Shabdanjali......शब्दांजली

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

मधला

                                                          मधला

शेवटचा शारीरिक शिक्षणाचा तास सुरु झाला . गावडे सर कवायत घेत होते. अरविंदला कवायत करायचा फार कंटाळा येई. बाकीच्या  मुलांना मात्र हा तास फार आवडायचा.कवायत संपल्यावर खेळ सुरु व्हायचे. सरांची नजर चुकवून अरविंद हळुच  वर्गात आला. बाकावरचं आपलं दप्तर उचललं आणि  बाहेर पडला. कोणाची नजर आपल्याकडे जाउ नये म्हणून दबकत दबकतच घराकडे जायच्या रस्त्यावर आला . इतक्यात  त्याला कोपर्यावर दहावीतला परशा त्याच्या टवाळ मित्रांबरोबर उभा असलेला दिसला. “त्यांनी मला पाहीलं तर? मला चिडवायला सुरवात करतील” . कल्पनेनेच त्याला दरदरुन घाम फुटला. त्याच पावली तो माघारी वळाला आणि पटकन परत शाळेत शिरला. शाळेच्या मागील दरवाजाने जावे असा विचार करुन तो बाहेर पडला. “हुश्श,”  इथे मात्र कोणीच नव्हतं . तो घराकडे निघाला. तसंही घरी जायचा फार उत्साह त्याला असायचा असं नव्हतं. घरी जाउन तरी काय घरातलं सगळं काम केल्यशिवाय  खायला  मिळणार आहे का ? खरं तर कडकडून भुक लागली होती. घर म्हणजे तरी काय. त्याच्या डोळ्यासमोर चाळीतली त्याची छोटी खोली उभी राहीली. चाळीत  एकमेकांना लागून अनेक खोल्या होत्या.  त्या इतक्या लागून होत्या की शेजारच्या खोलीत कोणी हळु आवाजात जरी बोललं तरी स्पष्ट ऐकु येईल. त्यातल्याच एका खोलीत तो आजीबरोबर रहात होता.खरं म्हणजे घर असावं तर अनिकेत सारखं. अनिकेत  वर्गात त्याच्या शेजारी बसायचा.  एक दिवस अनिकेतबरोबर तो त्त्याच्या घरी गेला होता . त्याचं घर पाचव्या मजल्यावर होतं. लिफ्टमधून जायला मिळालं म्हणून अरविंद एकदम खुश झाला. त्याच्या घरी गेल्यावर तर हरखल्यासारखं झालं त्याला. एकदम चकाचक घर होतं अनिचं. मोठा टिव्ही, छान छान वस्तु शिवाय अनिला अभ्यासाकरता वेगळे टेबल पण होते. अनिच्या आईने  दोघांना  बसायला सांगितले  आणि गरम गरम पोहेही खायला दिले . त्या पोह्याची चव आत्ताही त्याला आठवली आणि तोंडात पाणी सुटलं. नाहीतर आपलं घर.



आजी आणि तो दोघंच रहायचे घरी.  वडील खूप दारु प्यायचे म्हणून वैतागून जाउन आईने तो लहान असतानाच  दुसरा घरोबा केला  आणि अरविंदला  आजीच्या  भरवशावर  सोडून तशीच  निघून गेली. त्यानंतर वडीलही या धक्क्यामुळे व व्यसनांमुळे लवकरच वारले.  नाइलाजाने अरविंदची जबाबदारी   आता आजीला घ्यावी लागली. या वयात कुठलीही जबाबदारी घेण्याची तिची तयारी नव्हती. त्यामुळे आजीची खूप चिडचिड व्हायची .त्याला सोडून त्याची आई निघून गेली याचा तिला राग होता. माझा मुलगा दारु पिउन तिच्यामुळेच मेला असं तिला वाटायचं. हा सगळा राग ती अरविंद वर काढायची. अरविंद नातु नसून  ‘तिचा’ मुलगा होता. त्याला घरातली सगळी कामं ती मुद्दाम  करायला लावायची, अगदी धुणं भांड्यापासून फरशी पुसण्यापर्यंत. कामं झाल्यावरच त्याला खायला द्यायची, तेही पोटभर नाहीच. तो कायम अर्धपोटीच असे. आजीच्या बोलण्यात प्रेमाचा लवलेशही नसायचा. बाकी कोणीच नातेवाईक नसल्याने अरविंदलाही आजीकडे राहण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आत्ताही त्याला खूप भुक लागली होती.  पण काही खायला मिळणार नाही हे त्याला माहीत होतं .  ‘त्या’  दिवसानंतर आजीच्या वागण्याबोलण्यातला उरला सुरला ओलावाही संपला होता. ‘त्या’च दिवसामुळे त्याला शाळेत जाणंही अवघड होउन बसलं होतं.

 'तो ' दिवस आजही त्याच्या नजरेसमोर उभा राहीला. ‘त्या’ दिवशी शनीवार होता. अरविंद शाळेतून लवकर घरी आला.  आताशा आपल्यात काहीतरी बदल होतोय हे त्याला जाणवायचं. त्याची उंची चांगलीच वाढली होती. वर्गातल्या त्याच्या काही मित्रांना मिशा फुटल्या होत्या, आवाज बदलला होता. मधल्या सुट्टीत किंवा  आॕफ पिरीयडला मुलं मोबाईलवर कसलीतरी फिल्म बघायची,हसायची, काहीबाही सांगायची, पुस्तकातली चित्रं एकमेकांना दाखवायची. सगळ्यांचं लक्ष आजकाल मुलींकडेच असे, त्यांच्याशी बोलायला कधी मिळेल याची संधी शोधत असायचे सगळेजण.मुलीही मुलांकडे सतत पहायच्या. बहुतेक सर्व मुलांची एकदम खास अशी मैत्रीण होतीच.  तिच्याबरोबर बागेत जाणं, गिफ्ट देणं, मेसेज पाठवणं हे प्रकार चालु असायचे. अरविंदला मात्र कोणीच मैत्रीण नव्हती. खरं सांगायचं तर  मुलींकडे पहावसं, त्यांच्याशी बोलावसंही नाही वाटायचं त्याला. असं का हे नाही समजायचं .पण बाकीच्या मुलांपेक्षा हे वेगळं होतं. मुलींचं आकर्षणच नाही वाटायचं त्याला. उलट उंच, धिप्पाड मुलं आवडायची ,त्यांच्याशी बोलावं, त्यांनी आपल्याकडे पहावं अशी  काहीतरी विचीत्र भावना त्याच्या मनात यायची. आजकाल  तर  त्याला लिपस्टिक लावावी,   मुलींसारखे कपडे घालावे, ओढणी घ्यावी असंही वाटायला लागलं होतं.  “ छे छे, हे बरोबर नाहीये”, तो झटकून टाकायचा, असे विचार आले की त्याला खूप अपराधी वाटायचं. हे काहीतरी वेगळं आहे हे त्याला समजत होतं पण याचा उच्चार करण्याची सोय नव्हती . हे कोणाला कळलं जरी असतं तरी वर्गातल्या मुलांनी त्याचं जीणं मुश्कील करुन टाकलं असतं. ‘ त्या ‘ दिवशीही शनीवार असल्याने तो शाळेतून लवकर घरी आला. घरी आजी नव्हती. कडी लाऊन ती  बहुतेक मंदिरात गेली होती. मंदिरात गेली की आजी लवकर यायची नाही.  आज तरी आल्या आल्या शिव्या खायला लागणार नाहीत या कल्पनेनी तो मनाशीच हसला.  घरी कोणीच नाहीये तर डान्स करुन बघावा का ? नाचायला खूप आवडायचं अरविंदला,  पण कधी संधी मिळत नसे.आजी नसल्याने त्याने पटकन ट्रंकेतून एक साडी शोधून  काढली. शोधताना एक  खूप जुनी लिपस्टिकही मिळाली.  कदाचित आईची असेल.  घरात कोणी नाही म्हणून हळुच ओठावर लिपस्टिक फिरवली,  कपाळावर टिकली लावली,दार लोटलं आणि डोक्यावर साडीचा पदर घेउन आवाज न करता नाच करायला सुरवात केली. बेभान होउन नाचत असतानाच दार उघडून आजी अचानक आत आली. अरविंदचा अवतार पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. “मुडदा बशीवला तुजा , ही कसली थेरं चाललीयात तुजी, अरं, तुजा बाप गेला मरुन आन आय गेली तुजी तुला माझ्या डोस्क्यावर बसवून अन तुजे हे धंदे?” आजी  जोरजोरात ओरडायला लागली. घरं लागून असल्याने चाळीतली माणसं खोलीजवळ जमा झाली. अरविंदचं बखोटं धरुन आजीने त्याला बाहेर आणलं आणि जी गोष्ट अरविंद लपवू पहात होता ती अशा  वाईट पध्दतीने लोकांसमोर आली. अरविंदला मेल्याहून मेल्यासारखं झालं.   आजीच्या तावडीतून त्याने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली  आणि पळत पळत दूरवरच्या देवीच्या देवळात शिरला. मंदिराच्या मागच्या आवारात मोठे वडाचे झाड होते. याआधीही अनेक वेळा तो इथं आला होता. झाडाखाली जाउन तो जोरजोरात रडायला लागला.  माझ्याच बाबतीत हे का होतंय?,  मी असा का झालोय? का मला मुलीसारखं रहायला आवडतं? का मला आई सोडून गेली? का? विचार करुन  करुन त्याचं डोकं भणभणायला लागलं.किती वेळ गेला कोणास ठाउक. पोटात भुकेने आग लागली होती पण आता घरी जाण्यात काही अर्थ नव्हता. जवळ पैसे नव्हते, काय करावं ते त्याला समजेचना. अंधार होईपर्यंत तो तिथेच बसुन राहीला.  मग मात्र हळुच बाहेर पडला पण कुठे जावं तेच कळेना. तसाच चालत राहीला  इतक्यात समोरुन एक तृतीयपंथी व्यक्ती त्याला येताना दिसली.साडी, कानात  झुमके, मोठ्ठी टिकली, हातात बांगड्या. शरीर पुरषाचं पण पेहराव मात्र स्त्रीचा. अरविंदची  अवस्था पाहून, “ क्या हुआ बेटा, सब ठीक है ना?” असं त्याने  प्रेमाने विचारलं. इतक्या मायेने बोलण्याची त्याला सवय नव्हती. ते प्रेमाचे शब्द ऐकून त्याला खूप रडू यायला  लागलं. अरविंदला  ती व्यक्ती जवळच्या टपरीवर घेउन गेली. “ ये लो बेटा, थोडा खा लो, अच्छा लगेगा” त्याच्या हातात वडापाव आणि चहा देउन ती व्यक्ती म्हणाली. आपल्याला खूप भुक लागली आहे हे वडापाव खाताना त्याच्या लक्षात आलं.  वडा व चहा संपेपर्यंत त्याने वर पाहीलं सुध्दा नाही. खाउन  अरविंदला खूप बरं वाटलं. “ चलो, मैं चलती हूं , मेरा नाम हसीना है, अब ठीक से घर जाना बेटा, चिंता मत करो, सब ठीक हो जायेगा”.  या शब्दांनी त्याचं मन थोडं शांत झालं.उशीराने अरविंद घरी पोचला.

पण त्या दिवसापासून त्याचं बाहेर पडणं मुश्कील होउन गेलं.  बाहेर पडला की “ए चिकने, ए जानेमन , चलती है क्या मेरे साथ” असे अचकट विचकट शेरे त्याला ऐकायला लागायचे.  शाळेतही ही गोष्ट समजायला वेळ लागला नाही.  वर्गातली मुलं,  मोठ्ठी मुलं येता जाता त्याला त्रास द्यायला लागली, मुली येताजाता  चिडवायच्या. दहावीचं वर्षं होतं पण  अभ्यासातलं त्याचं लक्ष उडालं होतं म्हणून शिक्षकही सारखे रागवत, घरातल्यांना घेउन ये भेटायला असं सांगत. घरात तर वेगळीच परिस्थिती . त्या दिवसापासून आजीने तर अरविंद कडे पूर्ण दुर्लक्ष केलं.  अरविंद बिचारा कुचंबुन गेला. त्याला कुठेच जावसं वाटेना. कित्येक वेळा शाळेत न जाता तो देवीच्या मंदिरातील वडाच्या झाडाखाली जाउन बसायचा. एकटं रहायला त्याला आवडायला लागलं होतं.देवीच्या मंदिरात गेलं की बर्याच वेळा हसीना भेटायची. भेटली की ती खूप प्रेमाने बोलायची, त्याला खाउ घालायची.  अरविंदला हसीना खूप आवडायला लागली. हळूहळू का होईना पण तो तिच्याशी मोकळेपणाने बोलायला लागला . एक दिवस हसीना त्याला आपल्या घरी घेउन गेली. एका वस्तीतल्या झोपडीत रहायची ती. पण आजुबाजुचे लोक तिला खूप मान देतात असं अरविंदला जाणवलं.  त्या दिवशी घरी नेउन हसीनाने स्वतः चिकन बनवले  आणि त्याला खायला घातले. खाताना अरविंदच्या डोळ्यातले पाणी थांबता  थांबेना.        “ देखो बेटा,  रोना नहीं. ये दुनिया ऐसीही है,कोई हमारा दुःख नही समझेगा, अपुनको ही उनके उपर हावी होना  चाहीये, उनकी बात नहीं सुननेका, जोरसे जवाब देनेका तोही चुप बैठते है ××, तुम मेरे साथ आ जाओ रहने के लिये, जो भी मिलेगा मिलकर हसीखुशी खा लेंगे”.  त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हसीना प्रेमाने म्हणाली. अरविंदला समाजात वावरण्याचा एक नविन धडा मिळाला.  अरविंदला कोणी मित्र नव्हते. अभ्यासात त्याचं मन लागत नव्हतं. घरी कोणी प्रेमाचं उरलं नव्हतं.तरीही हसीनाकडे जाण्यासाठी त्याचे मन तयार होत नव्हतं. हसीनाइतकं प्रेम, माया त्याला कोणीच दिलं नव्हतं.हसीनालाही एकेकाळी असाच त्रास दिला होता लोकांनी म्हणून ती अरविंदची कुचंबणा समजु शकत होती.    तिच्यासाठी  तिने  यावर एक उपाय शोधून काढला होता. ती लोकांशी बोलताना आक्रमक व्हायची, कोणी वेडंवाकडं बोललं तर मोठ्याने शिव्या घालायची. त्यामुळे तिच्या नादी  फारसं कुणी लागायचं नाही.  तिच्यासारख्या असणाऱ्या लोकांसाठी तिने एक संस्थाही सुरु केली. ते सगळेजण आठवड्यातून एक दिवस भेटून स्वतःच्या समस्यांवर चर्चा करायचे, एकमेकांच्या सहाय्याने  त्या सोडवायचा प्रयत्न करायचे. अरविंदला पाहून हसीना समजून चुकली होती की हा मुलगा आपल्यासारखाच आहे. पण त्याला स्वतःला हे समजणं व त्याचा स्विकार करणं आवश्यक होतं. हसीना त्यासाठी वाट पहायला तयार होती.
या वर्षभरात अरविंदचं शाळेत जाणं खूप कमी झालं होतं. शाळेत जाउन शिक्षकांचे ओरडणे, मुलांचे चिडवणे यामुळे त्याचं अभ्यासाकडे लक्षच लागायचे नाही. याचा परीणाम म्हणून आत्तापर्यंत झालेल्या कुठल्याच परीक्षेत  तो पास होउ शकला नाही.  परीणामी शाळेने दहावीसाठी बोर्डाचा फाॕर्म त्याला भरुच दिला नाही. अखेर अरविंदची शाळा पूर्ण बंद झाली. आता पुढे काय? हा प्रश्न आ वासुन पुढे उभा होता. आपण नक्की कोण आहोत, का आहोत या प्रश्नांची उत्तरे तो आपल्या परीने मिळवत होता. या जगात हसीना सोडली तर कोणीच त्याच्याशी नीट बोलत नव्हतं. अनिकेतशी आधी मैत्री होती पण त्या दिवसानंतर त्यानेही बोलणे सोडले. अरविंद अगदी एकटा पडला होता. अधूनमधून मंदिरात जाणे, हसीनाला भेटणे चालू होते.  हसीनाला भेटणे, बोलणे हा एकमेव विरंगुळ्याचा क्षण त्याच्या आयुष्यात उरला होता.

असाच एक दिवस मंदिरातून घरी जाण्यासाठी निघाला. अंधार झाला होता. परत येताना वाटेत परशा आणि त्याचे मित्र रस्त्यात उभे असलेले त्याने पाहीले. त्याने रस्ता बदलला पण तरीही परशाचे लक्ष त्याच्याकडे गेलेच. “ अरे, तो बघ चिकना आला”. त्याच्या बोलण्यावरून त्याने दारु प्यायली आहे हे अरविंदच्या लक्षात आले. “ ए, रुक ना चिकने”, बाकीची मुलेही ओरडायला लागली. अरविंद घाबरला.  तो वेगात चालायला लागला. परशा व  त्याचे मित्र त्याचा पाठलाग करु लागले. अखेर त्यांनी त्याला गाठलेच. “ चल ना हमारे साथ, मजा करेंगे”. त्यांच्या या बोलण्यामागचा अर्थ अरविंदला समजायला वेळ लागला नाही.” नहीं, मुझे घर जाना है, आजी अकेली है” पण दारुच्या अंमलाखाली असलेल्या परशाने त्याला पकडले, जबरदस्तीने त्याला जवळच्या झाडीत फरफटत न्यायला सुरवात केली. सुटण्यासाठी अरविंद धडपडू लागला, ओरडायला लागला पण ५/६ मुलांसमोर त्याचं काही चालेना. जीवाच्या आकांताने अरविंद ओरडायचा प्रयत्न करत होता पण कोणीतरी त्याचे तोंड दाबून धरले. इतक्यात समोरुन एक गाडी आली. गाडीच्या उजेडाने अरविंदवरची त्यांची पकड सैल झाली. अरविंदने जोरात हिसडा मारला आणि जोरात पळायला सुरवात केली. कसाबसा चाळीतल्या घरी पोचला तेव्हा त्याला श्वासही घेता येत नव्हता.  आजी शांतपणे झोपली होती. आज मोठ्या संकटातून नशीबाने तो वाचला होता. पण उद्या ? कोण वाचवेल आपल्याला? रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सारखा धसक्याने जागा होत होता.  रात्रभरात त्याने एक निर्णय घेतला. दुसर्या दिवशी  सकाळी उशीरा उठला. आजी ओरडत होती. तिच्याकडे लक्ष न देता त्याने एका पिशवीत आपले कपडे भरले, आजीला नमस्कार केला आणि तो मंद हसत आजीच्या घराबाहेर पडला..हसीनाकडे जाण्यासाठी.

@ सौ. अंजली जोगळेकर.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा