Shabdanjali......शब्दांजली

सोमवार, ३ मे, २०२१

चुकलेली वाट

 

 चुकलेली वाट

कोमलने डोळे उघडले.तिच्या घशाला कोरड पडल्यासारखी झाली . काही क्षण आपण कुठे आहोत हेच तिला समजेना.  इकडे तिकडे पाहायचा प्रयत्न केला तेव्हा डोक्याशी सलाईन ची बाटली लावलेली दिसली. मी इस्पीतळात आहे की काय या शंकेने तिने उठायचा प्रयत्न केला पण कंबर व  पोटातून जीवघेणी कळ आली . " आई गं " कळवळून ती ओरडली . तिचा आवाज ऐकून एक परीचारीका धावत आली,” हालचाल करू नका ताई, आत्ताच औषध टोचलंय . थांबेल दुखणं थोड्या वेळात”  असं बोलून काही विचारायच्या आधीच  ती घाईघाईत निघून गेली . मी इथे कशी आले, मला काय झालंय  ? काही केल्या  तिला आठवेना. विचार करुन  ती  इतकी शिणून गेली की तिला ग्लानीच आली.  परत जाग आली तेव्हा  शोधक नजरेने  तिनेआजूबाजूला पाहीलं.एका लांबुळक्या खोलीत चार पलंग होते. त्यातील दुसऱ्या पलंगावर ती होती.तिच्या  एका बाजूला एक आजी होत्या  आणि दुसऱ्या बाजूला एक मध्यमवयीन स्त्री होती. आजींजवळ बहुतेक त्यांची मुलगी बसली होती. तिच्या मनातले प्रश्न तिला काही स्वस्थ बसू देईनात. तिने आजींना विचारले,

“आजी, तुम्हाला माहीतीये का कोणी आणून सोडले मला इथे?” 

" हो.अगं मी पण काल दुपारीच इथे  दाखल झाले. काल आमच्या बागेत शेजारच्या लिनाशी बोलता बोलता  पुजेसाठी फुलं काढत होते आणि पाय घसरला, मग काय? माझा मुलगा घेऊन आला इथे. हाड मोडलंय पायाचं."

आजी चांगल्याच बडबड्या होत्या पण कोमलला तिला इथे कोणी आणले हे ऐकायचे होते.

 " हो का? म्हणजे मला आणलं तेव्हा तुम्ही असणार".  

" हो, अगं होते मी. एका बाईंनी आणलं तुला इथे. तुझ्या शेजारी राहतात असं सांगत होत्या काल परीचारीकेला. ही माझी मुलगी आहे बरं का, मी पडलीये कळल्यावर लगेच धावत आली बघ."

शेजारच्या मिनाकाकू घेऊन आल्या वाटतं मला इथे .डोळे मिटून आपल्याला काय झालं होतं हे तिने  आठवायचा प्रयत्न केला. हळूहळू तिला एकएक गोष्ट आठवायला लागली.केतन, प्राजक्ता कुठे आहेत? काय करत असतील दोघं ? खाल्लं असेल का काही? रडून रडून गोंधळ घातला असणार, आईंच्या हातनं तर काहीच होत नाही. तिला खूप काळजी वाटायला लागली.काय करावे ते सुचेना . इतक्यात आजींच्या मुलीच्या हातात तिला भ्रमणध्वनी दिसला. तिने तो थोडा वेळासाठी मागून घेतला आणि घाईघाईने  घरी फोन लावला. सीमाने,  तिच्या नणंदेने फोन उचलला.

 "कोण वहिनी? कशी आहेस?"

" सीमा, तू? तू कधी आलीस?  केतन, प्राजक्ता कसे आहेत? पोरं काल धड जेवली पण नव्हती गं, रडून गोंधळ  घातला असेल ना?"

" वहिनी, नको काळजी करु. दोघंही व्यवस्थित आहेत, मी घातलंय त्यांना जेवायला. काल आईचा फोन आला होता,मला सगळं सांगीतलं तिने.रडत होती सांगताना. मला राहवलं नाही , लगेचच निघाले मग. आता तू घरी येईपर्यंत मी आहे इथे. तू स्वतःची काळजी घे. घराची, मुलांची काळजी करु नको. जेवायचा डबा पाठवून देते मी कोणाबरोबर तरी."

 सीमाशी  बोलणं झालं तशी ती निश्चिंत झाली.पडल्या पडल्या नजरेसमोर  कालचा प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला.


 प्राजक्ताला कडेवर आणि केतनला हाताशी धरून ती संध्याकाळी जवळच्याच बागेत खेळायला घेऊन गेली . मुलांबरोबरच तिलाही थोडी  विश्रांतीची, शांततेची गरज होती. विश्वास नेहमीप्रमाणेच कार्यालयामधे  होता. शेअर बाजार बंद झाला की दिवसभराचा हिशोब संध्याकाळी करायची पध्दत होती त्याची. मुलांची  जबाबदारी घ्यायचे तो कायम टाळायचा . त्याने कधी त्यांना जवळसुध्दा घेतलं नाही ना त्यांच्यासोबत वेळ घालवला. येताजाता त्यांच्यावर राग काढणं एवढं मात्र त्याला करायला यायचं.मुलं मग सतत तिच्या मागेमागे असत. ती पण चार वाजेपर्यंत कार्यालयामधेच असायची. शेअर्सच्या व्यवसायाचा भार पूर्णपणे तिच्यावरच होता .सकाळी ९ ते ४ या वेळात ती अधूनमधून मुले, स्वयंपाक आणि सासुबाई हे सगळं  घरात  येऊनजाऊन बघायची. सासुबाई खूप चांगल्या होत्या, पण गुडघेदुखीमुळे  त्यांना फार काही करता यायचं नाही .त्यातल्या त्यात एक चांगलं होतं कि  कार्यालय घरातच होतं.पण तरीसुध्दा दिवसभर खूप धावपळ व्हायची तिची.  कालही सकाळपासून  विश्वास चा मुड खूपच खराब होता. आजकाल बऱ्याच वेळा तो  तसाच असायचा.  शेअर बाजार काल  अचानकपणे जोरदार गडगडला.  त्यांच्या  ग्राहकांचे यात खूप नुकसान झाले.  संतापलेले  ग्राहक सकाळी कार्यालय  उघडल्यापासूनच येऊन बसले होते.विश्वास आणि त्यांची वादावादी  चालूच होती, संध्याकाळ झाली तरी आरडाओरडा चालूच होता . कार्यालयामध्ये कोमल गेली तेव्हा हा सगळा राग तिच्यावर सर्वांसमोर  काढायला त्याला निमित्तच मिळालं. 

 " कोमल, तुला कधी अक्कल येणार आहे? इतकी वर्षं या व्यवसायात आहेस तरी तुला समजत नाही पैसे कुठे गुंतवावे ?तुझं घरात पण लक्ष नाही आणि धंद्यात पण. Useless.  किती नुकसान सोसु मी तुझ्यामुळे, वैताग आलाय तुझा मला. तुझ्याशी मी लग्नं का केलं कोण जाणे "

 तो ओरडून त्याच्या ग्राहकांसमोर बोलायला लागला तेव्हा  तिला  खूप अपमानास्पद वाटलं. मी सांगेन ते ऐकतोस का कधी?त्या शेअर्समधे गुंतवणूक  करु नको हे बजावून सांगितलं होतं मी तुला तरीसुद्धा तुला हवं तेच तु केलंस, वर दोष मलाच देतोस असं बोलावसं वाटलं तिला पण विश्वासचा रुद्रावतार पाहून ती गप्प बसली. सगळ्यांसमोर हात उचलायलाही कमी केले नसते त्याने.


 दिवसभर हेच चालू होतं म्हणून ती मुलांच्या निमित्ताने बाहेर निघाली. बागेत आल्यावर मुलांचा किलबिलाट ऐकून तिला थोडं बरं वाटलं. केतन व प्राजक्ता  खुश झाले आणि धावत जाऊन झोपाळा खेळायला लागले. समोरच बाकावर मुलांकडे बघत ती बसली .तिच्याही नकळत डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले, तिला ते थांबवताच येईना. सकाळपासूनची घुसमट अश्रूंवाटे बाहेर पडू लागली. समोरच राहाणारा सुमित नेमका त्याच वेळी त्याच्या आजीला न्यायला आला होता. आजी रोज संध्याकाळी बागेतील मंदिरात तासभर येऊन बसत असत. सुमितने तिला रडताना पाहिले आणि तो तिच्याशेजारी बाकावर येऊन बसला.

 "ताई तू ठीक आहेस ना, काय होतंय तुला," 

पण ती बोलायच्या मनःस्थितीत नव्हती. सुमीतनेही जास्त काही न विचारता तिला पाणी दिले आणि आजीला घेऊन तो निघून गेला. तो जातो ना जातो तोच विश्वास अचानक बागेत आला आणि जोरजोरात ओरडायला लागला, 

"आत्ता कोणाशी बोलत होतीस? हेच धंदे करायला येतेस वाटतं इथे.उठ, ताबडतोब घरी चल, बघतो तुला घरी जाऊन" तिला काय करावे ते सुचेना.बागेत आलेले लोक थांबून ,वळूनवळून त्यांच्याकडे पाहू लागले.कसनुसे होत पटकन तिने मुलांना बरोबर घेतले आणि झपाझप  काही तमाशा होण्यापूर्वी  बाहेर पडली. कधी एकदा घरी जातोय असं तिला झालं होतं. घरी पोचताच विश्वासाने परत आरडाओरडा  आणि  सुमित वरून संशय घेण्यास सुरवात केली. त्याने दारू घेतलेली आहे हे तिच्या लक्षात आलं. आता तर त्याला रोज घ्यायची सवयच लागली होती. तरीही

 ,”अरे विश्वास   सुमित किती लहान आहे माझ्यापेक्षा, मी लहान भाऊ  समजते रे त्याला “

तिने बोलायचा प्रयत्न केला. आताशा  तो कोणावरूनही संशय घ्यायचा. आज मात्र  त्याने सीमा ओलांडली , तिचा संताप संताप झाला . पण विश्वासचा ताबा दारूने घेतला होता. त्याने तिला जोरात थोबाडीत मारली. सकाळपासून तिने धड काही खाल्लेही नव्हते  आणि दिवसभराचा ताण याने ती खालीच कोसळली. तरीही त्याचे मारणे थांबत नव्हते. मुले घाबरून रडायला लागली. तिला शेवटचं आठवत होतं ते विश्वास ने तिच्या पोटात जोरात लाथ मारली . त्यानंतरचे  तिला काही आठवत नव्हतं. आत्ता  हे सगळं आठवून तिच्या डोळ्यातून पाणी वहायला लागलं. काय करुन बसले हे मी? माझ्या हातांनीच माझ्या पायावर धोंडा मारुन घेतलाय मी.


 किती वाटा....चुकल्यामुळे चुकलेल्या. आई वडिलांच्या विरोधात जाऊन आपण लग्न केंलं.  विश्वास भरोसा ठेवण्यासारखा नाही, त्याच्याशी लग्न करून तू खूप मोठी चूक करतीयेस हे तिच्या आई वडिलांचा मत तंतोतंत खरं ठरलं होतं. तिच्या वडिलांचा शेअर चा व्यवसाय होता. तिच्या माहेरच्या घराच्या जवळच त्यांचं  कार्यालय होतं .महाविद्यालयात जातायेता किंवा आईचा काही निरोप द्यायचा असेल तर ती तिथे जायची. हे जग तिला आवडत होतं.  पुढे जाऊन मोठ्ठी शेअर ब्रोकर व्हायचं असं तिने ठरवलं होतं. या क्षेत्रात स्त्रीया फारशा नव्हत्या पण आपण यातच यशस्वी व्हायचं अशी तिची इच्छा होती. तसा अभिनयही तिला आवडायचा. पुरुषोत्तम करंडक मध्ये  एका वर्षी तिने अभिनयाचं उत्तेजनार्थ बक्षिसही मिळवलं होतं. पण ते तेवढ्यापुरतंच राहीलं. तिच्या वडीलांनी पण आपला व्यवसाय कोमलला सुपुर्द करायचा असं ठरवलं होतं,तिला त्यांनी त्या  दृष्टीने शिकवायलाही सुरवात केली होती. आपली कारकीर्द  यातच  करायची हा तिचा विचार पक्का होता. महाविद्यालयामधेही ती प्रसिध्द होती.तिची उंची, शेलाटा बांधा आणि रेखासारख्याच तिच्या लांब केसांच्या दोन वेण्या यामुळे बरीच मुले पण तिच्याशी ओळख  करुन घेण्यासाठी धडपडायची.


  तिच्या वडीलांच्या कार्यालयामध्ये त्याच सुमारास विश्वास अर्धं वेळ कामाला यायला लागला. विश्वासची  ओळख तिच्या वडिलांनीचं करून दिलेली तिला आठवत होतं.  विश्वास दिसायला खूपच देखणा होता.त्याची कपड्यांची निवडही चांगली होती. कोमल आॕफीसमधे यायची तेव्हा तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. तिलाही तो आवडला होता. हळूहळू दोघेजण गप्पा मारायला लागले , बाहेर भेटू लागले . कोमलच्या महाविद्यालयामधल्या दांड्या वाढू लागल्या .तिच्या वडलांना मात्र विश्वास कधीच आवडला नाही.  या दोघांमधल्या  मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर झालं ते दोघांनाही कळलंसुध्दा नाही.  कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी घरी त्यांच्या नात्याची कुणकुण लागलीच. तिचे वडील खूप संतापले, त्यांनी कोमलला समजवायचा खूप प्रयत्न केला.

 " हे बघ कोमल, मला समजतंय तु विश्वासच्या प्रेमात पडलीयेस. पण बेटा, तो मुलगा चांगला नाही. त्याचं शिक्षणही जास्त नाहीये. मी माणसांना ओळखतो. म्हणून मी तुला विरोध करतोय. ऐक माझं, भरोसा ठेवण्यासारखा तो मुलगा नाहीये."

 तरीही तिचं त्याला भेटणं चालुच राहीलं. शेवटी तिचं कार्यालयामधे येणं वडीलांनी बंद करुन टाकलं , विश्वासलाही कामावरुन काढून टाकलं. पण विश्वासच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कोमलला ते काय म्हणताहेत ते समजलेच नाही. जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.  तिचे अभ्यासातही मन रमत नव्हते. आईवडील परवानगी देणार नाहीत हे लक्षात येताच दोघांनी आळंदीला जाऊन लग्न केले.

विश्वासच्या घरी ती आली तेव्हा त्याच्या घरी फक्त त्याची आई होती. त्यांनी कोमलचे खूप मनापासून स्वागत केले.  तिला घरातली सगळी कामे, स्वयंपाक शिकवला. लग्नानंतर  सहा महिन्यातच आपले वडील का विरोध करत होते ते तिच्या लक्षात आले. विश्वास जास्त शिकला नव्हता पण छानछोकीशिवाय फारसं काही त्याला येत नव्हते. कोमलला शेअरची, त्या व्यवसायाची  जाण होती  म्हणून तिच्या भरवशावर त्याने व्यवसाय सुरु केला. पण त्यातही तिलाच लक्ष द्यावे लागायचे. विश्वासला त्यात फारशी  गती नव्हती . कोमलच व्यवसाय सांभाळत होती .या सगळ्या संकटात विश्वासची आई मात्र तिच्यामागे खंबीरपणे उभी होती. प्रसंगी आपल्या मुलाला सुनावायलाही त्या मागेपुढे पहायच्या नाहीत.त्यांचा तिला खूप आधार वाटायचा. 

 नव्या नवलाईचे दिवस संपले. केतनच्या वेळेस तिला दिवस गेले. काही वर्षांनी प्राजक्ताचा जन्म झाला  आणि तिचं व्यवसायातलं लक्ष थोडं कमी व्हायला लागलं. विश्वासला  व्यवसाय सांभाळणं फारसं जमत नव्हतं पण त्याचा पुरुषी अहंकार मात्रं हे मान्य करायला तयार नव्हता.आता डोळे बंद केल्यावर सगळे दिवस तिच्या समोर झरझर येऊन उभे राहीले. विश्वासशी लग्न केले नसते तर कदाचित आज  यशस्वी शेअर ब्रोकर झाले असते किंवा अभिनयक्षेत्रात जम बसवला असता. वाट चुकलीच आपली ,ती ओक्साबोक्शी रडायला लागली .रडण्याचा भर ओसरल्यावर तिच्या डोळ्यासमोर मुलांचे चेहरे उभे राहीले आणि ती भानावर आली.मी चूक केली पण त्याची शिक्षा मुलांना का?  मलाच काहीतरी करायला हवे, मला  हातपाय हलवायला हवे, यापुढे असाच अन्याय मी सहन करायचा?  नाही , मला विरोध करायला हवा हा विचार  मनाशी केला आणि सिस्टरला हाक मारली “ मला कधी सोडणार आहात घरी  ?”


घरी आल्या आल्या मुलं तिला येउन चिकटली. आईंनी तिला जवळ घेतले तेव्हा तिच्या मनाचा बांध तुटला व ती त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. त्या खूप समंजस होत्या . “  कोमल, असं कमकुवत होउन कसं चालेल? तुला खंबीर व्हावं लागेल. तु कुठलाही निर्णय घेतलास तरी मी तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव. अजिबात काळजी करु नकोस. “  त्यांच्या शब्दांनी तिला धीर आला. यापुढे काय करायचं  याचा ती विचार करु लागली. आता आपलं आयुष्य आपल्या मुलांसाठी जगायचं .तिने  पक्का  निश्चय केला. काहीतरी मनाशी ठरवत तिने स्वयंपाकाला सुरवात केली. बाहेर दरवाजा आपटल्याचा आवाज आला. विश्वास आल्याचे तिला समजले. 

“ ए, जेवायला वाढ मला , कुठं जाऊन आली दोन दिवस, मित्राबरोबर मजा मारायला? ", 

दारू प्यायलेल्या विश्वासला ती दोन दिवस इस्पीतळात असल्याचे गावी पण नव्हते. तिला वाढायला उशीर झाला तेव्हा स्वयंपाकघरात येऊन तिला मारण्यासाठी त्याने हात उचलला तेव्हा  त्याचा हात वरच्या वर धरत शांतपणे ती म्हणाली,

”  हे बघ विश्वास ,मी आत्ता इस्पीतळातून आलीये. यापुढे तु मला मारणार असलास तर मुलांना घेऊन मी  निघून जाईन नाहीतर तुला तरी घराबाहेर जावं लागेल. दोन्ही परीस्थितीत नुकसान तुझंच आहे. तु शेअर्सचा व्यवसाय करु शकणार नाहीस हे एक सत्य आहे  जे तुला चांगलं माहीत आहे.कारण त्यातलं तुझं ज्ञान शून्य आहे. जो काही व्यवसाय आत्ता चालतोय तो माझ्यामुळे हे लक्षात ठेव.शिवाय तुझ्या खाण्यापिण्याचे वांदे होतील ते वेगळेच . तेव्हा हात खाली करायचा " 

त्याचा हात जोरात हिसडून ती ठामपणे  म्हणाली.तिचा तो आविर्भाव पाहून एकदम गोंधळून, तोंड पाडून तो बाहेर निघून गेला. खुदकन हसून तिने स्वयंपाकघराच्या दारात पाहीले, तिच्या सासुबाईंच्या चेहर्यावर मंद हास्य होतं. चुकलेल्या वाटेतून  योग्य   वाट  तिने शोधली होती .



@ अंजली जोगळेकर 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा