'शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलीस चौकीची पायरी चढु नये' असं म्हणतात. पण नेमकं या दोनही ठिकाणी जाण्याची वेळ मी आणि विश्राम ( माझे पती ) दोघांवरही आली. या दोनही ठिकाणांबद्दल खूप नकारात्मकता , टीका मी कायमच ऐकत आलीये. म्हणूनच या दोनही ठिकाणचे अनुभव मला मांडावेसे वाटताहेत.
साधारण २००० सालपासून एका केसच्या संदर्भात त्यानंतर सतत पंधरा वर्षे आम्हांला न्यायालयात जावे लागले. या काळात न्यायालयाचे कामकाज, निकालाला लागणारा वेळ, मा.न्यायाधीशांच्या, वकीलांच्या कामाची पध्दत, न्यायालयावरचा ताण हे सर्व जवळून पाहता आले. २००० साली पहिल्यांदा जेव्हा एका प्रकरणाच्या निमीत्ताने न्यायालयात जायची वेळ आमच्यावर आली तेव्हा मनावर प्रचंड दडपण आले होते. त्या दिवशी मा. न्यायाधीशांसमोर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात नव्हे कठड्यात 😊 उभे राहून आपल्याला बोलावं लागणार असा आमचा समज झाला होता. प्रत्यक्षात हा गोड गैरसमज आहे हे थोड्याच वेळात आमच्या लक्षात आले. असं उभं राहून बोलायला तीन वर्ष जावी लागली. पण प्रथमच न्यायालयात जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा तिथे तीन प्रवेशद्वारे असल्याचे दिसले. नक्की कुठून प्रवेश करावा याबद्दल आमचा गोंधळच उडाला. शेवटी वकीलांना फोन करुन विचारले व त्यांनी सांगीतलेल्या दारातून आत प्रवेश केला. आत शिरता क्षणीच न्यायालयाचे खूप मोठे आवार दृष्टीस पडले. कायद्यासारखा रुक्ष विषय हाताळणार्या या विभागात हिरवळ, मोठ्ठाले सावली देणारे वृक्ष पाहून आम्हालाआश्चर्यच वाटले. माझ्या कल्पनेतलं जे न्यायालय होतं त्यापेक्षा हे चित्र खूप वेगळं होतं. न्यायालयाची इमारत ब्रिटीशकालीन , भव्य व दगडी आहे. माझ्या माहितीप्रमाणे आत चार प्रकारची न्यायालये आहेत,( small cause court, criminal court, district court & civil court). एकदा आपलं प्रकरण न्यायालयात दाखल झालं की ते कुठल्या प्रकारचं आहे ते पाहून त्या त्या न्यायालयात व वेगवेगळ्या मा.न्यायाधीशांकडे वर्ग केलं जातं. एखाद्या महाविद्यालयात जसे वर्ग असतात तशाच खोल्या या दुमजली इमारतीत आहेत. प्रत्येक खोली म्हणजे एक न्यायालय. बाहेरच्या बाजूला बोर्डवर तेथील मा. न्यायाधीशांचे नाव लिहीलेले असते त्यामुळे पक्षकारांना आपले न्यायालय शोधणे सोपे होते. या खोल्यांच्या म्हणजेच न्यायालयाच्या आतल्या बाजूला थोडं उंचावर मा.न्यायाधीशांची बसण्याची जागा असते , एका बाजूला संगणकावर असणारा एक लिपीक व दुसर्या बाजूला भाउसाहेब . भाउसाहेब म्हणजे न्यायालयात दाखल होणार्या सर्व प्रकरणांचे रेकाॕर्ड ठेवणारे व तारीख देणारे न्यायाधीशांचे मदतनीस. न्यायालयासाठी ही खूप महत्वाची व्यक्ती. थोड्याशा खालच्या पातळीवर साक्षीदारासाठी एक कठडा व बाजूला वकीलांसाठी जागा असते. याच खोलीत न्यायाधीशांसाठी वेगळा कक्ष ही असतो, तिथे मा. न्यायाधीश विश्रांती घेऊ शकतात किंवा कामकाजही करु शकतात.. चित्रपटात जसं एकदम चकाचक व पाॕश कोर्ट दाखवतात तसं इथे काहीच नसतं. खूपच साधेपणा इथे दिसतो. पण खिडक्या खूप मोठ्या व भरपूर झाडे, दगडी भिंती यामुळे उजेड व वारा मात्र चांगला आहे. न्यायालयात मोबाईलला बंदी आहे, म्हणजे तो वाजलेला अजिबात चालत नाही. जर चुकून वाजलाच तर जप्त केला जातो. एका प्रकरणाचा निकाल लागायला साधारण ४ ते ५ वर्ष लागतात. आपण खूप सहजपणे या विलंबाबद्दल टिका करत असतो, स्वतः मी सुध्दा करायचे . या संदर्भात एका चित्रपटातील तारीख पे तारीख..तारीख पे तारीख हा संवाद खूप प्रसिध्द आहे.पण न्यायालयाचा १० वर्षाहून जास्त अनुभव घेतल्यावर यामागचं कारण माझ्या लक्षात आलं. एक मा. न्यायाधीश रोज कमीतकमी ७० ते ८० प्रकरणं ( कदाचित यापेक्षाही जास्त ) हाताळत असतात, वकीलांचे युक्तीवाद ऐकत असतात. यावरुन त्यांच्यावर किती ताण असेल याची कल्पनाच केलेली बरी. न्यायालयात गेल्यावर इकडे तिकडे काळ्या कोटातील वकीलच वकील या न्यायालयातून त्या न्यायालयात जाताना दिसतात.एका वेळी अनेक प्रकरणं हाताळत असल्याने त्यांची धावपळ चाललेली दिसते. फौजदारी कोर्टाची इमारतही तिथेच असल्याने अनेक वेळा मी पोलीसांना हातकड्या लावलेल्या कैद्यांना सुनावणीसाठी घेऊन जाताना पाहीलेलं आहे. सुरवातीला मला फार उत्सुकता असायची त्यांना पाहण्याची पण नंतर नंतर त्याची पण सवय होऊन गेली. कैद्यांना न्यायालयातच भेटायला त्यांचे नातेवाईक ताटकळलेले असायचे. ते पाहून अनेक वेळा त्यांच्याशी बोलावे असे मला वाटायचे. न्यायालयाची वेळ ११ ते ५ असते. कित्येक वेळा वकीलांचा युक्तीवाद दोन दोन तास चालतो . एका वेळेस इतकी प्रकरणं हाताळताना, युक्तीवाद ऐकताना मा. न्यायाधीशांवर किती ताण येत असेल याची कल्पना यायला हरकत नाही. आपली न्यायव्यवस्था इतक्या ताणातही चांगलं काम करतीये याचा खरंच खूप अभिमान वाटतो.
काही वर्षांपूर्वी आमच्या घरात एक चोरी झाली. खिडकीचे गज वाकवून , गोदरेजचं कपाट फोडून घरातले सोन्याचे दागीने चोरीला गेले.भर दिवसा ही चोरी झाली. आम्ही कोणीच घरात नव्हतो. त्यावेळी नाइलाजाने पोलीस चौकीत जायचा प्रसंग आला. पोलीसांबद्दल खूप नकारात्मक गोष्टी आपल्या कानावर येत असतात , चित्रपटांमधेही तसंच दाखवलं जातं. तिथे जाताना याच सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या. पण आम्हाला आलेला अनुभव खूपच चांगला होता. आत शिरल्या शिरल्या पोलीसांनी व्यवस्थीत बसवून चौकशी केली व तातडीने ते आमच्याबरोबर घरी आले. चोरीच्या पध्दतीवरुन त्यांना चोरी कोणी केली असेल याचा अंदाज आला. त्यांच्या सतर्कतेमुळे चोर केवळ १० दिवसात पकडला गेला .पण दरम्यानच्या काळात ते आमच्या मोबाईलवर जे काही updates असतील ते सतत कळवत होते, आम्ही काही चौकशी केली तर व्यवस्थीत उत्तरे देत होते. केवळ त्यांच्यामुळेच चोरी गेलेल्या सोन्यापैकी काही सोनं आम्हाला परत मिळू शकलं आणि पोलीसांबद्दलचं आमचं मत बदललं. पण या काळात लोकांचा मात्र खूप वेगळाच अनुभव आम्हाला आला. त्यांच्या दृष्टीने सोनं चोरीला गेलं याला जबाबदार मीच (स्त्री म्हणून)ठरले. सोनं कशाला घरात ठेवलं, इतकं सोनं कोणी घरात ठेवतं का, माझं घरात लक्ष नाही, घरातल्या लाॕकरमधे का नाही ठेवलं( लाॕकरमधूनच चोरीला गेलं), तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तर सोनं चोरीला गेलंच नाहीये, खोटं बोलताहेत हे लोक🤔. अर्थातच अशा बोलण्याकडे लक्ष देण्यात काहीच अर्थ नसतो.
न्यायालय आणि पोलीस चौकी या दोनही ठिकाणचा आमचा अनुभव नक्कीच आम्हाला खूप काही शिकवून गेलाय यात काही शंकाच नाही. मला वाटतं अशा ठिकाणी जायची वेळच फारशी आपल्यावर येत नाही किंवा खूप कमी वेळा तिथे जावे लागते म्हणून मग आपण कोणाच्या तरी ऐकीव अनुभवांवरुन आपले मत बनवतो व अशा पूर्वग्रहांनी त्यांच्याकडे पाहतो, प्रत्यक्षात तसं नेहमीच असतं असं काही नाही, नाही का.
® अंजली विश्राम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा