आज लॉकडाउनचा ३३ वा दिवस आहे. गेले ३३ दिवस खरंच मी घरात आहे? काही अपवाद वगळता ,म्हणजे भाजी /किराणा आणण्याशिवाय, मी कुठेच गेलेली नाहीये आणि हे फ़क्त माझ्याच बाबतीत नाही तर सरकारने घालून दिलेले नियम पाळणार्या इतर अनेक जबाबदार नागरीकांचं रुटीन झालंय. सगळ्यांनीच जर आपली जबाबदारी पार पाडली तर कोरोनाला हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही..
गेल्या ३३ दिवसांत मात्रं काही अशा गोष्टी मी केल्या ज्या मी अनेक दिवसांत किंवा महीन्यात केल्या नव्हत्या असं म्हणलं तरी चालेल. त्यातली एक गोष्ट तर याआधी मी एकदाही केली नव्हती ती म्हणजे जयश्रीला म्हणजेच माझ्या बाईला आपणहून दिलेली मोठ्ठी सुट्टी आणि ती सुध्दा अजिबात खळखळ न करता. पैसे तर आपण कोणीच कापत नाही.जेव्हापासुन ती येत नाहीये तेव्हापासुन मी जरा माझ्या घराकडे माझ्या खास चष्म्यातून पहायला लागले . मला आता घराचे असे कोपरे दिसायला लागले जिकडे पहायला जयश्रीला जमत नाही. ओटा, भांडी आणि सगळं घरंच माझा हात फ़िरल्यावर आनंदाने खुलुन गेल्यासारखं दिसायला लागलं. ही सगळी कामं करताना मला खूपच समाधान मिळालं. मला जाणीव झाली की तिच्यावर माझं अवलंबुन राहणं वाढलं आहे. हे कमी करायला हवंय याची मी मनांत नोंद करुन ठेवलीये.
व्यायाम करायला आता मला जिमला जाता येत नाहीये किंवा सकाळी फ़िरायलाही जाता येत नाहीये. थोडे दिवस जरी व्यायाम केला नाही तर वजन वाढायला वेळ लागत नाही माझं. हवा लागली तरी वजन वाढणार्यांच्या श्रेणीमधे मी मोडते. मग वर गच्चीवर जाऊन मी व्यायाम करायचं ठरवलं. एरवी मी महीन्यातुन जेमतेम एकदा तिथे जाते. पण आता गेल्या ३३ दिवसांपासुन मी रोज वर जायला लागलीये. सकाळी सकाळी तिथे इतकं प्रसन्नं वाटतं हे मला याआधी कधी कळलंच नव्हतं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतंय. आमच्या गच्चीला लागून नारळ, गुलमोहोर,सोनचाफ़ा अशी झाडं आहेत. त्यावर सकाळी कोकीळा, भारद्वाज, साळुंकी असे पक्षी येत असतात, थोड्या दुरवरुन नारळाच्या झाडाआडुन दिसणारा सुर्योदय, आकाशात दिसणारे रंग पाहुन दिवसाची सुरवात खुप सकारात्मक , आनंदी होते. अशा वातावरणा्त व्यायामही जास्तं करावासा वाटतो. पण इतक्या वर्षात आपल्याच घरातल्या गच्चीवरुन निसर्गाच्या इतक्या जवळ जाता येते हे मला या ३३ दिवसांतच कळले.
पक्षी मला दिसायला लागल्यावर त्यांना काहीतरी खायला घालावं का? हा विचार माझ्या मनात आला. मग मी लगेच एका ताटलीत त्यांच्यासाठी पोळीचे तुकडे टाकायला सुरवात केली पण पक्षी काही फ़िरकेनात. मग एक दिवस मी भिजवलेली कणिक टाकली आणि काय आश्चर्य ती खायला पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांना पण आवड्निवड असते हे मला माहीतच नव्हते. पण माझ्या मुलांच्या म्हणण्याप्र्माणे माझ्या हातच्या पोळ्या खाण्यापेक्षा कणिक खाल्लेली बरी😄 असा विचार त्यांनी केला असावा. विनोदाचा भाग सोडला तर त्या दिवशीपासुन रोज आता कणिक खायला खुप पक्षी येतात. गेल्या काही दिवसांपासुन तर श्री व सौ भारद्वाजजी त्यांच्या पिलासह यायला लागले आहेत. हे पाहुन इतकं बरं वाटतंय मला. माझ्यासाठी हा खुप नविन व आनंददायी अनुभव आहे.
सध्या माझं वाचन कमी झालंय की काय असं मला वाटत होतं. मी मागे दिल्ली एअरपोर्ट वरुन मुंशी प्रेमचंद यांचं ’ गबन ’ हे पुस्तक आणलं होतं . आणलं खरं पण गडबडीत ते आत कुठेतरी कपाटात दडुन बसलं होतं, काही ना काही कारणाने ते वाचायचं राहुनच जात होतं . ते पुस्तक नेमकं आत्ता सापडलं. मग काय लगेच ते वाचायला सुरवात केली. पण मुड लागेना, वाचायला योग्य जागा सापडेना. सहज बागेतल्या झोपाळ्यावर वाचायला बसले आणि अर्धं पुस्तक एका झटक्यात वाचून काढलं. असं खुप दिवसांनी झालं की मी एका बैठकीत एवढं वाचलं. मग त्या दिवशीपासून झोपाळा ही माझी वाचनाची जागा झालीये. झोपाळ्यावर गुलमोहोराच्या झाडाच्या फ़ांद्यांमुळे छान सावली असते. मी तिथे बसले की आमचा लिओ खुप खुश असतो. लगेच माझ्याजवळ येऊन बसतो. शिवाय आमच्या बागेतली झाडे, कुंड्या फ़ुले यामुळे मन प्रसन्नं होतं. लिहायचा, वाचायचा मुड लागतो. आता ही माझी फ़ेवरीट जागा झालीये. या झोपाळ्यावर मी आधीही खुप वेळा बसलीये. भाजी निवडायला किंवा गप्पा मारायला पण आता वाचन व लेखनही या यादीत समाविष्ट झालंय. घरातून बाहेर पडता येत नाही, त्यामुळे बाहेरची कामं नाहीत आणि टी व्ही सारखा पाहवत नाही . म्हणुनच बहुतेक निवांत वेळ मिळायला लागला . एरवी मी अशी झोपाळ्यावर बसायला गेले नसते कदाचित. याशिवाय मी ' स्टोरीटेल ' हे मोबाईल वर एकॲप डाउनलोड करुन घेतलंय. यात चांगल्या लेखकांची मराठी/ हिंदी/ इंग्रजी पुस्तके आॕडीओ स्वरुपात असतात. त्यावरही या काळात मी तीन छान पुस्तके वाचली/ ऐकली. हा अनुभवही खूपच चांगला आहे. अगदी व्यायाम करताना, स्वयंपाक करताना सुध्दा मी ही पुस्तके वाचू/ऐकू शकते. वेगवेगळ्या पाककृती ऐकता ऐकता करताना खूप मजा येते.
घरातील लोकांना सगळ्या कामात, अगदी भांडी, झाडु, फ़रशी पुसणेसह , मदत करताना पाहणे हा आनंददायक अनुभव केवळ या लॅकडाउनमुळेच पहायला मिळाला. मुली नेहमीच मदत करतात. मुलं बाहेरची कामं करतील पण घरातलं काम करायला पहात नाहीत. ही माझी तक्रार या काळात पूर्णपणे दूर झाली. घरातलल्या साफ़सफ़ाई कडे सध्या माझं जातीने लक्ष असल्याने आमचं घर खुप ताजंतवानं , तरतरीत झालंय असं म्हणायला हरकत नाही.
बाहेर पडणे होत नाही म्हणुन खर्चही खूपच कमी झालाय. माझ्या पाकीटात कितीतरी दिवसांपासुन पाच हजार रुपये आहेत , ते संपायचे नावच घेत नाहीयेत. ज्या जीवनावश्यक वस्तु आहेत त्या तर घ्यायला लागतातच तरीही पैसे संपत नाहीयेत. आपण किती कमी वस्तुंमधे , सामानामधे राहु शकतो हे मला वाटतं या दिवसांतच मला कळलं . आपल्या गरजा आपण विनाकारणच इतक्या वाढवून ठेवतो, नको इतके स्वतःला गोंजारतो , लाड करतो याची लख्ख जाणीव मला झाली.
लाॕकडाउन चा त्रास मला होत नाहीये का? तसं अजिबातच नाही. त्रास तर नक्कीच होतोय पण जी परीस्थिती आपण बदलू शकत नाही तिचा जास्तं विचार करुन उपयोगाचं नसतं. आपण निदान घरात बसुन नीट जेवू तरी शकतोय, आपलं पोट तरी भरतोय पण मजुरांचं काय? हाताला काम नाही, खायला अन्नं नाही, त्यांनी काय करायचं? हा विचार आला की वाईट वाटतं, काही सुचत नाही. आपण त्यांच्यासाठी काही करु शकू का? त्यांच्यापर्यंत अन्न कसं पोचवू शकू? थोडी विचारपूस , चौकशी केली आणि मार्ग सापडला. उत्तरप्रदेश मधील काही मजुर ऊपाशी आहेत, त्यांना खायला अन्न नाहीये, साधारण वीस कामगार आहेत ही माहिती मिळाली. मग मी व माझी मैत्रीण मंजु दोघींनी मैत्रीणी, परीचीत यांना आवाहन केले, देेणगी गोळा केली व त्यातील काही मजुरांना ४/४ दिवसांचा शिधा दिला. खूप समाधान मिळालं. मला वाटतं जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं .
पण हा बदललेला जीवनक्रम लाॕक डाऊन नंतरही चालू रहायला हवा याची काळजी मला घ्यायची आहे. तरंच या बंदीचा काहीतरी सकारात्म्क शेवट होइल, हो ना?


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा