# माझ्यासाठी _ ती
‘ ती’चा जन्म झाला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. ती वाढत होती , तिच्याबरोबर मीही मोठी होत होते .तिच्या वयाचा प्रत्येक टप्पा मी तिच्या बरोबरीने , तिच्याएवढ्याच उत्साहाने अनुभवलाय. कधी तिची जिद्द पाहून चक्रावून गेलीये, कधी तिच्यातला धीटपणा पाहून आश्चर्यचकित झालीये. कधीकधी तिच्यातली सकारात्मकता, खंबीरपणा मला स्तिमीत करतो, तिची जगाकडे पाहण्याची दृष्टी पाहून मी अचंभीत होते. ती आली, तिला पाहीलं, तिने जिंकलं.....
‘ती ‘ माझ्या कुशीत आली तो दिवस कसा विसरता येईल?. गोरा गुलाबी रंग, टपोरे डोळे, गुबगुबीत पण डोक्यावर मात्र फक्त मोजून चार केस.या केसांमुळे मी काळजीतच पडले. ती हळूहळू मोठी होत होती.सगळ्या घराची लाडकी बनली. आता तिच्यापेक्षा फक्त चार वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या मुलाला मला जपायचं होतः. या दोघांच्या जन्माच्या आधी मी खूप अबोल होते. माहेरी असताना एका चौकटीत जगायची सवय झाली होती. कोणाशी काय बोलायचे ते मला उमजायचेच नाही. घरात कोणी पाहुणे आले तर मी गप्प गप्पच असायची . त्याच्या मागचं कारण वेगळंच होतं पण लोकांना वाटायचं ही खूप शिष्ठ आहे. पण ‘ ती ‘ आली आणि तिच्याशी खूप बोबडं बोबडं बोलायला लागले . तिला गोष्टी खूप आवडायच्या, गाणी आवडायची. मग तिला खूप गोष्टी सांगायचे, बडबडगीतं म्हणून दाखवायचे. तिला ते खूप आवडायचे. तिच्याबरोबर असताना मी फक्त आईच असायचे, तिथे मला कुणी जज करायला नव्हते. तिच्यासाठी ‘मी’ खास होते . माझा आवाज चांगला आहे, मला गाणी चांगली म्हणता येतात, आवडतात हे त्या वेळी जाणवले. तिच्याशी बोलताना, गाणं म्हणताना, गोष्टी सांगताना मग मी हळूहळू मोकळी होत गेले, व्यक्त व्हायला शिकले.
‘ती’ आता मोठी होत होती. तिच्या शाळा प्रवेशाची वेळ आली. ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता तिथे पालकांनी गीतेचा सोळावा अध्याय म्हणून दाखवायचा होता. तरच प्रवेश मिळणार होता. मला पाठ करता येईल? एवढा मोठा अध्याय लक्षात राहील? सगळ्यांसमोर म्हणुन दाखवता येईल? अनेक शंका मनात आल्या. पण आश्चर्य म्हणजे अगदी थोड्याच दिवसात अध्याय पाठ करुन पहिल्याच दिवशी मी चक्क सगळ्यांसमोर म्हणुन दाखवला आणि तिचा प्रवेश निश्चित झाला. विश्वासच बसेना कारण स्वतःला खूप कमी लेखायची सवय होती मला. पण आपली स्मरणशक्ती इतकी पण कमजोर नाहीये याची मला जाणीव झाली, आत्मविश्वास वाढला.
पुढे तिची बालवाडीची शाळा सुरु झाली. ती जात्याच खूप धीट आहे याचं मला भारी कौतुक वाटायचं. आपल्यासारखी घाबरट होऊ नये म्हणून मी तिला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावायची. ती पण प्रत्येक स्पर्धेत उत्साहाने न घाबरता भाग घ्यायची, यश मिळवायची. पण प्रत्येक स्पर्धेत काहीतरी वेगळेपण हवं म्हणून खूप वेगवेगळ्या कल्पना मला लढवाव्या लागल्या, त्यावेळी आपल्याला सृजनशीलतेचीही आवड आहे याचा शोध लागला. तिला शाळेत सोडायला जायच्या निमीत्ताने मलाही अनेक जीवाभावाच्या सख्या मिळाल्या. अबोल असल्याने कमी मैत्रीणी असणारी मी सुध्दा तिच्याबरोबर वाढत होते, खुलत होते.
आता थोडीथोडी ‘ती’ मोठी व्हायला लागली. शाळेत कधी कमी मार्क्स मिळायचे, कधी मैत्रीणींशी भांडणं व्हायची. कधी तिला शाबासकी मिळायची तर कधीकधी तिला शिक्षकांचाही राग यायचा. कधी आनंदी असायची, कधी रागावलेली, कधी दुःखी. शाळेतून आल्या आल्या हे सगळं तिला सांगायचं असायचं. हे तिचं मोकळं होणं खूप आवडायचं मला. तिला शिक्षकांचा राग आला तर मलाही यायचा. या तिच्या भावनांना काबुत कसं ठेवायचं हे तिला शिकवायला लागायचं पण मी ही ते तिच्याबरोबर शिकतच होते. माझंच लहानपण मी तिच्यात बघत होते.
आता तरुण होत चालली होती ‘ ती ‘. तिचे विचार स्वतंत्र होऊ लागले. आतापर्यंत छोट्यामोठ्या गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून असणारी ‘ती’ पण माझ्यावरचं तिचं अवलंबून असणं कमी व्हायला लागलं. माझ्यासाठी हा काळ खूप अवघड होता. आता तिला खुले आकाश मिळाल्यासारखं वाटत होतं. मित्रमैत्रीणींची संख्या, तिचं बाहेर राहणं वाढायला लागलं. आमच्यामधे वाद नित्यनेमाचे व्हायला लागले. तिला माझी कुठलीच गोष्ट पटेनाशी झाली. तिच्यावर या काळात अनेक संकटाचे प्रसंग आले पण तिने ते माझ्यापर्यंत येऊच दिले नाहीत,तिच्या पातळीवरच तिने हिंमतीने सोडवले. पण स्वभावतः खूप भावनाप्रधान असल्याने त्याचा तिला खूप त्रास व्हायचा. प्रेम, मत्सर,राग,आनंद, भिती किती भावना सांगु? तिच्याबरोबर या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना मी ही त्यांना काबुत ठेवायला शिकले. भावनेच्या भरात अनेकवेळा चुकीचे निर्णयही तिने घेतले. कोणी एवढंसं काही बोललं तरी दुखावली जायची. अशा वेळी तिला सावरणं हे मोठ्ठं कौशल्याचं काम असायचं. कधी तिच्या कलाने घेऊन कधी रागावून पण माझी भावनाप्रधानता बाजूला ठेवून मला खंबीर व्हावे लागायचे. तिला सावरता सावरता या सर्व काळात मी कधी खंबीर झाले ते मला कळलेच नाही.
या पुढची पाच वर्ष तर तिच्यासाठी परीक्षा घेणारी ठरली. मी नक्की कुठे उभी आहे, माझ्या क्षमता नक्की कुठल्या आहेत, मला पुढे काय करायचंय या भावनिक गोंधळात ती अडकली. त्या भरात करीअरमधला एक चुकीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे तिचं खूप नुकसानही झालं, वेळही वाया गेला.या सगळ्यातून बाहेर पडतानाचा तिचा लढा मला खूप काही शिकवून गेला. या काळातली तिची धडपड,धावपळ, स्वावलंबन याचबरोबर तिचा खंबीरपणा, ठामपणा, धीटाई मी नव्याने अनुभवली, तिचं खूप कौतुकही वाटलं. मुळात कमकुवत असलेली मी तिच्याकडून खूप काही शिकत गेले.
काही काळातच तिला तिचा रस्ता सापडला.नव्या उत्साहाने त्यावरचा तिचा प्रवास सुरु झाला. आता ती थोडीशी शांत झाली, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे तिच्या आवडीचं क्षेत्र तिला मिळालं होतं. ती आता बहरत चालली होती, खुलली होती. शंभर टक्के यशस्वी होत तिची वाटचाल सुरु होती. याच काळात अनेक वेळा अन्यायाविरुध्द लढण्याचा तिचा स्वभाव मला प्रकर्षाने जाणवला. मुलगा मुलगी यांच्यात केलेला फरक तिला आवडत नाही. यासाठी तर तिने काॕलेजमधे, घरातही लढा दिलाय. कित्येकवेळा ती मलाही उशीरा घरी येणे, कपडे घालणे,बाहेर जाणे यामधे मी तिचा भाऊ आणि ती यात करत असलेला भेदभाव दाखवून देत असते. मी ज्या वातावरणात वाढले त्याप्रमाणे माझ्यासमोर मुलगा व मुलगी यांच्या वागण्यासाठी काही विशीष्ठ नियम होते पण तिने हळूहळू ते मला दाखवून दिले, मला यातून बाहेर पडायला मदत केली. ती जशी मोठी झाली तशा आमच्या भुमिका बदलल्या. एका वेगळ्या खुल्या जगात ती वावरत असल्याने तिचे विचार खूप खुले, मुक्त व ठाम आहेत पण तितकेच ती दुसर्यांचे विचार ऐकायलाही शिकलीये. आता ती मला शिकवते..आई होऊन. मुलं मोठी झाल्यावर, वयाच्या पंचेचाळीशीत मानसशास्त्रात M.A. करायचं होतं पण मला जमेल का, माझ्या लक्षात राहील का अभ्यास, करु की नको या दोलायमान अवस्थेत असताना तिनेच मला विश्वास दिला, माझा आत्मविश्वास वाढवला की तु हे नक्की करु शकशील. त्या बळावरच मी ते करु शकले. त्या काळात मी नसताना तिने सगळं घर सांभाळलं, आजीची काळजी घेतली. एक वेगळीच ‘ती’ माझ्यासमोर आली.
आज आमचं नातं मित्रत्वाचं आहे. माझ्या चुकाही ती मला मोकळेपणाने समजावून सांगते.
मागे वळून पाहताना तिच्या जन्मापासून आजपर्यंत माझ्यामधेही आमुलाग्र बदल झालाय. माझ्याबरोबरच तिनेही मला माझ्या प्रवासात साथ दिलीये. तिच्या खंबीरपणामुळे मी हळूहळू खंबीर होत गेले. कुठलाही निर्णय घेताना ती गोंधळून जात नाही, ठाम असते. मीही तसं व्हायचा प्रयत्न करते. ती खूप सच्ची आहे, मित्रमैत्रीणींसाठी काहीही करायला तयार असते. अन्यायाला कायम प्रतिकार करते अगदी समोर कोणीही असो, ती खूप स्पष्टवक्ती आहे, जे मनात ते ओठात, हे सगळं तिच्याकडून शिकायचा मी प्रयत्न मी करत असते. ती माझी लेक...माझ्यासाठी माझी प्रेरणा, माझं आयुष्य, माझं अस्तित्वच नाही, माझा अंश असलेली ‘ ती, माझी लेक मिताली...अर्थाप्रमाणेच उदार, सक्षम आणि मैत्रीपूर्ण.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा