Shabdanjali......शब्दांजली

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

एका लग्नाची गोष्ट

 माझ्या लग्नाची  एकच ;) गोष्ट


आज माझ्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण झाली.  विचार करताना वाटलं आपण एकमेकांना  एवssssढी  वर्षं सहन केलं ?? पण  खरं सांगु का ही वर्षं कशी सरली समजलं पण नाही. माझ्या लग्नाची एक गोष्ट आहे. तसं तर प्रत्येकाच्याच लग्नाची एक गोष्ट असते असं मला वाटतं.


१९८५ सालची गोष्ट . M. Com ला प्रवेश घेउन काॕलेजला सुरवात झाली होती. स्वप्नांनाही पंख फुटले होते. मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. आपण इतक्यात लग्न करायचं नाही असं मनाशी ठरवुन टाकलं. पण आपण जे ठरवतो त्याच्या नेहमी उलटच होतं, बरोबर ना? माझ्या सासर्यांनी एका लग्नात मला पाहिलं. त्यांना असं वाटलं की ही मुलगी आपल्या मुलासाठी योग्य आहे. . त्यांनी आमच्या कुटुंबाची पूर्ण चौकशी केली आणि एक दिवस अचानक न कळवता त्यांच्या मुलाला घेऊन आमच्या घरीच येउन ठेपले की. झाली का पंचाइत? घरात तर मी खास पुणेरी पोशाखात ( पंजाबी ड्रेसचा कुडता व परकर😁). बहिणीचे लग्न नुकतेच झाल्याने घरी भरपूर पसारा, आई वडील कोणीच घरी नाही. घरात फक्त मी, माझा आत्ये भाउ व भावजय. त्यांना चहा वगैरे करुन दिला. पण मी ज्या अवतरात होते त्यावरुन होकार  येणार नाही याची खात्रीच होती. आई आल्यावर तिची पण खूप बोलणी खाल्ली . पण तरीही मी बेफिकीरच होते. नाही तर नाही, इथे कोणाला लग्न करायचंय , कोणाचं अडलंय लग्नावाचून हीच धारणा होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून होकार आला. त्यांचं घर पहायला, घरातील लोकांना भेटायला जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा लक्षात आलं की सगळेजण एकमेकांशी हिंदी व english मधे बोलताहेत.मी तर घाबरुनच गेले कारण सदाशिव पेठेतली असल्याने घरात बाळबोध वातावरण आणि इंग्रजी ची सवय नाही. कसं जमणार या घरात माझं?   लग्नं ठरवण्याच्या आधी थोडं एकमेकांशी बोलून घ्या असं जेव्हा माझ्या मोठ्या नणंदेनं सांगितलं तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जर मी काही केली असेल तर मला इंग्रजी  येत नाही हे सांगुन टाकलं. आज खूप हसू येतं विचार करता.पुढं बोलता बोलता मुलाने त्याच्या नोकरीच्या ठिकाणचे  वातावरण, कामाचे स्वरुप, पार्ट्या याचे इतके रसभरीत वर्णन केले की ते ऐकून मी घरी आल्यावर आईला हा मुलगा पसंत नाही असं सांगून टाकलं. मला इंग्रजी येत नाही असं सांगितल्या मुळे ते लोकही नाहीच म्हणतील याची मला पक्की खात्री होती. (किती बालीशपणा ना😁)पण दुसऱ्या च दिवशी सासुबाई, नणंद पेढ्याचा पुडा घेउन हजर. आता आली का पंचाइत. मी नकार दिल्यावर त्या दोघी अचंभीत झाल्या. नणंदेने खोदून खोदून कारण विचारल्यावर मी पार्ट्यांचं कारण सांगितले. कारण पार्टी म्हणजे दारु आणि दारु पिणारा नवरा मला नकोच होता.शेवटी नणंदेने मला खूप समजावले. माझा भाउ दारु वगैरे काही पित नाही, त्याला चेष्टा करण्याची सवय आहे. मी तुला खात्री देते. त्यांचं तळमळीचं बोलणं ऐकून मी परत एकदा मुलाशी बोलायला तयार झाले आणि यथावकाश आमाचा २५ नोवेंबरला शुभमंगल झालं. मी या घरात यायचं पूर्ण श्रेय अर्थातच माझ्या  नणंदेला,  विणाताईंना आहे. लग्नानंतरची पहिली काही वर्षं खूप महत्वाची असतात.हा काळ एकमेकांना तसेच घरातील  माणसांना समजून घ्यायचा असतो. पण माझ्या मुलाचा जन्म लगेचच झाल्याने एकमेकांना समजून घ्यायच्या आधीच आमच्यावर जबाबदारी पडली. त्यामुळे एक दुसर्याचा स्वभाव, विचार जाणून घ्यायला मधे खूप कालावधी जावा लागला. हा सगळा काळ तणाव, गैरसमज, कुटुंबातील वाद, आर्थिक संकटं, अडचणी व मुलांची जबाबदारी यांनी भरुन गेलेला होता,  परीक्षा घेणारा होता. एखाद्या  रोलर कोस्टरसारखी आमची,अवस्था होती. कधी वर तर कधी झपाट्याने खाली. खूप दमून गेलो होतो आम्ही. आज मागे वळून पाहताना वाटतं ह्याच परीक्षेच्या काळात एकमेकांना समजून घ्यायची प्रक्रिया पण  बहुतेक चालू होती. कधी मी दोन पावलं मागे सरत होते तर कधी तो.आमचा तोल कधी ढळुन दिला नाही. कुठलीही गोष्ट  तुटेपर्यंत ताणली नाही. आज आमचं नातं खूप छान वळणावर येउन ठेपलंय. एखाद्या  मुरलेल्या लोणच्यासारखं.. न बोलताही मनातल्या भावना  ओळखाता येतात आम्हाला, एकमेकांची काळजी घेतो, मोकळीक देतो, एकमेकांच्या कामाचा आदर करतो .शेवटी यशस्वी लग्नं यालाच  म्हणतात ना. Happy Anniversary Vishram

अंजली जोगळेकर

24/12/2018

उंबरठा... कविता

 माझा,कविता लिहायचा प्रयत्न ;) 


उंबरठा


चौकटीतलं जग आहे  उबदार ,सुरक्षीत

बाहेर आहे म्हणे समाज  विचलीत

म्हणून काय झालं

डोळ्यावरची झापड मला हटवायची आहे

एकदा का होईना हा उंबरठा ओलांडायचा आहे


ऐकलंय पलीकडे आहे अथांग आकाश

त्याची निळाई अनुभवायला हवाय मला अवकाश

म्हणून तर म्हंटलं

खांद्यावरचं जोखड  मला भिरकवायचं आहे

एकदा का होईना ह्या कुंपणापलीकडे जायचं आहे


ओलांडलंच कधी तर 'ते' काय म्हणतील

म्हणतील फारतर बाहेर जाउन फसशील

म्हणून तर म्हंटलं

हा फसवा समज एकदा दूर सारायचा आहे

एकदा का होईना हा उंबरठा ओलांडायचा आहे


माझ्यातल्या मी ला शोधायचंय आहे

माझ्याच बंधनातून मला मोकळं करायचं आहे 

म्हणून तर म्हटलं

स्वतःतला हा पुल पार करायचा आहे

एकदा का होईना हा उंबरठा ओलांडायचा आहे.


धडपडणार ,झगडणार पण ठेवणार ताठ मान

करायला लावणार त्यांना माझ्या स्त्रीत्वाचा सन्मान

म्हणून तर म्हंटलं

सन्मानाचा हा वसा पुढे पुढे  न्यायचा आहे

एकदा का होईना हा उंबरठा ओलांडायचाआहे


© सौ. अंजली जोगळेकर.

4/12/2019

 The Terminal ✈️


काही दिवसांपूर्वी Tom Hanks या  अभिनयसम्राटाचा  ‘ The Terminal ‘  हा चित्रपट परत एकदा पाहीला. मी फारसे इंग्रजी चित्रपट पहात नाही पण हा चित्रपट मला फार आवडतो.  न्युयाॕर्कला जाण्यासाठी विक्तोर (मी व्हिक्टरच म्हणते 😊) JFK Inernational Airport वर येतो पण तो न्युयाॕर्कलाही जाऊ शकत नाही आणि त्याच्या देशातही. युध्दामुळे त्याच्या देशाचं अस्तित्व संपून गेल्याने तो Airport वरच अडकून जातो. म्हणजे ‘ न इधरका ना उधरका ‘ अशी त्याची परिस्थिती असते. यात  Airport वरचं वातावरण, तिथली माणसं, त्यांची मानसिकता छान पध्दतीने दाखवली आहे.


हे आठवण्याचं पण एक कारण आहे. गेली काही वर्षं मी सातत्याने प्रवास करतीये, तोही विमानाने . त्यामुळे वेगवेगळ्या विमानतळावरचे वातावरण अनुभवण्याची, निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली.  यात पुणे, दिल्ली, मुंबई, लखनौ, भोपाळ, भटिंडा अशा भारतातल्या काही ठिकाणी मी  गेलीये. सुरवाती सुरवातीला विमानतळावर शिरताना मला फार भारी वाटायचं, आपण कोणीतरी ‘ खास ‘  वगैरे आहोत  असं वाटायचं पण कालांतराने हा गोड गैरसमज दूर होत गेला. विमानप्रवासाचे दर कमी झाल्याने आपल्यासारखे सामान्य लोक याचा फायदा घेउ लागलेत हे मला नंतर जाणवायला लागलं.


 रेल्वेनेही 🚂मी तितकाच प्रवास करते. रेल्वे लेट होणं किंवा मी लेट होणं,चुकीच्या  प्लॕटफाॕर्मवर/ स्टेशनवर  उभं राहणं, अक्षरशः पळत पळत रेल्वे/ विमान पकडणं  असे सर्व प्रकार 😄माझे करुन झालेत. स्टेशनवर विवीध ठिकाणी जाणार्या गाड्यांसाठी झुंबड उडालेली असते म्हणून बर्याच वेळा मला रेल्वे स्टेशन आणि विमानतळ दोन्हीकडची परिस्थिती सारखीच वाटते.अगदी अशीच लोकांची झुंबड आता विमानतळांवरही दिसतेच. कुठल्याही वेळी अगदी मध्यरात्रीही जा, विमानतळ माणसांनी खचाखच भरलेले असते. देशाच्या एका कोपर्यापासून दुसर्या कोपर्यापर्यंत विमाने उपलब्ध आहेत आणि गर्दीही तेवढीच आहे हे पाहून आश्चर्यही वाटते.पण  कुठल्याही विमानतळावर जा तिथलं वातावरण साधारण एकसारखंच असतं. तिथलं खाणं हे आपल्या खिशाला न परवडणारं आहे.  एकदा दिल्लीच्या विमानतळावर आम्ही १८०/- ला एक प्लेट पाणीपुरी घेतली. एकशे ऐंशी भागीले सहा म्हणजे तीस रुपयाला एक पुरी हा हिशोब करत मी पुरी खाल्ली आणि जो ठसका लागला😉 की तो जायचं नाव घेईना. चव म्हणलं तर अगदीच ordinary. स्वच्छता म्हणाल तर काऊंटर तर चकाचक पण आत कोणी पाहीलंय, दृष्टीआड सृष्टी.   बाकीचे दर पाहीले तर पुण्यात मैत्रीणींबरोबर गेल्यावर एकत्र जेवढे बिल होईल तेवढ्यात दोघेजण थोडंफार खाउ शकू हे लक्षात आलं.एकदा पाणी न्यायचं विसरले तेव्हा शंभर रु ची बाटली विकत घेताना डोळ्यातून पाणी 😜आले. तेव्हापासून आजतागायत  माझ्याबरोबर कायम खाण्याचा डबा व पाणी असतेच. बाकी एखादी गोष्ट भले विसरली तरी चालेल.


अनेक प्रकारचे प्रवासी terminal वर पहायला मिळतात. सोबत घरचा डबा आणणारे,  cheese burst pizza & Capachino असं  खाणारे,गावातले, स्वतःला ‘extra special’ समजणारे, इंग्लीश फाडणारे, प्रथमच विमानप्रवास करण्यासाठी उत्सुक  असणारे, वृद्ध , wheel chair वर बसलेले तर  त्यासाठी लागणार्या attendent ला नोकर समजून त्यांच्याशी बोलणारे अशा अनेक प्रकारची माणसे. यात पंजाबी, गुजराथी, बंगाली, मराठी, बिहारी इ. अनेक राज्यातले याशिवाय Airport वर येताना मेकअपने सजलेल्या फॕशन क्विन्स, काहीजण एकदम साधे,  माणसांचे किती प्रकार वर्णावे तेवढे कमीच पडतील. प्रत्येकाच्या चेहर्यावरचे भावही वेगवेगळे, चिंताग्रस्त, आनंदी, तणावग्रस्त. हे भाव वाचायची, माणसांचं निरीक्षण करायची मला सवय लागलीये. मग मी कल्पना करायला लागते यांच्या घरी काय झाले असेल, यांना काय ताण असेल, कुठे राहत असतील वगैरे😊. पण यामुळे माझा प्रवास मनोरंजक, सुखकर होतो. मला कधीच कंटाळा येत नाही. उलट एवढी विवीधरंगी, विवीधढंगी माणसं क्वचीतच पहायला मिळतात मग त्यांना वाचायची संधी मिळते.

विमानतळावरची सजलेली दुकाने हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे. यातील वस्तु, कपडे खरंच कोणी विकत घेत असेल? मला तर नेहमीच माझ्यसारखे window shopping करताना बहुतेकजण दिसतात. कारण तिथल्या किंमती अव्वाच्या सव्वा असतात. सगळ्या नामांकीत brands ची दुकाने इतकी सुंदर सजवलेली असतात की कोणाचेही लक्ष जायलाच पाहीजे.पण ती चालतात का , चालत नसतील तर ती चालु कशी ठेवत असतील? म्हणजेच ती चालत असणार असा निष्कर्ष मी काढला. आपल्या मात्र out of range आहे एवढं सत्य आहे.

भारतातील प्रत्येक सणांना इथे सजावट करतात. ती इतकी सुंदर असते की डोळ्यांचे पारणे फिटेल. दिवाळीला रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, नाताळमधे सुंदर  व भव्य christmas tree, नविन वर्षी  आकर्षक रोषणाई, फुगे यामुळे लोक फोटो,selfie काढत असतात.


विमानासाठी थांबलेले लोक एकतर खात असतात किंवा  आपल्या मोबाईलमधे, लॕपटाॕपवरच असतात. कोणी पुस्तक वाचताना फारसं दिसत नाही.


या प्रवासादरम्यान एक गोष्ट मला नक्कीच जाणवली की भारतात विमानाने प्रवास करणार्यांची संख्या प्रचंड वाढलीये. अनेक शहरे, राज्ये व देश एकमेकांशी जोडली गेलीयेत. आता सगळा देश आपल्या आवाक्यात आहे असं वाटतं. एकमेकांच्या संस्कृतीशी ओळख होते, आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण होते. आपल्या कुठल्यही प्रवासात वेगवेगळ्या संस्कृतीचे, राज्याचे आपले सहप्रवासी असतात.  राज्य, भाषा कुठलीही असो शेवटी माणूस सगळीकडे सारखाच असतो हे सत्य अशा ठिकाणी प्रत्ययाला येते.

इतक्या झपाट्याने प्रगती करत असलेल्या, विवीधतेने नटलेला, आर्थिकदृष्ट्या सधन असलेला आपला देश या प्रवासात एकीकडे पहायला मिळतो  पण त्याचवेळी रेल्वेने प्रवास करत असताना रुळाच्या दोन्ही बाजूला पसरलेली गरीबी, अस्वच्छता, अशिक्षीतपणा याकडे पाहवत नाही. चकाचक, स्वच्छ , झगमगलेले विमानतळ एका बाजूला तर अस्वच्छता, कचरा,दुर्गंधीने भरलेले रेल्वेस्टेशन व आसपासचे वातावरण दुसर्या बाजूला. कुणीतरी म्हणलंय ना इंडिया आणि भारत वेगवेगळे आहेत हे सगळं डोळ्याला दिसतं, फरक जाणवतो आणि मग मनाला पटायला लागतं. कसा समन्वय साधणार आहोत आपण या दोन्हीत??? खूप काही करायला हवंय......आपल्यालाच....


@ सौ. अंजली जोगळेकर .

25/02/2020



 माझं लाॕकडाऊन


आज लॉकडाउनचा ३३ वा दिवस आहे.  गेले ३३ दिवस  खरंच मी घरात आहे? काही अपवाद वगळता ,म्हणजे  भाजी /किराणा आणण्याशिवाय, मी कुठेच गेलेली नाहीये आणि हे फ़क्त माझ्याच बाबतीत नाही तर सरकारने घालून दिलेले नियम पाळणार्या  इतर अनेक जबाबदार  नागरीकांचं  रुटीन झालंय. सगळ्यांनीच जर  आपली जबाबदारी पार पाडली तर कोरोनाला  हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही..


गेल्या ३३ दिवसांत मात्रं  काही अशा गोष्टी मी   केल्या  ज्या मी अनेक दिवसांत किंवा महीन्यात केल्या नव्हत्या असं म्हणलं तरी चालेल. त्यातली एक गोष्ट तर याआधी मी एकदाही केली नव्हती ती म्हणजे जयश्रीला म्हणजेच माझ्या बाईला  आपणहून दिलेली मोठ्ठी सुट्टी आणि ती सुध्दा  अजिबात  खळखळ न करता. पैसे तर आपण कोणीच कापत नाही.जेव्हापासुन ती येत नाहीये तेव्हापासुन मी जरा माझ्या घराकडे माझ्या खास चष्म्यातून पहायला लागले .  मला आता घराचे असे कोपरे  दिसायला लागले जिकडे पहायला जयश्रीला जमत नाही. ओटा, भांडी आणि सगळं घरंच माझा हात फ़िरल्यावर आनंदाने खुलुन गेल्यासारखं दिसायला लागलं. ही सगळी कामं करताना मला  खूपच समाधान मिळालं. मला जाणीव झाली की तिच्यावर माझं अवलंबुन राहणं वाढलं आहे. हे कमी करायला हवंय याची मी मनांत नोंद करुन ठेवलीये.


व्यायाम करायला आता मला जिमला जाता येत नाहीये किंवा सकाळी फ़िरायलाही जाता येत नाहीये. थोडे दिवस जरी व्यायाम केला नाही तर वजन वाढायला वेळ लागत नाही माझं. हवा लागली तरी वजन वाढणार्यांच्या श्रेणीमधे मी मोडते. मग वर गच्चीवर जाऊन मी व्यायाम करायचं ठरवलं. एरवी मी महीन्यातुन  जेमतेम एकदा  तिथे जाते. पण आता गेल्या ३३ दिवसांपासुन मी रोज वर जायला लागलीये. सकाळी सकाळी तिथे इतकं प्रसन्नं वाटतं हे मला याआधी कधी कळलंच नव्हतं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. आमच्या गच्चीला लागून नारळ, गुलमोहोर,सोनचाफ़ा अशी झाडं  आहेत.  त्यावर सकाळी कोकीळा, भारद्वाज, साळुंकी असे पक्षी येत असतात, थोड्या दुरवरुन नारळाच्या झाडाआडुन दिसणारा सुर्योदय, आकाशात दिसणारे रंग  पाहुन दिवसाची सुरवात खुप सकारात्मक , आनंदी होते.  अशा वातावरणा्त व्यायामही जास्तं करावासा वाटतो. पण इतक्या वर्षात आपल्याच घरातल्या गच्चीवरुन निसर्गाच्या इतक्या जवळ जाता येते हे मला या ३३ दिवसांतच कळले.


पक्षी  मला दिसायला लागल्यावर त्यांना काहीतरी खायला घालावं का? हा विचार माझ्या मनात आला. मग मी लगेच एका ताटलीत त्यांच्यासाठी पोळीचे तुकडे टाकायला सुरवात केली पण पक्षी काही फ़िरकेनात. मग एक दिवस मी भिजवलेली कणिक टाकली आणि काय आश्चर्य ती खायला पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांना पण आवड्निवड असते हे मला माहीतच नव्हते. पण माझ्या मुलांच्या म्हणण्याप्र्माणे माझ्या हातच्या पोळ्या खाण्यापेक्षा कणिक खाल्लेली बरी😄 असा विचार त्यांनी केला असावा. विनोदाचा भाग सोडला तर त्या दिवशीपासुन रोज आता कणिक खायला खुप पक्षी येतात. गेल्या काही दिवसांपासुन तर श्री व सौ भारद्वाजजी त्यांच्या पिलासह यायला लागले आहेत. हे पाहुन इतकं बरं  वाटतंय मला.  माझ्यासाठी हा खुप नविन व आनंददायी अनुभव आहे.


सध्या माझं वाचन कमी झालंय  की काय असं  मला वाटत होतं. मी  मागे दिल्ली एअरपोर्ट वरुन मुंशी प्रेमचंद यांचं  ’ गबन ’ हे पुस्तक आणलं होतं . आणलं खरं पण गडबडीत ते  आत कुठेतरी कपाटात दडुन बसलं होतं, काही ना काही कारणाने ते वाचायचं राहुनच जात होतं . ते पुस्तक नेमकं आत्ता सापडलं. मग काय लगेच ते वाचायला सुरवात केली. पण मुड लागेना, वाचायला योग्य जागा सापडेना. सहज   बागेतल्या झोपाळ्यावर वाचायला बसले आणि अर्धं पुस्तक एका झटक्यात वाचून काढलं. असं खुप दिवसांनी झालं की मी एका बैठकीत एवढं वाचलं. मग  त्या दिवशीपासून झोपाळा ही माझी वाचनाची जागा झालीये. झोपाळ्यावर गुलमोहोराच्या झाडाच्या फ़ांद्यांमुळे छान सावली असते. मी तिथे बसले की आमचा लिओ खुप खुश असतो. लगेच माझ्याजवळ येऊन बसतो. शिवाय आमच्या बागेतली झाडे, कुंड्या  फ़ुले यामुळे मन प्रसन्नं होतं. लिहायचा, वाचायचा मुड लागतो. आता ही माझी फ़ेवरीट जागा झालीये.  या झोपाळ्यावर मी आधीही खुप वेळा बसलीये. भाजी निवडायला किंवा गप्पा मारायला पण आता वाचन व लेखनही या यादीत समाविष्ट  झालंय. घरातून बाहेर पडता येत नाही, त्यामुळे बाहेरची कामं नाहीत आणि टी व्ही सारखा पाहवत  नाही  .  म्हणुनच बहुतेक निवांत वेळ मिळायला लागला . एरवी मी अशी झोपाळ्यावर बसायला गेले नसते कदाचित. याशिवाय मी ' स्टोरीटेल ' हे मोबाईल वर  एकॲप डाउनलोड करुन घेतलंय. यात चांगल्या लेखकांची मराठी/ हिंदी/ इंग्रजी  पुस्तके आॕडीओ स्वरुपात असतात.  त्यावरही या काळात मी तीन छान  पुस्तके वाचली/ ऐकली. हा अनुभवही खूपच चांगला आहे. अगदी व्यायाम करताना, स्वयंपाक करताना सुध्दा मी ही पुस्तके वाचू/ऐकू शकते. वेगवेगळ्या पाककृती  ऐकता ऐकता करताना खूप मजा येते.


घरातील लोकांना सगळ्या कामात, अगदी भांडी, झाडु, फ़रशी पुसणेसह , मदत करताना पाहणे हा आनंददायक अनुभव केवळ या लॅकडाउनमुळेच पहायला मिळाला. मुली नेहमीच मदत करतात.  मुलं बाहेरची कामं करतील पण घरातलं काम करायला पहात नाहीत. ही माझी तक्रार या काळात पूर्णपणे दूर झाली. घरातलल्या साफ़सफ़ाई कडे सध्या माझं जातीने लक्ष असल्याने आमचं घर खुप  ताजंतवानं , तरतरीत झालंय असं म्हणायला हरकत नाही.

बाहेर पडणे होत नाही म्हणुन खर्चही खूपच कमी झालाय. माझ्या पाकीटात कितीतरी दिवसांपासुन पाच हजार रुपये आहेत , ते संपायचे नावच घेत नाहीयेत.  ज्या जीवनावश्यक वस्तु आहेत त्या तर घ्यायला लागतातच तरीही पैसे संपत नाहीयेत. आपण किती कमी वस्तुंमधे , सामानामधे राहु शकतो हे मला वाटतं या दिवसांतच मला कळलं . आपल्या गरजा आपण विनाकारणच इतक्या वाढवून ठेवतो, नको इतके स्वतःला गोंजारतो , लाड करतो याची लख्ख जाणीव मला झाली.

लाॕकडाउन चा त्रास मला होत नाहीये का? तसं अजिबातच नाही. त्रास तर नक्कीच होतोय पण जी परीस्थिती आपण बदलू शकत नाही तिचा जास्तं विचार करुन उपयोगाचं नसतं. आपण निदान घरात बसुन नीट जेवू तरी शकतोय, आपलं पोट तरी भरतोय पण मजुरांचं काय?  हाताला काम नाही,  खायला अन्नं नाही, त्यांनी काय करायचं? हा विचार आला की वाईट वाटतं, काही सुचत नाही.  आपण त्यांच्यासाठी काही करु शकू का? त्यांच्यापर्यंत अन्न कसं पोचवू शकू? थोडी विचारपूस , चौकशी केली आणि मार्ग सापडला. उत्तरप्रदेश मधील काही मजुर ऊपाशी आहेत, त्यांना खायला अन्न नाहीये, साधारण वीस कामगार आहेत ही माहिती मिळाली. मग मी व माझी मैत्रीण मंजु दोघींनी मैत्रीणी, परीचीत यांना आवाहन केले, देेणगी गोळा केली व त्यातील  काही मजुरांना ४/४ दिवसांचा शिधा दिला. खूप समाधान मिळालं. मला वाटतं जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं .


पण हा बदललेला जीवनक्रम लाॕक डाऊन नंतरही  चालू रहायला हवा याची काळजी मला घ्यायची आहे. तरंच या बंदीचा काहीतरी सकारात्म्क शेवट होइल, हो ना?

अंजली जोगळेकर

14/04/2020



महाविद्यालयातील पहीले दिवस

 *महाविद्यालयातील पहिले दिवस* 


मला माझ्या महाविद्यालयातील पहिला दिवस स्पष्ट आठवतोय. स.प.महाविद्यलयाचे भव्य पोर्च, दगडी इमारत आणि आमचा ११ वी चा वर्ग विसरणे शक्यच नाही. पण आज मात्र मी लिहीणार आहे चाळीशीनंतर आम्ही दोघी मैत्रीणींनी ( मी व माझी मैत्रीण  मंजुषा) M.A.मानसशास्त्र  करत असताना आलेल्या अनेक पहिल्या वहिल्या अनुभवांबद्दल. हे सगळे अनुभव आमच्या वयामुळे रोमांचकारी, अद्भुत आणि अविस्मरणीय ठरले. ती दोन वर्ष आमच्या आयुष्यातील ' मैलाचा दगड ' आहेत यात काहीच शंका नाही.


एका सामाजिक संस्थेत काम करत असताना 'मानसशास्त्र ' या विषयात आम्हा दोघींना खूप रुची निर्माण झाली आणि आम्ही M.A. करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी पुढे कायकाय करावे लागणार आहे याची थोडीशी सुध्दा कल्पना आम्हाला त्या वेळी नव्हती😔. प्रथम यशवंतराव चव्हाण विद्यापिठातून बहिंंःस्थ B.A . ची पदवी मिळवली पण M.A मानसशास्त्रसाठी मात्र नियमित महाविद्यालयात जावे लागणार होते. मग उत्साहाने माॕडर्न महाविद्यालयात प्रवेश अर्ज भरला आणि चक्क दोघींनाही प्रवेश मिळाला , वयाचा विचार न करता आणि मग सुरु झाला आमचा धाडसी प्रवास.


महाविद्यालयात जायचे म्हणून भरपूर खरेदी झाली, कपडे, वह्या, पेन, बॕग. खूप उत्साह अंगात भरला होता. अखेर पहिला दिवस उजाडला. छान तयार होउन प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरलो आणि जाणवलं इथे विद्यार्थी म्हणून आपण दोघीच इतक्या मोठ्या आहोत, वयाने आणि शरीरानेही😄. वर्गात शिरायची लाज वाटायला लागली पण एकमेकींचे हात घटृ धरुन 👭धडधडत्या हृदयाने वर्गात शिरलो. बाकांवर सगळी तरुण मुले/मुली हसत खिदळत, गप्पा मारत बसली होती. आम्ही आत शिरल्या शिरल्या Good morning madam असं सर्वांनी मिळून अभिवादन केलं. कसनुशा चेहर्याने आम्ही शिक्षिका नाही तर विद्यार्थी आहोत असं सांगितल्यावर आता त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. या चेहर्यांची पुढे आम्हाला सवय होउन गेली. आता पुढचं दिव्य पार पाडायचं होतं बाकावर बसण्याचं. गेल्या अनेक वर्षांचं खाणंपिणं आमच्या चांगलंच 'अंगी ' लागलं होतं. हे शरीर या बाकात कसं बसवायचं 😜तेही या मुलांसमोर हा यक्षप्रश्न आमच्यासमोर होता. आम्ही निमुटपणे शेवटच्या बाकाकडे निघालो. पाय जड झाले होते😊,सगळेजण आमच्याकडे पाहताहेत हे जाणवत होतं, कशाला शिकण्याचं ठरवलं यासाठी स्वतःला लाखो दुषणं देउन झाली पण आता सुखाचा जीव दुःखात टाकलाय ना मग भोगा आपल्या कर्मची फळं असं मनाशी बोलून त्यातल्या त्यात मोठा बाक पाहीला व त्यासमोर आलो. परमेश्वराचा कधी नव्हे ते मनापासून धावा केला आणि मी आत शिरले. काय आश्चर्य कशीबशी का होईना मी आत शिरु शकले😉 आणि पुढची फजिती वाचली😄.


आम्हाला सगळेजण शिक्षिका समजायचे याचा कधीकधी फायदाही व्हायचा. आम्ही Activa ने महाविद्यालयात जायचो . सर्व विद्यार्थ्यांना पार्कींगसाठी रस्त्यावर उन्हात  गाड्या लावायला लागायच्या पण वाॕचमन आम्हाला शिक्षीका समजायचा त्यामुळे शिक्षकांसाठी असलेल्या आच्छादित पार्कींगमधे आम्हाला गाडी लावता यायची.

विनोदाचा भाग सोडला तर या दोन वर्षात मानसशास्त्राबरोबरच  या मुलांची मानसिकता, त्यांचे प्रश्न , त्यांची विचार करायची पध्दत, दृष्टीकोन  जवळून पहायला मिळाले. याशिवाय इतक्या वर्षांनंतर शिकताना पहिली Ppt, पहिली viva, पहिलं project सादरीकरण, हात मोडेपर्यंत लेखन, मोठमोठ्या पुस्तकांचं वाचन, Roll Plays असे अनेक ' पहिले ' अनुभव या काळात घेतले ज्याने आमचे आयुष्य समृध्द होउन गेले. या दोन वर्षांनी आम्हाला आमची ओळख मिळवून दिली, पुढचा मार्ग आखायला मदत केली, अविस्मरणीय असा आनंद दिला. हा पहिलावहिला आनंद आमच्यासाठी कायमच खास राहील यात काही शंकाच नाही.


@ सौ.अंजली जोगळेकर.

प्रिय आईस

 प्रिय आईस,


माझं पत्रं आणि ते ही पुण्यातल्या पुण्यात, लाॕकडाऊन चालु असताना, आश्चर्य वाटलं ना? या आधी तुला पत्रं लिहून मला वाटतं  अनेक वर्ष झाली असतील, मला तर आठवतही नाहीये. पण असं पत्रं मातृदिनाच्या दिवशी पहिल्यांदाच लिहीतीये.


आज सकाळी तुझ्याशी फोनवर बोलले.  ८२ वं वर्ष लागलंय तुला. अजूनही तुला एवढं फिट पाहून तुझी नातवंडं आम्हा बहिणींना आणि भावाला चिडवतात, तुमची आई तुमच्यापेक्षा फिट आहे😊. खरं सांगु आई तुला असं समाधानी, आनंदी पाहीलं ना की परमेश्वराचे लाख लाख आभार मानावेसे वाटतात. आयुष्याच्या या टप्प्यावर तरी  तुला निवांतपणा आणि सुख लाभलंय.


मला आठवतंय आमच्या लहानपणी तुला कायम धावतपळत शाळेत जाताना, आल्यावर स्वयंपाक करताना अगदी सतत काम करताना पाहीलंय. पण एवढया कष्टाच्या काळात आमच्यावार चांगले संस्कार कसे होतील यासाठीही धडपडायचीस. आपल्या एवढ्याशा खोलीत इतकी माणसं, नातेवाईक यायचे .शाळेतली नोकरी , आम्ही तीन लहान भावंडं सांभाळून या सर्वांचं हसतमुखाने सगळं करताना तु कधीच वैतागली कशी नाहीस गं? पण हे त्या वेळी कधी  कळलंच नाही आम्हाला. आता संसारात पडल्यावर मात्र हे सगळं जाणवायला लागलं. मी आठ महीन्याची असताना मला मांडीवर घेउन तु शिकलीस. मी चाळीशीनंतर  MA करत असताना जेव्हा कधी मनात अभिमानाची भावना यायची ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुच यायचीस गं. कसं केलंस तु हे सगळं आणि तेही कोणाचीही मदत नसताना?  मावशी तेवढी तुझ्या पाठीशी उभी होती.आत्ता काही दिवसांपूर्वी जयंतीला ( माझी बहीण ) गंभीर आजाराची शंका आलेली असताना तु पटकन म्हणालीस, माझ्याकडे जे पैसे, दागिने आहेत ते सगळं विकून मी तिला बरं करेन, मला काही नकोय यातलं. देवाजवळ त्यावेळी प्रार्थना करत होतीस, जप करत होतीस. सुदैवाने तसं काही निघालं नाही पण तेव्हा तुझं बोलणं ऐकून थक्क झाले होते मी.  या वयातही तुझं आईपण संपलेलं नाही हे जाणवलं मला. . आम्ही इतक्या मोठ्या झालोहेत, जावई आलेत  पण तरीही  आमची काळजी करत असतेस, फोन करतेस.  मोबाईल वापरायला शिकलीयेस. सगळे पदार्थ खाउन पाहतेस मग अगदी ते नुडल्स असले तरी. पानात पडेल ते खायचं, टाकायचं नाही हा नियम आहे तुझा. प्रत्येक टप्प्यावरचे तुझं वागणं ,तुझ्या सवयी आठवून तसंच वागायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातलं थोडं तरी आम्ही साध्य केलं ना आई तर आमचं आयुष्य सफल होईल.


आजच्या या मातृदिनाच्या निमीत्ताने एकच मागणं देवाकडे मागेन..तु जशी आहेस ना तशीच शेवपटपर्ययंत रहावीस...फिट, आनंदी व समाधानी. तुला माझा  सलाम.   तुला साष्टांग नमन करुन इथेच थांबते 


तुझी,

सौ. अंजु


@,अंजली जोगळेकर .



अलक

*नातं मैत्रीचं* 


नवर्याच्या नोकरीमुळे तीन महिन्याच्या सचिनला घेउन ती मध्य प्रदेशातील कोरबा इथे गेली. पहिल्यांदाच पुणं सोडून आणि ते ही इतक्या लांब यामुळे खूप उदास झाली होती. काॕलनीत वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक रहात होते. तिची नाळ अजून कोणाशी जुळली नव्हती. त्यातच एकदा स्कुटरवरुन सचिनला घेउन जात असताना रात्रीच्या वेळी गाडीने  स्कुटरला धडक दिली. सचिनला वाचवताना तिचे डोके दगडावर आपटले. ती रक्तबंबाळ झाली .हाॕस्पीटलमधे ठेवावे लागले, डोक्याला दहा टाके पडले. आता कसे होणार?  माझ्या छोट्या सचिनला कोण पाहणार? आत्ता आई, बहीण इथे असायला हव्या होत्या असं वाटून तिच्या डोळ्यातून पाणी आले. पण या चार दिवसात गुजराथच्या जोशीभाभींनी ,खालापुरच्या अपर्णा आणि वर्ध्याच्या गांजापुरे वहिनींनी  सचिनला सांभाळलं,फुलासारखं जपलं, तिची घरच्यांसारखी काळजी घेतली. ती घरी आली तेव्हा तिच्या चेहर्यावर हास्य  फुललं होतं. परप्रांतात येउनही तिला प्रेमळ आई आणि बहिणी मिळाल्या होत्या..


(सत्य घटना  माझ्या बाबतीत झालेली)


# *अलक ...मैत्री धर्मापलीकडची* 


त्यानंतर अनेक वर्षांनी उत्तर प्रदेशात नवर्याची बदली झाली. तोवर अनेक ठिकाणी फिरुन झाले होते, बर्याच ठिकाणचे अनुभव घेतले होते म्हणजेच अनेक गावचे पाणी प्यायले होते. इथेही अनेक प्रकारची माणसे होती. विशेष कोणाशी मैत्री जुळली नव्हती. पण नवर्याचा फारुकी नावाचा मित्र एकदा त्याच्या बायकोला घेऊन आला. फरीहा नाव तिचं. दिसायला अत्यंत सुंदर.मला खूप आवडली. करावी का मैत्री हिच्याशी? कशी असेल ही? ती लखनौची. एकदा लखनौला गेलेलो असताना तिने आम्हाला जेवायला बोलवलं. तिच्या घरी जायला माझं मन साशंक होतं. आपल्या मनात अनेकदा पूर्वग्रह असतात, चुकीचे. पण तिने  आमचं स्वागत जे काही आपलेपणानं  केलं तेवढं  तर जवळचे नातेवाईक पण करत नाहीत. तेव्हापासून आमचं नातं जुळलंय छान मैत्रीचं...धर्माच्याही पलीकडचं...आपलेपणाचं.


( दोन्ही घटना सत्य आहेत...आणि माझ्याशी संबंधीत आहेत )


©® अंजली जोगळेकर.

देवी

 *देवी*


कोरोनामुळे सध्या सगळेजण घरात बंद आहेत. सरकारने घालून  दिलेले नियम आपल्यासारखे काही मोजके लोक पाळत आहेत. पण घरी बसून काय करायचं हा यक्षप्रश्न  प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आ वासून उभा आहे . त्यावर आपापल्या परीने उत्तरही अनेकजणांनी मिळवलंय किंवा तसा प्रयत्न तरी करताहेत. आज सोशल मिडीयावर जरा डोकावून पाहीलं तर ही उत्तरं आपल्याला पहायला मिळतात.  माझ्या बर्याच मैत्रीणी फेसबुकवर अभिवाचन, कवितेचे वाचन करताहेत तर काही जणी कलात्मकतेने परीपूर्ण अशा चित्रफिती बनवत आहेत.  यातून त्यांची सर्जनशीलता दिसून येते.  टिवी वर पाहण्यासारखे सध्या काहीच नाहीये. या टाळेबंदीच्या काळात माझ्या लेकीने, मितालीने मला  Netflix वरच्या काही इंग्रजी मालिका पहायला सुचवले. इंग्रजी मालिका, चित्रपट पहायला मी फारशी उत्सुक नसते. पण तिच्या आग्रहामुळे ‘Unbelievable ‘ ही मालिका पहायला मी सुरवात केली.


या मालिकेत एक महत्वाचा आणि ज्वलंत विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आलेला आहे. वय वर्ष १२ ते वय वर्ष ६० या वयोगटातील स्त्रियांवर एक कामपिपासू पुरुष एखाद्या serial killer सारखा एका मागून एक, वेगवेगळ्या ठिकाणी  बलात्कार करत असतो. पण प्रत्येकीचं या घटनेवर व्यक्त होणं हे दुसरीपेक्षा खूप वेगळं आहे .यातल्या १२ वर्षाच्या मुलीवर या घटनेचा इतका खोलवर परीणाम होतो की ती  अचानक गप्प गप्प रहायला लागते, स्वतःला मिटवून घेते.  साठ वर्षाची स्त्री हा प्रसंग मनाच्या आत खोलवर दाबून टाकते आणि वरवर काहीच झालेलं नाही असं दाखवत  एकदम सामान्य जीवन जगायला लागते, निदान तसा आभास निर्माण करते.  एक जण जास्तच देवभोळी होते, सतत चर्चमधे जाऊन ती प्रार्थना करायला लागते पण एक तरुण मुलगी मात्र या घटनेला वाचा फोडते. एखाद्या पोलीसाने हे प्रकरण कसे हाताळायला हवे,  पिडीतेशी कसं बोलायला हवं हे ते प्रकरण हाताळणार्या स्त्री डिटेक्टीव दाखवून देतात. प्रत्येक स्त्री बलात्कारासारख्या प्रसंगावर ज्या प्रकारे react होते त्यावरून स्त्रिया किती भावनाप्रधान आणि संवेदनशील मनाच्या असतात हे दिसून येते. अतिशय सुंदर असलेली ही मालिका प्रत्येकीने पहायलाच हवी.


 ही मालिका पाहील्यावर मग मात्र माझ्या टॕबवर Netflix, Hotstar वगैरे पहायला सुरवात केली.  खूप चांगल्या फिल्मस् , वेब सिरीज गेल्या काही दिवसात मी पाहील्या. याच सुमारास यु ट्युबवर ज्या शाॕर्ट फिल्मबद्दल ऐकलं होतं ती ‘ देवी ‘ ही फिल्म पाहीली आणि मनात विचारांचं काहुर माजलं.


ही फिल्म फक्त १२/१३ मिनीटांची आहे. एका खोलीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत , १३/१४ वर्षाच्या मुकबधीर मुलीपासून ६० वर्षाच्या स्त्रीपर्यंत, सुशिक्षित, अशिक्षित ,आधुनिक, साधी,हुषार थोडक्यात सर्व धर्माच्या, भाषेच्या, वयाच्या, दर्जाच्या स्त्रीया एका लहान खोलीत दाटीवाटीने बसलेल्या आहेत. त्यांच्यातला समान धागा एकच आहे. त्या सगळ्या जणींवर बलात्कार झालेला आहे. या फिल्मचा शेवट तर डोळ्यात पाणी आणतो. ही फिल्म मनाला अस्वस्थ करुन जाते. अगदी याच सुमारास माझा भाचा सिध्दांतने whatsapp वरुन अजून एक अस्वस्थ करणारा संदेश पाठवला. ‘ द लास्ट गर्ल ‘ ह्या अनुवादीत पुस्तकाबद्दल माहिती देणारा हा संदेश होता. आपल्या   कल्पनेच्याही पलीकडे असलेले अत्याचार आयसीस या दहशतवादी संघटनेकडून नादिया मुराद या यजीदी स्त्रीने सहन केले. ते वाचताना सुध्दा अंगावर काटा येतो. प्रत्यक्ष पुस्तकात  अजून काय असेल सांगता येत नाही.


 सध्या टाळेबंदीमुळे वर्तमानपत्रे  येत नाहीयेत. त्यामुळे रोज पेपरमधे वाचवतही नाहीत अशा बाल लैंगिक, स्त्रीयांवरील अत्याचाराच्या  बातम्या डोळ्यासमोर येत नाहीयेत. खरं सांगायचं तर खूप चांगलं वाटतंय. पण वर्तमानपत्रं नाहीयेत( असली तरी कोरोनाविषयक बातम्यांनी भरलीयेत), कोरोनाशिवाय दुसरी कुठलीही चर्चा नाहीये  म्हणून हे अत्याचार बंदच झाले असतील, अशा  घटना आता होत नाहीयेत  असं म्हणता येईल ? असं म्हणणं खूप धाडसाचंच ठरेल. रोज अशा बातम्या वाचताना हे नक्की काय चाललंय, काय झालंय आपल्या समाजाला,  का विकृत झाले आहेत लोक अशा प्रश्नांनी डोकं भंडावून जातं.  


आता इंटरनेटमुळे नको ते ज्ञान, फिल्मस् लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सहजरीत्या, अगदी हातात मिळतंय म्हणून असं होतंय? अत्याचार करणार्याला ६ महिन्याच्या निष्पाप बाळाकडे आणि ६०/७० वर्षाच्या म्हातार्या आजीकडे पाहून काहीच वाटत नाही? का होतंय हे सर्व? कारण काहीही असो पण हे होतंय हे सत्य आहे आणि हे खूप भयावह आहे. बालकांवर अत्याचार करणार्याला माणुस तरी म्हणता येईल? आजकाल लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवतानाही पालकांना भिती वाटते. माझी एक मैत्रीण तिच्या चार वर्षाच्या  नातीला  लांडे फ्राॕक घालून देत नाही, कायम खाली लांब लेगइन घालते. अनेकजणी मुलांना एकट्यांना बाहेर खेळायला सोडत नाहीत, सतत बरोबर राहतात. पण यात त्यांना कसा दोष देता येईल. बाहेरचं वातावरण एवढं वाईट आहे की  आता कोणावरच विश्वास ठेवता येत नाही. पण असं करुन त्यांचं बालपणच आपण हिरावून घेत नाहीये का? त्यांना उमलण्याची संधीही आपण देत नाहीये.  यावर उपाय करणं आवश्यक आहे. हे कुठेतरी थांबायला हवंय. 


पण मग पूर्वीच्या काळी अशा गोष्टी होत असतील? जिथे माणसं असतात तिथे अशा विकृत मनोवृत्तीची माणसंही असणारच. मग यावर त्यांनी काय उपाय शोधला असेल? त्या वेळेस बालविवाहाची पध्दत होती. बालविवाह हे सोल्युशन असेल आपल्या पुर्वजांच्या नजरेतून???  कदाचित नंतर ही पध्दत चुकीच्या पध्दतीने अवलंबली गेली असेल???? माहीत नाही पण मन मात्रं अशा घटनांनी अस्वस्थ होऊन जातं. खूप असहाय्य वाटायला लागतं..


©® अंजली जोगळेकर

आमची वारी

 आमची वारी :  आळंदी ते पुणे 


खरे तर मी आणि माझी खास मैर्त्रीण रेखा (पाठक) गेली ३ वर्ष म्हणत होतो कि एकदा तरी आळंदी पुणे वारीमध्ये चालत जायचे आणि वारीचा अनुभव घ्यायचा . पण एक तर रेखा गेली २ वर्ष चेन्नई ला होती त्यामुळे ते राहूनच गेले. यावेळी मात्र ठरवले कि जायचे नक्की . आणि अगदी त्याप्रमाणे सर्व योग जुळून आले. सकाळी ६ वाजता निघायचे ठरवले खरे पण त्या tention मुळे रात्री झोपच येईना .एवढे चालणे जमेल का , मधेच पाय दुखायला लागले तर काय,चक्कर आली तर काय अशा विचारांनी झोपच लागेना. शेवटी जेवढे जमेल तेवढे चालायचे नाहीतर मधेच वारी सोडून परत यायचे असे ठरवले.

सकाळी ६ वाजता घरून निघालो. आळंदीला पोचायला ७ वाजले .कुलकर्णी काका , वय ७४   आणि वारीचा १० वर्षांचा अनुभव , हे आमच्याबरोबर येणार होते. तरुणालाही लाजवेल असे उत्साही व्यक्तिमत्व .आमच्या दोघींच्या चेहरा पाहून त्यांनी आम्हाला धीर दिला , चालता येईल कि नाही  जमेल कि नाही हे सर्व विचार सोडून चालत राहा असा सल्ला दिला. परंतु तरी धाकधूक होतीच.

प्रत्यक्ष जेव्हा वारीच्या ठिकाणी पोचलो तेव्हा एकदम वेगळेच भारलेले असे वातावरण होते. जिथे पाहावे ठीथे कपाळाला गंध , बुक्का लावलेले वारकरी . त्यात महिला, पुरुष , मुले, वृद्ध असे सर्व जण होते. वारीला नुकतीच सुरवात झाली होती. प्रत्येक जण तल्लीन होऊन अभंग म्हणंत होते. ज्ञानबा तुकाराम ,ज्ञानोबा माउली असा जयघोष चालू होता. काका  दिंडी क्र. ४ चे सदस्य होते. त्याबद्दल त्यांनी माहिती दिली.पालखीच्या पुढे २८ आणि मागे २५० दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीत ३५० ते ४०० वारकरी असतात. प्रत्येक दिंडीचा एक विणेकरी असतो. ज्याला आपण leader किंवा captain म्हणू शकतो . त्याच्या गळ्यात वीणा असते.त्याच्या शेजारी एका काठीवर उंच दिंडी क्र. लिहिलेला असतो जेणेकरून आपली दिंडी ओळखण्यास सोपी जावी.हे क्रमांक वारीचे सर्व नियम पाळणाऱ्या दिन्डीना पालखी समितीकडून दिले जातात.पालखीच्या मुक्कामी सकाळी  पावणेसहा वाजता आरती आणि अभिषेक होतो. यावेळी प्रत्येक दिंडीचा विणेकरी हजर असतो . त्यानंतर ६ ते ६.१५ च्या सुमारास पालखीचे प्रस्थान होते.प्रत्येक दिंडीत हरिपाठ, अभंग/ भारुडे म्हणली जातात.

या भारावून गेलेल्या वातावरणात आम्ही चालायला सुरवात केली. अनेकजण फक्त दरवर्षी वारीतच भेटत असतात. एकमेकांना माउली माउली असे एकमेकांना संबोधत मिठी मारत होते, नमस्कार करत होते, क्षेमकुशल विचारात होते. या भेटीत ना धर्म ना जातपात काही आड येत होते.काकानाही अनेक जण भेटत होते. सर्वानाच एकच ध्यास माउली आणि पंढरपूर .

चालायला सुरवात केली तेव्हा पालखीच्या मागे होतो. खूपच गर्दी होती. गर्दीत चालणे खूपच अवघड होत होते. आम्ही दोघींनी एकमेकींचा हाथ धरून ठेवला होता.त्या गर्दीत कोण नव्हते , आमच्यासारखे गॉगल, टोपी आणि बूट घातलेले सुशिक्षित, तर अनवाणी डोक्यावर हंडा तुळशी वृंदावन घेऊन जाणार्या स्त्रिया, पुरुष.पण एवढ्या गर्दीतही कधी असुरक्षित वाटले नाही. धक्काबुक्की नाही, शिव्या नाहीत    फक्त माउली आणि पांडुरंग. हे काहीतरी वेगळेच होते. जिथे पालखी थांबे तिथे दर्शन घ्यायला सर्वांची खूप धावपळ उडे. शेवटी आम्ही वाट काढत काढत २ तासांनी पालखीच्या पुढे गेलो .पुढे मात्र गर्दी थोडीशी कमी होती. व्यवस्थित चालता येत होते. आजूबाजूच्या गावातले लोक पालखीचे दर्शन घ्यायला दुतर्फा उभे होते.चालता चालता वारीविषयी खूप माहिती काका आणि त्यांचे मित्र यांच्याकडून मिळत होती. आपल्या भारतीय समाजात अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. त्यामुळे संपूर्ण भारतात राज्य /भाषा जरी बदलली तरी हि गोष्ट बदलत नाही.म्हणूनच लाखो वारकरी एखाद्या मुक्कामी गेले तरी उपाशी राहत नाहीत. त्या गावचे गावकरी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतातच. ते एक पुण्यकर्म समजले जाते.खरे तर वारीची सुरवातच सर्व समाजाने एकत्र यावे यासाठी केली गेली. त्या काळात तर याची खूप होती. वारीमध्ये जे अभंग म्हटले जातात त्यातून समाजाला काहीतरी शिकवले जाते.त्यांच्या चुकीच्याधी परंपरांवर  आसूड ओढले जातात.आपले संत साहित्य जात पात , धर्म भेद ,रूढी चालीरीती याच्या वर जाऊन जगायला शिकवते.तेच त्यांच्या अभंगातूनही समजावले जाते. वारकरी विसाव्याच्या वेळी अभंग/भारुडे म्हणतात.फुगड्या खेळतात . त्यामुळे त्यांना पुढे चालायची energy मिळते. वारीत चालताना पुढे उतार आहे. प्रत्येक वारकरी त्यावरून पळत सुटतो .मग तो म्हातारा असो कि तरुण. भारुडे/कीर्तने यामुळे त्यांना positive energy  मिळते.घाट चढताना सर्वजण हरिपाठ वाचायला/म्हणायला सुरवात करतात. वरून पाऊस पडत असतो पण घाट कधी पार होतो कळतच नाही.

हि सर्व माहिती घेत घेत चालत होतो. वाटेत एका ठिकाणी शाळेत थांबून खाली बसून सर्वांबरोबर वाटून नाश्ता केला. सुदैवाने हवा खूप चांगली होती. उन कमी आणि वारे सुटलेले त्यामुळे त्रास कमी झाला. खूप अनोळखी भागातून जात आम्ही विश्रांतवाडी ला  कधी पोचलो कळले पण नाही. तिथेच एका soceity च्या garrage मध्ये बसून जेवण घेतले.


या सर्व चांगल्या अनुभवांना गालबोट लागले ते मात्र अस्वच्छतेचे .प्रत्येक ठिकाणी वारकर्यांना बिस्किटे,केळी, जेवण असे वाटले जात होते. जिथे तिथे प्लास्टिकचे ग्लास , अन्नपदार्थ ,केळीची साले यांचा खच पडला होता. शिस्तबद्द्ध चाललेली वारी अशा वाटपाच्या ठिकाणी बेशिस्त होऊन जाई. प्रत्येक ठिकाणी एखाद्या पक्षातर्फे मंडप , त्यांचे नेते , त्यांच्यातर्फे वाटप या सर्वांचा उबग आला . काहीजण तर वारीत फक्त असे सामान गोल करतात आणि आपल्या गावी जाऊन विकतात असे कळले.खूप चांगली गोष्ट मला यात कळली कि वारीत मुसलमानांची पण एक दिंडी आहे.

हे सर्व करता करता शिवाजीनगर कधी आले ते कळलेच नाही.आम्ही २५ km चाललो एकूण असे कळले.

अर्थात या सर्वाचे श्रेय जाते रेखा आणि काकांना. केवळ त्यांच्यामुळेच आम्ही हि वारी करू शकलो यात काही शंकाच नाही. so thank you very much rekha and kaka and his friends.


अंजली जोगळेकर

25/6/2014

 माप ओलांडलंस अन आपलंसं केलंस हे घर

घराचा तोल सांभाळताना तुला पडलाय स्व चा विसर


माजघरातल्या काळोखात घेऊन डोक्यावर पदर

थोरामोठ्यांचा सदैव  करत आलीयेस आदर


सगळं विसरुन स्वतःला सावर ...सखे

तुझ्यातल्या प्रतिभेची नाहीये गं कोणाला कदर


अजून वेळ आहे कर जरा स्वतःचा विचार

तुझ्यातल्या 'ती'चा होऊन जाऊ दे जागर


आता मात्र लढायचंय तुला आर या पार

काही गोष्टींना द्यायला शिक ठाम नकार


उजळायचाय तुला युगानुयुगांचा अंधार

पार करुन उंबरा उडायचंय क्षितीजापार


अगं तुच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार

कर आता तरी याचा स्विकार सखे

कर आता तरी याचा स्विकार 


@ अंजली जोगळेकर .

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

सखी

 माझ्या प्रत्येक मैत्रीणीला समर्पीत....    

      


                    सखी


इकडच्या स्वारीसोबत नव्या घरी आले

अनोळखी वळणांवर अनेकदा धडपडले

आव्हानांशी भिडता वारंवार चुकत गेले

नाती निभावताना कितीदा  तरी बावरले

           

                 सखे


तु साथ दिलीस अन मी सावरले

गुजगोष्टी करून मन मोकळे झाले

नवउमेदीने  जीवनाला सामोरी गेले

तुझ्या निखळ आनंदात चिंब भिजले

 

तुझ्या सवे इंद्रधनुषी रंंगात रंगले

आनंदाचे , उत्साहाचे क्षण  वेचले

हृदयाच्या आत स्थान तुला दिले

अपूर्ण मी तुझ्याविना सखे होऊन गेले

अपूर्ण मी तुझ्याविना सखे होऊन गेले.


@ अंजली जोगळेकर


Happy friendship day girls😘😘🌹🌹💐❤



विलग्नवासातून सुटका

 विलग्नवासातून सुटका


'अज्ञातवासातून सुटका 'सारखं शिर्षक वाटतंय ना? 🙂. विलग्नवास म्हणजे क्वारंटाईन. मी गुगलवर मराठीत क्वारंटाईनसाठी शब्द शोधत होते तेव्हा हा शब्द सापडला. याचा खरा अर्थ जहाज व त्यावरील प्रवासी यांना ते सांसर्गिक रोगापासून मुक्त आहेत असे ठरेपर्यंत अलग ठेवतात तो काळ असा आहे. प्रत्यक्ष अज्ञातवास एक वर्षाचा होता पण आमचा ( माझ्या लेकीचा )हा विलग्नवास मात्र चौदा दिवसांचा होता . हे चौदा दिवस माझ्या लेकीच्या , मितुच्या, संयमाची परीक्षा घेणारे ठरले आणि वेगळ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. 


गेली दोन वर्ष मितु( मिताली ) आणि तिचा नवरा कुशल मलेशियात असतात. तिच्या भावाचे,सचिनचे , लग्नं ठरलं आणि १६ एप्रिल ही लग्नाची तारीख ठरली. या लग्नाच्या तयारीसाठी, खरेदीसाठी व माझ्या मदतीसाठी म्हणून ती एक मार्चलाच पुण्यात आली. कुशल नंतर एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात येणार असे ठरले. पण कोरोनाची कृपा झाली आणि सचिनचे लग्नं पुढे ढकललं गेलं. इकडे देशातील, परदेशातील विमानसेवा, रेल्वे, बससेवा बंद झाली. प्रवास ठप्प झाले.त्यामुळे मितु इकडे आणि कुशल तिकडे असे दोघेही बिचारे नाइलाजाने अडकून गेले 😞. ' दो हंसोका जोडा बिछड गयो रे 'अशी अवस्था दोघांची झाली होती. थोड्या दिवसातच ती अस्वस्थ व्हायला लागली, चिडचिड करायला लागली. आम्हालाही तिची घालमेल दिसत होती, पण करणार काय? त्याच वेळेस पन्नास माणसांच्या सोबत सचिनच्या लग्नाची परवानगी मिळाली . मग लग्नाची तयारी, व्यवस्था यात आम्ही सगळेच एकदम व्यस्त होऊन गेलो. ठरल्याप्रमाणे २७जूनला लग्नं झालं. आता मलेशियाला परत जायला हवं असं मितुला वाटायला लागलं.ती सतत वेबसाईट्स, गुगलवर काही विमानसेवा सुरु होतीये का याचा शोध घेत होती. तेव्हाच वंदे भारत मिशन चालू झालं . आता जास्तं वाट न पाहता त्यातूनच तिने जायचा निर्णय घेतला. पण एक मोठी अडचण होती. तिचा व्हिसा संपलेला आणि टाळेबंदीमुळे पुण्याचे व्हिसाचे आॕफीस बंद होतं.मग सचिनने तिला मलेशियन दुतावासात मेल पाठवायला सुचवले. तिनेही मेल पाठवुन तिची अडचण कळवली. त्यांचे लगेच उत्तर आले व त्यांनी मुंबईच्या दुतावासासाठी वेळ दिली आणि मग सुरु झाला तिचा खरा प्रवास.


मुंबईतलं व्हिसाचं काम खूप लवकर झालं. पण आता वेळ होती प्रत्यक्ष प्रवासाची. वंदे भारत प्रवासाचे तिकीट खूप जास्त आहे. आम्ही सगळेजण तिला थोडं महाग असलं तरी थेट विमान बुक कर असं सांगत होतो. पण खूप पैसे वाचतील म्हणून वेळ खूप लागणारं आणि सर्वात स्वस्त असलेलं पुणे हैद्राबाद, हैद्राबाद चेन्नई आणि मग चेन्नई क्वाललंपुर असं तिकीट तिने कोणाचंही न ऐकता बुक केलं. सकाळी सात वाजता चेन्नईला जाणारं विमान पकडण्यासाठी आदल्या दिवशी रात्री तिथे पोचणं आवश्यक होतं. म्हणून रात्री सातला तिथे पोचेल असं पुणे हैद्राबाद व हैद्राबाद चेन्नई अशी विमानसेवा बुक केली. चेन्नईला त्या वेळेस पूर्ण टाळेबंदी जाहीर केली होती त्यामुळे विमानतळाच्या बाहेर पडता येणार नव्हतं. रात्रं तिथेच काढायला लागणार होती कारण कुठलेच हाॕटेल चालु नव्हते. तिला एकटीलाच पाठवण्याखेरीज आमच्याकडेही दुसरा उपाय नव्हता. तिच्या प्रवासाच्या दिवशी पुण्यातून दुपारी बारा वाजता ती निघाली. जाताना हातमोजे, मास्क, कोरोनाची टेस्ट या सर्व आवश्यक बाबी तिने पूर्ण केल्या होत्या. 


दोन्ही विमाने वेळेवर असल्याने ती वेळेवर म्हणजे संध्याकाळी सातला चेन्नई ला पोचली. सोबतच्या अजून दोन एकट्याने प्रवास करणार्या दोघींशी तिचा आधीच संपर्क झाला होता ही जमेची बाजू. सोबत भरपूर सामान. ती चेन्नईला पोचली खरी पण तिथे मात्रं अनेक अडचणींचा सामना तिला करावा लागला. तिथे कसलीच सोय नव्हती.विमानतळावर सर्वच प्रवासी थांबल्याने जागेची अडचणच होती. कशीबशी जागा पकडून तिघीजणी बसल्या . भरपूर डास, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि त्यात भर म्हणून सोबतचे असे प्रवासी ज्यांच्यामुळे या तिनही मुलींना वाटणारी असुरक्षीतता. नाही म्हणायला एकमेव काॕफी शाॕप मात्र उघडं होतं.कशी रात्रं काढली असेल या विचारानेही अंगावर काटा उभा राहतो. पहाटे चार वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळावर जायचं होतं म्हणून मितु व तिच्या दोन नवीन मैत्रीणी पहाटे तीन वाजताच विमानतळाच्या बाहेर पडल्या. आंतर्देशीय विमानतळापासून हा विमानतळ लांब होता म्हणून थोड्या लवकरच तिघीजणी बाहेर पडल्या. बाहेरचं वातावरण खूपच गरम, बरोबरच्या जड बॕग्ज त्यात भरीस भर म्हणून ट्राॕलीसुध्दा तिथे उपलब्ध नव्हत्या. ते जड सामान ओढत जात असताना रस्त्यात पूर्ण अंधार. तिघीजणी एकमेकींच्या साथीने धापा टाकत आंतरराष्ट्रीय  विमानतळाबाहेर पोचल्या पण आत सोडायला साडेचारला सुरवात करणार होते. तोवर इतर प्रवाश्यांसोबत अर्धा तास ,इतक्या गर्मीत बाहेर बसायला लागले. डासांचा हल्ला तर चालूच होता. नशीबाने ते विमान मात्र वेळेवर होते. आत शिरुन सगळे सोपस्कार पूर्ण करुन एकदाची विमानात जाऊन बसली . तोवर ती इतकी दमली होती की क्वाललंपुर येईपर्यंत गाढ झोपूनच गेली.


क्वाललंपूरला पोचल्यावर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन कोरोनाची टेस्ट परत एकदा तिला द्यायला लागली आणि त्या देशाच्या नियमाप्रमाणे विलग्नवासासाठी ( चौदा दिवसांसाठी ) एका हाॕटेलमधे सर्वांना हलवण्यात आले. आता इथेचौदा दिवस काढायचे होते. हाॕटेलमधली खोली छोटीशी होती. खोलीच्या बाहेर cctv बसवलेले होते. कोणालाही चौदा दिवस बाहेर पडायची परवानगी नव्हती. दरवाज्याच्या बाहेर नाश्ता व दोन वेळचे जेवण आणून ठेवले जायचे. ते घेण्यापुरताच दरवाजा उघडायची परवानगी दिलेली होती. सुरवातीचे ५/६ दिवस खाण्याचे खूप हाल झाले. मितुने अनेक वेळा तक्रारी केल्यावर आठव्या दिवशीपासून बरं जेवण यायला लागलं. या काळात अजून दोन वेळा कोरोनाच्या टेस्ट घेण्यात आल्या. इकडे आम्हालाही चैन पडत नव्हतं, चौदा दिवस असे बंद खोलीत ही कशी काढणार याची काळजी लागून राहीली होती. मी तर रोज दिवस मोजत होते , तिच्याशी बोलताना तिला माझी काळजी दिसायला नको याची काळजी घेत होते. आम्ही सगळेच सतत तिच्या संपर्कात होतो. सगळेजण मुद्दाम वेगवेगळ्या वेळी तिच्याशी बोलायचो. मी व विश्राम सकाळी व संध्याकाळी , सचिन, शुभांगी रात्री आणि तिच्या मैत्रीणी असं आम्ही आपापसात ठरवून तिच्याशी संपर्काचा ताळमेळ राखत होतो. पण खरी लढाई तिलाच लढायची होती.कुशलला भेटायचं या तीव्र इच्छेमुळे हे दिवस पार पडले असावेत. पण या सगळ्या परिस्थितीला तिने एकटीने ज्या हिंमतीने, धाडसाने तोंड दिलंय त्याला तोड नाही. विश्राम नेहमी मला सांगत असतो, "मुलांना त्यांची लढाई लढु दे एकट्याने. वेळ पडली तर आपण आहोतच". ही लढाई मितुने जिंकलीये असं म्हणायलाच हवं. आई म्हणून मला खरंच तिचा खूप अभिमान वाटतोय. या चौदा दिवसात जीवनातले अनेक धडे ती शिकली असेल याची खात्री आहे. आता मात्र दो हंसो का जोडा एकमेकांना भेटलाय.दोघेही खूप खुश आहेत आणि त्यांची खुशी पाहून आम्हीही खूपच खुश आहोत. अखेर विलग्नवासातून सुटका झालीये......


© अंजली जोगळेकर






लेक माझी लाडकी

 आठवतंय मला तुझं गोंडस रुप

छान गुटगुटीत बाळसं होतं खूप


लुटुलुटु चालताना पडायचीस धप्प

भांडताना करायचीस सर्वांना गप्प


शाळेतल्या धीटाईला कसलंच नाही माप

डान्स करताना असायचीस सर्वांचा बाप


बघता बघता  ओलांडलंस उंबर्यावरचं माप

माझीच पडछाया बनून गेलीस आपोआप


तुझी माया पाहून काळीज होतं सुप

कुशलशी होउन गेलीयेस छान एकरुप


पैलतिराच्या वाटेवर चालतोय झापझाप

तुम्हीच व्हायचंय आता आमचे आईबाप

 


भरभरुन सुख मिळो देवासमोर करते जाप

आईबाबांचे आशिर्वाद तुला कायम अमाप


@ अंजली जोगळेकर 




Happy birthday to u Mittu💐🌹🎂🌈




आठवणीतले घर

 आठवणीतलं घर🏚️🌈


आमच्या ग्रुपवर माझ्या मैत्रिणीने , शुभदाने हा विषय दिला  आणि मन लगेच या घरांचा फेरफटका मारुन आलं. 


 सर्वात पहिलं आठवणीतलं घर (सगळ्यांसाठीच )जिथे आपण लहानाचे मोठे होतो. माझं लहानपण एका  सदाशिवपेठेतल्या वाड्यात गेलं हे मी अनेकवेळा लिहीलेलं आहेच. अगदी मध्यवस्तीतल्या  या  घराचा म्हणजे जुना ३१९, नविन १२२४, सदाशिव पेठ, करंदीकर वाडा, पेरुगेट पोलीस चौकीशेजारी असा पत्ता होता. होता असं मी म्हणतीये कारण आता वाड्यात कोणीच रहात नाही. वाड्याच्या दरवाजाला एक छोटी खिडकी होती त्याला आम्ही दिंडी म्हणायचो.त्याची किल्ली प्रत्येक बिर्हाडाकडे असायची.रात्री उशीर झाला तर कुलूप उघडून  हात घालायचा आणि वाड्याचं दार उघडायचं. वाड्याचे मालक अप्पा रात्री नऊला दरवाजा बंद करायचे. पहिल्या मजल्यावर आमची  भाड्यची एक खोली होती .वर जायला सोळा पायर्या होत्या. त्याचं भाडं वीस रु. होतं माझ्या आठवणीत. खोली लहान होती पण बाहेर एक सामाईक मोठी गॕलरी होती. आमच्या भागात आम्ही एक काॕट, खुर्च्या ठेवल्या होत्या.  ही गॕलरी  माझी अत्यंत लाडकी जागा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कुठल्याही वेळी माझा ठिय्या गॕलरीतच.  तिथे उभं राहीलं की लक्ष्मी रोड आणि टिळकरोड अशा दोन्ही दिशांकडे स्पष्ट पाहता यायचं.तापलेलं ऊन असो की मुसळधार पाऊस  कुठल्याही वेळा गॕलरीत गेलं  तरी ती तितकीच आपलीशी वाटायची. बरोबर कोणी असो की नसो  गॕलरीत रस्त्याकडे पहात उभं राहीलं की तास दोन तास सहज निघून जायचे. तिथे कधीच एकटेपणा जाणवायचा नाही.मी तर बाराही महिने गॕलरीतच झोपायची. आमची खोली खूप लहान असली तरी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे आमची गॕलरी.माझ्या लहानपणीची भांडणं, रुसवेफुगवे, राग,तारुण्यातील स्वप्नं, गुपीतं , दुःख सगळं सगळं मी गॕलरीशी शेअर केलंय . ती माझ्यासाठी खास आहे, माझ्या हृदयाजवळची आहे, इतर कुठल्याही जागेपेक्षा श्रेष्ठ आहे. या वाड्याचं व्यक्तीमत्व मला सर्वसमावेशक वाटतं, अगदी सर्वांना सामावून घेणारं.


दुसरी जागा मला आठवते ती कोरब्याची. सचिनचा जन्म झाला आणि विश्रामची बदली मध्य प्रदेशमधल्या कोरबा या ठिकाणी झाली. तिथे आम्हाला दोन खोल्या काॕलनीच्या मध्यावर मिळाल्या होत्या. काही घरं लहान असली तरी मनाच्या आत घर करुन राहतात त्यातलंच हे एक. लग्नानंतर एका वर्षातच तिकडे गेलो . त्यामुळे तारुण्याची धुंदी, आईपण ,अडीअडचणी  त्या घरासोबत मी अनुभवले. त्या घराच्या दारात बाहेर तीन पायर्या होत्या. ती माझी आवडती जागा होती. काम संपलं की तिथे वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या शेजारणींशी गप्पा मारायच्या, सचिनला बाबागाडीत बसवून तिथेच मी त्याला जेवायला घालायची. हे घर खूप उबदार होतं. माझ्या आठवणींच्या उबेने इतक्या वर्षांनंतरही त्याला मी माझं 'comfort zone ' म्हणेन.


आत्ताच्या घराला 'माझं' म्हणायला मधे खूप वर्ष जाउ द्यावी लागली. लग्नं होउन एका खोलीतून  एकदम मोठ्या घरात आले. घर बैठं , प्रशस्त होतं पण गॕलरी नसल्यने खूप चुकल्या चुकल्या सारखं झालं. घराचं नाव ' संतोषी व्हिला ' असं छान होतं. तरीपण पेरुगेटचं एका खोलीचं घरच मला आपलं वाटायचं. काळ उलटला, घराच्या साथीने बर्यावाईट प्रसंगांना तोंड दिलं. याच घराने मला माझी ओळख मिळवून दिली, प्रसंगी आधार दिला. काही वास्तु खूप आश्वासक वाटतात. तसंच हे घर आहे. आता  हे 'माझं 'घर वाटतं , माणसं तर माझी आहेतच पण घरही आपलंसं वाटतं अगदी त्यातल्या भिंती, टेबल, खुर्ची , भांडी,माझा लिओ  यांच्यासकट. इथे खूप सकारात्मकता आहे, समाधान आहे, ते  खूप दिलदार आहे..प्रसन्न आहे... आणि माझं आहे


@ अंजली जोगळेकर







राजे

 राजे


आजोबांनी केली सुरुवात राजे म्हणायला

पाहता पाहता गवसणी घातलीस की गगनाला


बालपणीपासूनच  नाही दिलास  त्रास कधी आम्हाला

प्रत्येक टप्प्यावर स्वावलंबी बनवलंस स्वतः ला


सक्षम होऊन झालास  सज्ज संकटांना तोंड द्यायला

संघर्षातून क्षितिजाकडे लागलास झेपवायला


आर या पार अशी स्पष्टता असते तुझी विचाराला

तुझ्या यशाचा खूप अभिमान आहे आम्हाला


काळीज लागतं निधडं मोठठी स्वप्नं पाहायला

काळजी घेत  घे भरारी घाल गवसणी तुझ्या स्वप्नाला


शुभांगीच्या प्रेमळ साथीने आरंभ केला आहेस नवआयुष्याला

स्वप्नं  होवोत पुरी  तुझी हा आशीर्वाद सदैव तुजला


@ अंजली  जोगळेकर 

Happy happy Birthday  Dear Sachin🎂💐🌹🌈





रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

संजीवन

 ' स्वीट जंक्शन ' मधून केशरी पेढ्यांचा बाॕक्स घेतला आणि आभा शिरीन मॕमकडे निघाली. संजय, नंदिता आणि प्रशांत तिला थेट दादर स्टेशनवर भेटणार होते. तिथून सिंहगड एक्सप्रेसने ते चौघेही पुण्यातल्या प्रयोगासाठी निघाले होते. जायच्या आधी मॕमना भेटून आशिर्वाद घेणं तिच्यासाठी महत्वाचं होतं. मॕमच्या क्लिनीकमधे येऊन ती बसली. आतमधे कोणी क्लायंट होता. आता कमीत कमी चाळीस मिनीटांची निश्चिंती. ती बाहेरच्या वेटींग हाॕलमधे वाट पहात बसली. वर्षभरापूर्वी आपणही तर त्यांच्या क्लायंटच होतो की, तिच्या मनात विचार आला. मागे वळून पाहीलं तर या वर्षात आपले पाय चांगलेच स्थिरावलेत. याचं पूर्ण श्रेय मात्र तिला शिरीन मॕमनाच द्यायचं होतं. त्यांनी सावरले नसते तर निराशेच्या खोल गर्तेत आपण कुठे हरवून गेलो असतो कोण जाणे. त्या दिवसांचीआठवण आली आणि झरकन तिच्या डोळ्यासमोर तिचं गाव उभं राहीलं.


सांगलीजवळचे भिलवडी हे तिचं गाव. गावातून कृष्णा नदी वाहत होती. जवळच दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर होते. अनेकदा आभा मैत्रीणींबरोबर चालत औदुंबरला जायची. दत्ताचं दर्शन घ्यायचं आणि मग कृष्णेच्या भव्य घाटावर पाण्याकडे पहात बसायचं किंवा नावेने पल्याड जाऊन देवीचं दर्शन घेऊन यायचं हे तिचं फार आवडीचं काम.वडील चितळ्यांच्या कारखान्यात कामाला होते. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं तिचं. एकुलती एक असल्याने जरा लाडकीच होती ती दोघांची. आईपण दिवसातले चारपाच तास चितळे वहिनींनी सुरु केलेल्या बचतगटात जायची. आभाला लहानपणीपासूनच अभिनयाची आवड. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेतही कायम पहिला नंबर असायचा तिचा. तिचे हे गुण पाहून प्रभुणेबाईंनी तिला स्नेहसंमेलनातल्या नाटकात काम दिलं. ते करताना तिला खूप मजा वाटलेली. तेव्हापासून दर वर्षी तिचा नाटकातला सहभाग निश्चित झाला. ती नववीत असताना तिच्या शाळेने आंतरशालेय संस्कृत नाटक स्पर्धेत भाग घेतला. त्यात एकच प्याला नाटकातील एक प्रवेश सादर करायचा होता. प्रभुणे बाईंनी विश्वासाने तिला सिंधुचे काम दिले. त्या वर्षी उत्कृष्ट अभिनयाचे पहिले बक्षीस तिला मिळाले . ती नमस्कार करायला गेली तेव्हा प्रभुणे बाई तिला म्हणाल्या ," आभा, खूप सुंदर अभिनय केलास. संस्कृत भाषेचं पाठांतर आणि चेहर्यावरचे हावभाव दोन्ही एका वेळेस निभावणं अवघडच. हे शिवधनुष्य छान पेललंस . शाब्बास. खूप मोठी हो, माझे आशिर्वाद आहेत तुला बाळा,". दहावीचं वर्ष मात्रं नाटकाविना गेलं. या वर्षी खूप अभ्यास करायचा, नाटकबिटक काही नाही अशी बाबांनी तंबी दिली होती. ऐंशी टक्के मार्क मिळवून तिने सांगलीत विलींग्डन काॕलेजला प्रवेश घेतला. या काॕलेजला प्रवेश घेण्यामागे त्यांचं दरवर्षी नाट्यस्पर्धेतलं यश हे मुख्य कारण ही होतंच. विज्ञान शाखेत शिकत असताना अभिनयाची आवड असल्याने नाटकासाठी तिने आपले नाव नोंदवले. पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत अभिनयाचं दुसरं बक्षीस तिने पहिल्याच वर्षी मिळवलं. पुरुषोत्तम करंडक या मानाच्या स्पर्धेसाठी त्यांच्या नाटकाची निवड झाली. यासाठी तासनतास चालणार्या तालमींमधे ती रमून जात असे.नवीन मित्रमैत्रीणी मिळाल्या होत्या. त्यांच्यबरोबर नाटकातले संवाद, उतारे यांची प्रॕक्टीस करताना खाण्यापिण्याची शुध्दही तिला रहात नसे. पुण्यात त्यांना बक्षीस मिळालं नाही पण या निमीत्ताने या क्षेत्रात आपण किती पाण्यात उभे आहोत हे सर्वांच्याच लक्षात आले. त्यानंतरही प्रत्येक वर्षी अभिनयाचे पारीतोषिक तिलाच मिळत होतं.तोपर्यंत अभिनयातच करीयर करायचं हे तिने मनाशी पक्के ठरवलं. पुढे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धाही तिने गाजवली. त्यानिमीत्ताने मुंबई ला जायची संधी तिला मिळाली. पहिल्याच भेटीत मुंबई तिला खूप आवडून गेली.. आपलं स्वप्नं पुरं करायचं असेल तर इथेच यायला हवं ही खुणगाठ तिने मनाशी बांधली. सलग दुसर्या वर्षी अभिनयाचं बक्षीस सिनेसृष्टीतील प्रतिथयश दिग्दर्शकाकडून घेताना तिचं अंग थरथर कापत होतं .बक्षीस देताना ते म्हणाले," उत्कृष्ट अभिनय करतेस. ऐकलं होतं मी तुझ्याबद्दल पण आज प्रत्यक्ष पाहीलं तुला अभिनय करताना. मुंबईला ये, खूप संधी मिळतील, माझ्याशी संपर्क कर आलीस की". हे ऐकून आभा नाचायचीच राहीली होती. शिक्षण पूर्ण झालं की मुंबईत जाऊन अभिनयक्षेत्रात नाव कमवणं हेच आता तिचं लक्ष्य बनलं.

विज्ञानशाखेतली पदवी मिळाली आणि तिची मुंबई ला जायची तयारी सुरु झाली. इतके दिवस आईबाबांनी नाटकात काम करण्यासाठी कसलीही आडकाठी केली नव्हती. पण आता मात्रं ते विरोध करु लागले. पण आभा ऐकायला तयार नव्हती. तिचे बाबा तिला म्हणाले,
" आभा, एवढया मोठ्या शहरात कशी राहणारेस तु? अगं , तुझा काय निभाव लागणार तिकडे. हे आपल्यासारख्यांचं काम नाही . तिथं जायचं असेल तर पैसा किंवा ओळख दोन्हीपैकी एक काहीतरी हवं. आपण पडलो मध्यमवर्गीय. शिवाय ते क्षेत्र चांगलं नाही पोरी. ऐक माझं, जाऊ नको". पण आभा कोणाचच ऐकायला तयार नव्हती.तिने जेवणखाण बंद केलं. आई बाबांना समोर बसवून ती म्हणाली,
" आई बाबा, मला मुंबईला जाऊ दे. हे क्षेत्र वाईट आहे असं म्हणताय तुम्ही, पण कुठलं क्षेत्रं चांगलं आहे? सगळं आपल्यावर असतं, आपण नीट राहीलो तर बाकीचेही नीट वागतात आपल्याशी. मला प्रयत्न तर करु दे".
आईला तयार करणं फारच अवघड गेलं तिला.एकच वर्ष राहून प्रयत्न करायचा, रोज फोनवर बोलायचं, मुंबईत जाऊन आधी २/३ महिने मावशीकडे रहायचं, वर्षात काही जमलं नाही तर परत यायचं आणि लग्नं करायचं या अटींवर तिला जायची परवानगी मिळाली. वर्षभर वडील पैसे पाठवणार हे मात्र तिला कबुल करावं लागलं. आईची एक चुलत बहीण मुंबईत होती. सुरवातीला तीन महिने अनुमावशीकडे रहायचं आणि मग वेगळी खोली घ्यायची असं ठरलं. या आधी स्पर्धेच्या निमीत्ताने ती अनेक वेळा मुंबई ला जाउन आली होती. वर्षभर जर काही जमलं नाही तर मात्र परत यायचं या अटीवरच तिला मुंबईत यायला मिळालं होतं .

मुंबईत तिची अनुमावशी गोरेगावला रहात होती. घरात अनुमावशी आणि काका असे दोघेच रहायचे. आभाला काही ओळखीचे दिग्दर्शक , अभिनेते यांचे नंबर तिच्या काॕलेजमधल्या सरांनी दिले होते. सांगलीहून तिच्या ग्रुपमधले तिघेजण आले होते.आल्याआल्यायाच तिने दिग्दर्शकांना फोन करायला सुरवात केली.ज्या उत्साहात तिने सुरवात केली तो हळूहळू अगदी महीनाभरातच ओसरायला लागला. बर्याच वेळा ," वो सेट पर है., अभी नही बात कर सकते, बाद में काॕल करो किंवा सर अभी आउटडोअर पर है " या सारखी उत्तरे मिळायची. ज्या दिग्दर्शकांच्या हस्ते तिला पुरस्कार मिळाला होता त्यांच्याशी तर तिचा संपर्कही होऊ शकला नव्हता. महिना म्हणता म्हणता मावशीकडे दोन महिने होऊन गेले. आभा सकाळी डबा घेऊन बाहेर पडायची. तिला परत यायला रात्र व्हायची. मावशी आणि काकांना याचा त्रास व्हायचा. इतका उशीर का होतो यायला असं सारखं विचारत रहायचे. कांदीवलीला माफक दरात एका सोसायटीमधे सांगलीच्याच मैत्रीणीसोबतची काॕट रिकामी होती. शेवटी तिने त्या रुमवर जायचा निर्णय घेतला. भिलवडीला आईला फोन करुन सांगीतलं. ती मैत्रीण , श्रुती दादरला नोकरी करत होती. श्रुतीही आईशी बोलली. मावशीकडून सामान तिने रुमवर आणून टाकलं. खोली जरा छोटी होती पण तिच्या बजेटमधे बसणारी होती. वडीलांकडे पैसे मागायला लागु नयेत म्हणून मग तिने आता स्वतःच प्राॕडक्शन हाउसमधे जायचा निर्णय घेतला. अनेक खेटे घालूनही काहीच उपयोग होत नव्हता. तिच्यासारख्याच या क्षेत्रात काम मिळावं म्हणून धडपडणार्या काही मुलींशी तिची ओळख झाली होती. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिनेही आता आॕडीशन्स द्यायला सुरवात केली.मुंबईत रहायचं तर पैसा पाहीजे, पैसा हवा असेल तर सिरीयलमधे छोटीमोठी भुमिका करायला हवी. तिला वाटलं होतं तसं स्वतःच्या अभिनयसामर्थ्यावर भुमिका मिळत नव्हत्या , इथे काम मिळवायचं तर बक्षीसं नाही तर ओळख हवी हे या सहा महीन्यात तिच्या लक्षात येत चाललं होतं. एकदा एका आॕडीशनमधे ती निवडली गेली असं तिला प्राॕडक्शन हाउसने कळवलं आणि ती आनंदाने रडायलाच लागली. तिचा विश्वासच बसेना.भुमिकेबाबत सर्व ठरवण्याकरता दुसर्या दिवशी तिला त्यांच्या आॕफीसवर बोलवले होते.ती खूप उत्साहाने गेली तेव्हा त्या भुमिकेसाठी दुसर्या कोणाची तरी निवड झालेली समजलं .यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजेना. निराश होऊन ती परतली. दोन दिवस कुठेच गेली नाही ती. तिसर्या दिवशीपासून परत जिद्दीने प्रयत्न करायला सुरवात केली. पण कुठेच काही जमेना. दोन ठिकाणी निवड झाली असं सांगीतलं पण नंतर या भुमिकेसाठी तुझं वजन जास्त आहे तर कधी वय जास्तं वाटतंय अशी कारणं दिली गेली.असं किती वेळा झालं हे मोजणं सोडून दिलं तिने. स्वतःच्या अभिनयसामर्थ्यावर विश्वास असणार्या तिचा आत्मविश्वास हळूहळू डळमळायला लागला, खच्चीकरण व्हायला लागलं. पैसे जास्त खर्च व्हायला नको म्हणून एका वेळेसच जेवायला तिने सुरवात केली. तिचं वजनही कमी व्हायला लागलं, चेहरा ओढल्यासारखा दिसायला लागला. मला काही जमतच नाहीये असं वाटायला लागलं. पण भिलवडीला परत जायचीही तिची इच्छा नव्हती. परत जाणं म्हणजे हार मानणं असं तिच्या मनाने घेतलं. काय करावं ते समजत नव्हतं. इतके हातपाय मारुनही काम मिळत नव्हतं. सांगली सोडून जवळजवळ आठ महिने झाले होते . ती इतकी निराश झाली की तिने आता बाहेर जाणं बंद करुन टाकलं. दिवसच्या दिवस अंथरुणात लोळत पडायची, सारखं रडायला यायचं. गेल्या चार दिवसात तर तिने घरीही फोन केला नव्हता. श्रुतीचं तिच्याकडे लक्ष होतं. आभाच्या आईचा तिला फोन आला तेव्हा ,
"मी आहे काकु, तुम्ही काळजी करु नका. तिला जरा ताप आहे म्हणून तुमच्याशी बोलू शकली नाही. मी तिला डाॕक्टरकडे नेऊन आणते. ती उद्या फोन करेल तुम्हाला",
असं सांगीतलं. संध्याकाळी ती आॕफीसमधून घरी आली आणि आभाजवळ जाउन बसली.
"काय होतंय आभा? बरं वाटत नाहीये का"
श्रुतीचे शब्द ऐकले आणि आभा तिच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडायला लागली. तिला शांत करत श्रुती म्हणाली,
"आभा एक सुचवू का. मला माहीतीये तुझ्या मनात खूप काही चालू आहे, ते तु कोणाशीच बोलू शकत नाहीयेस. शिरीन नावाच्या एक समुपदेशक आहेत त्यांची मदत तु घेऊ शकतेस. येतेस का माझ्याबरोबर त्यांच्याकडे?"
"मी काही वेडी नाहीये counsellor कडे जायला," आभा संतापाने म्हणाली.
" मी वेडी वाटतीया का तुला. अगं मी पण इथे आले तेव्हा एका मुलाने मला फसवलं, माझ्याकडचे पैसे काढून घेतले, प्रेमाचं नाटक केलं, मी तर पूर्ण तुटून गेले होते. तेव्हा
समुपदेशनासाठी त्यांच्याकडे गेले आणि पूर्ण बाहेर पडले यातून. तु विचार कर. त्यांच्या मदतीने तु यातून बाहेर पडु शकतेस. आत्ता शांतपणे झोप, आपण उद्या सकाळी बोलू."
दुसर्या दिवशी सकाळी आभा आपणहूनच श्रुतीकडे आली "कधी जायचं आपण शिरीन मॕमकडे"

शिरीन मॕमच्या क्लिनीकमधे तिला सोडून श्रुती आॕफीसला गेली. शिरीन मॕमच्या समोर आभा येऊन बसली . मॕमचा चेहरा खूप शांत व आश्वासक वाटला.
" काय नाव म्हणालीस? आभा, व्वा किती सुंदर नाव आहे. नावासारखीच दिसतीयेस..चमकदार."
मॕम प्रसन्न हसून म्हणाल्या. गेल्या कित्येक दिवसात स्वतःबद्दल चांगलं ऐकायची सवय नसलेली आभा अचानकपणे टेबलवर डोकं ठेवून रडायला लागली. तिला तसेच रडून दिल्यानंतर शिरीन मॕमने पाण्याचा ग्लास पुढे केला तेव्हा गटागट तिने ते पिऊन टाकलं. पुढचा तासभर ती नुसती बोलतच होती. मॕमने तिला दुसर्या दिवशी संध्याकाळची वेळ दिली. त्यांच्याकडून घरी परतताना आभा खूप शांत झाली होती. ती आईशी पण बोलली आणि कित्येक दिवसांनंतर शांत झोपली. काही सिटींग्जनंतर शिरीन मॕम तिला म्हणाल्या
"आभा माझ्याकडे यायचा निर्णय घेऊन अर्धी लढाई तु जिंकली आहेस.यायला अजून थोडा वेळ जरी लावला असतास ना तर कदाचित तुला नैराश्य आलं असतं. खरं तर समुपदेशकाची मदत घेणं म्हणजे एखाद्या आजारासाठी आपण डाॕक्टरकडे जातो ना इतकं सहज आहे. पण समुपदेशन मात्र डाॕक्टरांनी दिलेली गोळी घेतली आणि बरं वाटलं इतकं सोप्प नाही. थोडा वेळ लागतो पण समस्येचं पूर्ण निराकरण होतं. समस्या छोटी असो वा मोठी समुपदेशकाची मदत प्रत्येकाने घेतली पाहीजे. यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण व्हायच्या आधीच तो वेळेवर सुटतो.असो, तु मात्र योग्य निर्णय घेतला आहेस".

पुढच्या महिन्याभरात मॕमनी काही टास्क दिले, लिहायला सांगीतले तर उदासी दूर करण्याचे मार्ग, काही ट्रिक्स सांगीतल्या. आभा हळूहळू पूर्वपदावर येत होती. पहिल्यासारखाच उत्साह आता तिला जाणवत होता. आपल्याला अभिनय करायचाय हा निर्णय बरोबर आहे पण त्याकरता सिरीयल्स हा एकच मार्ग नाहीये हे शिरीन मॕमच्या मदतीने तिच्या लक्षात आलं. सिरीयलसाठी आपण योग्य नाही याचा अर्थ आपल्याला अभिनय येत नाही असा नाही हे तिच्या लक्षात आलं. तिने आपल्या सांगलीच्या इकडे आलेल्या तिघांशी परत एकदा संपर्क केला. त्यातले प्रशांत, नंदिता आणि संजय मुंबईतच होते. नाटक व अभिनयाची आवड असलेली पुण्याची प्रतिक्षाही त्यांच्याबरोबर जोडली गेली. नाटक या विषयात काहीतरी सगळे मिळून करायचं असं त्यांनी ठरवलं. अनेक चर्चा, त्यांच्या सांगलीच्या सरांशी विचारविनीमय केल्यावर त्यांनी एक नाट्यसंस्था ,अगदी छोट्या प्रमाणात, सुरु करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या एकांकिका बसवून त्या लहान रंगमंचावर सादर करायच्या असं सर्वानुमते ठरलं.नेपथ्य, कपडे, ध्वनी यावर जास्त खर्च न करता दर्जेदार कथा उत्तम अभिनयाने लोकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश ठेवायचा असं त्यांनी ठरवलं. यासाठी ' संजीवन ' हे नाव आभाने सुचवलं. ही एक अभिनव कल्पना होती आणि यासाठी भांडवलही जास्त लागणार नव्हतं. लहान रंगमंचामुळे कमी तिकीटात प्रेक्षकही जास्त मिळणार होते. ' संजीवन ' कडून कामाला सुरवात झाली. सुरवातीला काही एकांकिका आभाने लिहील्या.तालमींना सुरवात झाली. हळूहळू ह्या एकांकिका प्रसिध्द होऊ लागल्या . या तरुण मुलांच्या अभिनव कल्पनेची वर्तमानपत्रांनीही दखल घेतली. ' संजीवन' चे नाव प्रसिध्द होऊ लागले. त्यांच्या ' तडा ' या एकांकिकेचा एक प्रयोग पहायला दादा वाघ आले होते दादा वाघ म्हणजे प्रसिध्द नाट्यनिर्माते.प्रयोग संपल्यावर ते भेटायला आले. त्यांना सगळ्यांचा अभिनय आणि संकल्पना खूप आवडली होती. या एकांकिकेचं दोन अंकी नाटक बसवा, मी आर्थिक मदत करतो असं त्यांनी या चौघांना सांगीतलं तेव्हा काही क्षण तर त्यांचा विश्वासच बसेना. गेले तीन महिने दोन अंकी नाटक त्यांनी लिहून काढलं, दिवस रात्र त्याच्या तालमी केल्या आणि आता उद्या त्याचा पहिला प्रयोग बालगंधर्वला आहे. हे सगळं शक्य झालं शिरीन मॕममुळे. इतक्यात शिरीन मॕमने तिला आत बोलवले. पेढ्यांचा बाॕक्स घेउन आभा शिरीन मॕमच्या पाया पडली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. शिरीन मॕम आनंदाने तिला म्हणाल्या ,
" तुझ्या स्वप्नांचा खरोखर वेध घेतलास आभा , जिंकलीस तु "
" नाही मॕम, तुम्ही मला ' संजीवन ' दिलंय...अगदी खर्या अर्थाने.."

@ अंजली जोगळेकर 



सोमवार, ११ मे, २०२०

कल्लोळ

कल्लोळ

आईंना घेउन आले आत्ता हाॕस्पीटलमधे. काय होतंय काय माहीत ? किती जोरत पडल्या त्या बाथरुममधे. डोक्यातून रक्त खूप वाहत होतं . पाहून घाबरलेच मी. घरी कोणीच नाही, अर्थात रोजच कोणी नसतं म्हणा. मी आणि आई दोघीच असतो नेहमी.  नेमकं मलाही काय बुध्दी झाली स्वयंपाकघरात जायची? भाजी थोड्या वेळाने फोडणीला टाकली असती तर काय बिघडलं असतं? पण  आईंना आंघोळीला पाणी दिलं, स्टुलवर बसवलं, दार उघडंच ठेवून मी स्वयंपाकघरात गेले. आंघोळ झाली की पोथी वाचून जेवायलाच बसतात त्या. आज त्यांच्या आवडीची लाल भोपळ्याची , त्यांच्या नागपुरी भाषेत बाकरभाजी, करायची होती. त्यांची अंघोळ झाली की त्यांना खोलीत बसवून कपडे दिले की माझं काम व्हायचं . तोवर भाजी शिजेल असं वाटून मी गेले पण तेवढ्यात गोंधळ झालाच. आंघोळ आटोपल्यावर उभे राहताना त्यांचा पाय घसरला आणि जोरात आपटल्या.  केवढा आवाज झाला, धावत गेले, पण काय करावं तेच कळेना. शेवटी कसबसं त्यांना उचललं, गाउन चढवला आणि शेजारच्या शिवला आवाज दिला. त्याने व मी मिळून त्याच्या गाडीने आता रुग्णालयात आणलंय. त्यांना भोवळ येऊन त्या घाबरलेल्याच होत्या. येताना उलटीही झाली त्यांना म्हणून जास्त काळजी वाटतीये मला.  डाॕक्टर येऊन तपासताहेत.  पण उलटी झाल्याने मला वाटलं होतं तसं त्यांना अॕडमिट करावंच लागलं. ऐंशी वय असल्याने कोणताही धोका पत्करायची त्यांची तयारी नव्हती. आय सी यु मधे ठेवायला हवं होतं.

काय गरज होती मला स्वयंपाकघरात जायची? त्यांची अंघोळ झाल्यावर गेले असते तर काय बिघडलं असतं? बाकरभाजी तर पटकन होते. खूप अपराधी वाटायला लागलं मला. मी विश्वासला फोन लावला. आईला एवढंसं जरी काही झालं की त्याचा जीव थोडाथोडा व्हायचा. लगेच आॕफीसमधून निघाला आणि तासाभरात रुग्णालयात आला. तो आला तसा माझा जीव भांड्यात पडला.
माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाला,” नको काळजी करु, मी आलोय ना आता. सगळं काही नीट होईल.”
मी त्याला सांगायचा प्रयत्न करु लागले,” अरे मी भाजी टाकायला गेले आणि इकडे त्या पडल्या,मी लगेच पळत आले पण....”.
 “मला माहितीये विभा, तु माझ्या आईची खूप काळजी घेतेस, मला तिच्याकडे पहायला वेळ नसतो पण तु आहेस म्हणून मी निश्चिंत असतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर”. हे ऐकलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.इतक्यात डाॕक्टरांनी बोलावलं म्हणून  मला तिथे सोडून विश्वास भेटायला गेला.

खरंच किती बदलतो ना माणुस.? हा तोच विश्वास आहे जो आपल्या आईच्या पूर्ण आज्ञेत होता? मला आठवतंय लग्नं होऊन या घरात आले तेव्हा घर भरलेलं होतं. दादा, आई आणि विश्वास. विश्वासच्या मोठ्या बहिणीचे, विशाखाचे लग्नं झालेलं होतं. माझ्या घरी मी आणि माझे वडील अण्णा दोघेच होतो.आई मी लहान असतानाच गेली. अण्णांनीच माझा सांभाळ केला. या घरात एकछत्री आईंचा अंमल होता. माझं या घरात येणं त्यांना फारसं आवडलेलं नव्हतं. दादांनी एका लग्नात मला पाहीलं आणि विश्वाससाठी मला पसंत केलं. अण्णा आलेले पण त्यांना आवडायचं नाही. ते आले तरी त्या विशेष बोलायच्या नाहीत. मला याचा फार राग यायचा. अण्णांची एकुलती एक मुलगी होते मी. विश्वासने किंवा दादांनी याबाबत बोलावे असं मला वाटायचं. पण ते दोघे कधीच काही बोलले नाहीत. माझा फार संताप व्हायचा त्यामुळे. पण विश्वासला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे सर्वस्व होती. आॕफीसमधून आल्यावरही तो आधी आईच्या खोलीत जायचा. मग आई, दादा आणि तो, तिघांच्या गप्पा रंगत असत, तिथेच चहा, खाणंही व्हायचं, कधीकधी पत्त्यांचा डावही रंगायचा. या सगळ्यात मला सामिल करुन घ्यावं असं या तिघांपैकी कोणालाही वाटायचं नाही. खूप एकटंएकटं, असहाय वाटायचं,  कधी खूप संताप व्हायचा माझा. विश्वासचा खूप राग यायचा. वाटायचं  माझं घर सोडून मी या माणसासाठी आले या घरात आणि याला तर काहीच पडलेलं नाहीये माझं. मी स्वतःहून त्यांच्यात सामील व्हायचा एकदोनदा प्रयत्न केला पण लक्षात आलं की आईंना फारसं आवडत नाहीये मी त्यांच्या खोलीत गेलेली.  मग मात्र मी ते करणं सोडून दिलं. मी एकटीच काहीतरी वाचत नाहीतर काम करत बसायची. याबाबतीत विशाखाताईंना माझी मनःस्थिती नक्की समजेल असं मला वाटलं होतं पण तिथेही माझी निराशा झाली. कोणालाच आईंची नाराजी नको होती.  पण माझ्या जयाचा जन्म झाला आणि माझं विश्व बदलले. आता आई काय करतात, विश्वासचं वागणं इकडे मी  दुर्लक्ष करायला लागले.  जया हेच माझं विश्व बनली, तिच्यासाठी मी आणि माझ्यसाठी ती . ती मोठी व्हायला लागली तसं तिच्याबरोबर माझंही क्षितीज रुंदावायला लागलं, मैत्रीणी मिळाल्या.  पुढच्या काळात एका मैत्रीणी बरोबर फॕशन डिजायनींग चा डिप्लोमा करुन आम्ही स्वतःचं ‘रिवाज बुटीक’ चालु केलं, घरीच.  त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. आम्हाला मदतीसाठी दोन बायकांनाही कामावर ठेवायला लागणार होतं. मग बाहेरच्या बाजूला शेड टाकून  काम मी सुरु केलं. मशिनच्या आवाजाचाही आईंना त्रास व्हायचा, त्यावरुन घरी कटकट चालूच होती.  त्या दोघांनाही माझ्या कामाचं अजिबात कौतुक नव्हतं.  पण दुर्लक्ष करणे हा मार्ग मला सापडला होता.
अण्णा त्यांच्या मित्रासोबत कर्जतच्या वृध्दाश्रमात रहायला गेले. खूप खुश होते ते तिथे, अनेक मित्रं जोडल्याने त्यांचा एकटेपणा संपला होता. मी अधूनमधून जाऊन भेटून येतच होते.  विशाखाताईही अधूनमधून घरी यायच्या. पण आल्यावर प्रथम आईंच्या खोलीत जाऊन गप्पाटप्पा, चहा झाल्यावर बाहेर येऊन थोडंफार माझ्याशी बोलायच्या. मला खूप आश्चर्य वाटायचं त्यांचं. त्याही माझ्यासारख्याच त्यांच्या घरातील एक सुन होत्या मग एका सुनेची बाजू त्यांना समजू शकत नाही? अर्थात घरातल्या या राजकारणाकडे लक्ष द्यायला मला आता वेळ नव्हता. जया, माझं काम आणि घर, मला दिवस कमी पडत होता. जयावर मात्रं आईंदादांचा खूप जीव होता. जयालाही आजीआजोबा फार प्रिय. शाळेतून आली की तिचं जेवण त्या दोघांबरोबरच होई. तिच्यासाठी जेवायला थांबायचे दोघेजण. त्यांच्यातलं ते प्रेम पाहून मला बरं वाटायचं. पुढे मोठी होऊन काॕलेजमधे जायला लागली तेव्हा त्यांचं जेवण बंद झालं पण गप्पा तशाच चालु होत्या.तिचं लग्नं झालं त्यावेळी खूप वाईट वाटलं त्यांना. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. तिचं लग्नं झालं आणि वर्षभरातच दादा गेले. रात्री झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
 दादा गेले तसं घरात आता मी आणि आईच रहायला लागलो. इतक्या वर्षात आम्ही एकमेकींबरोबर कधीच एकत्र जेवायलाही बसलो नव्हतो. सुरवाती सुरवातीला माझ्याशी बोलताना त्यांचा अहंकार आड यायचा. मग मीच आपणहून त्यांच्याशी बोलायला सुरवात केली . विश्वास सकाळीच जायचा तो त्याला यायला जवळजवळ रात्रंच व्हायची. मग  विश्वास गेला की माझं काम सुरु व्हायचं. त्याआधीचा चहा मी त्यांच्याबरोबर घ्यायला सुरवात केली. चहा घेता घेता आमच्या गप्पा रंगायला लागल्या .एकमेकींबद्दल असलेली अढी हळुहळु सुटायला लागली. मला आता त्या त्यांच्या लहानपणीच्या, लग्नाच्या हकीकती, किस्से सांगायला लागल्या, माझ्या ऐकू लागल्या.  मी त्यांना त्यांच्या मैत्रीणीकडे गाडीवर सोडायला गेले तर आत बोलवून माझी ओळख करुन द्यायला लागल्या. आमचं नातं आता बर्यापैकी निवळायला लागलं. मैत्रीचं नाही म्हणणार मी पण एक छानसं नातं आमच्यामधे निर्माण होऊ पहात होतं.  विशाखाताईही यायच्या पण त्या येऊन गेल्यावर तो दिवस आई थोड्या वेगळ्या वागायच्या. पण दुसर्या दिवशी नेहमीसारख्या आमच्या गप्पा व्हायच्या. आता तर जेवणासाठी पण माझ्यासाठी त्या थांबू लागल्या. मला खूप आश्चर्य वाटत होतं, या त्याच आई आहेत ज्या माझ्याशी बोलायला पण तयार नसायच्या? पण मी खूप समाधानी होते.
तेव्हाचा अजून एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. दादा गेल्यावर त्यांची अर्धी पेंशन आईंना मिळायला लागली. विश्वासला वेळ नसायचा मग मीच ती काढून आणून आईंकडे द्यायचे. एकदा विशाखाताई आल्या होत्या. त्यांनी आईंचे पेंशनचे पासबुक तपासायला सुरवात केली . मला बोलवलं आणि विचारलं  “हे सगळे पैसे कुठे गेले?”
 मला समजेना त्या काय बोलताहेत. मी पैसे काढून आईंच्या हातात देत असे हे त्यांना बहुतेक माहीत नव्हते. मी काही बोलणार इतक्यात आईच बोलल्या         "विशाखा, काय बोलतीयेस तु? ती पैसे काढून माझ्या हातात देते., दर महिन्याच्या पाच तारखेला, अगदी न चुकता. तिच्यावर अविश्वास दाखवू नकोस.” ऐकून  मला  सुखद धक्का बसला. हे मला अपेक्षितच नव्हतं. विशाखाताईंचा चेहरा मात्र कसनुसा झाला होता.

इतक्यात विश्वास बाहेर आला. “विभा आत जा, आई बोलवतीये तुला “ .  विचारांच्या कल्लोळातून बाहेर येत मी आईंना भेटायला आत गेले. आईंना पाहून मला परत एकदा  अपराधी वाटायला लागलं. त्यांच्याजवळ जाऊन बसले. इतक्यात त्यांनी डोळे उघडले. “ विभा, मला काही झालेलं नाहीये, मी ठीक आहे. मी पडले त्यात कोणाचीच चुक नाहीये, तुझी तर अजिबात नाही. जा, आता घरी जाऊन थोडी विश्रांती घे, खूप धावपळ केलीयेस सकाळपासनं” माझ्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना. तशीच बाहेर पळत आले, डोळे पुसले. आता घरी जाते, छान गरमगरम मुगाची खिचडी करते आईंना आवडते तशी. त्यांचं पांघरुणही आणायला हवं, त्यांना झोप येत नाही त्याशिवाय. भावनांचा कल्लोळ संपला होता,स्वच्छ  आकाशात चांदण्या चमकत होत्या.

© अंजली जोगळेकर


सोमवार, २० एप्रिल, २०२०

माझं लाॕकडाऊन



आज लॉकडाउनचा ३३ वा दिवस आहे.  गेले ३३ दिवस  खरंच मी घरात आहे? काही अपवाद वगळता ,म्हणजे  भाजी /किराणा आणण्याशिवाय, मी कुठेच गेलेली नाहीये आणि हे फ़क्त माझ्याच बाबतीत नाही तर सरकारने घालून दिलेले नियम पाळणार्या  इतर अनेक जबाबदार  नागरीकांचं  रुटीन झालंय. सगळ्यांनीच जर  आपली जबाबदारी पार पाडली तर कोरोनाला  हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही..

गेल्या ३३ दिवसांत मात्रं  काही अशा गोष्टी मी   केल्या  ज्या मी अनेक दिवसांत किंवा महीन्यात केल्या नव्हत्या असं म्हणलं तरी चालेल. त्यातली एक गोष्ट तर याआधी मी एकदाही केली नव्हती ती म्हणजे जयश्रीला म्हणजेच माझ्या बाईला  आपणहून दिलेली मोठ्ठी सुट्टी आणि ती सुध्दा  अजिबात  खळखळ न करता. पैसे तर आपण कोणीच कापत नाही.जेव्हापासुन ती येत नाहीये तेव्हापासुन मी जरा माझ्या घराकडे माझ्या खास चष्म्यातून पहायला लागले .  मला आता घराचे असे कोपरे  दिसायला लागले जिकडे पहायला जयश्रीला जमत नाही. ओटा, भांडी आणि सगळं घरंच माझा हात फ़िरल्यावर आनंदाने खुलुन गेल्यासारखं दिसायला लागलं. ही सगळी कामं करताना मला  खूपच समाधान मिळालं. मला जाणीव झाली की तिच्यावर माझं अवलंबुन राहणं वाढलं आहे. हे कमी करायला हवंय याची मी मनांत नोंद करुन ठेवलीये.

व्यायाम करायला आता मला जिमला जाता येत नाहीये किंवा सकाळी फ़िरायलाही जाता येत नाहीये. थोडे दिवस जरी व्यायाम केला नाही तर वजन वाढायला वेळ लागत नाही माझं. हवा लागली तरी वजन वाढणार्यांच्या श्रेणीमधे मी मोडते. मग वर गच्चीवर जाऊन मी व्यायाम करायचं ठरवलं. एरवी मी महीन्यातुन  जेमतेम एकदा  तिथे जाते. पण आता गेल्या ३३ दिवसांपासुन मी रोज वर जायला लागलीये. सकाळी सकाळी तिथे इतकं प्रसन्नं वाटतं हे मला याआधी कधी कळलंच नव्हतं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. आमच्या गच्चीला लागून नारळ, गुलमोहोर,सोनचाफ़ा अशी झाडं  आहेत.  त्यावर सकाळी कोकीळा, भारद्वाज, साळुंकी असे पक्षी येत असतात, थोड्या दुरवरुन नारळाच्या झाडाआडुन दिसणारा सुर्योदय, आकाशात दिसणारे रंग  पाहुन दिवसाची सुरवात खुप सकारात्मक , आनंदी होते.  अशा वातावरणा्त व्यायामही जास्तं करावासा वाटतो. पण इतक्या वर्षात आपल्याच घरातल्या गच्चीवरुन निसर्गाच्या इतक्या जवळ जाता येते हे मला या ३३ दिवसांतच कळले.

पक्षी  मला दिसायला लागल्यावर त्यांना काहीतरी खायला घालावं का? हा विचार माझ्या मनात आला. मग मी लगेच एका ताटलीत त्यांच्यासाठी पोळीचे तुकडे टाकायला सुरवात केली पण पक्षी काही फ़िरकेनात. मग एक दिवस मी भिजवलेली कणिक टाकली आणि काय आश्चर्य ती खायला पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांना पण आवड्निवड असते हे मला माहीतच नव्हते. पण माझ्या मुलांच्या म्हणण्याप्र्माणे माझ्या हातच्या पोळ्या खाण्यापेक्षा कणिक खाल्लेली बरी😄 असा विचार त्यांनी केला असावा. विनोदाचा भाग सोडला तर त्या दिवशीपासुन रोज आता कणिक खायला खुप पक्षी येतात. गेल्या काही दिवसांपासुन तर श्री व सौ भारद्वाजजी त्यांच्या पिलासह यायला लागले आहेत. हे पाहुन इतकं बरं  वाटतंय मला.  माझ्यासाठी हा खुप नविन व आनंददायी अनुभव आहे.

सध्या माझं वाचन कमी झालंय  की काय असं  मला वाटत होतं. मी  मागे दिल्ली एअरपोर्ट वरुन मुंशी प्रेमचंद यांचं  ’ गबन ’ हे पुस्तक आणलं होतं . आणलं खरं पण गडबडीत ते  आत कुठेतरी कपाटात दडुन बसलं होतं, काही ना काही कारणाने ते वाचायचं राहुनच जात होतं . ते पुस्तक नेमकं आत्ता सापडलं. मग काय लगेच ते वाचायला सुरवात केली. पण मुड लागेना, वाचायला योग्य जागा सापडेना. सहज   बागेतल्या झोपाळ्यावर वाचायला बसले आणि अर्धं पुस्तक एका झटक्यात वाचून काढलं. असं खुप दिवसांनी झालं की मी एका बैठकीत एवढं वाचलं. मग  त्या दिवशीपासून झोपाळा ही माझी वाचनाची जागा झालीये. झोपाळ्यावर गुलमोहोराच्या झाडाच्या फ़ांद्यांमुळे छान सावली असते. मी तिथे बसले की आमचा लिओ खुप खुश असतो. लगेच माझ्याजवळ येऊन बसतो. शिवाय आमच्या बागेतली झाडे, कुंड्या  फ़ुले यामुळे मन प्रसन्नं होतं. लिहायचा, वाचायचा मुड लागतो. आता ही माझी फ़ेवरीट जागा झालीये.  या झोपाळ्यावर मी आधीही खुप वेळा बसलीये. भाजी निवडायला किंवा गप्पा मारायला पण आता वाचन व लेखनही या यादीत समाविष्ट  झालंय. घरातून बाहेर पडता येत नाही, त्यामुळे बाहेरची कामं नाहीत आणि टी व्ही सारखा पाहवत  नाही  .  म्हणुनच बहुतेक निवांत वेळ मिळायला लागला . एरवी मी अशी झोपाळ्यावर बसायला गेले नसते कदाचित. याशिवाय मी ' स्टोरीटेल ' हे मोबाईल वर  एकॲप डाउनलोड करुन घेतलंय. यात चांगल्या लेखकांची मराठी/ हिंदी/ इंग्रजी  पुस्तके आॕडीओ स्वरुपात असतात.  त्यावरही या काळात मी तीन छान  पुस्तके वाचली/ ऐकली. हा अनुभवही खूपच चांगला आहे. अगदी व्यायाम करताना, स्वयंपाक करताना सुध्दा मी ही पुस्तके वाचू/ऐकू शकते. वेगवेगळ्या पाककृती  ऐकता ऐकता करताना खूप मजा येते.

घरातील लोकांना सगळ्या कामात, अगदी भांडी, झाडु, फ़रशी पुसणेसह , मदत करताना पाहणे हा आनंददायक अनुभव केवळ या लॅकडाउनमुळेच पहायला मिळाला. मुली नेहमीच मदत करतात.  मुलं बाहेरची कामं करतील पण घरातलं काम करायला पहात नाहीत. ही माझी तक्रार या काळात पूर्णपणे दूर झाली. घरातलल्या साफ़सफ़ाई कडे सध्या माझं जातीने लक्ष असल्याने आमचं घर खुप  ताजंतवानं , तरतरीत झालंय असं म्हणायला हरकत नाही.
बाहेर पडणे होत नाही म्हणुन खर्चही खूपच कमी झालाय. माझ्या पाकीटात कितीतरी दिवसांपासुन पाच हजार रुपये आहेत , ते संपायचे नावच घेत नाहीयेत.  ज्या जीवनावश्यक वस्तु आहेत त्या तर घ्यायला लागतातच तरीही पैसे संपत नाहीयेत. आपण किती कमी वस्तुंमधे , सामानामधे राहु शकतो हे मला वाटतं या दिवसांतच मला कळलं . आपल्या गरजा आपण विनाकारणच इतक्या वाढवून ठेवतो, नको इतके स्वतःला गोंजारतो , लाड करतो याची लख्ख जाणीव मला झाली.
लाॕकडाउन चा त्रास मला होत नाहीये का? तसं अजिबातच नाही. त्रास तर नक्कीच होतोय पण जी परीस्थिती आपण बदलू शकत नाही तिचा जास्तं विचार करुन उपयोगाचं नसतं. आपण निदान घरात बसुन नीट जेवू तरी शकतोय, आपलं पोट तरी भरतोय पण मजुरांचं काय?  हाताला काम नाही,  खायला अन्नं नाही, त्यांनी काय करायचं? हा विचार आला की वाईट वाटतं, काही सुचत नाही.  आपण त्यांच्यासाठी काही करु शकू का? त्यांच्यापर्यंत अन्न कसं पोचवू शकू? थोडी विचारपूस , चौकशी केली आणि मार्ग सापडला. उत्तरप्रदेश मधील काही मजुर ऊपाशी आहेत, त्यांना खायला अन्न नाहीये, साधारण वीस कामगार आहेत ही माहिती मिळाली. मग मी व माझी मैत्रीण मंजु दोघींनी मैत्रीणी, परीचीत यांना आवाहन केले, देेणगी गोळा केली व त्यातील  काही मजुरांना ४/४ दिवसांचा शिधा दिला. खूप समाधान मिळालं. मला वाटतं जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं .

पण हा बदललेला जीवनक्रम लाॕक डाऊन नंतरही  चालू रहायला हवा याची काळजी मला घ्यायची आहे. तरंच या बंदीचा काहीतरी सकारात्म्क शेवट होइल, हो ना?


शनिवार, २१ मार्च, २०२०

कोर्टाची पायरी



'शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलीस चौकीची पायरी चढु नये' असं म्हणतात. पण नेमकं या दोनही ठिकाणी जाण्याची वेळ मी आणि विश्राम ( माझे पती ) दोघांवरही आली. या दोनही ठिकाणांबद्दल खूप नकारात्मकता , टीका मी कायमच ऐकत आलीये. म्हणूनच या दोनही ठिकाणचे अनुभव मला मांडावेसे वाटताहेत.

साधारण २००० सालपासून एका केसच्या संदर्भात त्यानंतर  सतत पंधरा वर्षे आम्हांला न्यायालयात जावे लागले. या काळात न्यायालयाचे कामकाज, निकालाला लागणारा वेळ, मा.न्यायाधीशांच्या, वकीलांच्या कामाची पध्दत, न्यायालयावरचा ताण हे सर्व जवळून पाहता आले. २००० साली पहिल्यांदा जेव्हा एका प्रकरणाच्या निमीत्ताने न्यायालयात जायची वेळ आमच्यावर आली तेव्हा मनावर प्रचंड  दडपण आले होते. त्या दिवशी मा. न्यायाधीशांसमोर  साक्षीदाराच्या पिंजऱ्यात  नव्हे कठड्यात 😊 उभे  राहून आपल्याला बोलावं लागणार असा आमचा समज झाला होता. प्रत्यक्षात हा गोड गैरसमज आहे हे थोड्याच वेळात आमच्या लक्षात आले. असं उभं राहून बोलायला तीन वर्ष जावी लागली. पण  प्रथमच न्यायालयात जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा तिथे तीन प्रवेशद्वारे असल्याचे  दिसले. नक्की कुठून प्रवेश करावा  याबद्दल आमचा  गोंधळच उडाला. शेवटी वकीलांना फोन करुन विचारले व त्यांनी सांगीतलेल्या दारातून आत प्रवेश केला. आत शिरता क्षणीच  न्यायालयाचे  खूप मोठे आवार दृष्टीस पडले. कायद्यासारखा रुक्ष विषय हाताळणार्या या विभागात हिरवळ, मोठ्ठाले सावली देणारे वृक्ष पाहून  आम्हालाआश्चर्यच वाटले. माझ्या कल्पनेतलं जे  न्यायालय होतं त्यापेक्षा हे  चित्र खूप वेगळं होतं.  न्यायालयाची इमारत ब्रिटीशकालीन , भव्य व दगडी आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत चार प्रकारची न्यायालये आहेत,( small cause court, criminal court, district court & civil court).  एकदा आपलं प्रकरण न्यायालयात  दाखल झालं   की ते कुठल्या प्रकारचं आहे ते पाहून त्या त्या न्यायालयात व वेगवेगळ्या  मा.न्यायाधीशांकडे वर्ग केलं जातं. एखाद्या महाविद्यालयात जसे वर्ग असतात तशाच खोल्या या दुमजली इमारतीत आहेत. प्रत्येक खोली म्हणजे एक न्यायालय. बाहेरच्या बाजूला बोर्डवर तेथील मा. न्यायाधीशांचे नाव लिहीलेले असते त्यामुळे पक्षकारांना आपले न्यायालय शोधणे सोपे होते. या खोल्यांच्या म्हणजेच न्यायालयाच्या  आतल्या बाजूला थोडं उंचावर मा.न्यायाधीशांची बसण्याची जागा असते , एका बाजूला  संगणकावर असणारा एक लिपीक व दुसर्या बाजूला भाउसाहेब . भाउसाहेब म्हणजे न्यायालयात दाखल होणार्या सर्व प्रकरणांचे रेकाॕर्ड ठेवणारे व तारीख देणारे न्यायाधीशांचे मदतनीस. न्यायालयासाठी ही खूप महत्वाची व्यक्ती. थोड्याशा खालच्या पातळीवर साक्षीदारासाठी एक कठडा व बाजूला वकीलांसाठी जागा असते. याच खोलीत न्यायाधीशांसाठी वेगळा कक्ष ही असतो, तिथे मा. न्यायाधीश विश्रांती घेऊ शकतात किंवा कामकाजही करु शकतात.. चित्रपटात जसं एकदम चकाचक व पाॕश कोर्ट दाखवतात तसं इथे काहीच नसतं. खूपच साधेपणा  इथे दिसतो. पण खिडक्या खूप मोठ्या व भरपूर झाडे, दगडी भिंती यामुळे उजेड व वारा मात्र चांगला आहे. न्यायालयात मोबाईलला बंदी आहे, म्हणजे  तो वाजलेला अजिबात चालत नाही. जर चुकून वाजलाच  तर जप्त केला जातो.  एका प्रकरणाचा निकाल लागायला साधारण ४ ते ५ वर्ष लागतात. आपण खूप सहजपणे  या विलंबाबद्दल  टिका करत असतो,  स्वतः मी सुध्दा करायचे . या संदर्भात  एका चित्रपटातील तारीख पे तारीख..तारीख पे तारीख हा  संवाद खूप प्रसिध्द आहे.पण न्यायालयाचा १० वर्षाहून जास्त अनुभव  घेतल्यावर यामागचं कारण माझ्या लक्षात आलं. एक मा. न्यायाधीश रोज कमीतकमी ७० ते ८० प्रकरणं ( कदाचित यापेक्षाही जास्त ) हाताळत असतात, वकीलांचे  युक्तीवाद ऐकत असतात. यावरुन त्यांच्यावर किती  ताण असेल याची कल्पनाच केलेली बरी. न्यायालयात गेल्यावर इकडे तिकडे काळ्या कोटातील वकीलच वकील या न्यायालयातून त्या न्यायालयात जाताना दिसतात.एका वेळी अनेक प्रकरणं हाताळत असल्याने त्यांची धावपळ चाललेली दिसते. फौजदारी कोर्टाची इमारतही तिथेच असल्याने  अनेक वेळा मी पोलीसांना हातकड्या लावलेल्या कैद्यांना  सुनावणीसाठी घेऊन  जाताना पाहीलेलं आहे. सुरवातीला मला फार उत्सुकता असायची त्यांना पाहण्याची पण नंतर नंतर त्याची पण सवय होऊन गेली. कैद्यांना  न्यायालयातच भेटायला त्यांचे नातेवाईक ताटकळलेले असायचे. ते पाहून अनेक वेळा त्यांच्याशी बोलावे असे मला वाटायचे. न्यायालयाची वेळ ११ ते ५ असते. कित्येक वेळा वकीलांचा युक्तीवाद दोन दोन तास चालतो . एका वेळेस इतकी प्रकरणं हाताळताना, युक्तीवाद ऐकताना मा. न्यायाधीशांवर किती ताण येत असेल याची कल्पना यायला हरकत नाही. आपली न्यायव्यवस्था इतक्या ताणातही चांगलं काम करतीये याचा खरंच खूप अभिमान वाटतो.

काही वर्षांपूर्वी आमच्या घरात एक चोरी झाली. खिडकीचे गज वाकवून , गोदरेजचं कपाट फोडून घरातले सोन्याचे दागीने चोरीला गेले.भर दिवसा ही चोरी झाली. आम्ही कोणीच घरात नव्हतो. त्यावेळी  नाइलाजाने पोलीस चौकीत जायचा प्रसंग आला. पोलीसांबद्दल खूप नकारात्मक गोष्टी आपल्या कानावर येत असतात , चित्रपटांमधेही तसंच दाखवलं जातं. तिथे जाताना याच सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या. पण आम्हाला आलेला अनुभव खूपच चांगला होता. आत शिरल्या शिरल्या पोलीसांनी  व्यवस्थीत बसवून चौकशी केली व तातडीने  ते आमच्याबरोबर घरी आले. चोरीच्या पध्दतीवरुन त्यांना चोरी कोणी केली असेल याचा अंदाज आला. त्यांच्या सतर्कतेमुळे चोर केवळ १० दिवसात पकडला गेला .पण दरम्यानच्या काळात  ते आमच्या मोबाईलवर जे काही updates असतील ते सतत  कळवत होते, आम्ही काही चौकशी केली तर व्यवस्थीत उत्तरे देत होते. केवळ त्यांच्यामुळेच चोरी गेलेल्या सोन्यापैकी काही सोनं आम्हाला परत मिळू शकलं आणि  पोलीसांबद्दलचं आमचं मत बदललं.    पण या काळात  लोकांचा मात्र खूप वेगळाच अनुभव आम्हाला आला.  त्यांच्या दृष्टीने सोनं चोरीला गेलं याला जबाबदार मीच (स्त्री म्हणून)ठरले.  सोनं कशाला घरात ठेवलं, इतकं सोनं कोणी घरात ठेवतं का, माझं घरात लक्ष नाही, घरातल्या लाॕकरमधे का नाही ठेवलं( लाॕकरमधूनच चोरीला गेलं),  तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे  तर  सोनं चोरीला गेलंच नाहीये, खोटं बोलताहेत हे लोक🤔. अर्थातच अशा बोलण्याकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नसतो.

न्यायालय आणि पोलीस चौकी या दोनही ठिकाणचा आमचा अनुभव नक्कीच आम्हाला खूप काही शिकवून गेलाय यात काही शंकाच नाही. मला वाटतं अशा ठिकाणी जायची वेळच फारशी आपल्यावर येत नाही किंवा  खूप कमी वेळा तिथे जावे लागते  म्हणून मग आपण कोणाच्या तरी ऐकीव अनुभवांवरुन आपले मत बनवतो  व अशा पूर्वग्रहांनी  त्यांच्याकडे पाहतो, प्रत्यक्षात तसं नेहमीच असतं असं काही नाही, नाही का.

® अंजली विश्राम



शनिवार, ७ मार्च, २०२०

# माझ्यासाठी _ ती


                               # माझ्यासाठी _ ती

‘ ती’चा जन्म झाला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. ती वाढत होती , तिच्याबरोबर मीही मोठी होत होते .तिच्या  वयाचा प्रत्येक टप्पा मी तिच्या बरोबरीने , तिच्याएवढ्याच उत्साहाने अनुभवलाय. कधी तिची जिद्द पाहून चक्रावून गेलीये, कधी तिच्यातला धीटपणा पाहून आश्चर्यचकित झालीये. कधीकधी तिच्यातली सकारात्मकता, खंबीरपणा मला स्तिमीत करतो, तिची जगाकडे पाहण्याची दृष्टी पाहून मी अचंभीत होते.  ती आली, तिला पाहीलं, तिने जिंकलं.....

‘ती ‘ माझ्या कुशीत आली तो दिवस कसा विसरता येईल?. गोरा गुलाबी रंग, टपोरे डोळे, गुबगुबीत पण डोक्यावर मात्र फक्त मोजून चार केस.या केसांमुळे मी काळजीतच पडले. ती हळूहळू मोठी होत होती.सगळ्या घराची लाडकी बनली.  आता तिच्यापेक्षा फक्त चार वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या मुलाला मला जपायचं होतः. या दोघांच्या जन्माच्या आधी मी खूप अबोल होते.  माहेरी असताना एका चौकटीत जगायची सवय झाली होती. कोणाशी काय बोलायचे ते मला उमजायचेच नाही.   घरात कोणी पाहुणे आले तर मी गप्प गप्पच असायची . त्याच्या मागचं कारण वेगळंच होतं पण लोकांना वाटायचं ही खूप शिष्ठ आहे.  पण ‘ ती ‘ आली आणि तिच्याशी खूप बोबडं बोबडं  बोलायला लागले . तिला गोष्टी खूप आवडायच्या, गाणी आवडायची. मग तिला खूप गोष्टी सांगायचे, बडबडगीतं म्हणून दाखवायचे. तिला ते खूप आवडायचे. तिच्याबरोबर असताना मी फक्त आईच असायचे, तिथे मला कुणी जज करायला नव्हते. तिच्यासाठी ‘मी’ खास होते . माझा आवाज चांगला आहे, मला गाणी चांगली म्हणता येतात, आवडतात हे त्या वेळी जाणवले. तिच्याशी बोलताना, गाणं म्हणताना, गोष्टी सांगताना मग मी हळूहळू मोकळी होत गेले, व्यक्त व्हायला शिकले.
‘ती’ आता मोठी होत होती. तिच्या शाळा प्रवेशाची वेळ आली. ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता तिथे पालकांनी गीतेचा सोळावा अध्याय म्हणून दाखवायचा होता. तरच प्रवेश मिळणार होता. मला पाठ करता येईल? एवढा मोठा अध्याय लक्षात राहील? सगळ्यांसमोर म्हणुन दाखवता येईल? अनेक शंका मनात आल्या. पण आश्चर्य म्हणजे  अगदी थोड्याच दिवसात अध्याय पाठ करुन पहिल्याच दिवशी मी चक्क सगळ्यांसमोर म्हणुन दाखवला आणि  तिचा प्रवेश निश्चित झाला.  विश्वासच बसेना कारण स्वतःला खूप कमी लेखायची सवय होती मला. पण आपली स्मरणशक्ती इतकी पण कमजोर नाहीये याची मला जाणीव झाली, आत्मविश्वास वाढला.
पुढे तिची बालवाडीची शाळा सुरु झाली. ती जात्याच खूप धीट आहे याचं मला भारी कौतुक वाटायचं. आपल्यासारखी घाबरट होऊ नये म्हणून मी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावायची. ती पण प्रत्येक स्पर्धेत उत्साहाने न घाबरता भाग घ्यायची, यश मिळवायची.  पण प्रत्येक स्पर्धेत काहीतरी वेगळेपण हवं म्हणून खूप  वेगवेगळ्या कल्पना मला लढवाव्या लागल्या, त्यावेळी आपल्याला सृजनशीलतेचीही आवड आहे याचा शोध लागला. तिला शाळेत सोडायला जायच्या निमीत्ताने मलाही अनेक जीवाभावाच्या सख्या मिळाल्या. अबोल असल्याने कमी मैत्रीणी असणारी मी  सुध्दा तिच्याबरोबर वाढत होते, खुलत होते.
आता थोडीथोडी ‘ती’ मोठी व्हायला लागली. शाळेत कधी कमी मार्क्स मिळायचे, कधी मैत्रीणींशी भांडणं व्हायची. कधी तिला शाबासकी मिळायची तर कधीकधी तिला शिक्षकांचाही राग यायचा. कधी आनंदी असायची, कधी रागावलेली, कधी दुःखी. शाळेतून आल्या आल्या हे सगळं तिला सांगायचं असायचं. हे तिचं मोकळं होणं खूप आवडायचं मला. तिला शिक्षकांचा राग आला तर मलाही यायचा. या तिच्या भावनांना काबुत कसं ठेवायचं हे तिला शिकवायला लागायचं पण मी ही ते तिच्याबरोबर शिकतच होते. माझंच लहानपण मी तिच्यात बघत होते.
आता तरुण होत चालली होती ‘ ती ‘. तिचे विचार स्वतंत्र होऊ लागले. आतापर्यंत छोट्यामोठ्या गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून असणारी ‘ती’ पण  माझ्यावरचं तिचं अवलंबून असणं कमी व्हायला लागलं. माझ्यासाठी हा काळ खूप अवघड होता. आता तिला खुले आकाश मिळाल्यासारखं वाटत होतं.  मित्रमैत्रीणींची संख्या, तिचं बाहेर राहणं वाढायला लागलं. आमच्यामधे वाद नित्यनेमाचे व्हायला लागले. तिला माझी कुठलीच गोष्ट पटेनाशी झाली. तिच्यावर या काळात अनेक संकटाचे प्रसंग आले पण तिने ते  माझ्यापर्यंत येऊच दिले नाहीत,तिच्या पातळीवरच तिने हिंमतीने सोडवले. पण स्वभावतः खूप भावनाप्रधान असल्याने त्याचा तिला खूप त्रास व्हायचा.  प्रेम, मत्सर,राग,आनंद, भिती किती भावना सांगु? तिच्याबरोबर या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना  मी ही त्यांना काबुत ठेवायला शिकले. भावनेच्या भरात अनेकवेळा चुकीचे निर्णयही तिने घेतले. कोणी एवढंसं काही बोललं तरी दुखावली जायची. अशा वेळी तिला सावरणं हे मोठ्ठं कौशल्याचं काम असायचं. कधी तिच्या कलाने घेऊन कधी रागावून पण माझी भावनाप्रधानता बाजूला ठेवून मला खंबीर व्हावे लागायचे. तिला सावरता सावरता  या सर्व काळात मी कधी खंबीर झाले ते मला कळलेच नाही.
 या पुढची पाच वर्ष तर तिच्यासाठी परीक्षा घेणारी ठरली. मी नक्की कुठे उभी आहे, माझ्या क्षमता नक्की कुठल्या आहेत, मला पुढे काय करायचंय या भावनिक गोंधळात ती अडकली.  त्या भरात करीअरमधला एक चुकीचा निर्णय घेतला गेला.  त्यामुळे तिचं खूप नुकसानही झालं, वेळही वाया गेला.या सगळ्यातून बाहेर पडतानाचा तिचा लढा मला खूप काही शिकवून गेला. या काळातली तिची धडपड,धावपळ, स्वावलंबन याचबरोबर  तिचा खंबीरपणा, ठामपणा, धीटाई मी नव्याने अनुभवली, तिचं खूप कौतुकही वाटलं.  मुळात कमकुवत असलेली मी तिच्याकडून खूप काही शिकत गेले.
काही काळातच तिला तिचा रस्ता सापडला.नव्या उत्साहाने  त्यावरचा तिचा प्रवास सुरु झाला. आता ती थोडीशी शांत झाली, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे तिच्या आवडीचं क्षेत्र तिला मिळालं होतं. ती आता बहरत चालली होती, खुलली होती.  शंभर टक्के यशस्वी होत तिची वाटचाल सुरु होती. याच काळात अनेक वेळा अन्यायाविरुध्द लढण्याचा तिचा स्वभाव मला प्रकर्षाने जाणवला. मुलगा मुलगी यांच्यात केलेला फरक तिला आवडत नाही.  यासाठी तर तिने काॕलेजमधे, घरातही लढा दिलाय. कित्येकवेळा ती मलाही उशीरा घरी येणे, कपडे घालणे,बाहेर जाणे यामधे मी तिचा भाऊ आणि ती यात करत असलेला भेदभाव दाखवून देत असते. मी ज्या वातावरणात वाढले  त्याप्रमाणे माझ्यासमोर मुलगा व मुलगी यांच्या वागण्यासाठी काही विशीष्ठ नियम होते पण तिने हळूहळू ते मला दाखवून दिले, मला यातून बाहेर पडायला मदत केली. ती जशी मोठी झाली तशा आमच्या भुमिका बदलल्या. एका वेगळ्या खुल्या जगात ती वावरत असल्याने तिचे विचार खूप खुले, मुक्त व ठाम आहेत पण तितकेच ती दुसर्यांचे विचार ऐकायलाही शिकलीये.  आता ती मला शिकवते..आई होऊन. मुलं मोठी झाल्यावर, वयाच्या पंचेचाळीशीत मानसशास्त्रात  M.A.  करायचं होतं पण मला जमेल का, माझ्या लक्षात राहील का अभ्यास, करु की नको या दोलायमान अवस्थेत असताना तिनेच मला विश्वास दिला, माझा आत्मविश्वास वाढवला की तु हे नक्की करु शकशील. त्या बळावरच मी ते करु शकले. त्या काळात मी नसताना तिने सगळं घर सांभाळलं, आजीची काळजी घेतली. एक वेगळीच ‘ती’ माझ्यासमोर आली.
आज आमचं नातं मित्रत्वाचं आहे. माझ्या चुकाही ती मला मोकळेपणाने समजावून सांगते.
मागे वळून पाहताना तिच्या जन्मापासून आजपर्यंत माझ्यामधेही आमुलाग्र बदल झालाय. माझ्याबरोबरच  तिनेही मला  माझ्या  प्रवासात  साथ दिलीये. तिच्या खंबीरपणामुळे मी हळूहळू खंबीर होत गेले. कुठलाही निर्णय घेताना ती गोंधळून जात नाही, ठाम असते. मीही तसं व्हायचा प्रयत्न करते. ती खूप सच्ची आहे, मित्रमैत्रीणींसाठी  काहीही करायला तयार असते. अन्यायाला कायम प्रतिकार करते अगदी समोर कोणीही असो, ती खूप स्पष्टवक्ती आहे, जे मनात ते ओठात, हे सगळं तिच्याकडून शिकायचा मी प्रयत्न मी करत असते.  ती माझी लेक...माझ्यासाठी माझी प्रेरणा, माझं आयुष्य, माझं अस्तित्वच नाही, माझा अंश असलेली ‘ ती, माझी लेक मिताली...अर्थाप्रमाणेच उदार, सक्षम आणि मैत्रीपूर्ण.....


सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

The Terminal

The Terminal ✈️

काही दिवसांपूर्वी Tom Hanks या  अभिनयसम्राटाचा  ‘ The Terminal ‘  हा चित्रपट परत एकदा पाहीला. मी फारसे इंग्रजी चित्रपट पहात नाही पण हा चित्रपट मला फार आवडतो.  न्युयाॕर्कला जाण्यासाठी विक्तोर (मी व्हिक्टरच म्हणते 😊) JFK Inernational Airport वर येतो पण तो न्युयाॕर्कलाही जाऊ शकत नाही आणि त्याच्या देशातही. युध्दामुळे त्याच्या देशाचं अस्तित्व संपून गेल्याने तो Airport वरच अडकून जातो. म्हणजे ‘ न इधरका ना उधरका ‘ अशी त्याची परिस्थिती असते. यात  Airport वरचं वातावरण, तिथली माणसं, त्यांची मानसिकता छान पध्दतीने दाखवली आहे.

हे आठवण्याचं पण एक कारण आहे. गेली काही वर्षं मी सातत्याने प्रवास करतीये, तोही विमानाने . त्यामुळे वेगवेगळ्या विमानतळावरचे वातावरण अनुभवण्याची, निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली.  यात पुणे, दिल्ली, मुंबई, लखनौ, भोपाळ, भटिंडा अशा भारतातल्या काही ठिकाणी मी  गेलीये. सुरवाती सुरवातीला विमानतळावर शिरताना मला फार भारी वाटायचं, आपण कोणीतरी ‘ खास ‘  वगैरे आहोत  असं वाटायचं पण कालांतराने हा गोड गैरसमज दूर होत गेला. विमानप्रवासाचे दर कमी झाल्याने आपल्यासारखे सामान्य लोक याचा फायदा घेउ लागलेत हे मला नंतर जाणवायला लागलं.

 रेल्वेनेही 🚂मी तितकाच प्रवास करते. रेल्वे उशीरा येणं किंवा मला उशीर होणं,चुकीच्या  फलाटावर/ स्थानकावर  उभं राहणं, अक्षरशः पळत पळत रेल्वे/ विमान पकडणं  असे सर्व प्रकार 😄माझे करुन झालेत. स्थानकावर विवीध ठिकाणी जाणार्या गाड्यांसाठी झुंबड उडालेली असते म्हणून बर्याच वेळा मला रेल्वे स्थानक आणि विमानतळ दोन्हीकडची परिस्थिती सारखीच वाटते.अगदी अशीच लोकांची झुंबड आता विमानतळांवरही दिसतेच. कुठल्याही वेळी अगदी मध्यरात्रीही जा, विमानतळ माणसांनी खचाखच भरलेले असते. देशाच्या एका कोपर्यापासून दुसर्या कोपर्यापर्यंत विमाने उपलब्ध आहेत आणि गर्दीही तेवढीच आहे हे पाहून आश्चर्यही वाटते.पण  कुठल्याही विमानतळावर जा तिथलं वातावरण साधारण एकसारखंच असतं. तिथलं खाणं हे आपल्या खिशाला न परवडणारं आहे.  एकदा दिल्लीच्या विमानतळावर आम्ही १८०/- ला एक प्लेट पाणीपुरी घेतली. एकशे ऐंशी भागीले सहा म्हणजे तीस रुपयाला एक पुरी हा हिशोब करत मी पुरी खाल्ली आणि जो ठसका लागला😉 की तो जायचं नाव घेईना. चव म्हणलं तर अगदीच साधारण. स्वच्छता म्हणाल तर समोरुन तर चकाचक पण आत कोणी पाहीलंय, दृष्टीआड सृष्टी.   बाकीचे दर पाहीले तर पुण्यात मैत्रीणींबरोबर गेल्यावर एकत्र जेवढी रक्कम  होईल तेवढ्यात दोघेजण थोडंफार खाउ शकू हे लक्षात आलं.एकदा पाणी न्यायचं विसरले तेव्हा शंभर रु ची बाटली विकत घेताना डोळ्यातून पाणी 😜आले. तेव्हापासून आजतागायत  माझ्याबरोबर कायम खाण्याचा डबा व पाणी असतेच. बाकी एखादी गोष्ट भले विसरली तरी चालेल.
अनेक प्रकारचे प्रवासी  विमान फलाटावर  पहायला मिळतात. सोबत घरचा डबा आणणारे,  cheese burst pizza & Capachino असं  खाणारे,गावातले, स्वतःला ‘extra special’ समजणारे, इंग्लीश फाडणारे, प्रथमच विमानप्रवास करण्यासाठी उत्सुक  असणारे, वृद्ध ,  चाकाच्या खुर्ची  वर बसलेले तर  त्यासाठी लागणार्या  मदतनीसाला नोकर समजून त्यांच्याशी बोलणारे अशा अनेक प्रकारची माणसे. यात पंजाबी, गुजराथी, बंगाली, मराठी, बिहारी इ. अनेक राज्यातले याशिवाय विमानतळा वर येताना मेकअपने सजलेल्या फॕशन क्विन्स, काहीजण एकदम साधे,  माणसांचे किती प्रकार वर्णावे तेवढे कमीच पडतील. प्रत्येकाच्या चेहर्यावरचे भावही वेगवेगळे, चिंताग्रस्त, आनंदी, तणावग्रस्त. हे भाव वाचायची, माणसांचं निरीक्षण करायची मला सवय लागलीये. मग मी कल्पना करायला लागते यांच्या घरी काय झाले असेल, यांना काय ताण असेल, कुठे राहत असतील वगैरे😊. पण यामुळे माझा प्रवास मनोरंजक, सुखकर होतो. मला कधीच कंटाळा येत नाही. उलट एवढी विवीधरंगी, विवीधढंगी माणसं क्वचीतच पहायला मिळतात मग त्यांना वाचायची संधी मिळते.
विमानतळावरची सजलेली दुकाने हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे. यातील वस्तु, कपडे खरंच कोणी विकत घेत असेल? मला तर नेहमीच माझ्यसारखे window shopping करताना बहुतेकजण दिसतात. कारण तिथल्या किंमती अव्वाच्या सव्वा असतात. सगळ्या नामांकीत brands ची दुकाने इतकी सुंदर सजवलेली असतात की कोणाचेही लक्ष जायलाच पाहीजे.पण ती चालतात का , चालत नसतील तर ती चालु कशी ठेवत असतील? म्हणजेच ती चालत असणार असा निष्कर्ष मी काढला. आपल्या मात्र खिशाला परवडणारं नाही  हे एक सत्य आहे.
भारतातील प्रत्येक सणांना इथे सजावट करतात. ती इतकी सुंदर असते की डोळ्यांचे पारणे फिटेल. दिवाळीला रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, नाताळमधे सुंदर  व भव्य christmas tree, नवीन वर्षी  आकर्षक रोषणाई, फुगे यामुळे लोक फोटो,selfie काढत असतात.

विमानासाठी थांबलेले लोक एकतर खात असतात किंवा  आपल्या मोबाईलमधे, लॕपटाॕपवरच असतात. कोणी पुस्तक वाचताना फारसं दिसत नाही.

या प्रवासादरम्यान एक गोष्ट मला नक्कीच जाणवली की भारतात विमानाने प्रवास करणार्यांची संख्या प्रचंड वाढलीये. अनेक शहरे, राज्ये व देश एकमेकांशी जोडली गेलीयेत. आता सगळा देश आपल्या आवाक्यात आहे असं वाटतं. एकमेकांच्या संस्कृतीशी ओळख होते, आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण होते. आपल्या कुठल्यही प्रवासात वेगवेगळ्या संस्कृतीचे, राज्याचे आपले सहप्रवासी असतात.  राज्य, भाषा कुठलीही असो शेवटी माणूस सगळीकडे सारखाच असतो हे सत्य अशा ठिकाणी प्रत्ययाला येते.
इतक्या झपाट्याने प्रगती करत असलेल्या, विवीधतेने नटलेला, आर्थिकदृष्ट्या सधन असलेला आपला देश या प्रवासात एकीकडे पहायला मिळतो  पण त्याचवेळी रेल्वेने प्रवास करत असताना रुळाच्या दोन्ही बाजूला पसरलेली गरीबी, अस्वच्छता, अशिक्षीतपणा याकडे पाहवत नाही. चकाचक, स्वच्छ , झगमगलेले विमानतळ एका बाजूला तर अस्वच्छता, कचरा,दुर्गंधीने भरलेले रेल्वेस्टेशन व आसपासचे वातावरण दुसर्या बाजूला. कुणीतरी म्हणलंय ना इंडिया आणि भारत वेगवेगळे आहेत हे सगळं डोळ्याला दिसतं, फरक जाणवतो आणि मग मनाला पटायला लागतं. कसा समन्वय साधणार आहोत आपण या दोन्हीत??? खूप काही करायला हवंय......आपल्यालाच....

@ सौ. अंजली जोगळेकर .