलेलं नाही हे जाणवलं मला. . आम्ही इतक्या मोठ्या झालोहेत, जावई आलेत पण तरीही आमची काळजी करत असतेस, फोन करतेस. मोबाईल वापरायला शिकलीयेस. सगळे पदार्थ खाउन पाहतेस मग अगदी ते नुडल्स असले तरी. पानात पडेल ते खायचं, टाकायचं नाही हा नियम आहे तुझा. प्रत्येक टप्प्यावरचे तुझं वागणं ,तुझ्या सवयी आठवून तसंच वागायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातलं थोडं तरी आम्ही साध्य केलं ना आई तर आमचं आयुष्य सफल होईल.
आजच्या या मातृदिनाच्या निमीत्ताने एकच मागणं देवाकडे मागेन..तु जशी आहेस ना तशीच शेवपटपर्ययंत रहावीस...फिट, आनंदी व समाधानी. तुला माझा सलाम. तुला साष्टांग नमन करुन इथेच थांबते
तुझी,
सौ. अंजु
@,अंजली जोगळेकर .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा