आठवणीतलं घर🏚️🌈
आमच्या ग्रुपवर माझ्या मैत्रिणीने , शुभदाने हा विषय दिला आणि मन लगेच या घरांचा फेरफटका मारुन आलं.
सर्वात पहिलं आठवणीतलं घर (सगळ्यांसाठीच )जिथे आपण लहानाचे मोठे होतो. माझं लहानपण एका सदाशिवपेठेतल्या वाड्यात गेलं हे मी अनेकवेळा लिहीलेलं आहेच. अगदी मध्यवस्तीतल्या या घराचा म्हणजे जुना ३१९, नविन १२२४, सदाशिव पेठ, करंदीकर वाडा, पेरुगेट पोलीस चौकीशेजारी असा पत्ता होता. होता असं मी म्हणतीये कारण आता वाड्यात कोणीच रहात नाही. वाड्याच्या दरवाजाला एक छोटी खिडकी होती त्याला आम्ही दिंडी म्हणायचो.त्याची किल्ली प्रत्येक बिर्हाडाकडे असायची.रात्री उशीर झाला तर कुलूप उघडून हात घालायचा आणि वाड्याचं दार उघडायचं. वाड्याचे मालक अप्पा रात्री नऊला दरवाजा बंद करायचे. पहिल्या मजल्यावर आमची भाड्यची एक खोली होती .वर जायला सोळा पायर्या होत्या. त्याचं भाडं वीस रु. होतं माझ्या आठवणीत. खोली लहान होती पण बाहेर एक सामाईक मोठी गॕलरी होती. आमच्या भागात आम्ही एक काॕट, खुर्च्या ठेवल्या होत्या. ही गॕलरी माझी अत्यंत लाडकी जागा. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कुठल्याही वेळी माझा ठिय्या गॕलरीतच. तिथे उभं राहीलं की लक्ष्मी रोड आणि टिळकरोड अशा दोन्ही दिशांकडे स्पष्ट पाहता यायचं.तापलेलं ऊन असो की मुसळधार पाऊस कुठल्याही वेळा गॕलरीत गेलं तरी ती तितकीच आपलीशी वाटायची. बरोबर कोणी असो की नसो गॕलरीत रस्त्याकडे पहात उभं राहीलं की तास दोन तास सहज निघून जायचे. तिथे कधीच एकटेपणा जाणवायचा नाही.मी तर बाराही महिने गॕलरीतच झोपायची. आमची खोली खूप लहान असली तरी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे आमची गॕलरी.माझ्या लहानपणीची भांडणं, रुसवेफुगवे, राग,तारुण्यातील स्वप्नं, गुपीतं , दुःख सगळं सगळं मी गॕलरीशी शेअर केलंय . ती माझ्यासाठी खास आहे, माझ्या हृदयाजवळची आहे, इतर कुठल्याही जागेपेक्षा श्रेष्ठ आहे. या वाड्याचं व्यक्तीमत्व मला सर्वसमावेशक वाटतं, अगदी सर्वांना सामावून घेणारं.
दुसरी जागा मला आठवते ती कोरब्याची. सचिनचा जन्म झाला आणि विश्रामची बदली मध्य प्रदेशमधल्या कोरबा या ठिकाणी झाली. तिथे आम्हाला दोन खोल्या काॕलनीच्या मध्यावर मिळाल्या होत्या. काही घरं लहान असली तरी मनाच्या आत घर करुन राहतात त्यातलंच हे एक. लग्नानंतर एका वर्षातच तिकडे गेलो . त्यामुळे तारुण्याची धुंदी, आईपण ,अडीअडचणी त्या घरासोबत मी अनुभवले. त्या घराच्या दारात बाहेर तीन पायर्या होत्या. ती माझी आवडती जागा होती. काम संपलं की तिथे वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या शेजारणींशी गप्पा मारायच्या, सचिनला बाबागाडीत बसवून तिथेच मी त्याला जेवायला घालायची. हे घर खूप उबदार होतं. माझ्या आठवणींच्या उबेने इतक्या वर्षांनंतरही त्याला मी माझं 'comfort zone ' म्हणेन.
आत्ताच्या घराला 'माझं' म्हणायला मधे खूप वर्ष जाउ द्यावी लागली. लग्नं होउन एका खोलीतून एकदम मोठ्या घरात आले. घर बैठं , प्रशस्त होतं पण गॕलरी नसल्यने खूप चुकल्या चुकल्या सारखं झालं. घराचं नाव ' संतोषी व्हिला ' असं छान होतं. तरीपण पेरुगेटचं एका खोलीचं घरच मला आपलं वाटायचं. काळ उलटला, घराच्या साथीने बर्यावाईट प्रसंगांना तोंड दिलं. याच घराने मला माझी ओळख मिळवून दिली, प्रसंगी आधार दिला. काही वास्तु खूप आश्वासक वाटतात. तसंच हे घर आहे. आता हे 'माझं 'घर वाटतं , माणसं तर माझी आहेतच पण घरही आपलंसं वाटतं अगदी त्यातल्या भिंती, टेबल, खुर्ची , भांडी,माझा लिओ यांच्यासकट. इथे खूप सकारात्मकता आहे, समाधान आहे, ते खूप दिलदार आहे..प्रसन्न आहे... आणि माझं आहे
@ अंजली जोगळेकर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा